वैभव तयार आहे पण जग त्याच्यासाठी तयार आहे का? 15 वर्षांच्या या फलंदाजाच्या यशाचं गणित काय सांगतं?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.
    • Author, आनंद वासू
    • Role, क्रिकेट लेखक
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेलं आयपीएल शनिवारी (28 मार्च) सुरू होत आहे. या स्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर तर लक्ष असेलच, परंतु एका तरुण किंवा टीनएजर खेळाडूवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

आयपीएल सुरू होण्याच्या अवघ्या एका दिवस आधी म्हणजे 27 मार्च रोजी, राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी 15 वर्षांचा झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, वैभव क्रिकेट करिअरच्या मोठ्या टप्प्यासाठी तयार आहे का?

सूर्यवंशीनं 3 वर्षांपूर्वीच म्हणजे जेव्हा तो अवघ्या 12 वर्षांचा होता तेव्हाच लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी तो त्याच्या वडिलांच्या वयाच्या गोलंदाजांना आत्मविश्वासाने सामोरा गेला होता.

त्यानंतर त्याच्या फलंदाजीचे कौशल्य, सातत्य आणि अत्यंत वेगाने धावा काढण्याची त्याची भूक वाढतच गेली.

सूर्यवंशी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करतो. तो चांगल्या चेंडूसाठ वाट पाहत बसत नाही, तर लगेच हल्ला चढवतो. त्याची फलंदाजी इतकी सुंदर आहे की, अनेकांनी त्याची तुलना महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांच्याशी केली.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

सचिन तेंडुलकरचा विक्रम टप्प्यात, पण...

2020 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलनं (आयसीसी) 'खेळाडूंच्या सुरक्षेसाठी' किमान वयाची नियमावली जाहीर केली. अगदी अंडर-19 स्तरावरही त्याबाबत स्पष्ट संदेश होता. तो म्हणजे 15 वर्षांखालील कोणालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची परवानगी नाही.

आयसीसीने पहिल्यांदाच किमान वयाची नियमावली ठरवली होती. यापूर्वी पाकिस्तानच्या हसन रझाने 14 वर्षे आणि 227 दिवसांचा असतानाच 1996 मध्ये कसोटीमध्ये पदार्पण केले होते. आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण करणारा तो सर्वात तरुण पुरुष खेळाडू ठरला होता.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, सूर्यवंशीने 3 वर्षांपूर्वीच म्हणजे जेव्हा तो अवघ्या 12 वर्षांचा होता तेव्हाच त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हसन रझाचा विक्रम अजूनही कायम आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 16 वर्षे आणि 205 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. सूर्यवंशीसाठी हा टप्पा पार करणं आता अशक्य नाही.

याबाबत भारताच्या निवड समितीनंही फार वाट पाहिली तर आश्चर्य वाटू शकतं. तेंडुलकरनंतर अनेक तरुण प्रतिभावान क्रिकेटपटूंना लवकर संधी मिळाली, पण अनेकजण एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी तयार नसल्याचं दिसून आलं.

पण सूर्यवंशीचं तसं नाही. उलट तो भारतीय संघासाठीच तयार झालाय असं वाटतं.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 2023 मध्ये सूर्यवंशीच्या झपाट्यानं मिळालेल्या यशासाठी त्याच्या टॅलेंटसह नशीबाचीही मोलाची साथ होती.

पाऊस ठरला टर्निंग पॉइंट

चंदिगडमध्ये विनू मंकड ट्रॉफीचा सामना सुरू होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ही देशांतर्गत अंडर-19 स्पर्धा होती. यात एक निवडकर्ते थिलक नायडू यांना सामना पाहण्यासाठी आले होते. पण पाऊस पडल्यामुळं सामना रद्द झाला.

तेव्हा नायडू यांच्याकडं वेळ होता. त्यांनी बिहारच्या एका मुलाबद्दल ऐकलं होतं. त्यामुळं ते दुसरीकडं सुरू असलेला सामना पाहण्यासाठी गेले.

नायडूंनी मोकळ्या वेळात दुसरीकडे जाण्याचा घेतलेला निर्णयच टर्निंग पॉइंट ठरला. त्या सामन्यात किशोरवयात पाऊलही न टाकलेल्या वैभवनं 76 चेंडूत 86 धावा केल्या.

फोटो स्रोत, ICC via Getty Images

फोटो कॅप्शन, वैभव सूर्यवंशी आयसीसी अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत आहे.

त्याच्या या खेळीने बिहारला आसामवर विजय मिळवता आला होता. वैभवची फलंदाजी एवढी प्रभावी ठरली की, त्याचं क्रिकेट करिअर फास्ट ट्रॅकवर आलं.

सूर्यवंशीच्या क्षमतेबद्दल नायडूंना खात्री होती. आणखी काही अर्धशतकांनी त्यानं क्षमता सिद्ध केली होती. त्यामुळे त्याला लवकर संधी मिळाली.

तत्पूर्वी नायडू यांनी बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी वैभव सूर्यवंशीबद्दल चर्चा केली.

प्रत्येक टप्प्यावर सूर्यवंशीला लय सापडत गेली, त्यानं स्वतःला व्यवस्थित जुळवून घेतलं.

नोव्हेंबर 2023 मध्ये अंडर-19 चॅलेंजर ट्रॉफीत वैभवने खोऱ्याने धावा काढल्या. त्यानंतर त्याच महिन्यात झालेल्या चौरंगी मालिकेतही त्याने हाच फॉर्म कायम ठेवला. तिथे तो भारताच्या अंडर-19 संघाकडून इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात खेळला.

पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार

त्याची खरी मोठी कामगिरी मात्र एक वर्षानंतर दिसून आली. ऑक्टोबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटीसाठी त्याची निवड झाली. त्या सामन्यात त्याने अवघ्या 58 चेंडूत शतक ठोकलं. या अभूतपूर्व खेळामुळे त्याची स्वतःची मोठी ओळख निर्माण झाली.

त्यावेळी आयपीएल हा त्याच्यासाठी आणखी खूप मोठा टप्पा आहे, असं काही लोकांचं मत होतं. तो अजून शिकत असताना एवढ्या लवकर जगातील सर्वोत्तम खेळाडूंना सामोरे जाणं त्याच्यासाठी फायद्यापेक्षा नुकसानदायक ठरू शकतं, असं मत होतं.

पण, 2025 च्या हंगामात सूर्यवंशीने या सर्व शंका दूर केल्या. त्याने अनुभवी शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आयपीएलमध्ये जोरदार सुरुवात केली.

राजस्थान रॉयल्सने 13 वर्षांच्या मुलावर केलेल्या सुमारे 1.3 लाख डॉलर्सच्या (त्यावेळच्या मुल्यानुसार 1.10 कोटी भारतीय रुपये) गुंतवणुकीचे मूल्य त्याने सिद्ध केले. गुजरात टायटन्सविरुद्ध केवळ 35 चेंडूत शतक ठोकत तो अशा स्पर्धांतील वरिष्ठ क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर ठरला.

फोटो स्रोत, MB Media/Getty Images

फोटो कॅप्शन, क्रीजवर आल्यानंतर सूर्यवंशी नैसर्गिकरित्या आक्रमकपणे खेळतो.

तरीही एक शंका होती. काही लोक म्हणत होते की, आयपीएल ही फक्त देशांतर्गत स्पर्धा आहे. प्रभावी असली तरी अंतिम कसोटी नाही. त्यामुळे 2026 च्या सुरुवातीला झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही सूर्यवंशीवर सर्वांची नजर होती.

तोपर्यंत भारताने नियम कडक केले होते. वय कितीही कमी असलं तरी खेळाडूला या स्पर्धेत फक्त एकच संधी दिली जात होती.

यामागचा उद्देश स्पष्ट आहे, वयाबाबत होणारी फसवणूक थांबवणं, दर्जा वाढवणं आणि खेळाडू लवकर नव्हे तर पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरतील याची खात्री करणं.

अंडर-19 वर्ल्डकपमध्ये तडाखेबाज फलंदाजी

सूर्यवंशीने लीग टप्प्यात 72, 40, 52 आणि 30 धावा केल्या आणि भारताने नॉकआउट फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 33 चेंडूत 68 धावांची जोरदार खेळी केली.

पण खरी कमाल त्याने फायनलमध्ये केली, इंग्लंडविरुद्ध त्याने सर्वोत्तम खेळ दाखवला. त्याने 32 चेंडूत अर्धशतक आणि 55 चेंडूत शतक पूर्ण केले. शेवटी सूर्यवंशीने केवळ 80 चेंडूत 175 धावा केल्या, त्यात 15 षटकार आणि 15 चौकार होते.

तोपर्यंत सूर्यवंशीला वयोगट स्तराच्या स्पर्धांमध्ये अगदी त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या खेळाडूंविरुद्ध खेळवू नये, अशी मागणी शिगेला पोहोचली होती.

त्याची पातळी इतरांपेक्षा खूपच वरची होती. परंतु, आयसीसीच्या नियमांमुळे भारताला त्याला अजून वरिष्ठ संघात घेता येत नव्हतं.

माजी क्रिकेटपटूंमध्ये त्याच्याबद्दल आश्चर्य आणि अविश्वास, अशा दोन्ही प्रतिक्रिया होत्या.

रवी शास्त्री म्हणाले, "या वयात सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली किती चांगले होते? हा मुलगा इतक्या लहान वयातच इतका चांगला असेल, तर तो चार दिवसांच्या सामन्यांमध्ये का खेळू शकत नाही?"

'27 मार्च 1994 टीम इंडियासाठी खास'

एबी डिव्हिलियर्सने म्हटलं की, सूर्यवंशी वयाच्या तुलनेत खूपच समजूतदार आणि प्रगल्भ आहे. तर मॅथ्यू हेडनने त्याच्या आयपीएल शतकाला 'स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी क्षण' असं म्हटलं.

डब्ल्यूव्ही रमण सूर्यवंशीच्या 'धडाकेबाज आणि रोमांचक खेळाने' खूप प्रभावित झाले. तर सचिन तेंडुलकरने त्याच्या 'निर्भय खेळाची, बॅटची वेगवान हालचाल, चेंडू लवकर ओळखण्याची क्षमता आणि जोराने फटका मारण्याच्या ताकदीची' खूप प्रशंसा केली.

आता 27 मार्च 2026 ला वैभवच्या वाढदिवशी प्रश्न बदलला. तो तयार आहे का असं नाही, तर सगळं जग त्याच्यासाठी तयार आहे का? हा खरा प्रश्न ठरतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एबी डिव्हिलियर्सने म्हटलं की, सूर्यवंशी आपल्या वयापेक्षा खूपच समजूतदार आणि प्रगल्भ आहे.

ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आधीपासूनच खास आहे.

1994 मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे मोहम्मद अझरुद्दीनने सचिन तेंडुलकरला ओपनिंगला पाठवलं होतं.

तेंडुलकरने या सामन्यात 49 चेंडूत 82 धावा केल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही.

त्यानंतर सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून वनडेमध्ये 15,310 धावा केल्या, त्याची सरासरी 48.29 होती. त्याच्या 49 शतकांपैकी केवळ चार वगळता उर्वरित सर्व शतके त्याने सलामीला येऊनच केली आहेत.

27 मार्च 1994 हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी टर्निंग पॉइंट ठरला, असं म्हणायला हरकत नाही.

आता 32 वर्षांनंतर आणखी एक मोठा टर्निंग पॉइंट पाहायला मिळावा अशी आशा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)