नालासोपाऱ्यात केरला स्टोरी-2 नंतर भर चित्रपटगृहात दिलेल्या शपथेमुळे वाद; 'सर्व व्यवहार केवळ हिंदूंसोबतच' करण्याची प्रतिज्ञा

फोटो कॅप्शन, नालासोपाऱ्यात केरळा स्टोरी - 2 च्या स्क्रीनिंगनंतर हिंदूना दिली शपथ
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

सकल हिंदू समाज व हिंदू जागरण मंच यांच्यामार्फत नालासोपारा पीव्हीआर कॅपिटल मॉल येथे 5 मार्च रोजी केरला स्टोरी टू चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदूंवर होणारे अत्याचार आणि धर्मांतर विरोधात चित्रपट प्रदर्शनानंतर हिंदूंव्यतिरिक्त कुणाशीही व्यवहार न करण्याची तसेच, गैर हिंदूंशी मैत्रीदेखील करणार नाहीत अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. या प्रतिज्ञेचे व्हीडिओ सोशल मीडियावर देखील फिरत आहेत.

एक फुटकी कवडी देखील इतर कुणा समुदायाला जाऊ दिली जाणार नाही.

'भाजी घ्यायची तर हिंदूंकडूनच घ्या, केस देखील कापायचे तर हिंदूंकडूनच कापून घ्या,' अशी प्रतिज्ञा या चित्रपटावेळी उपस्थित असलेल्यांना देण्यात आली.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली. विशिष्ट समुदायाकडून कशाप्रकारे हिंदूंवर आक्रमण केलं जातंय आणि विविध ठिकाणी कशी परिस्थिती आहे यावर भाष्य केलं.

धर्मांतर आणि अत्याचार या विरोधात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी इतर धर्मीयांसोबत व्यवहार न करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेतली.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

दरम्यान, या घटनेचा व्हीडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

चित्रपटाला आलेल्या महिलांनी काय म्हटले?

चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या महिलांचे प्रतिक्रिया एका व्हीडिओत दिसत आहेत.

या महिलांनी म्हटले की घरातील मुला-मुलींनी आपण आपल्या धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे संस्कार दिले पाहिजेत. इतर धर्मीयांशी त्यांची मैत्री होऊ देता कामा नये.

फोटो स्रोत, Alpesh Karkare

फोटो कॅप्शन, केरळा स्टोरी - 2 च्या स्क्रीनिंगवेळी देण्यात आली शपथ

आपल्या धर्माचे पालन कसे करायचे हे त्यांना शिकवले गेले पाहिजे अशा प्रतिक्रिया यावेळी आलेल्या महिलांनी दिल्या.

काही पदाधिकारी असे सांगताना दिसत आहेत की, हिंदूंची खोटी नावे धारण करुन, टिळा लावून, हिंदू असल्याचे भासवून मैत्री केली जाते.

आणि मुलींना जाळ्यात ओढले जाते. त्यामुळे सर्वांनी सावध राहावे, अनोळखी लोकांशी मैत्री करू नये, त्यातून प्रेम प्रकरणे आणि लग्नाची देखील प्रकरणे होतात असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेवर काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली?

या पार्श्वभूमीवर हा दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि देशाचा संविधान न मानण्याची कृती असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

यासंदर्भात मौलाना आझाद विचार मंचाचे अध्यक्ष आणि माजी खासदार, माजी मंत्री हुसेन दलवाई म्हणाले की, "देशात हिंदू-मुस्लीम करणं हे चुकीचं आहे. असे कृत्य करणाऱ्या विरोधात हे सरकार काही करत नाही याची खंत आहे. हे सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देतं.

"ही घटना आपल्या संविधानाच्या विरोधात आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करायला हवी. द्वेष पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे," असं दलवाई म्हणाले.

फोटो कॅप्शन, नालासोपाऱ्यात दिली शपथ

मुजफ्फर हुसेन, काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष व माजी आमदार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "अशाप्रकारे एखाद्या समाजाविरोधात प्रतिज्ञा करण ही चुकीचे आहे. देशाच्या घटनेबद्दल यांना काही देणंघेणं नाही. अप्रत्यक्षपणे या सगळ्या लोकांनी त्यांच्या या कृतीतून दाखवून दिलंय आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानत नाही.

"देशात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. आता पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे त्या दृष्टीने उजव्या विचारसरणीचे लोक हे सगळं करत आहेत. केरळ आणि इतर राज्यांचे इलेक्शन आहेत त्या दृष्टीने अशा चित्रपटांचा आयोजन करून द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे."

फोटो स्रोत, Alpesh Karkare

फोटो कॅप्शन, नालासोपाऱ्यात चित्रपटानंतर प्रतिज्ञा घेण्यात आली

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डॉ. सय्यद नासिर हुसैन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "पालघरमधील वसई येथे 10 मार्च रोजी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या मोफत प्रदर्शनानंतर, उपस्थितांनी मुस्लिमांवर आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकण्याची सामूहिक शपथ घेतल्याचं वृत्त आहे.

भाजप सरकारच्या काळात प्रचारकी कथानकांना सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळे मुस्लिमांना अधिकाधिक लक्ष्य केले जात असून जातीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे. जेव्हा संपूर्ण समाजाला कलंकित करण्यासाठी सिनेमाचा राजकीय साधन म्हणून वापर केला जातो, तेव्हा पूर्वग्रहाचे संघटित भेदभावात रूपांतर होण्याचा आणि मुस्लीमविरोधी भावनांना अधिक बळ मिळण्याचा धोका असतो.

भारताची लोकशाही मूल्य ही धर्मनिरपेक्षता, समानता आणि बंधुत्वावर दृढपणे आधारलेली आहेत. कोणत्याही समाजावर आर्थिक किंवा सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन हे भारतीय संविधानाच्या मूळ प्रतिमेलाच धक्का देणारे आहे. आपल्या प्रजासत्ताकाचे बहुलवादी व सर्वसमावेशक स्वरूप जपण्यासाठी ते ठामपणे नाकारलेच पाहिजे."

फोटो स्रोत, Alpesh Karkare

यासंदर्भात या चित्रपट उपक्रमाचे आयोजक आणि हिंदू जागरण मंच समन्वयक राकेश जोशी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "भारतात हिंदू विरोधात अत्याचार होत आहेत, मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहेत याचं वास्तव दाखवण्यासाठी आणि हिंदू समाजात जनजागृती व्हावी या दृष्टीने आम्ही या चित्रपटाचे आयोजन केले होते.

"निवडणूक, द्वेष असे आरोप कोणी करत आहेत, त्याला अर्थ नाही. धर्मांतर आणि हिंदूंवर अत्याचार होऊ नये हा आमचा मूळ उद्देश आहे. आमच्या या कार्यक्रमासंदर्भात कोणीही तक्रार केलेली नाही."

नालासोपारा आचोळे पोलिसांशी या घटने संदर्भात संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही, त्यामुळे काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. कोणाचं काही म्हणणं असेल तर त्यांनी आम्हाला कळवावे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.