You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डायनासोर, तोही एक फुटाचा! संशोधकांना त्याच्या कवटीतून कोणतं रहस्य गवसलं?
- Author, सोफी अब्दुल्ला आणि पॉला अडामो इडोएटा
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- वाचन वेळ: 5 मिनिटे
स्पेनच्या उत्तर भागातील संशोधकांनी कोंबडीच्या आकाराची डायनासोरची एक नवीन प्रजाती शोधली आहे. नेहमीपेक्षा अतिशय लहान, बारीक हाडांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी या प्रजातीचा शोध लावला आहे.
या नवीन प्रजातीला 'फोस्किया पेलेंडोनम' असं नाव देण्यात आलं आहे.
डायनासोरची ही प्रजाती पृथ्वीवर जवळपास 12.5 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होती असं मानलं जातं. ही प्रजाती नामशेष झालेल्या ऑर्निथोपॉड्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या शाकाहारी डायनासोरच्या गटाशी संबंधित आहे.
डायनोसोरच्या या प्रजातीचा आकार लहान असूनही, संशोधनातून समोर आलं की त्यांची कवटी अनपेक्षितपणे विकसित झाली होती.
पेनेलोप क्रुझाडो-काबालेरो, स्पेनमधील ला लागुना विद्यापीठातील जीवाश्मशास्त्रज्ञ आहेत. पेनेलोप म्हणतात, "त्यांची शरीररचना अशाप्रकारे विचित्र स्वरुपाची आहे की ती आपल्याला सजीवांच्या उत्कांतीच्या उतरंडीचा किंवा इतिहासाचा पुनर्विचार करायला भाग पाडते."
पॉल-एमिल डियुडोने, अर्जेंटिनामधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ नेग्रोमध्ये जीवाश्मशास्त्रज्ञ आहेत. ते या प्रकल्पावर 2013 पासून काम करत आहेत. पॉल यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय टीमनं केलेल्या संशोधनानुसार, सापडलेले जीवाश्म किमान पाच वेगवेगळ्या जीवांचे आहेत.
डीयुडोने यांनी बीबीसीला सांगितलं, "मी असं म्हणेन की या शोधामधील सर्वात रंजक बाब म्हणजे यातून असं दिसून येतं की अजूनही बरेच जीवाश्म सापडायचे आहेत. त्यातील बहुतांश जीवाश्म छोट्या डायनासोरची असतील."
"आपण विचार केला होता, त्यापेक्षा छोटे डायनासोर खूप अधिक वैविध्यपूर्ण होते. आपल्याला माहित असलेल्या बहुतेक गटांची उत्पत्ती छोट्या डायनासोरपासूनच झाली असावी. कालांतरानं हे डायनासोर आकारानं मोठे होत गेले, असं झालं असण्याची शक्यता आहे," असं ते पुढे म्हणाले.
छोटे डायनासोर सापडणं अधिक कठीण
डियुडोने नमूद करतात की, छोट्या डायनासोरचे अवशेष अधिक नाजूक असतात. तसंच, त्यांचा शोध घेणंदेखील अधिक कठीण असतं. ते म्हणाले, "दुर्दैवानं, छोटे अवशेष खूप जास्त प्रमाणात विखुललेले असतात. काही छोटी हाडं असलेले गाळ अधिक सहजपणे नाहीसे होतात."
कोएन स्टाईन, बेल्जियममधील फ्री युनिव्हर्सिटी ऑफ ब्रसेल्समधील जीवाश्मशास्त्रज्ञ आहेत. ते या अभ्यासाचे सह-लेखक आहेत. कोएन यांच्या मते, हा डायनासोर आकारानं तुलनेनं खूपच छोटा होता.
त्याची उंची 25 ते 30 सेंटीमीटरदरम्यान असावी असा अंदाज आहे. हा आकार इतका लहान आहे की त्याची तुलना कोंबडीच्या आकाराशी केली जाऊ शकते.
कोएन स्टाईन यांनी, आतापर्यंत समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे बीबीसीला सांगितलं की, "मला वाटतं की आपण खात्रीनं असं म्हणू शकतो की युरोप खंडात आढळलेल्या कदाचित हा सर्वात छोटा डायनासोर नसला तरीदेखील सर्वात छोट्या डायनासोरपैकी एक आहे. तसंच तो एकूणच जगभरातील सर्वात छोट्या डायनासोरपैकी एक असू शकतो."
जीवाश्मांच्या छोट्या आकारातून असं दिसून आलं की ते डायनासोर कदाचित पूर्ण प्रौढ नसावेत, तुलनेनं लहान असावेत. मात्र पुढील विश्लेषणातून त्याच्या उलट बाब समोर आली.
स्टाईन म्हणाले, त्यातील किमान एक डायनासोर प्रौढ होता. लहान किंवा किशोरवयीन असताना ते डायनासोर कदाचित चार पायांवर चालत असावेत. मात्र प्रौढ झाल्यावर ते अधिक द्विपाद झाले म्हणजे दोन पायांवर अधिक चालू लागले.
फोस्किया हा सर्वात जुना ज्ञात रॅबडोमॉर्फ आहे. तो ऑर्निथोपॉड्समधीलच एक गट आहे.
रॅबडोमॉर्फ "कदाचित सुरुवातीपासूनच खूपच छोटे होते." त्यामुळे त्यांना "भक्षकांपासून बचाव करणं शक्य झालं असावं," असं डियुडोने यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "छोटा आकार, लांब अंतर धावण्यासाठी अनुकूल नसतो. मात्र तो पटकन लपण्यासाठी जागा शोधण्यास अधिक अनुकूल असतो."
अनेक दशकांपासून सुरू असलेला शोध
बहुतांश जीवाश्म 1998 मध्ये सापडले होते. तर त्यानंतर काही वर्षांमध्ये त्याच ठिकाणाहून आणखी काही जीवाश्म सापडले. मात्र त्यांची ओळख पटवण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागला.
ज्या व्यक्तीनं ही अवशेषांची जागा शोधली आणि ज्यानं बहुतांश अवशेष गोळा केले, ती व्यक्ती होती, फिडेल टॉर्सिडा फर्नांडेस-बाल्डोर. ते या अभ्यासाच्या सह-लेखकांपैकी एक आहेत. ते स्पेनच्या उत्तर भागातील डायनासोर म्युझियम ऑफ सालास दे लॉस इन्फंटेसमध्ये काम करतात.
"सुरुवातीपासूनच, आम्हाला माहित होतं की ही हाडं त्यांच्या छोट्या आकारामुळं अतिशय अपवादात्मक आहेत," असं टॉर्सिडा फर्नांडेस-बाल्डोर म्हणाले.
संशोधकांचं म्हणणं आहे की, ऑर्निथोपॉड डायनासोरची उत्क्रांती समजून घेण्यासाठी फोस्कियाचा शोध महत्त्वाचा आहे. फोस्किया हे नाव प्रकाशासाठी असणाऱ्या प्राचीन ग्रीन शब्दावरून आलं आहे.
"एखादा जीव आकारानं छोटा असणं, म्हणजे उत्क्रांतीमध्येही तो साधा असेल, त्यात गुंतागुंत नसेल असं नाही," असं मार्कोस बेसेरा म्हणतात. ते या अभ्यासाचे सह-लेखक आहेत. ते अर्जेंटिनातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोर्दोबामधील जीवाश्मशास्त्रज्ञ आहेत.
फोस्कियाच्या दातांची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण होती. त्यांचे पुढचे दात पुढे आलेले होते. "जणूकाही एखादा मोठा त्रिशूळ मध्यभागी ठेवण्यात आला असावा," असं डियुडोने यांनी नमूद केलं.
स्टाईन यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या 'काहीशा चमत्कारिक' किंवा वेगळ्या दातांव्यतिरिक्त, त्यांची 'कवटी आणि चेहऱ्याच्या हाडांची रचना, तसंच त्यांची वैशिष्ट्यं रंजक' होती.
ते पुढे म्हणाले, "उक्रांती होत असताना, निसर्गात झालेल्या अनेक प्रयोगांचं हे आणखी एक उदाहरण आहे."
डायनासोरची कवटीतून काय माहिती समोर आली?
यापूर्वीचं संशोधन, 2016 मध्ये प्रकाशित झालं होतं. त्यात या जीवाश्मांना डायनासोरच्या वेगागेट ऑर्निथोपॉड प्रजातीशी तात्पुरतं जोडण्यात आलं होतं. मात्र त्यांची औपचारिकपणे ओळख पटवण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती.
या ताज्या संशोधनातील एक महत्त्वाची प्रगती म्हणजे कवटीच्या तुकड्यांसह कवटीच्या विविध भागांची ओळख पटवणं. यामुळे या वेगागेट ऑर्निथोपॉड डायनासोरची ओळख पटवणं आणि त्यांना औपचारिकपणे, फोस्किया पेलेंडोनम हे नाव देता येणं शक्य झालं.
"सर्वसामान्यपणे, सजीवांमध्ये शरीराबद्दल सर्वाधिक माहिती देणारा अवयव म्हणजे कवटी. त्यातून आपल्याला चावण्याची किंवा चघळण्याची प्रक्रिया, दृष्टी आणि शरीराचा तोल साधणं या गोष्टीबद्दल माहिती मिळते," असं डियुडोने यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, एखादा प्राणी ज्या पर्यावरणात राहत असतो, त्यामधील त्याच्या गरजांनुरुप त्या प्राण्याच्या डोक्याचा आकार विकसित झालेला असतो. "त्यामुळे ही कवटीची हाडं कितीही छोटी असली आणि तुकड्या तुकड्या विभागलेली असली, तरीदेखील त्यातून आपल्याला, तो प्राणी कसा जगत होता, त्याचं वर्तन कसं होतं, सवयी काय होत्या, याबद्दल खूप माहिती मिळते."
ते म्हणाले, "ते प्राणी कसे वाढले, कसे जगत होते, त्यांचा मृत्यू कसा झाला आणि उक्रांतीमध्ये त्यांचा विकास कसा झाला, या गोष्टींचा शोध घेण्यासाठी या पैलूंची नोंद करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून भूतकाळात बदलत्या वातावरणात जीवन कशाप्रकारे सतत बदल गेलं, हे आपल्याला समजू शकेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)