You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ज्यांच्या पुनरागमनासाठी चाहत्यांची अभूतपूर्व गर्दी ते BTS कोण आहेत? ते एवढे लोकप्रिय कसे झाले?
- Author, जाह्नवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जगप्रसिद्ध कोरियन बॉय बँड 'बीटीएस'ने आज (21 मार्च) त्यांच्या नवीन म्युसिक अल्बमसह पुनरागमन केलं. दक्षिण कोरियाची राजधानी सोलच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात त्यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चाहते मोठ्या संख्येने जमले होते.
मनोरंजन कंपनी HYBE च्या मते, ग्वांगह्वामुन स्क्वेअर येथे झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे 1 लाख 4 हजार लोकांनी हजेरी लावली. येथे बीटीएसच्या 7 के-पॉप स्टार्स - आरएम, जिन, सुगा, जे-होप, जिमिन, व्ही आणि जंग कूक यांनी ऑक्टोबर 2022 नंतर पहिल्यांदाच एकत्र सादरीकरण केलं.
14 व्या शतकातील एका राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात रंगलेल्या या कार्यक्रमात बँडने आपल्या नव्या 'आरिरांग' (Arirang) या अल्बममधील गाणी सादर केली. हा अल्बम शुक्रवारी (20 मार्च) दुपारी प्रदर्शित झाला.
मात्र, बीटीएस नेमके कोण आहेत? ते एवढे लोकप्रिय कसे झाले? जाणून घेऊयात
बीटीएस कोण आहेत?
तुम्ही के-पॉप म्हणजे कोरियन पॉप म्युझिकचे चाहते असाल किंवा नसाल, सोशल मीडियावर बीटीएसविषयी तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल.
बीटीएसचं पूर्ण नाव आहे बँग्टन सोनियोंदन (Bangtan Sonyeondan) म्हणजे बुलेटप्रुफ बॉय स्काऊट्स. 'बँग्टन बॉईज' नावानंही ते ओळखले जातात.
या बँडमध्ये सात सदस्य आहेत - जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, व्ही आणि जुंगकुक. या सात जणांची निवड बांग सीह्यूक या एका संगीतकारानं ऑडिशन्समधून केली होती.
2010 साली या ग्रुपची स्थापना झाली आणि 2013 साली त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला. तेव्हापासूनच ते लोकप्रिय होऊ लागले, आणि कोरियापाठोपाठ जपान आणि इतर आशिया देशांमध्ये BTSची चर्चा होऊ लागली.
गेल्या काही वर्षांत तर आशियाबाहेर जगभरात, अगदी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत बीटीएसनं धुरळा उडवून दिला. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली.
अमेरिकेत बीटीएसनी आशियाई वंशाच्या नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या वर्णद्वेष आणि त्रासावरही भाष्य केलं.
यंदा आयएफपीआय या संगीतक्षेत्रातल्या नावाजलेल्या संस्थेनं बीटीएसला ग्लोबल रेकॉर्डिंग आर्टिस्ट ऑफ द इयर म्हणून नावाजलं.
जगभरात त्यांचे चाहते बीटीएस आर्मी म्हणून ओळखले जातात.
BTS एवढे लोकप्रिय का झाले?
एक म्हणजे मुळातच कोरियन पॉपची लोकप्रियता वाढली आहे. त्यातलं संगीत, गायन, नृत्य यात नाविन्य आहे. हटके स्टाईल, जोरदार मार्केटिंग आणि पैशाच्या जोरावर के पॉपची, आणि त्यातल्या त्यात बीटीएसची क्रेझ जगभरात पसरली.
पॉप, हिपहॉप, ऱ्हिदम अँड ब्लूज अशा मिश्र संगीतामुळे आणि खास डान्स रुटिन्समुळेही हा बँड ओळखला जातो.
अवघ्या विशीतल्या तरुणांचा हा ग्रुप जगभरात तरुणाईच्या मनाला भिडू लागला. यामागचं आणखी एक कारण म्हणजे, बीटीएसने निवडलेले विषय. तरुणांच्या मानसिक आरोग्यापासून ते राजकारणापर्यंत, वेगवेगळ्या विषयांवर ते आपली मतं परखडपणे मांडत असतात.
बीटीएस सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सतत जोडलेले राहतात. सोशल मीडियावरचा त्यांचा वावर काहीसा विनम्र असा असतो, जे इतर सेलिब्रिटीजच्या तुलनेत उठून दिसतो. अनेकांना त्यांच्यात स्वतःचं प्रतिबिंबही दिसतं.
काही काळापूर्वी या बँडनं काही काळासाठी आपण विश्रांती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. यावेळेस बँडचे काही सदस्य वैयक्तिक प्रोजेक्ट्सवर काम करणार आहेत, असंही सांगण्यात आलं. ती घोषणा झाल्यावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हे सातही स्टार्स दक्षिण कोरियातील सक्तीच्या लष्करी सेवेत दाखल झाले होते. ही लष्करी सेवा कशी असते, जाणून घेऊया.
सक्तीची लष्करी सेवा कशी असते?
काही काळापूर्वी भारतात अग्निपथ योजना लागू झाली, तेव्हा कोरियातल्या सक्तीच्या लष्करी सेवेचा दाखला अनेकांनी दिला होता.
दक्षिण कोरियात सर्व शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषांना वयाच्या तिशीपर्यंत राष्ट्रीय लष्करी सेवेत सुमारे दोन वर्षं काम करणं बंधनकारक असतं. महिला स्वेच्छेनं त्यात सामील होऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या उत्तर कोरियासोबत युद्ध संपलेलं नसल्यानं दक्षिण कोरियात ही व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
त्याअंतर्गत 18 ते 28 वयोगटातले तरुण लष्करात 21 महिने, नौदलात 23 महिने किंवा हवाई दलात 24 महिने सेवा, या तीनपैकी एकाची निवड करू शकतात. याव्यतिरिक्त पोलीस, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि काही विशेष प्रकरणांमध्ये सरकारी विभागात काम करण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर असतो.
ऑलिम्पिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणाऱ्या खेळाडूंना सैन्यातील सक्तीच्या सेवेतून सूट दिली जाते. ज्या खेळाडूंना पदक मिळत नाही, त्यांना परत येऊन सैन्यात सेवा बजावावीच लागते.
आज के-पॉप आणि BTS दक्षिण कोरियाची जागतिक ओळख बनले आहेत. त्यांच्या या ब्रँडचा देशाच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधींचा फायदा होतोय, आणि हेसुद्धा एक प्रकारचं राष्ट्रीय कार्यच आहे, म्हणून बीटीएसला सक्तीच्या मिलिट्री सर्व्हिसमधून सूट दिली जावी, अशी मागणी अगदी त्या देशाच्या संसदेतही केली गेली.
पण ती मागणी मान्य झाली नाही. पंरतु, या सेवेच्या काळातही त्यांना एकत्र येऊन प्रॅक्टिस करण्याची मुभा संरक्षण मंत्रालयाने दिली होती.
ही लष्करी सेवा पार पाडून बाहेर पडल्यानंतरचा हा बीटीएसने पहिल्यांदाच एकत्र सादरीकरण केले. त्यांच्या या कार्यक्रमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर हा कार्यक्रम आज पार पडला आणि लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी उपस्थिती दर्शवून आपल्या आवडत्या कलाकारांचा उत्साह वाढवला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.