You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अंतराळातून परतल्यावर लोकांशी वाद घालणं आणि भांडण करणं खूपच विचित्र वाटतं' - सुनीता विल्यम्स
- Author, दिव्या उप्पल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"जेव्हा तुम्ही अंतराळातून पृथ्वीला पाहता, तेव्हा वाद घालणं आणि भांडण करणं, खूप विचित्र वाटतं." हे अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे उद्गार आहेत.
जवळपास 3 दशकांची कारकीर्द असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता 'सुनी' विल्यम्स यांच्यावर अंतराळातून दिसणाऱ्या दृश्यानं एक जबरदस्त प्रभाव टाकला आहे.
या प्रभावामुळे मानवता, तंत्रज्ञान आणि पृथ्वीबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनाची सातत्यानं जडणघडण केली आहे.
नासामध्ये 27 वर्षे काम केल्यानंतर डिसेंबर महिन्यात सुनीता विल्यम्स निवृत्त झाल्या. त्या अलीकडेच कोझिकोडमध्ये झालेल्या केरळ साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी भारतात आल्या होत्या. जवळपास एक दशकानंतर त्या भारतात आल्या होत्या.
दिल्ली आणि केरळ इथं त्यांनी विद्यार्थी, वैज्ञानिक आणि संमेलनात उपस्थित असलेल्या लोकांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी अंतराळ घालवलेलं आयुष्य आणि त्यांच्या करिअरमधील शेवटच्या अनपेक्षित प्रकरणाबद्दल सांगितलं.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (आयएसएस) 3 प्रदीर्घ कालावधीच्या मोहिमांमध्ये सुनीता विल्यम्स ऑर्बिट म्हणजे कक्षेमध्ये 600 हून अधिक दिवस होत्या. एक महिला म्हणून सर्वाधिक स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांनी केला.
त्या म्हणाल्या, "मी नासामध्ये नोकरी करण्याचा कधी विचारही केला नव्हता. मी अंतराळात जाईन अशी कल्पनाही कधी केली नव्हती."
अंतराळात करावा लागला 9 महिने मुक्काम
मागे वळून पाहताना सुनीता विल्यम्स म्हणतात की फक्त मोहिमाच संस्मरणीय नाहीत. सुनीता म्हणतात, "ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं, मला सल्ला दिला आणि मला त्या टप्प्यापर्यंत पोहोचवलं, अशा सर्व अद्भूत लोकांबद्दल मी विचार करते."
"माझी सर्वात मोठी आठवण प्रत्यक्षात त्या सर्व लोकांबरोबर जोडलेली आहे, ज्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली."
सुनीता विल्यम्स यांना 2024 मध्ये एका मोहिमेअंतर्गत अंतराळात काही दिवसच राहायचं होतं. मात्र बोईंग स्टारलायनर अंतराळ यानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) तब्बल 9 महिने राहावं लागलं होतं.
त्यांनी याचा सहजतेनं स्वीकार केला.
त्या म्हणाल्या, "मला अंतराळात राहायला खूप आवडतं. त्यामुळे तिथे असणं हेच माझ्यासाठी पुरेसं होतं."
"मला जे अतिशय आवडतं, असं सर्वकाही करण्याची संधी मिळाली. उदाहरणार्थ खिडकीतून बाहेर पाहणं, डायरी लिहिणं, प्रयोग करणं. ती एक अद्भूत प्रयोगशाळा आहे."
वैज्ञानिक प्रयोग करणं, रोबोटिक आर्म ट्रेनिंग, उपकरणांची दुरुस्ती, जमिनीवरील टीमबरोबर कॉन्फरन्स आणि तासनतास चालणारी एक्सरसाईज यामध्ये त्यांचे दिवस जायचे.
त्या म्हणाल्या, "प्रत्येक दिवस वेगळा असतो. तीच गोष्ट याला अतिशय मजेशीर बनवते."
अर्थात तिथे दीर्घकाळ राहिल्यामुळे भावनिक पातळीवर काही अडचणी निर्माण झाल्या.
सुनीता म्हणाल्या, "मी माझ्या कुटुंबाबरोबर काही प्लॅन तयार केले होते. यात माझ्या 80 वर्षांच्या आईसोबत तयार केलेला प्लॅनदेखील होता."
"मला असं वाटत होतं की जणू काही माझा वेळ वाया गेला. कारण मी त्यांच्यासोबत नव्हती. मी माझा भाचा आणि भाचीसोबत देखील अनेक गोष्टी करू शकत नव्हते."
त्या म्हणाल्या की त्यांच्या कुटुंबानं त्यांना धीर दिला, हिंमत दिली.
"त्यांनी मला सांगितलं की 'जा, वर जाऊन खूप धमाल कर, आम्हालाही सोबत घेऊन चल आणि अंतराळ यानातून एखाद्या दिवशी सुरक्षित परत ये.' यामुळे मला मोठा धीर मिळाला."
बदलत्या भारतात परत येणं आणि मूळ गावी जाणं
सुनीता विल्यम्स म्हणाल्या की त्यांनी भारतात केलेला प्रत्येक प्रवास, आधीच्या प्रवासापेक्षा पूर्ण वेगळा असतो.
त्या म्हणाल्या, मी इथे अनेक वेळा आली आहे. प्रत्येक वेळेस मला इथे बदल झालेला पाहायला मिळाला आहे. रस्ते, उड्डाणपूल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं आता पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं आहे. प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलं आहे.
विज्ञान आणि नाविन्यतेच्या (इनोव्हेशन) क्षेत्रात भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांमुळे त्या विशेषकरून प्रभावित झाल्या.
त्या म्हणाल्या, "तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी लोक तयार आहेत. यात अंतराळाच्या क्षेत्राचाही समावेश आहे."
भारताशी त्यांचं घनिष्ठ नातं आहे. गुजरातमधील झुलासन या त्यांच्या मूळ गावातील लोक प्रदीर्घ काळापासून त्यांच्या यशाला स्वत:चं यश मानत आले आहेत.
त्या म्हणाल्या, "ही खरंच खूप सन्मानाची बाब आहे. मी, माझे वडील आणि कुटुंबासह तिथे गेली आहे. मात्र त्यामुळे हे नातं आणखी घट्ट झालं आहे. मी तिथल्या लोकांना ओळखते."
लवकरच त्यांची बहीण आणि कुटुंबासह तिथे परत जाण्याची आशा त्यांना आहे.
त्या म्हणाल्या, "केरळमध्ये येऊन छान वाटलं. माझे वडील या ठिकाणचं खूप कौतुक करायचे. भारताचा एक वेगळा भाग पाहण्याची संधी मिळाली. मात्र झुलासनमधील आमच्या घरी मला परत जावंच लागेल."
एकच ग्रह, ज्यावर आपण सर्व राहतो
सुनीता विल्यम्स म्हणतात, पृथ्वीच्या कक्षेतून पाहिल्यावर सीमा आणि लढायांचं कोणतंही महत्त्व उरत नाही.
त्या म्हणाल्या, "जेव्हा तुम्ही (अंतराळातून) खाली आपल्या ग्रहाकडे पाहता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की आपण सर्व एकाच ठिकाणी सोबत आहोत. एकच पाणी, एकच हवा, एकच जमीन."
त्यांना वाटतं की या दृष्टीकोनामुळे माणसांमधील दुरावा, विभागणी या गोष्टी खुज्या वाटतात.
त्या म्हणतात, "आम्ही जेव्हा इथे इतक्या सर्व गोष्टींमध्ये असतो, तेव्हा अनेक गोष्टींपासून आपलं मन भरटकत असतं. मात्र अंतराळात आपण लोकांशी भांडण्याची कल्पनादेखील करू शकत नाही."
त्या म्हणाल्या, "लोकांशी वाद घालणं आणि भांडण करणं खूपच विचित्र वाटतं."
या अनुभवामुळे सुनीता विल्यम्स यांना सहानुभूतीचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवलं.
त्या म्हणाल्या, "कदाचित आपण सर्वांनी फक्त एक क्षणभर थांबून निसर्गाच्या कुशीत कुठेतरी जायला हवं. एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. कारण कदाचित प्रत्येकाच्याच बोलण्यात काहीतरी चांगलं असतं."
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भारताची क्षमता
सुनीता विल्यम्स यांना वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे विज्ञान आणि अंतराळ मोहिमांसाठी एक शक्तिशाली उपकरण आहे. मात्र त्याचबरोबर त्या म्हणतात की यालादेखील मर्यादा आहेत.
त्या म्हणाल्या, "एआय डेटावर खूप वेगानं प्रक्रिया करू शकतं. आकडेवारीचं विश्लेषण करू शकतं आणि माहिती गोळा करू शकतं. पुन्हा पुन्हा करायची कामं रोबोटद्वारे केली जाऊ शकतात. तर माणूस निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो."
मात्र त्यांनी या मुद्द्यावर भर दिला की एआय हे एक उपकरणच राहिलं पाहिजे. तो पर्याय होता कामा नये.
त्या म्हणाल्या, "हे (एआय) सर्व काही नाही. ते आपल्या पुढील प्रगतीसाठी मदत करणारं फक्त एक उपकरण आहे."
"भारतासाठी कल्पनाशक्ती हीच मर्यादा आहे. भारताकडे मनुष्यबळ आहे आणि अनेक प्रतिभावान लोक आहेत. जे अद्भूत काम करू शकतात."
निवृत्त झालेल्या सुनीता विल्यम्स म्हणाल्या की त्यांच्या आयुष्याचा पुढील टप्पा प्रवास, कुटुंबं आणि नवीन आव्हानांनी भरलेला असेल.
त्यांना केरळच्या समुद्रकिनाऱ्यांपासून लडाखच्या पर्वतांपर्यंत, भारताचा जास्तीत जास्त भाग पाहायचा आहे.
त्या म्हणाल्या, "मला डोंगर खूप आवडतात. मला कधीतरी तिथे जायचंच आहे."
अंतराळातून मिळालेल्या शिकवणीबद्दल विचार करत, त्या काही क्षण थांबल्या आणि म्हणाल्या, "धीर धरा आणि एकमेकांचं म्हणणं ऐका."
त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की निवृत्तीनंतर कोणत्या गोष्टीबद्दल त्यांना सर्वात जास्त उत्साह वाटतो. त्यावर त्यांनी लगेच उत्तर दिलं, "डोंगर चढणं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)