महाराष्ट्रात यंदा उन्हाळा कसा असेल? ऐन उन्हाळ्यात पाऊस पडेल का आणि किती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसानं हजेरी लावली असून शेतीचं नुकसानही झालं आहे. पुढचे काही दिवस हवामान कसं असेल आणि यंदाचा उन्हाळा कसा असेल, याबद्दलचा अंदाज समोर आला आहे.
31 मार्च रोजी भारतीय हवामान विभागानं एप्रिल महिन्यासाठी तसेच एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी उष्णता आणि पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
मात्र एप्रिलमध्ये एरवीही पावसाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असं म्हटलं असलं, तरी खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता नाही.
सध्या पडणाऱ्या पावसाच्या प्रभावामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानात अंशतः घट दिसून येते आहे.
एप्रिलमध्येही मराठवाड्याच्या लगतचा काही भाग वगळता राज्यात दिवसाचं कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही याचा अर्थ उन्हाळा सौम्य असेल असं नाही.
कारण एप्रिलमध्ये रात्रीचं किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यात रात्रीचं तापमान अधिक राहील.
एप्रिल ते जून या कालावधीतही राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसाचं कमाल तापमान नेहमीच्या सरासरीएवढं किंवा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत रात्रीचं किमान तापमान नेहमीपेक्षा जास्त राहील.
एप्रिलमध्ये मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता सर्वाधिक आहे. येथे उष्णतेच्या लाटेचा कालावधी सात ते आठ दिवसांचा असू शकतो. दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत एक ते दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
यानंतर उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या कालावधीत मराठवाड्याचा काही भाग, विदर्भाचा पूर्वेकडील भाग आणि उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा कालावधी आठवडाभरापर्यंत राहू शकतो.
इशारे, अलर्ट आणि सध्याची परिस्थिती
सध्या उत्तर भारतात आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होत आहे. मध्य भारतात गारपीट आणि वादळी पावसाचा प्रभाव 6 एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
पुढील तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत वादळी हवामान राहण्याचा अंदाज आहे. येथे जोरदार वारे, विजांसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
1 एप्रिल रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत वीजा आणि ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे 1 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2 एप्रिलसाठी धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर आणि पुण्याच्या पठारी भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील इतर जिल्हे, विदर्भ तसेच सातारा, सांगली, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यंदा पॅसिफिक महासागरात एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. मात्र एप्रिल ते जून या कालावधीत तो तयार न होता स्थिती न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे.
एल निनो आणि ला निना काय आहेत?
'एल निनो' आणि 'ला निना' हे स्पॅनिश भाषेतले शब्द आहेत. एल निनो म्हणजे छोटा मुलगा आणि ला निना म्हणजे छोटी मुलगी.

पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यानं, प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं.
यालाच सदर्न ऑसिलेशन असं म्हणतात. तर एल निनो आणि सदर्न ऑसिलेशन यांना एकत्रितपणे ENSO (एन्सो) म्हणून ओळखलं जातं.
हे सगळं घडतं व्यापारी वाऱ्यांमुळे. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात. या वाऱ्यांचा पॅसिफिक महासागरातल्या सागरप्रवाहावर परिणाम होतो.
सामान्य स्थितीत म्हणजे न्यूट्रल परिस्थितीत या महासागराच्या वरच्या स्तरातलं पाणी गरम झाल्यावर आशियाच्या दिशेनं वाहू लागतं आणि खालच्या स्तरातलं थंड पाणी त्याची जागा घेतं. थोड्यात पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागातलं पाणी पूर्व भागात थोडं थंड असतं आणि पश्चिमेला आशियाजवळ ते तुलनेनं थोडं गरम असतं.

व्यापारी वाऱ्यांचा वेग कमी झाला किंवा ते उलट दिशेनं वाहू लागले, तर या वर आलेल्या पाण्याचं तापमानही वाढतं आणि मग गरम पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतं. या स्थितीला एल निनो म्हणून ओळखलं जातं. (वरचं रेखाचित्र)
पण हे व्यापारी वारे जेव्हा वेगानं वाहू लागतात तेव्हा गरम पाणी आणि त्यासोबत हवेतलं बाष्प आधी आशियाच्या दिशेनं सरकतं आणि मग हे थंड पाणीही पश्चिमेकडे वाहू लागतं. त्यालाच ला निना म्हणून ओळखलं जातं. (खालचं रेखाचित्र)
सागरी प्रवाहांची ही स्थिती पहिल्यांदा सतराव्या शतकात पेरूमधल्या मच्छिमारांच्या लक्षात आली होती.
दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ डिसेंबरच्या आसपास पाण्याचं तापमान वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी या प्रवाहाला नाव दिलं 'एल निनो डी नाविदाद' – ख्रिस्मसचा छोटा मुलगा.
तर याउलट स्थिती 'ला निना' नावानं ओळखली जाऊ लागली.
एल निनो कसा मोजतात?
एरवी साधारण दोन ते आठ वर्षांच्या अंतरानं एल निनो आणि ला निना परिस्थिती उद्भवताना दिसते. पण नेमकी कुठली स्थिती आहे, हे कसं मोजलं जातं?
एल निनो स्थिती जाहीर करण्याआधी वेगवेगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात.
- पूर्व पॅसिफिक प्रदेशात विषुववृत्ताजवळ समुद्राच्या पृष्ठभागाजवळ नेहमीपेक्षा जास्त तापमान
- पश्चिम पॅसिफिक प्रदेशात ऑस्ट्रेलियातल्या डार्विनमध्ये वातावरणात हवेचा दाब नेहमीपेक्षा जास्त
- मध्य पॅसिफिक प्रदेशात टहिटी बेटांजवळ वातावरणात नेहमीपेक्षा कमी दाब
उन्हाळ्यात एकूणच काय काळजी घ्यायची?

- दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा.
- तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया वा हालचाली करू नका.
- ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
- चक्कर येत असेल, दमल्यासारखं वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
- प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या.
- तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. पण एकाचवेळी भरपूर पाणी पिणं योग्य नाही.
- ORS, लस्सी, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल.
- हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. गॉगल्स, छत्री किंवा टोपी वापरा. सनस्क्रीन वापरा.
- अल्कोहोल, चहा - कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. ही पेयं टाळा.
- प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न, तेलकट - शिळं अन्न टाळा.
- लिंबूवर्गीय फळं 'सी' जीवनसत्त्वासाठी चांगली. कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षं, आंबा, डाळिंब, करवंद, जांभूळ यांचा आहारात समावेश करावा.
- आवळा, कोकम, कैरी यांच्यातही 'सी' जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)























