कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा रस्सीखेच; सिद्धरामय्यांना बाजूला करुन डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता पक्षांतर्गत कलहामुळेच धोक्यात आलेली दिसतेय.

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात शब्दांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी सकाळी एक्सवर केलेल्या पोस्टमधून हे स्पष्ट दिसत आहे की ते काँग्रेसच्या वरिष्ठांनी केलेल्या कथित वचनाची पूर्तता करण्याची मागणी करत आहेत.

डी.के. शिवकुमार यांनी लिहिले आहे, "आपलं वचन पाळणं ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. मग तो न्यायाधीश असो, राष्ट्रपती असो किंवा कोणीही असो. अगदी मी स्वतःही. प्रत्येकाने आपला शब्द पाळला पाहिजे. वचनाची ताकद हीच विश्वाची ताकद आहे."

विधानसभा निवडणुकांनंतर सिद्धरामय्या अडीच वर्षं आणि शिवकुमार अडीच वर्षं मुख्यमंत्री होतील असं काँग्रेसनं अधिकृतरित्या कधीही जाहीर केलं नव्हतं मात्र डी.के. शिवकुमार यांनी

अलिकडेच असा गुप्त करार झाला होता असं म्हटलं आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

अडीच वर्षांपूर्वी काय घडलेलं?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चा सुरू होती.

डीके शिवकुमार की सिद्धरामय्या या दोन नावांभोवती निवडणूक निकालानंतरचं कर्नाटकचं राजकारण फिरत होतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अखेर मुख्यमंत्रीपदी सिद्धारामय्या यांची निवड करण्यात आली. काँग्रेस नेते के.वेणुगोपाल यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार यांची निवड झाली होती.

निवडणुकीच्या निकालानंतर डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीशी तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

डीके शिवकुमार हे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डीके शिवकुमार यांनी म्हटलं होतं की, जर हायकमांड अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची वाटणी करण्याच्या सूत्रावर विचार करत असेल, तर त्यासाठी आपण तयार नाही.

योग्य वेळी खेळी खेळून आपला हेतू कसा साध्य करायचा, हे डीके शिवकुमार यांना चांगलं माहिती आहे. त्यांच्या या शैलीमुळेच त्यांना आजवर यश मिळालं आहे आणि त्यामुळेच ते आता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही आघाडीवर होते.

कर्नाटक विधानसभेत अपक्ष उमेदवार असलेले एच. नागेश यांचेच उदाहरण घ्या.

जुलै 2019 मध्ये एच. नागेश विमानानं मुंबईत जाऊ नये, यासाठी शिवकुमार यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला.

जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस युतीचं सरकार कोसळावं, म्हणून ज्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते, त्यात नागेश यांचाही समावेश होता.

शिवकुमार नागेश यांना मुंबईला जाण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यामुळे ते स्वत: त्यांच्या मागोमाग मुंबईला जाऊन हॉटेलबाहेर उभे राहिले.

तिथे मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांच्या मित्रासोबत 'एक कप चहा'सुद्धा घेऊ दिला नाही.

देशाला कळलं... डीके शिवकुमार कोण आहेत?

शिवकुमार कोण आहेत आणि त्यांच्यात एवढा अहंकार का आहे, हे रातोरात देशाला कळलं.

राजकीय वर्तुळात ज्या गोष्टींची केवळ ऑफ द रेकॉर्ड चर्चा होत होती, त्यावरून शिवकुमार यांनी त्या दिवशी पडदा हटवला. त्यांनी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्याला सांगितलं, "माझ्याकडे कोणतेही शस्त्र नाही. मी फक्त एक 'काळीज' आणलंय."

त्यांनी थेट सत्ताधारी पक्षाला घेरल्याने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची वाहवा केली.

फोटो स्रोत, Getty Images

जेव्हा ते राजकारणात येण्याच्या प्रयत्नात होते, त्यावेळी त्यांचा साथीदार असलेल्या एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "त्यांच्या या वृत्तीमुळेच तो आज जो आहे तो बनला आहे."

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना शिवकुमार यांनी नागेश हे पक्षाचे उमेदवार होण्यासाठी फॉर्मवर स्वाक्षरी केली होती. नागेश यांनी महादेवपुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र तिथून त्यांचा पराभव झाला.

अनेक ठिकाणी छापे, मात्र घाबरले नाहीत शिवकुमार

डीके शिवकुमार यांच्या या मुंबई एपिसोडच्या दोन वर्षांपूर्वी केंद्रीय संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर, त्याच्या बंगळुरूतील घरावर आणि गावातील त्यांच्या आईच्या घरावर छापे टाकले. तरीही ते घाबरले नाहीत.

त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर हे छापे मारले गेले होते. गुजरातमधील 44 आमदारांना बंगळुरूजवळील एका रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी सोय त्यांनी केली होती, तेव्हाच ही छापेमारी सुरू झाली होती.

राज्यसभा निवडणुकीपूर्वीचा घोडेबाजार रोखण्यासाठी गुजरातच्या आमदारांना कर्नाटकात नेण्यात आलं होतं. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे तेव्हा राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार होते.

त्याहीपूर्वी, 2002 साली महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील आमदारांना एका ठिकाणी ठेवण्याचा त्यांचा अनुभव कामी आला.

काँग्रेस पक्षाचा दुसरा सर्वांत महत्त्वाचा नेता निवडण्यासाठी हायकमांडने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

भाजपकडून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापेक्षा तुरुंगात जावं लागलं तरी जाईन, असे ते वारंवार सांगत होते. काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही त्यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली.

कर्नाटक निकालानंतर माध्यमांशी बोलताना डीके शिवकुमार यांनी सोनिया गांधींच्या भेटीचा प्रसंग सांगितलं. तुरुंगात असताना सोनिया गांधी भेटायला आल्याचा प्रसंग सांगितना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते भावूक झाले होते.

गुंतवणुकीची चांगली समज

डीके शिवकुमार यांच्या एका सहकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "डीके शिवकुमार हे काही गोष्टींबद्दल अगदी स्पष्ट आहेत. यापैकी एक म्हणजे तुमच्याकडे पुरेसा निधी असायला हवा. त्यांनी आपल्या काही निकटवर्तीय आणि समर्थकांना योग्य वेळी योग्य गुंतवणूक करण्याचा सल्लाही दिला आहे."

त्यांचे आणखी एक सहकारी सांगतात की, "कनकापुरा (डीके शिवकुमार यांचा मतदारसंघ) मधील ग्रेनाइट खाणकामाबद्दल कोणालाच माहिती नव्हती, जोपर्यंत त्यांनी त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला नाही. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला जमिनीत गुंतवणूक करणे ही एक चांगली संधी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ती संधी हेरून त्यांनी औद्योगीकरणाची शक्यता असलेल्या जमिनीत गुंतवणूक केली. आज बंगळुरूत जिथं आयटी हब बांधलं गेलंय तिथं ही जमीन त्यांनी घेतली होती. यातलं काहीच बेकायदेशीर नव्हतं."

1980 च्या उत्तरार्धात त्यांना बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील सथानूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचं तिकीट मिळालं.

तेव्हा ते फक्त 27 वर्षांचे होते. 1990 मध्ये एस. बंगारप्पा यांच्या निकवर्तीयांपैकी एक बनले, जे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.

प्रवास सोपा नव्हता...

त्यावेळी डीके शिवकुमार यांच्या इतक्याच वयाच्या इतर जणांना राज्यमंत्री केल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला. मग पुढे मोठ्या कालावधीनंतर धरम सिंग (जे बंगारप्पा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य होते) यांनी डीके शिवकुमार यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी मदत केली.

पण त्यांना बंगारप्पा यांच्याकडून तुरुंग मंत्रिपद मिळाल्याने त्यांची निराशा झाली.

1991 मध्ये त्यांनी राजकीय नव्यानं आलेल्या तेजस्विनी गौडा यांना पाठिंबा दिला आणि लोकसभा निवडणुकीत एचडी देवेगौडा यांचा पराभव केला.

फोटो स्रोत, Getty Images

नंतर ते एस.एम. कृष्णांचे खास व्यक्ती बनले आणि केपीसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पण 2019 मध्ये जेव्हा जेडीएस-काँग्रेसची युती झाली, तेव्हा त्यांनी कृष्णा आणि देवेगौडा यांच्यासोबतच्या संबंधांमध्ये संतुलन ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

एक भाजप नेता डीके शिवकुमार यांच्याबद्दल म्हणतो की, "त्यांच्याकडे कुठल्याही एका जातीचा पाठिंबा नाहीय, पण त्यांना एखाद्या संकटाशी कसं लढतात, हे चांगलं माहित आहे. विरोधकांमध्ये भीती निर्माण व्हावी, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी, विरोधक हेसुद्धा खासगीत मान्य करतात की, डीके शिवकुमार हे कर्नाटकतील सर्वाधिक साधनसंपन्न राजकीय नेते आहेत."

तर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव ना छापण्याच्या अटीवर म्हटलं की, "एक मंत्री म्हणून ते अधिकाऱ्यांचे ऐकतात आणि प्रशासनात येणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्यांना कसे सामोरे जायचे हे त्यांना माहीत आहे."

आक्रमक नेता

'ते' आणि बदनामी हा शब्द हातात हात घालूनच चालतात. कधीकधी बदनामी त्यांच्याआधी दोन पावलं पुढं चालत असते. कदाचित म्हणूनच ते माध्यमांमध्ये कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

काही दिवसांपूर्वी ते मुंबई पोलिसांशी आक्रमकपणे बोलताना दिसले, तर कधी आव्हान देताना. ते आहेत डी. के. शिवकुमार.

"कितीही घोषणा द्या, हा डी. के. शिवकुमार कुणालाही घाबरणारा नाही. मी एकटाच आलोय आणि एकटाच इथून जाणार आहे."

हा डायलॉग ऐकायला फिल्मी वाटेल, पण डी. के. शिवकुमार स्वत:ची ओळख अशाच पद्धतीने करुन देतात. कर्नाटकात डी. के. शिवकुमार केवळ 'डीके' नावाने परिचित आहेत आणि याच नावाने ते लोकप्रिय आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

डी. के. शिवकुमार यांच्या आक्रमक आणि धडाकेबाज कामगिरीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा हेही दुजोरा देतात.

कर्नाटक विधानसभेला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी बंगळुरुत धरणं आंदोलन करणाऱ्या येडियुरप्पा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, "लोक डी. के. शिवकुमार यांच्या 'वागण्याला' विसरले नाहीत. ते अशा प्रकारची प्रकरणं सांभाळण्यात तरबेज आहेत."

येडियुरप्पा यांनी आपल्या विधानाला दुजोरा देण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचं उदाहरण दिलं होतं. त्यावेळी डी. के. शिवकुमार यांनी 'पक्षाच्या हितासाठी आमदारांना आश्रय दिला होता.'

कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल युनायटेडचं (जेडीएस) आघाडी सरकार सध्या कोसळण्याच्या स्थितीत आहे. मात्र, तरीही दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आपापल्या घरात आरामात बसलेत किंवा अधून-मधून निदर्शनं करत आहेत. मात्र, डी. के. शिवकुमार यांनी सगळ्यांपेक्षा वेगळी वाट चोखाळली आहे.

इतर नेत्यांपेक्षा हटके स्टाईल

काँग्रेसचे आमदार कोंडजी मोहन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन इतर नेत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांच्याकडे अफाट क्षमता आहे. रुळलेल्या वाटा बदलण्यात ते तरबेज आहेत आणि पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेवर कुणीच शंका उपस्थित करु शकत नाही."

काँग्रेस प्रचार समितीचे सरचिटणीस मिलिंद धर्मसेन म्हणतात, "डी. के. शिवकुमार यांना शालेय जीवनापासून पाहतोय. आम्ही दोघेही सथनूर गावातील आहोत. लोक कायम अंतिम निकालाबाबत काळजीत असतात. मात्र, डीके कधीच कुठल्या गोष्टीला घाबरून राहत नाहीत. कुठलीही गोष्ट त्यांनी त्यांनी एकदा हातात घेतली, तर ती पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत."

फोटो स्रोत, TWITTER

गुजरात राज्यसभा निवडणुकीदरम्यान ज्याप्रकारे डी. के. शिवकुमार यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात बलाढ्य नेते आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भिडले, त्यावरुन मिलिंद धर्मसेन यांचं विधान एका मर्यादेपर्यंत खरंही वाटतं.

नाव न जाहीर करण्याच्या अटीवर डी. के. शिवकुमार यांच्या एका सहकाऱ्याने बीबीसीला सांगितलं, "गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीवेळी तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी या जोडीविरुद्ध थेट भिडले होते.

सर्वांना माहित होतं की, डीके मोठं आव्हान पेलत आहेत आणि त्याच्या परिणामांचा ते अजूनही सामना करत आहेत. मात्र डीके असेच आहेत."

डीके असे का आहेत?

आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर डीकेंच्या निकटवर्तीयाने बीबीसीला सांगितलं, "ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्री बनण्याचीही त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री बनण्यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्न करतील. आपल्या नशिबात मुख्यमंत्री बनणं लिहिल्याचं डीके मानतात."

मिलिंद धर्मसेनही म्हणतात की, डीकेंचं वागणंही असंच काहीसं राहिलं आहे.

धर्मसेन म्हणतात, "निवडणूक लढण्यासाठी डीकेंनी स्वत:ची जमीन गहाण ठेवली होती. 1985 साली काँग्रेसचा उमेदवार या नात्याने सथनूरमधील (बंगळुरु ग्रामीण जिल्ह्यातील गाव) तरुणांना एकत्रित करण्याचं काम केलं होतं. मात्र, एचडी देवेगौडा यांच्याविरोधात ते निवडणूक जिंकू शकले नाहीत."

प्रत्येक बाजी सुपरहिट

पाच वर्षांनंतर काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. मात्र, डी. के. शिवकुमार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले आणि इतिहासही रचला. वोक्कलिग समाजाचे ताकदवान नेते देवेगौडा पराभूत झाले होते. त्यानंतर 10 वर्षांनी डीकेंनी विधानसभा निवडणुकीत देवेगौडा यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी यांना पराभूत केलं होतं.

त्यानंतर कर्नाटकात सर्वात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कनकपुरा लोकसभा मतदारसंघातून तेजस्विनी यांना तिकीट दिलं आणि देवेगौडा यांना पराभूत केलं. तेजस्विनी यांना राजकारणाचा काहीही अनुभव नव्हता.

मात्र त्यांनंतर ज्यावेळी काँग्रेसने जेडीएस आणि देवेगौडा कुटुंबाशी हातमिळवणी करुन कर्नाटकात आघाडीचं सरकार बनवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी एका निष्ठावान कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला.

फोटो स्रोत, Getty Images

त्यांच्यासोबत काम केलेल्या एका काँग्रेस नेत्याचं म्हणणं आहे की, देवेगौडा कुटुंब आणि वोक्कलिग समाजाविरोधातील नेता अशी कित्येक वर्षांपासूनची तयार झालेली प्रतिमा डी. के. शिवकुमार यांनी काही क्षणात बदलली. याचा अर्थ असा, त्यांना वाटतं की ज्यावेळी गरज पडेल, त्यावेळी ते त्यांचीही सोबत देतील.

भविष्यकालीन विचार करुन निर्णय

भविष्यातल्या गोष्टींसाठी गुंतवणूक करण्याकडेच डी. के. शिवकुमार यांचा कल असतो. धर्मसेन म्हणतात, "त्यांनी मला सांगितलं होतं की, मुर्ख बनू नका आणि जमिनीत गुंतवणूक करा. केवळ जमीनच अशी गोष्ट आहे, ज्यातून चांगला परतावा मिळू शकतो. त्यांनी अशा अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या, ज्या त्यावेळी ओसाड किंवा वाळवंटासारख्या होत्या. मात्र, त्यांची दूरदृष्टी कमाल होती की, काही वर्षानंतर त्याच जमिनीच्या किंमती महागल्या."

रिअल इस्टेट, ग्रॅनाईट आणि शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये रस असणारा माणूस म्हणून डी. के. शिवकुमार यांना ओळखलं जातं.

जुने-जाणते काँग्रेस नेते एल.एन. मूर्ती सांगतात की, "त्यांच्या कुटुंबीयांकडे कनकपुरामध्ये जमीन होती. त्यानंतर ज्यावेळी 80 च्या दशकात माझा सहकारी म्हणून ते काम करण्यासाठी आले, तेव्हा एखादं काम करण्याची त्यांची एक स्वत:ची शैली होती. अत्यंत कष्टाळू होते. अनेकांना वाटायचं की ते वादग्रस्त स्वभावाचे आहेत. मात्र, तसे नव्हते. त्यांच्याविरोधात एकही तक्रार नव्हती. ते प्रचंड साधे आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्त्वही तसेच आहे."

मूर्ती पुढे म्हणतात, "ज्यावेळी डी. के. शिवकुमार यांनी मुंबई पोलिसांना म्हटलं की, 'मेरे पास कोई हथियार नहीं है, सिर्फ़ एक दिल है', त्यावेळी खरंतर त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता."

डीके आतापर्यंत मुख्यमंत्री का बनले नाहीत?

फोटो स्रोत, TWITTER

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्विनी गौडा म्हणतात, "जर त्यांनी दुसऱ्यांना पुढे जाऊ दिलं असतं, तर ते मुख्यमंत्री बनले असते. मात्र, आपल्यापुढे कुणीही गेलेलं त्यांना खपत नाही. मी माझ्याबाबत हे सांगत नाहीये. योगेश्वर किंवा एसटी सोमशेखर यांच्याकडे तुम्ही पाहा ना. ते त्यांच्या अहंकारातून बाहेरच येत नाहीत."

मात्र, डी. के. शिवकुमार कधी ना कधी मुख्यमंत्री बनतील, असं काँग्रेसमध्ये अनेकांना वाटतं.

डीकेंनी ज्यावेळी राजकारणात पाऊल ठेवलं, त्यावेळी ते केवळ बारावी पास होते. त्यानंतर राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी संस्कृतमध्ये श्लोक वाचणंही शिकून घेतलं. तसेच, बाराव्या शतकातील महान संत बसवेश्वरांचे विचारही वाचले. संत बसवेश्वरांना मानणाऱ्यांची कर्नाटकच्या उत्तरेकडील भागात प्रचंड मोठी संख्या आहे.

डी. के. शिवकुमार यांना स्वत:लाही विश्वास आहे की, आपली वेळ येईल. कारण ते स्वत:ला अजूनही तरुण मानतात, जरी ते सध्या 57 वर्षांचे आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)