सख्खे भाऊ भारत-पाकिस्तान युद्धात एकमेकांविरुद्ध लढले; पुढे दोघांची भेट झाली, तेव्हा काय घडलं?

फोटो स्रोत, Saman Ali Khan

फोटो कॅप्शन, साहिबजादा युनूस खान (डावीकडे) आणि साहिबजादा याकूब खान (उजवीकडे)
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

सर अब्दुस समद खान हे रामपूर संस्थानाचे मुख्यमंत्री होते. त्यांचा मोठा मुलगा युनूस खान सुरुवातीला डेहराडूनच्या कर्नल ब्राउन स्कूलमध्ये शिकला. त्यानंतर त्या मुलाची भारतीय सैन्य अकादमीसाठी (IMA) निवड झाली, जिथून त्या मुलाला 'गढवाल रायफल्स'मध्ये कमिशन मिळाले.

फोटो स्रोत, Saman Ali Khan

फोटो कॅप्शन, साहिबजादा याकूब खान (फाईल फोटो)

1920 मध्ये जन्मलेले त्यांचे धाकटे चिरंजीव साहिबजादा याकूब खान याचीही ब्रिटिश भारतीय सैन्यासाठी निवड झाली, जिथे त्यांना 1940 मध्ये 18 वी किंग एडवर्ड कॅव्हलरी'मध्ये कमिशन मिळाले.

या दोघांनीही दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. दोघांनाही 'इंडियन जनरल सर्व्हिस मेडल'ने सन्मानित करण्यात आले होते.

याकूब दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याच्या वतीने लढण्यासाठी आफ्रिकेला गेले होते, तिथे इजिप्त आणि लिबियाच्या सीमेजवळ असलेल्या तोब्रुकच्या लढाईदरम्यान इटलीच्या सैन्याने त्यांना बंदी बनवले.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

इटलीमध्ये ते पाकिस्तान आणि भारताचे दोन भावी जनरल - याह्या खान आणि पी.पी. कुमारमंगलम यांच्यासोबत कैदेतून पळून गेले होते, पण त्यांना पुन्हा पकडण्यात आले. याह्या आणि कुमारमंगलम मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

युद्धबंदी होती त्या काळात त्यांनी इटालियन आणि जर्मन भाषा आत्मसात केली. दुसरे महायुद्ध संपताच त्यांची सुटका करण्यात आली. त्यांचे मित्र त्यांना 'जॅकब' या नावाने हाक मारत असत. या काळात त्यांचे मोठे भाऊ युनूस खान म्यानमार म्हणजे तत्कालीन ब्रह्मदेशात तैनात होते.

कुटुंबाची फाळणी

जेव्हा 1947 मध्ये भारताची फाळणी झाली, तेव्हा मोठे भाऊ साहिबजादा युनूस खान यांनी भारतीय सैन्यातच राहण्याचा निर्णय घेतला, तर धाकटे भाऊ साहिबजादा याकूब खान पाकिस्तानी सैन्यात दाखल झाले.

डॉमिनिक लापिअर आणि लॅरी कॉलिन्स त्यांच्या प्रसिद्ध 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' या पुस्तकात याकूब खान यांच्या पाकिस्तानला जाण्याबद्दल लिहितात की, "जेव्हा याकूब खान यांनी रात्रीच्या जेवणादरम्यान आपल्या आईला पाकिस्तानला जाण्याचा निर्णय सांगितला, तेव्हा त्या ऐकून सुन्न झाल्या. त्या खूप रागावल्या सुद्धा."

त्या म्हणाल्या की, "आपण इथे दोन शतकांपासून राहत आलो आहोत. आपल्या पूर्वजांच्या कबरी इथे आहेत. मला राजकारण समजत नाही. पण एक आई म्हणून माझा स्वार्थ आहे. मला भीती वाटतेय की आपण कायमचे एकमेकांपासून दुरावत आहोत."

पण याकूब यांनी कोणाचे ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रामपूर सोडले.

फोटो स्रोत, Vikas Publishing House

फोटो कॅप्शन, डॉमिनिक लापिए आणि लॅरी कॉलिन्स यांचे गाजलेले पुस्तक 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट'

लापिअर आणि कॉलिन्स यांनी लिहिले आहे, "निरोप घेताना त्यांच्या आईने शोकाचे प्रतीक म्हणून पांढरी साडी नेसली होती. त्यांनी कुराणातील आयत वाचून घराला निरोप दिला. 25 वर्षांपासून त्यांचे आचारी असलेले रामलाल आणि ड्रायव्हर कुंदन सिंह यांनी भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला."

त्यांनी आपल्या कुटुंबाला वचन दिले की पाकिस्तानमध्ये स्थिरावल्यानंतर काही दिवसांतच ते परत येतील आणि आपले सर्व सामान घेऊन जातील. मात्र याकूब आपल्या वडिलोपार्जित घरी कधीच परतले नाहीत आणि त्यांनी पुन्हा कधीही आपल्या आईचा चेहरा पाहू शकले नाहीत.

दोन्ही भाऊ काश्मीरच्या आघाडीवर

भारत सोडल्यानंतर काही महिन्यांतच साहिबजादा याकूब खान काश्मीरच्या बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या एका बटालियनचे नेतृत्व करत होते.

लापिअर आणि कॉलिन्स लिहितात, "पाकिस्तानी सैनिकांना रोखण्याचे प्रयत्न 'गढवाल रेजिमेंट'ची एक कंपनी करत होती. त्या कंपनीचे नेतृत्व सुद्धा याकूब खान प्रमाणेच एक मुस्लिम अधिकारी करत होता.

फोटो स्रोत, Saman Ali Khan

फोटो कॅप्शन, याकूबजादा बंधू- युनूस खान डावीकडे आणि याकूब खान सर्वात उजवीकडे

त्यांनी जुलै 1947 मध्ये पाकिस्तानला न जाता भारतीय सैन्यातच राहण्याचा निर्णय घेतला होता. तो अधिकारी सुद्धा रामपूरचाच राहणारा होता. त्यांचे नाव होते, युनूस खान. ते साहिबजादा याकूब खान यांचे सख्खे मोठे भाऊ होते.

दोन्ही भाऊ काश्मीरच्या युद्धभूमीवर एकमेकांसमोर उभे होते. दोन्ही मेजर पदावर कार्यरत होते आणि आपापल्या बटालियनचे नेतृत्व करत होते.

गोळीबाराचे वेगवेगळे दावे

पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर त्यांच्या 'द स्टोरी ऑफ टू खान्स' या लेखात लिहितात, "मेजर युनूस खान यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने त्यांचे धाकटे भाऊ याकूब खान जखमी झाले."

"जेव्हा युनूस खान यांना समजले की जखमी झालेली व्यक्ती त्यांचा धाकटा भाऊ आहे, तेव्हा ते ओरडून म्हणाले, 'दुःखी नको होऊ भावा, आपण सैनिक आहोत आणि आपण आपले कर्तव्य पार पाडले आहे.' नंतर तत्कालीन कर्नल सॅम माणेकशॉ यांनी युनूस खान यांच्या शौर्याचे कौतुक केले होते."

फोटो स्रोत, Saman ali Khan

फोटो कॅप्शन, साहिबजादा युनूस यांची सून समन अली खान

पण कर्नल युनूस यांची सून समन अली खान यांचे असे मत आहे की ही गोष्ट पूर्णपणे खरी नाही.

त्या म्हणतात, "दोन्ही भाऊ काश्मीरच्या लढाईत एकमेकांसमोर नक्कीच होते, पण युनूस यांनी याकूब यांच्यावर गोळी झाडली नव्हती. मी माझ्या सासूबाईंना आणि पतीला याबद्दल विचारले होते. त्यांचे म्हणणे होते की अशी कोणतीही घटना घडली नव्हती. त्यांनी माझ्या सासूबाईंना सांगितले होते की, आपण दोघे भाऊ एकाच आघाडीवर लढत होतो हे आम्हाला खूप उशिरा समजले."

युनूस यांचा अभिनंदनाचा संदेश

त्यानंतर पुढील 12 वर्षे दोन्ही भावांमध्ये कोणताही संपर्क नव्हता आणि दोघेही आपापल्या देशाच्या सैन्यासाठी काम करत राहिले.

जेव्हा 1960 मध्ये साहिबजादा याकूब खान यांनी कलकत्त्यातील एका भारतीय मुलीशी, तुबा खलिलीशी लग्न केले, तेव्हा त्यांचे मोठे भाऊ युनूस यांनी त्यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला होता.

फोटो स्रोत, Muniza Shamsi

फोटो कॅप्शन, साहिबजादा याकूब खान यांची भाची मुनीझा शम्सी

याकूब खान यांची भाची मुनीझा शम्सी आपल्या लेखात लिहितात, "लग्नाच्या वेळी मामा ब्रिगेडियर होते. त्यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी रामपूरचे नवाब आणि बेगम खास भारतातून कराचीला आले होते आणि राष्ट्राध्यक्ष अयुब खान यांनी त्या दोघांना 'राजकीय पाहुणे' म्हणून दर्जा दिला होता. काही महिन्यांनंतर ते पाकिस्तानी सैन्यातील सर्वात तरुण मेजर जनरल बनले."

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात साहिबजादा याकूब खान एका पाकिस्तानी डिव्हिजनचे नेतृत्व करत होते.

लष्करी कारवाईच्या विरोधात होते याकूब

1971 पर्यंत हेच साहिबजादा याकूब खान पाकिस्तानी सैन्यात लेफ्टनंट जनरल बनले होते. त्यांना पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) पाकिस्तानी सैन्याचे कमांडर बनवण्यात आले होते.

जेव्हा मार्च 1971 मध्ये त्यांना शेख मुजीब-उर-रहमान यांच्या नेतृत्वाखालील आवामी लीगविरुद्ध लष्करी मोहीम सुरू करण्याचा आदेश मिळाला, तेव्हा याकूब खान यांनी लष्करी हुकूमशहा जनरल याह्या खान यांना सल्ला दिला की, त्यांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारविरुद्ध बंदुकीच्या ताकदीचा वापर करू नये.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल याह्या खान, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्यासोबत

पाकिस्तानच्या प्रसिद्ध लेखिका आणि याकूब यांची भाची मुनीझा शम्सी लिहितात, "1971 च्या त्या दिवसात जेव्हा दोन्ही पक्षांमधील चर्चा अयशस्वी ठरली, तेव्हा गव्हर्नर ॲडमिरल अहसन आणि माझे मामा या दोघांनी सल्ला दिला की समस्येवर फक्त राजकीय तोडगाच निघू शकतो. पण याह्या खान आणि त्यांचे सल्लागार लष्करी कारवाईवर ठाम होते."

"मामांना येणाऱ्या संकटाची पूर्ण कल्पना होती. या निर्णयाचा भाग होण्याऐवजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे श्रेयस्कर मानले. 5 मार्च 1971 रोजी त्यांनी आपला राजीनामा जनरल याह्या खान यांना पाठवला. सुरुवातीला त्यांना याह्या यांच्या रागाला सामोरे जावे लागले, पण नंतरच्या घटनांनी हे सिद्ध केले की ते योग्य होते."

भुट्टो यांना फाशी न देण्याचा सल्ला

पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना माहित होते की साहिबजादा याकूब खान यांचे फ्रेंच, जर्मन, इटालियन, रशियन, पर्शियन आणि अरबीसह 10 भाषांवर प्रभुत्व होते.

ढाकामध्ये असताना त्यांनी थोडी-थोडी बंगाली भाषाही शिकली होती. भुट्टो यांनी 1972 मध्ये त्यांची फ्रान्समध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून नियुक्ती केली. जेव्हा 1977 मध्ये जनरल झिया-उल-हक यांनी भुट्टो यांची सत्ता उलथवून लावली, तेव्हा याकूब मॉस्कोमध्ये पाकिस्तानचे राजदूत होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री साहिबजादा याकूब खान, भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री इंदर कुमार गुजराल यांच्यासोबत

हामिद मीर लिहितात, "सरकारचा भाग असूनही साहिबजादा याकूब खान यांनी जनरल झियांना सल्ला दिला की त्यांनी भुट्टो यांना फाशी देऊ नये, पण झियांनी त्यांचा सल्ला मानला नाही. वेगळे मत असूनही झियांनी 1982 मध्ये साहिबजादा याकूब खान यांची पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली."

35 वर्षांनंतर दोन्ही भावांची दिल्लीत भेट

त्याच वर्षी याकूब खान परराष्ट्र मंत्री म्हणून नवी दिल्लीला आले होते.

साहिबजादा युनूस यांची सून समन खान आठवणींना उजाळा देत म्हणतात, "दिल्लीतच याकूब आणि त्यांचे मोठे भाऊ युनूस यांची 35 वर्षांनंतर भेट झाली. त्यावेळी मी तिथेच होते. माझ्या वडिलांनी त्या दोघांना आपल्या घरी आमंत्रित केले होते. ते गाडीतून उतरून आत आले तो प्रसंग मला अजूनही आठवतो. दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला."

फोटो स्रोत, Saman Ali Khan

फोटो कॅप्शन, साहिबजादा युनूस खान (फाईल फोटो)

त्यांच्या सांगण्यानुसार, "अब्बाजानींनी त्यांना 'नट्टा' या त्यांच्या जुन्या टोपणनावाने हाक मारली. याकूब उंच होते, पण त्यांचे दोन्ही भाऊ त्यांच्यापेक्षा जास्त उंच होते, म्हणून ते त्यांना नट्टा म्हणायचे. दोन सैन्यात काम केलेली आणि कणखर मानली जाणारी माणसे अशा प्रकारे उघडपणे रडत आहेत, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले."

"त्यांच्यातील रक्ताचे नाते त्यावेळी अश्रूंच्या रूपाने बाहेर आले. जेव्हा ते बसले तेव्हा दोघांनीही आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा दिला. दोघांनीही काश्मीर युद्धाचा कोणताही उल्लेख केला नाही."

निवृत्तीनंतर अलीगढमध्ये स्थायिक

दरम्यान, युनूस खान भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे एडीसी (ADC) राहिले होते.

युनूस यांच्यावर संशोधन करणाऱ्या निवेदिता सिंह सांगतात, "नंतर त्यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे एडीसी म्हणूनही काम केले. ते 1962 च्या भारत-चीन युद्धावेळी काश्मीरमध्ये आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी बरेलीमध्ये तैनात होते. ते एक देशभक्त, स्वाभिमानी आणि साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवणारे व्यक्ती होते."

"ते खूप कमी बोलायचे. त्यांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याऐवजी पडद्यामागे राहणे आवडायचे. 1969 मध्ये ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले. त्यांचा मुलगा नदीम खान यांनी मला सांगितले होते की, निवृत्त झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कर्नल युनूस नेहमीप्रमाणे तयार होऊन लष्करी गणवेश घालून स्वतःला आरशात पाहत होते, तेव्हाच त्यांना आठवले की ते निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्ध झाले होते
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युनूस खान यांची सून समन अली खान सांगतात, "माझे लग्न त्यांच्या मधल्या मुलाशी झाले होते. त्यांचे संगोपन अत्यंत शिस्तीत झाले होते. त्यांच्या प्रत्येक कामाची वेळ ठरलेली असायची. संध्याकाळी ते फिरायला जायचे. त्यांना चांगले कपडे घालण्याची आवड होती."

"जेव्हा ते हिंदुस्तानी पेहराव करायचे, तेव्हा त्यांचा कुर्ता-पायजमा आणि शेरवानी उत्तम प्रकारे शिवलेली असायची. जेव्हा ते इंग्रजी कपडे घालायचे, तेव्हा ते अगदी ब्रिटिश थाटात असायचे. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्यांचे जेवण वेगवेगळ्या प्रकारचे असायचे."

"हिवाळ्यात त्यांना गरम सूप आणि गरम पुडिंग आवडायचे, तर उन्हाळ्यात ते थंड सूप आणि सॅलड खाणे पसंत करायचे. सैनिक असूनही ते खूप हळवे होते. ज्यांच्याकडे फारशी साधने नसायची, अशा लोकांची ते खूप काळजी घ्यायचे. ते अत्यंत उच्च नैतिक चारित्र्य असलेले व्यक्ती होते."

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर युनूस खान यांनी अलिगढमधील 'आफताब मंजिल'ला आपले निवासस्थान बनवले. त्यांनी अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये मानद प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. 30 जानेवारी 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना अलीगढमध्येच दफन करण्यात आले.

त्यांचे धाकटे भाऊ साहिबजादा याकूब खान अनेक वर्षे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम करत राहिले. याकूब यांना उर्दू शायरी, विशेषतः गालिब वाचण्याची खूप आवड होती. त्यांना चित्रकलेचाही छंद होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साहिबजादा याकूब खान डावीकडे, अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री वॉरेन क्रिस्टोफर यांच्यासोबत

मुनीझा शम्सी लिहितात, "त्यांचे कपडे अत्यंत स्टायलिश असायचे. त्यांचे सूट आणि शेरवानी सुद्धा लंडनच्या प्रसिद्ध 'सेविल रो'मध्ये शिवले जायचे. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत सैन्याचा विरोध करण्याच्या पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा ते महत्त्वाचा भाग होते."

हामिद मीर लिहितात, "1986 मध्ये जेव्हा जनरल झियांनी कारगिलवर ताबा मिळवण्याची आपली योजना आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी ती पूर्णपणे फेटाळून लावली. झियांनी त्यांच्या सल्ल्याचा मान राखला आणि ती योजना रद्द करण्यात आली."

"काही वर्षांनंतर बेनझीर भुट्टो यांनीही कारगिलच्या टेकड्यांवर ताबा मिळवण्याचा लष्करी कमांडरांचा सल्ला आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत शेअर केला. यावेळीही साहिबजादा यांनी विरोध केला आणि बेनझीर भुट्टो यांना तसे करण्यापासून परावृत्त केले."

"1999 मध्ये तिसऱ्यांदा पाकिस्तानी सैन्याने सरकारला विश्वासात न घेता ही योजना लागू करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, ज्यामुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आणि त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले."

साहिबजादा याकूब खान यांचे निधन

साहिबजादा याकूब खान हे पाकिस्तानचे सर्वात दीर्घकाळ परराष्ट्र मंत्री राहिले. त्यांनी झिया-उल-हक यांच्याशिवाय बेनझीर भुट्टो आणि नवाझ शरीफ यांच्यासोबतही काम केले होते. त्यांच्या नेतृत्वाखालीच अफगाणिस्तानमधून सोव्हिएत सैन्याच्या माघारीवर शिक्कामोर्तब झाले होते.

आपल्या शेवटच्या दिवसात ते नवाझ शरीफ सरकारचे अनौपचारिक सल्लागार म्हणून काम करत होते.

हामिद मीर लिहितात, "एकदा जेव्हा मी त्यांना म्हणालो की त्यांनी आपले आत्मचरित्र लिहावे, तेव्हा त्यांचे उत्तर होते - मला माझ्या कर्तृत्वाचे आणि दुःखाचे प्रदर्शन करायचे नाही. मी माझ्या भावाचा उल्लेख केल्याशिवाय माझी कहाणी सांगू शकत नाही, ज्याने भारताची सेवा केली होती. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो होतो. त्याने त्याचे काम केले आणि मी माझे."

आपल्या मोठ्या भावाच्या निधनानंतर साधारण 32 वर्षांनी, धाकट्या भावाने 26 जानेवारी 2016 रोजी अखेरचा श्वास घेतला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.