मोठ्या स्तनांमुळे महिलांना आरोग्याच्या कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं?

    • Author, रेबेका थॉर्न
    • Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"मी नेहमी खांदे वाकवून चालायची. निव्वळ माझे स्तन खूप मोठे आहे, हे दिसू नये म्हणून मी तसं करायचे. ही गोष्ट मला अजूनही आठवते, कारण मला त्या गोष्टीची खूपच लाज वाटायची."

हे उद्गार आहेत, अर्जेंटिनातील एका विद्यापीठातील प्राध्यापक रॅक्वेल यांचे.

रॅक्वेल यांनी 2010 मध्ये ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी म्हणजे स्तनांचा आकार छोटा करण्याची शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं.

आता 52 वर्षांच्या असलेल्या रॅक्वेल म्हणतात की या शस्त्रक्रियेतून जे साध्य झालं त्यामुळे त्यांना एकप्रकारे 'स्वातंत्र्यांची जाणीव' झाली. असं स्वातंत्र्य, या भावना यापूर्वी त्यांनी कधीही अनुभवल्या नव्हत्या.

जगातील अनेक भागांमध्ये मोठे स्तन आकर्षक मानले जातात. मात्र प्रत्यक्षात यामुळे महिलांचं आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता याबाबतीत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

मोठ्या स्तनांचा संबंध अनेक समस्यांशी असतो. उदाहरणार्थ, पाठदुखी, डोकेदुखी, चुकीचं पोश्चर किंवा शरीराची स्थिती, सुन्नपणा, झोपेच्या समस्या आणि मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या.

खेळ आणि व्यायामावर देखील परिणाम

इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ॲस्थेटिक प्लॅस्टिक सर्जरीच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये जगभरात 6,52,676 ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्यात आल्या.

यातील सर्वाधिक म्हणजे 1,15,647 ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी ब्राझीलमध्ये झाल्या. त्यानंतर अमेरिकेत 67,478, फ्रान्समध्ये 38,780, त्यानंतर जर्मनीत 32,068, तुर्कियेत 25,334 आणि भारतात 22,400 ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी झाल्या.

रॅक्वेल म्हणतात की किशोरवयापासूनच त्यांना मोठ्या स्तनांमुळे सतत पाठदुखीचा त्रास सहन करावा लागला.

त्यांच्या मते, अर्जेंटिनामध्ये मात्र मोठ्या स्तनांना अनेकदा एकप्रकारचं वरदान मानलं जातं. त्या म्हणतात, "बहुतांश लोक, विशेषकरून महिला, तुम्हाला म्हणतात की तुम्ही खूप नशीबवान आहात."

त्या म्हणतात, "मी नशीबवान नव्हते. मी खूप त्रास सहन केला. एक किशोरवयीन म्हणून मी त्रास सहन केला. एक महिला म्हणूनही त्रास सहन केला आणि एक आई म्हणूनही त्रास सहन केला."

त्या म्हणतात की शरीर लपवण्यासाठी त्या ज्याप्रकारे चालायच्या, त्यामुळे आजदेखील त्यांना पाठदुखीचा त्रास होतो.

एक सक्रिय व्यक्ती म्हणून रॅक्वेल यांना योगासनं, पिलाटीज आणि जिममध्ये व्यायाम करणं आवडायचं. मात्र शेवटी मोठ्या स्तनांच्या ओझ्यामुळे त्यांना नाईलाजानं त्यांच्या आवडत्या कृती करणं बंद करावं लागलं.

डॉक्टर नोरा न्यूजेंट, ब्रिटिश असोसिएशन ऑफ ॲस्थेटिक प्लॅस्टिक सर्जन्सच्या अध्यक्ष आहेत. त्या म्हणतात की ज्या महिला ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्यासाठी येतात, त्यांना चालण्या-फिरण्यात आणि व्यायाम करण्यात अडचणी येतात.

त्या म्हणतात, "व्यवहारी दृष्टीकोनातून पाहिलं तर मोठे स्तन वजनदार असतात. त्यामुळे ते शरीराला पुढच्या बाजूला ओढतात. यामुळे पाठ आणि मानेवर सातत्यानं दबाव येतो."

"यामुळे व्यायाम करणं खूपच गैरसोयीचं होतं. योग्य मापाची, आधार देणारी ब्रा शोधणंदेखील खूप कठीण होऊन बसतं."

रॅक्वेल म्हणतात की त्यांना त्यांची छाती सांभाळण्यासाठी एकाचवेळी 'दोन किंवा तीन' ब्रा घालाव्या लागायच्या. तसंच त्यांच्या मापाची ब्रा शोधणं हा त्यांच्यावरील एक वेगळा आर्थिक भारदेखील झाला होता.

त्या म्हणतात, "अर्जेंटिनामध्ये मोठ्या स्तनांसाठी मिळणाऱ्या ब्रा खूप महागड्या असायच्या."

'मला स्वांतत्र्य मिळाल्यासारखं वाटलं'

न्यूजेंट सांगतात की त्यांच्याकडे येणाऱ्या बहुतांश महिलांच्या प्रत्येक स्तनातून 500 ग्रॅम ते 800 ग्रॅमपर्यंत वजन कमी केलं जातं.

त्या म्हणतात, "कधी-कधी शरीराच्या एकूण वजनाच्या दृष्टीनं हे वजन फारसं वाटत नाही. मात्र शरीराच्या एका छोट्याशी भागासाठी हे खूप वजन असतं."

रॅक्वेल यांच्या बाबतीत, डॉक्टरांनी त्यांच्या स्तनातून एकूण 2.5 किलो वजन कमी केलं.

रॅक्वेल म्हणतात, "मला आठवतं, शस्त्रक्रियेनंतर मला फरशीवरून काहीतरी उचलायचं होतं...आणि मला असं वाटलं की 'अरे वा, हे तर पूर्णपणे वेगळं शरीर आहे.' खरोखरंच मला, खूप जास्त स्वांतत्र्याची जाणीव झाली."

'चांगल्या ब्रा ची ताकद'

प्राध्यापक जोआना वेकफील्ड स्कर, त्यांना सतत होत असलेल्या ब्रेस्ट पेनची समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेल्या. त्यावेळेस त्यांना सल्ला देण्यात आला की त्यांना एका योग्य फिटिंगच्या ब्राची आवश्यकता आहे.

बायोमॅकेनिक्स तज्ज्ञ असल्यामुळे, त्यांनी चांगली ब्रा कशी असते, यावर संशोधन करण्याचं ठरवलं.

त्या म्हणतात, "माझ्या लक्षात आलं की आपल्याला ब्रा ची आवश्यकता का असते, ब्रा चे काय फायदे असतात आणि ब्रा चं काम कसं असलं पाहिजे, याबद्दल आपल्याला फार कमी माहीत आहे."

"त्याउलट, ब्रा कडे बहुतांशपणे एक फॅशनची वस्तू म्हणून पाहिलं गेलं आहे. त्याकडे एखादी कामाची वस्तू म्हणून, ज्याचा काही उद्देश असेल आणि ज्याचे आरोग्याशी संबंधित फायदे असतील, या दृष्टीनं पाहण्यात आलेलं नाही. ही गोष्ट मला खूपच निराशाजनक वाटली."

या मुद्द्यामुळे त्यांना 2005 मध्ये ब्रिटनमधील, पोर्ट्समाउथ विद्यापीठात, ब्रेस्ट हेल्थ म्हणजे स्तनाच्या आरोग्यावर एक रिसर्च ग्रुप सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांच्या टीमनं चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्यामुळे होणारे 4 मोठे नकारात्मक परिणाम ओळखले. ते म्हणजे,

  • वेदना, त्वचेमध्ये ताण
  • ऊतींचं नुकसान
  • श्वास घेण्याची पद्धत आणि हृदयाच्या ठोक्यांमधील वेळेतील बदल
  • शारीरिक क्रियांमध्ये अडथळा

त्या म्हणतात, "जर तुमचे स्तन वजनदार असतील आणि जर ते वरखाली होत असतील, तर त्यामुळे तुमच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत खरोखरंच बदल होऊ शकतो. तुम्ही जमिनीवर किती ताकदीचा वापर करता यामध्येदेखील त्यामुळे बदल होतो. म्हणजेच याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या काम करण्याच्या पद्धतीवर होतो."

त्यांनी हे लक्षात घेतलं की ब्रेस्ट पेन कमी करण्यामागील सर्वात महत्त्वाची बाब, स्तन किती जास्त हलतात ही नाही. तर त्यांची हालचाल किती संथ किंवा कमी केली जाऊ शकते हा त्यातील मुद्दा आहे.

या टीमनं, 'लायनेसेस' या नावानं ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या महिला फुटबॉल टीममधील आघाडीच्या ॲथलीट आणि जगातील काही टॉप गोल्फ खेळाडूंबरोबर मिळून त्यांच्यासाठी सर्वोत्तम ब्रा तयार करण्यावर काम केलं आहे.

वेकफील्ड स्कर म्हणतात, "आपल्याला दिसतं आहे की एफए, वर्ल्ड रग्बीसारख्या संस्था महिला ॲथलीटच्या आरोग्याशी संबंधित उपक्रमांवर पैसे खर्च करत आहेत. हा बदल गेल्या जवळपास 5 वर्षांमध्येच दिसून आला आहे."

"हे सर्व आता नवीच आहे. मात्र हा बदल आता दिसतो आहे ही खूप चांगली गोष्ट आहे."

'रुग्णांना चांगलं आयुष्य जगायचं आहे'

समाज मोठ्या स्तनांच्या ओझ्याकडे कसं पाहतो आणि काय समजतो, ही गोष्ट रॅक्वेल यांना स्वत:ला सहन करावी लागली.

त्या म्हणतात की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्याच्या निर्णयावरून त्यांना त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांच्या भेदभावाला तोंड द्यावं लागलं. त्याचबरोबर त्यांच्या निर्णयामागच्या कारणाबद्दल एक सामान्य गैरसमज होता.

त्या म्हणतात, "बहुतांश लोकांना वाटलं की हा आरोग्याशी संबंधित नाही, तर फक्त सौंदर्याशी निगडीत निर्णय होता. मी ही शस्त्रक्रिया केल्यानंतर, एक महिला मला म्हणाली, आता तू पोटावरदेखील शस्त्रक्रिया केली पाहिजे - उदाहरणार्थ लायपोसक्शन."

अशा प्रतिक्रिया येऊन देखील, रॅक्वेल म्हणतात की त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चाताप वाटत नाही.

त्या म्हणतात, "मी खूप खूश आहे. मी आता मेनोपॉजच्या काळात आहे. अशा वेळी मोठ्या स्तनांसह मी कशी जगू शकले असते, हे मला माहीत नाही. त्या शरीराबरोबर संघर्ष करत असल्याचा मी विचारदेखील करू शकत नाही."

न्यूजेंट यांचं म्हणणं आहे की ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करून घेणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येतून कदाचित सेल्फ केअर म्हणजे स्वत:ची काळजी घेण्यामधील वाढता रस दिसून येतो.

त्या म्हणतात, "नक्कीच, फक्त महिलांनाच नाही तर, सर्वच रुग्णांना चांगलं आयुष्य जगायचं असतं."

"हा काही परफेक्शनचा शोध नाही, तर आरोग्य आणि निरोगीपणाचा शोध आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.