सरपंचपदासाठी अपात्र ठरण्याच्या भीतीने बापानंच केली 6 वर्षांच्या लेकीची हत्या, नांदेडमधील हे प्रकरण नेमकं काय?

    • Author, अमरेंद्र यारलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

(इशारा: या बातमीतील काही गोष्टी तुम्हाला विचलित करू शकतात.)

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.

तिथे निवडणुकीला उभं राहण्यासाठी एका पित्यानंच त्याच्या लहान मुलीची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीची हत्या तेलंगणात करण्यात आली होती.

तेलंगणातील निजामाबाद पोलिसांनी सांगितलं की, ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांसाठी पात्रतेसाठी असलेल्या अपत्यांबाबतच्या नियमामुळे पित्यानंच मुलीची हत्या केली.

तीन अपत्ये असल्यानं अपात्र ठरण्याच्या भीतीनं त्यानं मुलीचीच हत्या केली.

समोर आलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील पांडुरंग कोंडमंगले नावाच्या व्यक्तीनं ही हत्या केली आहे.

पोलिसांनी मृत मुलीची ओळख पटवली आहे, ही 6 वर्षांची मुलगी प्राची कोंडमंगले असून तिला तेलंगणात नेऊन तिची हत्या करण्यात आली.

निजामाबादचे पोलीस आय़ुक्त पी. साई चैतन्य यांनी 2 फेब्रुवारीला प्रसारमाध्यमांना या घटनेची सविस्तर माहिती दिली.

निजामसागर कालव्यात सापडला मुलीचा मृतदेह

तेलंगणातील येडापल्लीजवळ असलेल्या एआरपी कॅम्पच्या बाहेरील बाजूस निजामसागर कालव्यात एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी निजामाबादचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली 3 पथकं तयार करण्यात आली.

त्यांनी या मुलीच्या मृतदेहाचा फोटो प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याची आणि मुलीच्या कोणत्याही नातेवाईकानं यासंदर्भात माहिती देण्याची विनंती केली.

कॉन्स्टेबलचं व्हॉट्सॲप स्टेटस

सुधीर नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलनं पोलिसांकडून करण्यात आलेलं हे आवाहन त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर टाकलं होतं.

त्याचं व्हॉट्सॲप स्टेटस नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील त्याच्या नातेवाईकांनी पाहिलं. त्यांनी या कॉन्स्टेबलला सांगितलं की, ते या मुलीला ओळखतात.

ही मुलगी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावातील 6 वर्षांची प्राची कोंडमंगले असल्याची ओळख पटवण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आखला कट

प्राचीचे वडील पांडुरंग कोंडमंगले असल्याची ओळख पोलिसांनी पटवली. पांडुरंगला, पत्नी आणि 3 अपत्यं आहेत. यात प्राची आणि तिची जुळी बहीण आणि एक मुलगा आहे.

पोलिसांनी सांगितलं की, पांडुरंग गावात सलून चालवतो.

महाराष्ट्रात यावर्षी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. सध्या गणेश शिंदे केरूर गावचा सरपंच आहे.

मात्र, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या सरंपचपदासाठीच्या आरक्षणात बदल होणार आहे.

त्यामुळं गणेश शिंदेनं त्याच्या जागी पांडुरंगला निवडणुकीत उभं करण्याचा निर्णय घेतला. पांडुरंग त्यांच्या परिचयातील आहे.

"जरी ते सत्तेत नसले, तरीदेखील ते सांगतील तसं वागणाऱ्या व्यक्तीला त्यांना सरपंचपदी निवडून आणायचं आहे. याचाच एक भाग म्हणून, गणेश शिंदे पांडुरंगशी बोलले आणि त्यांनी पांडुरंगला निवडणुकीत उभं राहण्यास राजी केलं," असं बोधन ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजय बाबू यांनी बीबीसीला सांगितलं.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 3 अपत्यं असलेली व्यक्ती सरपंचपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते, असा नियम आहे.

निजामाबादचे पोलीस आयुक्त साई चैतन्य म्हणाले की पांडुरंगला 3 अपत्य असल्यामुळे वाटलं की तो निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अपात्र ठरेल. त्यामुळे पांडुरंगनं गणेश शिंदेसोबत मिळून त्याच्या 3 अपत्यांपैकी एकाला मार्गातून कोणत्याही प्रकारे दूर करण्याचा कट आखला होता.

'दत्तक देण्याचा प्रयत्न अयशस्वी...'

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की सुरुवातीला या दोघांनी पांडुरंगच्या 3 अपत्यांपैकी एकाला दत्तक देण्याची योजना आखली होती. मात्र दत्तक घेण्यासंदर्भात असलेल्या कडक नियमांमुळे त्यांनी तो विचार सोडून दिला.

"पांडुरंगला मुलगा दत्तक द्यायचा होता. मात्र जन्मदाखल्यावर आधीच त्याचं नाव होतं. दत्तक घेण्यासाठीच्या नियमांमुळे त्याला तो प्रयत्न सोडून द्यावा लागला.

जन्मदाखल्यात बदल करण्यासाठी ते पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी त्यासाठीचे प्रयत्न केले. मात्र ते शक्य झालं नाही," असंही ते म्हणाले.

पोलीस आयुक्त म्हणाले की पांडुरंगला वाटलं जर त्यानं प्राचीची हत्या केली, तर त्याला दोनच अपत्य राहतील आणि मग त्याला निवडणुकीला उभं राहता येईल.

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, "त्यांनी मुलीला घेतलं आणि पांडुरंगच्या मोटरसायकलवरून (MH26 BY 7495) ते निघाले. निजामाबादकडे जाताना, येडापल्ली सर्कलमधील अंबाम गावच्या वाटेवर निजामसागर कालव्यात ढकल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला."

जिथे ही हत्या झाली तिथून केरूर गाव साधारण 65 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या मोटरसायकलवर मुलीला घरातून नेण्यात आलं होतं, ती मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

वडिलांवर होता लेकीचा जीव

सर्कल इन्स्पेक्टर विजय बाबू यांनी बीबीसीला सांगितलं की 3 अपत्य असल्यामुळे प्राचीची हत्या करण्यासाठी ठोस कारण होतं.

"प्राचीला तिचे वडील पांडुरंग खूप आवडायचे. पांडुरंग आल्यावर ती लगेचच त्याच्याकडे जात असे. पांडुरंग जे सांगेल ते सर्व प्राची ऐकायची. दुसरी मुलगी बहुतांश वेळ आईसोबत घालवते. त्यानं मुलालाच वारस मानलं होतं आणि त्यामुळे पांडुरंगला मुलाला मारायचं नव्हतं," असं विजय बाबू म्हणाले.

पांडुरंगनं माहिती दिली की त्यानं प्राचीला त्याच्यासोबत घरातून नेलं होतं. त्याला वाटलं होतं की प्राचीचं त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे ती एक शब्दही न बोलता त्याच्यासोबत येईल.

पोलिसांनी सांगितलं की, तपासादरम्यान पांडुरंगनं सांगितलं की जर त्यानं मुलीची हत्या महाराष्ट्रात केली असती, तर तिची ओळख पटवली जाण्याची शक्यता होती. मात्र जर शेजारच्या राज्यात तिची हत्या केली तर त्याकडे एक अपघात म्हणून पाहिलं जाण्याची शक्यता होती

पोलिसांनी सांगितलं की मुलीची हत्या केल्यानंतर पांडुरंगनं मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून, ती मृत असल्याचं नाटक करून निवडणूक लढवण्याची योजना आखली होती.

निजामाबादचे पोलीस आयुक्त साई चैतन्य यांनी सांगितलं की, या हत्येच्या प्रकरणात पांडुरंगचा साथीदार म्हणून गणेश शिंदेची ओळख पटवण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बीबीसी, आरोपी पांडुरंग आणि गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ती मिळाल्यावर आम्ही त्या माहितीचा इथं समावेश करू.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)