You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रश्मिका-विजय देवरकोंडाच्या लग्नानंतर चर्चेत असलेली कोडवा विवाह पद्धत काय आहे? कसे होतात विधी?
- Author, अमरेंद्र यारलागड्डा
- Role, बीबीसी तेलुगु
- वाचन वेळ: 5 मिनिटे
तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा 26 फेब्रुवारीला राजस्थानमधील उदयपूरमध्ये विवाह पार पडला.
दोघांनीही आपल्या विवाहाचे खास फोटो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले.
पण सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाबद्दल फक्त सेलिब्रिटी चर्चा नाही, तर कोडवा परंपरेत झालेल्या लग्नावरही मोठी चर्चा सुरू आहे.
कोडवा परंपरेतील विवाहावर मोठी चर्चा
रश्मिका ही कर्नाटकच्या कोडगू (कुर्ग) जिल्ह्यातील विराज पेटा येथील रहिवासी आहे. तिचं शिक्षणही कुर्गमध्येच झालं आहे.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, दोघांचा विवाह सामान्य हिंदू पद्धतीने तसेच कोडवा परंपरेनुसारही पार पडला.
याच कारणामुळे आता कोडवा पद्धतीच्या विवाह परंपरेवर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
पण विजय किंवा रश्मिकाने त्यांचा विवाह कोणत्या परंपरेनुसार पार पडला हे अद्याप सांगितलेलं नाही.
सामान्यपणे कर्नाटकच्या कोडगू (कुर्ग) भागातील लोक कोडवा परंपरेनुसार विवाह करतात. या भागातील लोकांना कोडवा म्हणतात.
रश्मिका ही कोडगूची असल्यामुळे त्यांचा विवाहही त्या परंपरेनुसार झाला असेल, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे.
कोडवा विवाह म्हणजे काय?
कोडवा विवाह हा सामान्य हिंदू विवाहापेक्षा खूपच वेगळा असतो.
हिंदू विवाहात पंडित मंत्र म्हणतात, मंगळसूत्र बांधलं जातं, अक्षदा टाकल्या जातात आणि अनेक वैदिक विधी पार पाडले जातात.
परंतु, कोडवा परंपरेतील विवाहात पंडित नसतात.
घरातील ज्येष्ठ मंडळीच विवाह पार पाडतात. विवाह मंडपात एक दिवा लावला जातो आणि पितरांची पूजा केली जाते.
म्हैसूरचे तेलुगू अभ्यासक रघु शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, कोडवा आणि हिंदू विवाहात फरक आहे.
कोडवा विवाहात पंडित फार कमी वेळा बोलावले जातात. त्यांनी स्वतःही 4 ते 5 कोडवा विवाह पार पाडले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
2 दिवसांचे विवाह विधी
कोडवाक्लॅन डॉट कॉमनुसार, कोडवा विवाहाचे विधी साधारणपणे 2 दिवस चालतात.
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार,
पहिला दिवस - मंडप आणि तयारी
पहिल्या दिवशी वधू-वराचे कुटुंबीय विवाहस्थळी येतात. तिथे विवाहासाठीचा मंडप उभारला जातो.
आंबा, केळीची पानं आणि फणसाच्या फांद्यांनी मंडप सजवला जातो.
रघु शर्मा सांगतात, "ही परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे. मंडपाचे खांबही अशा झाडांच्या लाकडापासून बनवले जातात, ज्यातून दुधासारखा रस निघतो. हा देखील त्यांच्या परंपरेचाच एक भाग आहे."
यानंतर विवाहाचा स्वयंपाक करणारे लोक आणि कुटुंबातील सदस्य सर्वजण मिळून एकत्र काम करतात.
या संपूर्ण प्रक्रियेला 'ऊर कोडुओ', 'पंदाल पनी' किंवा 'तेरनेबेप्पो' असं म्हणतात.
कोडवा परंपरेतील विवाहाच्या मेजवानीत डुकराचं मांस देणं आवश्यक मानलं जातं.
रघु शर्मा सांगतात, "विवाहात मांसाहार आवश्यक असतो, विशेषतः त्यात डुकराचं मांस असतं."
सायंकाळी सर्वजण मिळून आनंद साजरा करतात.
दुसरा दिवस- 'मंगला'
दुसऱ्या दिवसाला मंगला म्हटलं जातं.
सकाळी वराच्या चेहऱ्यावर दूध लावून त्याची दाढी केली जाते. त्यानंतर त्याला मंगल स्नान घातलं जातं. या विधीत वराची आई आणि 2 विवाहित महिला सहभागी होतात.
यानंतर वर कुप्पया (पारंपरिक कोडवा पोशाख) घालतो आणि कंबरेला कद्र-कत्थी (कंबरेवर परिधान केलेली पारंपारिक तलवार) धारण करतो.
मात्र व्हायरल झालेल्या विवाहाच्या फोटोमध्ये विजय देवरकोंडा कोडवा पोशाखात दिसला नाही. त्याच्या कंबरेला सोन्याचा कमरपट्टा होता आणि वर लाल वस्त्र त्यानं परिधान केलं होतं.
मंगल स्नानानंतर वधूला बांगड्या घालण्याचा विधी केला जातो.
वधू लाल रंगाची, सोनेरी किनार असलेली साडी परिधान करते.
विवाहाच्या विधीत 'बाले बिरूद'ला खास महत्त्व असतं. म्हणजे विवाहाच्या हॉलकडे जाणाऱ्या वाटेवर केळीच्या झाडांची खोडं फुलांनी सजवून एका रांगेत ठेवले जातात.
विवाह मंडपाकडे जाणारा मार्ग केळी आणि फुलांनी सजवला जातो.
यानंतर वधू किंवा वराचे मामा एका फटक्यात तलवारीने हे केळीचे खोड कापतात.
रघु शर्मा सांगतात, "काही ठिकाणी हा विधी वर करतो, तर काही ठिकाणी मामा करतो. परंपरा स्थानानुसार बदलते."
कापणीनंतर वर–वधू मंडपाभोवती 3 प्रदक्षिणा घालतात आणि पूर्व दिशेकडे बसतात.
आशीर्वाद आणि अधिकारांचा विधी
यानंतर आशीर्वाद दिले जातात.
सुरुवातीला आई, मग वडील आणि त्यानंतर इतर ज्येष्ठ मंडळी आशीर्वाद देतात.
यानंतर वधू वराला दूध, भेटवस्तू आणि सोने-चांदी-तांब्याच्या नाण्यांची पिशवी देते.
दोघेही फुलांचे हार बदलतात.
यानंतर ज्येष्ठ मंडळी दिव्यापुढे जाहीर करतात, "आता वधूची जबाबदारी वराकडे सोपवली आहे."
त्यानंतर वधूच्या बाजूचे लोक वराच्या घरच्यांना 12 खडे/छोटे दगड देतात. याचा अर्थ, "आम्ही वधूचे सर्व हक्क/अधिकार आता तुमच्याकडे सोपवत आहेत."
वराच्या बाजूचे लोक 12 पैकी 11 खडे ठेवतात आणि एक खडा सोडून देतात. याचा अर्थ गरज पडल्यास वधूवर त्यांचाही हक्क राहील.
यानंतर वर वधूला घेऊन विवाह मंडपातून बाहेर पडतो. कोडवा विवाहात मंगळसूत्र खूपच लहान असतं.
महिलांना आधी जेवण दिलं जातं, हाही परंपरेचाच एक भाग आहे. सायंकाळी वधू गंगा पूजा करते आणि तिच्या पायात पारंपरिक पैंजण घातलं जातं.
वधू विहिरीकडे जाते. तिथे सुपारी, बेलपत्र, अक्षदा आणि नारळाचे तुकडे पाण्यात टाकून पूजा करते. नंतर तेच पाणी एका घागरीत भरून घेऊन येते.
ती घागर विवाहाच्या दिव्यापुढे ठेवली जाते. याचा अर्थ वधूने आता गृहलक्ष्मीच्या रुपात सासरच्या घरी प्रवेश केला आहे.
सर्वात शेवटी 'कोम्बारेक कोतुवावो' या विधीत वर वधूला आपल्या खोलीत बोलावतो, तिच्या चेहऱ्यावरचा पदर काढतो आणि तिला सोन्याची लग्नाची अंगठी भेट देतो.
अशा पद्धतीने विवाह सोहळा पार पडतो.
विजय-रश्मिकाचा चित्रपट प्रवास
रश्मिका मंदानाने 2016 मध्ये कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
2018 मध्ये रश्मिकाने छलो हा पहिला तेलुगू चित्रपट केला.
विजय देवरकोंडाने 2011 मध्ये तेलुगू चित्रपट नुव्विलामधून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
2016 मधील पेल्ली चोपुलू आणि 2017 मधील अर्जुन रेड्डी या सिनेमांमुळे तो घराघरांत पोहोचला.
दोघांनी नंतर एकत्रित गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेडमध्ये अभिनय केला.
सध्या दोघेही रणबाली सिनेमात एकत्र काम करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)