युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास हा 'देश' काय आहे, त्याच्या स्थापनेचा दावा करणारे नित्यानंद कोण आहेत?

फोटो स्रोत, YOUTUBE

वादग्रस्त धर्मोपदेशक नित्यानंद यांच्या युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास (युएसके) या स्वघोषित देशाच्या प्रतिनिधीने चक्क संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समितीनं (सीईएससीआर) आयोजित केलेल्या चर्चेला उपस्थिती लावली.

मात्र या देशाच्या प्रतिनिधीने केलेल्या वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केलं आहे.

जिनिव्हामध्ये 24 फेब्रुवारीला ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यात या तथाकथित देशाच्या दोन लोकांनी हजेरी लावली होती.

साडी, डोक्याला पगडी आणि खूप सारे सोन्याचे दागिने घातलेल्या महिला प्रतिनिधीचा फोटो नित्यानंद यांनी ट्वीट केला आहे.

त्यासोबत नित्यानंदने म्हटलं, “युएनमध्ये युएसके : शाश्वत विकासाबद्दल जे मिळवलंय त्यासंबंधीचे इनपुट्स दिले...जिनिव्हामधील संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समितीच्या चर्चेत युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासाच्या प्रतिनिधीची उपस्थिती.”

संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या 193 देशांच्या यादीत युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास या देशाचा समावेश नाहीये.

या ‘देशा’च्या प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेत नेमक्या सहभागी कशा झाल्या, याची नेमकी माहिती मिळाली नाही. पण या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सीईएससीआरच्या वेबसाइटवर लिंक उपलब्ध आहे.

UN ने काय म्हटलं?

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी न्यूजने संयुक्त राष्ट्रसंघाशी संपर्क साधला. यावेळी आपण कथित महिला प्रतिनिधीने केलेल्या वक्तव्यांकडे आपण दुर्लक्ष करतो, अशी प्रतिक्रिया UN ने दिली.

UN च्या मानवाधिकार उच्चायुक्त विव्हियन क्वॉक यांनी म्हटलं की संयुक्त राष्ट्रांच्या या बैठका सर्वांसाठी खुल्या असतात. यामध्ये कोणताही व्यक्ती आपले विचार प्रकट करू शकतो.

पण कथित USKच्या प्रतिनिधींनी केलेलं वक्तव्य हे अंतिम अहवालात समाविष्ट केलं जाणार नाही. कारण ही बैठक ज्या विषयावर आयोजित करण्यात आली होती, या दृष्टिने त्यांनी मांडलेलं मत अप्रासंगिक होतं.

तसंच दुसऱ्या बैठकीत त्यांनी केलेलं वक्तव्यही अंतिम अहवालाचा भाग असणार नाही, असं संयुक्त राष्ट्रसंघाने स्पष्ट केलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

नित्यानंद यांनी इक्वेडोरच्या इथे एक बेट विकत घेऊन नवीन देश स्थापन केल्याचा दावा केला होता. त्यांच्या या ‘देशा’चा स्वतःचा झेंडा आहे, घटना आहे, पासपोर्ट आणि बोधचिन्हही आहे.

नित्यानंद यांचा हा कथित देश आणि ते स्वतः चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. एकेकाळी सेक्स सीडीच्या वादग्रस्त प्रकरणात अडकलेले नित्यानंद वेळोवेळी चर्चेत आले आहेत.

नित्यानंद यांचा कैलास देश

स्वामी नित्यानंद यांनी दक्षिण अमेरिका खंडातील इक्वाडोरमध्ये खासगी भूखंड खरेदी केला होता. या भूखंडाचं नाव 'कैलास' असं ठेवण्यात आलं होतं. नित्यानंद यांनी या भूखंडाला 'हिंदूराष्ट्र' म्हटलंय.

'महान हिंदूराष्ट्र कैलासा'साठी देणग्यांचं आवाहनही नित्यानंद यांनी वेबसाईटवरून केलं होतं.

नित्यानंद यांनी 22 ऑगस्ट 2020ला 'कैलास'च्या नाण्यांचं अनावरण केलं.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 'कैलास' देशाच्या प्रतिनिधी

गणेश चतुर्थीला कैलासची नाणी जारी करण्यात येईल, असं त्यांनी एका व्हिडिओद्वारे जाहीर केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, देशांतर्गत व्यवहारासाठी स्वतंत्र चलन आणि विदेशी व्यापारासाठी वेगळं चलन अस्तित्वात आणलं जाईल.

नित्यानंद यांनी गणेश चतुर्थीला प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं की, कैलाश बँकेचं कामकाज सांभाळण्यासाठी त्यांच्या देशानं दुसऱ्या एका देशाबरोबर सामंजस्य करार केला आहे.

या कराराला 'हिंदू गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँक' असं नाव देण्यात आलं आहे.

नित्यानंद यांच्यावर अपहरणाचा आरोप

स्वत:ला ईश्वराचा अवतार मानणाऱ्या नित्यानंदांवर दोन मुलींच्या कथित अपहरणाचा आणि त्यांना कैद करण्याचा आरोप आहे. या प्रकरणी अहमदाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात नित्यानंद यांच्या 'सर्वाज्ञपीठम' आश्रमातील प्राणप्रिया आणि तत्त्वप्रिया या दोन संचालिकांना ताब्यात घेतलं.

या प्रकरणात बालमजुरी, अपहरण, आणि छळवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती चौकशी अधिकारी के. टी. कमारिया यांनी दिली होती.

2016 मध्ये हे प्रकरण उजेडात आलं.

बेपत्ता मुलींच्या पालकांकडून गुजरात उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला.

मुलींच्या पालकांच्या मते 2012 मध्ये नित्यानंद यांच्या शैक्षणिक आश्रमाकडून एका शैक्षणिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला त्यांनी आपल्या चार मुलींना पाठवलं होतं. तेव्हा त्यांचं वय सात ते पंधराच्या दरम्यान होतं.

त्यानंतर या मुलींना अहमदाबादच्या आश्रमात परस्पर पाठवण्यात आल्याचा आरोप या दाम्पत्यानं केला होता.

ही शाखा अहमदाबाद मधील दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये आहे. पोलिसांच्या मदतीने जेव्हा त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी हे दाम्पत्य गेलं, तेव्हा आश्रमात फक्त दोनच मुली आल्याचं त्यांना सांगण्यात आलं. इतर दोन मुलींनी तिथे जाण्यास नकार दिला होता.

त्यांच्या मुलींचं अपहरण झालं असून त्यांना बेकायदेशीर पद्धतीने डांबून ठेवल्याचा आरोप या दांपत्याने केला होता.

नित्यानंद आणि त्यांच्याशी निगडीत वाद

2010 मध्ये त्यांच्याविरुद्ध अश्लीलता आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांची एक कथित सेक्स सीडीही समोर आली होती. या कथित सीडीमध्ये ते दक्षिण भारतीय अभिनेत्रीबरोबर आपत्तीजनक स्थितीत दिसले होते.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जेव्हा तपासणी झाली तेव्हा ही सीडी खरी असल्याचं आढळलं. मात्र, नित्यानंदाच्या आश्रमाने भारतात झालेली तपासणी चुकीची असून अमेरिकेतल्या प्रयोगशाळेतल्या तपासणीचा हवाला दिला. त्यात सीडीबरोबर छेडछाड झाल्याचं म्हटलं होतं.

या प्रकरणी नित्यानंदांना अटक करण्यात आली. मात्र काही दिवसातच ते जामीनावर बाहेर आले. याशिवाय बंगळुरूमधील त्यांच्या आश्रमात एकदा धाड पडली होती. या धाडीत कंडोमची अनेक पाकिटं आणि गांजा जप्त करण्यात आला होता.

2012 मध्ये नित्यानंदांवर बलात्काराचेही आरोप झाले होते. याप्रकरणी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या वादानंतर ते फरार झाले होते. मात्र पाच दिवसांनी त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते फरार असताना पोलिसांनी त्यांच्या आश्रमाची तपासणी केली होती. त्यावेळी नित्यानंदांनी त्यांच्या अनुयायीबरोबर बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली होती.

याशिवाय अनेक वादांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी एकदा सांगितलं होतं, की ते माकडांना आणि इतर काही प्राण्यांना संस्कृत आणि तामिळ बोलायला शिकवू शकतात.

त्यांनी अल्बर्ट आईनस्टाईनच्या सिद्धांताला आव्हान दिलं होतं. त्यांच्या मते आईनस्टाईनचा सिद्धांत चुकीचा आहे. त्यांनंतर ते ट्रोल झाले होते.

एकदा तर आपण सूर्यालाही 40 मिनिटं उगवण्यापासून थांबवलं होतं, असा दावा त्यांनी केला होता. हा व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका प्रवचनात त्यांनी भूतांशी मैत्री केल्याचा दावा केला होता.

एका बाजूला वैज्ञानिक मंगळावर जीवसृष्टी शोधत आहेत. तर एका बाजूला ग्रहावर जीवसृष्टी आहे आणि ते धरतीवर शैक्षणिक सहलीसाठी येतात आहे.

नित्यानंदांच्या अशा दाव्यांची यादी खूप मोठी आहे. त्यातला एक दावा त्यांना भिंतींच्या पलीकडे सगळं दिसतं असाही आहे.

नित्यानंदांना मानणाऱ्यांची संख्या हजारांमध्ये आहे. त्यांचे अनुयायी केवळ भारतात नाहीत. त्यांना मानणारे लोक परदेशातही आहेत. त्यांनी 500 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिल्याचा दावा त्यांच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे.

कोण आहेत नित्यानंद?

फोटो स्रोत, Getty Images

मूळचे तामिळनाडूचे असलेल्या नित्यानंदांनी स्वत: देव असल्याचा दावा केला आहे.

त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार यूट्यूबवर त्यांचे 18 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आहे. त्यांनी 27 भाषांमध्ये 500 पुस्तकं लिहिण्याचा दावा केला आहे. यूट्यूबवर पाहिले जाणारे सगळ्यात लोकप्रिय आध्यात्मिक गुरू असल्याचा दावाही ते करतात.

वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 1 जानेवारी 1978 ला झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अरुणाचलम आणि आईचं नाव लोकनायकी आहे. त्यांचं बालपणीचं नाव राजशेखरन होतं. धार्मिक कार्याची आवड त्यांच्या आजोबांमुळे लागली. तेच त्यांचे पहिले गुरू होते.

त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण 1995 मध्ये पूर्ण केलं. त्यानंतर 12 वर्षांनी असताना त्यांनी रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरूवात केली.

नित्यानंद ध्यानपीठम या त्यांच्या पहिल्या आश्रमाची स्थापना 1 जानेवारी 2003 मध्ये बंगळुरूजवळ बिदादी येथे झाली.

अहमदाबादमध्ये असलेला त्यांचा आश्रम याच आश्रमाची एक शाखा आहे. तिथूनच मुली गायब झाल्याच्या प्रकरणात खटला दाखल करण्यात आलेला.

हेही वाचलंत का?