दुसऱ्या गर्भधारणेमुळे स्त्रियांच्या मेंदूत होतो 'अद्भुत बदल'; नव्या संशोधनातून काय कळलं?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, केट बोवी
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान आईंच्या मेंदूत विशेष बदल होतात, जे त्यांना लक्ष केंद्रित करण्यास आणि मुलांची काळजी घेण्यास मदत करतात, असं संशोधनातून समोर आलं आहे.

या बदलांचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

ॲमस्टरडॅम युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या (यूएमसी) नवीन अभ्यासात हे आढळून आलं आहे. त्यांच्या संशोधनानुसार दुसऱ्या बाळाच्या गर्भधारणे दरम्यान आईच्या मेंदूत 'अद्वितीय' बदल होतात. यामुळे त्यांना त्यांचं लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.

मातृत्वाची तयारी करण्यासाठी स्त्रीच्या पहिल्या गर्भधारणेदरम्यान तिच्या मेंदूमध्ये बदल होतात, असं संशोधकांनी यापूर्वीच शोधून काढलं होतं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

परंतु, नवीन अभ्यासानुसार दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान होणारे काही विशिष्ट बदल स्त्रियांना 'लक्ष केंद्रित करण्यास आणि काम पूर्ण करण्यास' मदत करू शकतात.

काही स्त्रियांना मातृत्वाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्या का निर्माण होतात, याचाही अंदाज लावायला हे निष्कर्ष मदत करू शकतात.

महिलांच्या मेंदूचे स्कॅन पाहून अभ्यास

बहुतेक महिला त्यांच्या आयुष्यात गर्भधारणेचा अनुभव घेतात. 2023 पर्यंत जागतिक स्तरावर प्रति महिला सरासरी 2.3 बाळांचा जन्म होत होता.

यूएमसीच्या 'प्रेग्नन्सी ब्रेन लॅब'च्या संशोधकांना पूर्वी असं आढळून आलं की, पहिल्या गर्भधारणेदरम्यान महिलेच्या मेंदूचा जो भाग स्वतःचा विचार करण्यास आणि मुलांच्या भावना समजून घेण्यास महत्त्वाचा असतो, तो बदलतो. यामुळे तिला मुलांची काळजी घेणं सोपं होतं.

नवीन अभ्यासात त्यांनी 110 महिलांवर लक्ष ठेवलं. त्यातील काही पहिल्यांदा माता बनत होत्या, काहींना दुसरे मूल होत होते, आणि तिसऱ्या गटातील महिला अपत्यहीन होत्या.

फोटो कॅप्शन, मेंदूत होणारे बदल महिलेला एकाच वेळी अनेक मुलांची काळजी घेण्याच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांसाठी तयार करतात, असं संशोधकांना आढळून आलं.

महिलांच्या गर्भधारणेपूर्वी आणि नंतर घेतलेले मेंदूचे स्कॅन पाहून, नेमकं काय बदललं हे संशोधकांना पाहता आलं.

दुसऱ्या गर्भधारणेतील महिलांच्या मेंदूत, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि संवेदना ओळखण्यासाठी जबाबदार असलेल्या भागांमध्ये अधिक बदल दिसले.

डेटा विश्लेषण करणाऱ्या संशोधक मिलू स्ट्रॅथॉफ म्हणतात, "हे बदल एकाहून अधिक मुलांची काळजी घेण्यास फायदेशीर ठरू शकतात."

मानसिक आरोग्यावर परिणाम

पहिल्या आणि दुसऱ्या गर्भधारणेतील मेंदूतील बदल आईच्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याशी जोडलेले असू शकतात, असंही अभ्यासात आढळून आलं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, जगभरातील सुमारे 10 टक्के गर्भवती महिला आणि 13 टक्के नुकतेच बाळाला जन्म दिलेल्या महिला मानसिक आजारांचा सामना करतात. यात प्रामुख्याने डिप्रेशनचा अनुभव येतो.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यूएमसीच्या अभ्यासात आढळून आलं की, महिलांच्या मेंदूच्या (सेरेब्रम) वरच्या भागातील बाह्य थरात होणारे रचना बदल गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर होणाऱ्या नैराश्याशी (पेरिपार्टम डिप्रेशन) संबंधित असतात.

पहिल्यांदाच आई झालेल्या महिलांसाठी, हे बदल त्यांच्या डिलिव्हरीनंतरच्या मानसिक आरोग्याशी अधिक संबंधित होते.

पण दुसऱ्यांदा आई झालेल्या महिलांसाठी, हे बदल गर्भधारणेदरम्यान त्यांच्या मानसिक आरोग्याशी अधिक जुळलेले होते.

यूएमसीच्या प्रेग्नन्सी ब्रेन लॅबच्या (गर्भधारणा मेंदू प्रयोगशाळा) प्रमुख एल्सेलिन होक्झेमा म्हणतात, "मेंदू फक्त पहिल्या गर्भधारणेदरम्यानच नव्हे, तर दुसऱ्या गर्भधारणेदरम्यानही बदलतो, हे आम्ही पहिल्यांदाच दाखवून दिलं."

त्या म्हणाल्या, "पहिल्या आणि दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान मेंदूत काही बदल एकसारखे म्हणजे समान आणि काही वेगळे म्हणजेच अद्वितीय अशा दोन्ही प्रकारे होतात. प्रत्येक गर्भधारणा महिलेच्या मेंदूत स्वतःची एक वेगळी अनोखी छाप सोडते."

लेखकांचं म्हणणं आहे की, या विषयावर आणखी संशोधन आवश्यक असलं तरी, या निष्कर्षांमुळे आईंची काळजी सुधारता येऊ शकते आणि काही महिलांमध्ये डिलिव्हरीनंतर डिप्रेशन का येतं हे समजून घेता येऊ शकतं.

"आई होताना मेंदू कसा बदलतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे," असं होक्झेमा म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)