लेस्बियन जोडपं, IVF मधील चूक आणि जन्माला आली दोन वेगळ्या वंशांची मुलं; काय आहे या गुंत्याची गोष्ट?

फोटो स्रोत, Keith Bridle / BBC

फोटो कॅप्शन, मुलगा जेम्सच्या गर्भधारणेसाठी चुकीच्या दात्याचा शुक्राणू वापरण्यात आल्याचं लॉरा आणि तिच्या जोडीदाराचं म्हणणं आहे.
    • Author, अ‍ॅना कॉलिन्सन
    • Role, फाईल ऑन 4 इन्व्हेस्टिगेट्स
    • Author, जो ॲडनिट
    • Role, बीबीसी न्यूज इन्व्हेस्टिगेशन्स
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

"जेम्सचा जन्म झाल्यानंतर लगेचच मला जाणवलं की, काहीतरी चुकीचं घडलंय," असं लॉरा सांगत होती.

ती आणि तिची जोडीदार बेथ यांना दोन मुलं आहेत, जेम्स आणि मोठी मुलगी केट. दोघांचाही जन्म उत्तर सायप्रसमधील एका क्लिनिकमध्ये आयव्हीएफ उपचारांद्वारे झाला आहे.

तिला आणि तिची जोडीदार, बेथ, यांना दोन मुले आहेत जेम्स आणि त्यांची मोठी मुलगी केट. दोघांचाही जन्म नॉर्दर्न सायप्रसमधील क्लिनिकमध्ये IVF उपचारांद्वारे झाला आहे.

त्या दोघींनी स्वतःची स्त्रीबीजं (एग्ज) वापरली आणि एकच, निरोगी व अनोळखी शुक्राणू दाता काळजीपूर्वक निवडला. त्यांनी क्लिनिकला स्पष्ट सांगितलं होतं की, दोन्ही बाळांसाठी एकाच दात्याचा वापर करावा, म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये जैविक दृष्ट्या नातं राहील.

पण जेम्सचा जन्म झाल्यावर त्याच्या 'सुंदर' तपकिरी डोळ्यांचा रंग बेथ आणि त्यांनी निवडलेल्या शुक्राणू दात्यापेक्षा खूप वेगळा असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, 'आमच्या क्लिनिककडून काही चूक झाली होती का?'

त्यांच्या डोक्यात या चिंतेनं घर केलं होतं. एक दशकानंतर बेथ आणि लॉराने त्यांच्या मुलांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

निकालांमधून समोर आलं की, दोन्ही मुलांचा त्यांच्या आई-वडिलांनी निवडलेल्या शुक्राणू दात्याशी काहीच संबंध नाही. इतकंच नाही, तर त्या दोन्ही मुलांमध्येही एकमेकांशी जैविक नातं नसल्याचं दिसून आलं.

"फारच काहीतरी चुकीचं झालंय, आणि याचा मुलांवर काय परिणाम होईल? ही भीती मनात होती," असं बेथ म्हणते.

फोटो स्रोत, Family supplied

फोटो कॅप्शन, जेम्स आणि केट (काही वर्षांपूर्वीचा फोटो) दोघांचाही जन्म आयव्हीएफ उपचारांद्वारे झाला आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसी न्यूजने अशा एकूण सात मुलांच्या कुटुंबांशी संवाद साधला आहे, ज्यांना वाटतं की आयव्हीएफ उपचारादरम्यान चुकीचे शुक्राणू किंवा बीजदाता वापरण्यात आले होते. यापैकी बहुतेक कुटुंबांनी खासगी डीएनए चाचण्या केल्या असून, त्यातून त्यांच्या शंका खऱ्या असल्याचं दिसून आलं आहे.

ही सर्व प्रकरणं नॉर्दर्न सायप्रसमधील क्लिनिकशी संबंधित आहेत. हा एक असा भाग आहे, जिथे युरोपियन युनियनचे कायदे लागू होत नाहीत. त्याला फक्त तुर्कीच अधिकृत मान्यता देते.

तज्ज्ञांच्या मते, नॉर्दर्न सायप्रस ब्रिटिश लोकांसाठी परदेशात फर्टिलिटी (प्रजननक्षमता) उपचार घेण्यासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण बनलं आहे. येथील क्लिनिकमध्ये कमी नियम आहेत आणि ते कमी किंमतीत जास्त यशाची हमी देतात.

येथे जगभरातील अनेक अनोळखी स्त्रीबीजं आणि शुक्राणू दात्यांचा मोठा संग्रह आहे. ज्यामुळे हे क्लिनिक फर्टिलिटी समस्यांशी झगडणाऱ्या लोकांसाठी, एलजीबीटी समुदायातील लोकांसाठी किंवा एकटे असलेल्या प्रौढांना आकर्षित करतात, जे त्यांच्या स्वतःच्या देशात असा पर्याय मिळवू शकत नाहीत.

सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ आणि फोटो आहेत, जिथे आई-वडील आपले चांगले आणि सकारात्मक अनुभव सांगताना दिसतात.

नॉर्दर्न सायप्रसमधील क्लिनिक यूकेमध्ये अवैध असलेले उपचारही करतात, जसं की वैद्यकीय कारणाशिवाय लिंग निवडणे. या प्रदेशाचे आरोग्य मंत्रालय आपल्या फर्टिलिटी क्लिनिकवर देखरेख करते, पण आम्ही त्यांना वारंवार विचारणा करूनही त्यांनी अद्याप यावर उत्तर दिलेले नाही.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

'डेन्मार्कमधून शुक्राणू मागवला होता, असं वाटत होतं'

या तपासात सहभागी प्रत्येक कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्हाला अनेक महिने लागले. बेथ, लॉरा, केट आणि जेम्स यांच्याशी सातत्याने संवाद साधत आम्ही त्यांना त्यांची कहाणी मांडण्यासाठी तयार होण्यास मदत केली.

बेथ आणि लॉराने आम्हाला सांगितलं की, त्यांनी 2011 मध्ये कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांनी नॉर्दर्न सायप्रसमधील डॉगस आयव्हीएफ सेंटर निवडलं. हे क्लिनिक जगातील सर्वात मोठ्या शुक्राणू बँक, डेन्मार्कमधील क्रायोस इंटरनॅशनलकडून गोठवलेला शुक्राणू आणू शकते, असं त्यावेळच्या तिथल्या रुग्ण समन्वयक ज्युली हॉडसन यांनी सांगितलं होतं.

त्यांना त्या क्लिनिकमधील अनोळखी दात्यांची मोठी संख्या आणि त्यांची 'संपूर्ण आरोग्य तपासणी' आणि मानसिक तपासण्या झाल्याची माहिती आवडली, असं दोघांनी सांगितलं.

त्यांना 'फिन' नावाच्या दात्याचं प्रोफाइल आवडलं. तो डॅनिश होता आणि त्याने स्वतःला निरोगी, तंदुरुस्त सांगितलं होतं; तो क्वचितच मद्यपान करायचा आणि त्याने कधीच धूम्रपान केलं नव्हतं.

फोटो कॅप्शन, डावीकडे बेथ आणि उजवीकडे लॉरा . 'फिन'च्या तपशीलवार प्रोफाइलमुळे मुलांसाठी सुरक्षित आणि निर्वेध पर्याय मिळेल, अशी त्यांना आशा होती.

ज्यावेळी त्यांनी फिनची हस्तलिखित नोट पाहिली, त्यात फिनने सांगितलं होतं की शुक्राणू देण्यामागे त्याचा हेतू हा 'इतरांना जीवन आणि आनंद देणे' आहे.

बेथ आणि लॉराला आशा होती की, हा तपशीलवार प्रोफाइल त्यांच्या मुलांना मोठे होताना दिलासा देईल. बेथ म्हणते, "आम्हाला वाटायचं की मुलांना त्यांच्या दात्याबद्दल थोडीशी तरी माहिती असणं महत्त्वाचं आहे, कारण त्यात त्यांचा अर्धा भाग आहे."

फिन आणि त्याच्या डॅनिश नातेवाइकांची शारीरिक लक्षणं यूकेच्या जोडप्यासारखी होती. फिकट डोळे आणि तपकिरी केस, असा त्यांचा कुटुंबाचा विस्तार दाखवला गेला.

लॉरा म्हणाली, "आम्ही आमच्या रुग्ण समन्वयक ज्युलीला विचारलं की, फिनचा शुक्राणू मागवण्यासाठी काय करावं लागेल."

यावर ती म्हणाली, "'डॉ. फिरदेव्स तुमच्यासाठी ते मागवतील.' बस इतकंच."

या जोडप्याचं म्हणणं आहे की, डोगस क्लिनिकमधील आयव्हीएफ उपचार डॉ. फिरदेव्स उगुझ टिप यांनी केले. ते आणि त्यांची टीम 'छान आणि मैत्रीपूर्ण' होती, असे ते सांगतात.

नऊ महिन्यांनंतर, लॉराने त्यांच्या पहिल्या अपत्याला म्हणजे केटला जन्म दिला.

जेव्हा या दोघांना दुसरं मूल हवं होतं, तेव्हा ते पुन्हा त्याच आयव्हीएफ टीमकडे गेले आणि फिनचा शुक्राणू पुन्हा मिळवता येईल का, अशी विचारणा त्यांना केली. त्यावेळी हॉडसनने ई-मेलद्वारे सांगितलं की, डॉ. फिरदेव्स शुक्राणू पुन्हा मागवतील.

यावेळी बेथने जेम्सला जन्म दिला.

या दोघांना नॉर्दर्न सायप्रसमधील फर्टिलिटी उपचार, ज्यात औषधं, हॉटेल आणि फ्लाइट्स यांचा समावेश होता, एकूण सुमारे 16 हजार पौंड खर्च (सुमारे 19 लाख 86 हजार 700 रुपये ) झाला. ज्यात फिनच्या शुक्राणूचा खर्च 2 हजार पौंड (सुमारे 2 लाख 48 हजार रुपये) होता.

बेथ आणि लॉरा म्हणतात की, लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या मुलांशी त्या दात्याबद्दल खुलेपणाने बोलणं सुरू केलं होतं. "दोघेही स्वतःला 'हाफ-डॅनिश' म्हणायचे," असं लॉरा सांगते.

पण जेम्सचे काळे डोळे, काळे केस आणि ऑलिव्ह रंगाच्या त्वचेमुळे आई-वडिलांना शंका आली की त्यांचा दाता फिन नसावा. अनेक वर्षे विचार केल्यानंतर बेथ आणि लॉराने ठरवलं की दोन्ही मुलांची डीएनए चाचणी केली पाहिजे.

डीएनएच्या चाचणीनुसार दोन्ही मुलांचा जन्म फिनच्या शुक्राणूने झाला नव्हता. तसेच, चाचणीत दिसून आलं की मुलं वेगवेगळ्या दात्यांच्या शुक्राणूपासून झाली आहेत आणि त्यांचं एकमेकांशी जैविक नातं किंवा संबंध नाही.

चाचणीचे निकाल पाहून ते 'संतापले', त्यांच्याकडे अनेक अनुत्तरित प्रश्न उरले. दोन्ही मुलांचे दाते कोण होते? त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्या होत्या का?

"आमच्याकडे फिन या दात्याचा चांगला प्रोफाइल होता. ज्यातून आम्हाला कुटुंबाची आणि आरोग्याची माहिती समजली होती. पण आता ती सर्व माहिती गायब झाली," असे बेथ म्हणते.

बेथ आणि लॉराने फिरदेव्स आणि हॉडसन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही प्रतिसाद दिला नाही.

बीबीसीने अनेक महिने बेथ आणि लॉरासोबत नेमकं काय घडलं हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आमच्या तपासादरम्यान आम्हाला आणखी दोन ब्रिटिश कुटुंबं आढळली, ज्यांनी फिरदेव्सकडून उपचार घेतले होते आणि त्यांना देखील त्यांच्या आयव्हीएफ उपचारांमध्ये चुकीच्या दात्यांचा वापर झाला असेल, असा संशय होता.

त्यांनी देखील खासगी डीएनए चाचण्या केल्या आहेत. ज्यातून त्यांची शंकाही खरी असल्याचे दिसून आले.

बेथ आणि लॉरा प्रश्न करतात की, त्यांच्या क्लिनिकने फिन दात्याचा शुक्राणू खरोखर मागवला होता का?

जेव्हा आम्ही फिरदेव्सशी संपर्क केला, तिने सांगितलं की डोगसमध्ये शुक्राणू मागवण्याची जबाबदारी तिच्यावर नव्हती आणि फिन दात्यासाठी केलेल्या मागणीबाबत तिला काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

तिने बेथ आणि लॉराच्या खासगी डीएनए चाचणीवरही शंका व्यक्त केली. चुकीचा दाता वापरल्याचा निष्कर्ष 'पूर्ण खात्रीने' सांगता येणार नाही, असं तिने सांगितलं.

फिरदेव्सने बीबीसीला सांगितलं की, 2011 ते 2014 दरम्यान जेव्हा बेथ आणि लॉरा रुग्ण होत्या, 'तेव्हा तिने आयव्हीएफ उपचार केलेले नव्हते'. तरीही, डोगसच्या वेबसाइटवर त्या काळात ती कोणती उपचार करत होती याची सविस्तर माहिती दिलेली होती.

फिरदेव्स म्हणते की, बेथ आणि लॉराच्या उपचारांची जबाबदारी क्लिनिकवर होती, पण डोगस क्लिनिकने आमच्या प्रश्नाला अजून उत्तर दिलं नाही.

2015 पर्यंत, फिरदेव्स आणि हॉडसन दोघेही डोगस क्लिनिक सोडून नॉर्दर्न सायप्रसमधील दुसऱ्या क्लिनिकमध्ये एकत्र काम करत होत्या.

हॉडसन, आता त्या प्रदेशात काम करत नाही. फिरदेव्सकडे शुक्राणूंची ऑर्डर दिली होती की नाही, याबद्दल तिने बीबीसीच्या प्रश्नांना अद्याप उत्तर दिलेले नाही.

बेथ, लॉरा आणि मुलांनी आता अधिकृत डीएनए चाचण्या केल्या आहेत, ज्या ब्रिटिश न्यायालयात वापरता येऊ शकतात. यातून स्पष्ट झालं आहे की, जेम्स आणि केट एकमेकांशी जैविकदृष्ट्या संबंधित नाहीत आणि त्यांचा जन्म एकाच शुक्राणू दात्यापासून झालेला नाही.

एक आघाडीच्या फॉरेन्सिक जेनॅटिक्स तज्ज्ञाने, सर्व कुटुंबांच्या चाचण्यांचे विश्लेषण केले. त्यांनी सांगितलं की, जेम्स किंवा केटपैकी कुणीही फिन या दात्याशी जैविकदृष्ट्या संबंधित असण्याची शक्यता कमी आहे.

फोटो कॅप्शन, फिरदेव्स (डावीकडे) आणि ज्युली हॉडसन (उजवीकडे) यांनी डोगस आयव्हीएफ सेंटर सोडल्यानंतरही एकत्र काम करणं सुरू ठेवलं.

डेन्मार्कमधील शुक्राणू बँक क्रायोस इंटरनॅशनलशी आम्ही बोललो. या बँकेतूनच बेथ आणि लॉरा तसेच आमच्या तपासातील आणखी एका कुटुंबाने शुक्राणू मागवले होते.

"आमच्याकडे अनेक सुरक्षा प्रक्रिया असतात, पण 100 टक्के खात्री कधीच देता येणार नाही. ते मानवी आहे," असं कंपनीचे सीईओ ओले शौ म्हणतात. पण त्यांनी असंही सांगितलं की, क्रायोसच्या 45 वर्षांच्या इतिहासात अशी चूक कधीही नोंदली गेलेली नाही.

युरोपमधील अनेक फर्टिलिटी तज्ज्ञांनी बीबीसीला सांगितलं की, आयव्हीएफ प्रक्रियेत चुकून एकदा चुकीचा दाता वापरण्याची शक्यता खूप दुर्मिळ आहे.

पण, जर अशी मोठी चूक एकाच वैद्यकीय टीमकडून एकाहून अधिक वेळा झाली, तर तज्ज्ञांच्या मते ते 'निष्काळजीपणा' किंवा 'फसवणूक' असू शकते.

"रुग्णांच्या स्थितीबाबत हे खूपच भयानक आहे," असं ब्रिटिश फर्टिलिटी सोसायटीचे डॉ. इपोक्रॅटिस सारिस म्हणतात.

"अशा प्रकारच्या घटनेबद्दल मी यूकेमध्ये कधीही ऐकलेलं नाही. कोणत्याही आयव्हीएफ युनिटसाठी अंडी, शुक्राणू किंवा भ्रूण मिसळण्याची सर्वात मोठी भीती असते."

नॉर्दर्न सायप्रसचे स्वतःचे फर्टिलिटी कायदे आहेत. परंतु, यूकेप्रमाणे येथे स्वतंत्र फर्टिलिटी नियामक नाही, जे क्लिनिकवर देखरेख करेल, नियम पाळले जात आहेत की नाही ते पाहेल, आणि गरज पडल्यास परवाने रद्द करेल.

तेथे राहणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या माइन अटली म्हणतात, "जे क्लिनिक कायदा पाळतात, त्यांचा मालकांना चांगली विवेकबुद्धी असते. राज्य त्यांना हे करायला भाग पाडत नाही."

नियम पाळणे महागडे असते, ज्यामुळे यूकेसारख्या देशांमध्ये उपचारांची किंमत जास्त होते. ब्रिटिश फर्टिलिटी सोसायटीचे सारिस म्हणतात की, याच कारणास्तव नॉर्दर्न सायप्रस फर्टिलिटी उपचारासाठी लोकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे.

आम्हाला अशी चिंताही ऐकायला मिळाली की, काही लोकांना नंतर कळलं की त्यांचा दाता जसा त्यांनी समजला तसा तो नाही, आणि यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य प्रभावित होऊ शकते.

अशा प्रकारच्या माहितीचा त्यांच्यावर 'मोठा परिणाम' होऊ शकतो, असं यूकेच्या चॅरिटी डोनर कन्सेप्शन नेटवर्कमधील नीना बार्न्सले म्हणतात.

'मला माझ्या मुलाशी खोटं बोलायचं नाही'

बीबीसीने आणखी दोन ब्रिटिश कुटुंबांशी संवाद साधला, ज्यांच्यावर बेथ आणि लॉरापेक्षा अलीकडे फिरदेव्सने उपचार केले होते. त्या कुटुंबाला देखील त्यांना चुकीचे दाते दिले गेले होते, अशी शंका आहे.

त्यांना नाव सांगायचं नव्हतं, पण त्यांनी मिरॅकल आयव्हीएफ सेंटरमध्ये उपचार घेतले होते. आणि विशेष म्हणजे फिरदेव्सने 2019 मध्ये हे उपचार सुरू केले होते.

दोन्ही कुटुंबांना मूल होण्यासाठी बीजदात्यांची (एग डोनर) गरज होती, आणि त्यांना शंका होती की त्यांना मिळालेले बीज त्यांनी निवडलेल्या बीजांप्रमाणे नाहीत. नंतर केलेल्या डीएनए चाचण्या त्यांची शंका बरोबर असल्याचे दिसून आलं.

"माझा मुलगा किंवा मुलगी फक्त माझ्यासारखे दिसावेत, असं नाही," असं कॅथरीन म्हणते.

"पण मला त्यांना खोटंही सांगायचंही नाही की ते कुठून आले आहेत. त्यांना खरी माहिती माहीत असायला हवी, आणि त्यांनी ते स्वतः समजून घ्यायला हवं."

जेव्हा आम्ही फिरदेव्सला या दोन कुटुंबांची दिशाभूल झाली असल्याचं सांगितलं, तेव्हा तिने बीजदात्यांची निवड 'केवळ' (एक्स्क्लुजिवली) मिरॅकल आयव्हीएफ सेंटरने केली होती, अशी माहिती दिली.

फोटो कॅप्शन, "जरी आमच्यात रक्ताचं नातं नसलं तरीही, आम्ही अजूनही एक कुटुंब आहोत," असं केट म्हणते.

तिच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना अशा दात्यांचे प्रोफाइल दिले जात नाहीत, जे एखाद्या व्यक्तीची माहिती सांगतात. त्याचबरोबर दात्याच्या वंशाबद्दलही कोणतीही हमी दिली जात नाही, असंही तिने सांगितलं.

फिरदेव्सच्या सांगण्यानुसार, ही माहिती सर्व रुग्णांनी उपचारापूर्वी स्वाक्षरी केलेल्या संमतीपत्रांमध्ये दिली होती. महत्त्वाचं म्हणजे सर्वांना 'स्पष्टपणाने समजावून सांगण्यात' आलं होतं.

पण, आम्ही ज्या दोन कुटुंबांशी बोललो, त्यांना वाटत होतं की त्यांनी ठराविक दाता निवडला आहे. आणि त्यांना कधीही स्पष्ट सांगितलं गेलं नव्हतं की शेवटी दात्याची निवड क्लिनिक करेल.

बीबीसीने कॅथरीन आणि आणखी एका कुटुंबाला मिरॅकल आयव्हीएफ सेंटरकडून देण्यात आलेले दात्यांचे प्रोफाइल पाहिले.

मी माझ्या बाळावर खूप प्रेम करते. पण जर मी निवडलेला दाता वापरला जाऊ शकत नाही, हे आधीच समजलं असतं तर मी आयव्हीएफ उपचार सुरू ठेवले नसते, असं कॅथरीन म्हणते.

परंतु, फिरदेव्सने आम्हाला सांगितलं की मिरकॅल आयव्हीएफमध्ये केलेले सर्व उपचार कायद्याच्या नियमांनुसार आहेत, आणि रुग्णांच्या गोपनीयतेमुळे ती आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही.

'आम्ही अजूनही एक कुटुंब आहोत'

दोन वर्षांपूर्वीच बेथ आणि लॉराने त्यांच्या मुलांना फिन हा कदाचित त्यांचा दाता नसेल असं सांगितलं आहे.

जेम्स अजूनही त्याच्या कुटुंबानं काय शोधलंय... हे समजून घेत आहे.

तो म्हणतो. "ओळख ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे आपण व्यक्ती म्हणून कोण आहोत."

मुलांना आता हे माहीत आहे की, ते जैविक दृष्ट्या संबंधित नाहीत, परंतु यामुळे त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम बदललेले नाही.

"आम्ही सगळे एकत्र मोठे झालो आहोत आणि आमच्या आईने आम्हाला वाढवलं आहे. रक्ताचं नातं नसलं तरीही आम्ही अजूनही एक कुटुंब आहोत," असं केट म्हणते.

बेथ आणि लॉरा म्हणतात, "आम्हाला दोन अद्भुत मुले आहेत. सरतेशेवटी, सर्व काही ठीक होईल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.