ब्रेकअपनंतरही 'एक्स'बरोबर मैत्री ठेवावी की नको? तज्ज्ञांनी सांगितल्या 4 निर्णायक गोष्टी

फोटो स्रोत, RyanKing999

    • Author, एमिली होल्ट
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

ब्रेकअप हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील कठीण काळ असतो. अशावेळेस एकमेकांना ब्लॉक करणं, कोणताही संपर्क न ठेवणं या गोष्टी आल्याच. मात्र, ब्रेकअपनंतरही काहीजणांची मैत्री कायम असते.

हे कसं काय शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडत असला, तरी याबाबत अनेकांची मतं वेगवेगळी आहेत.

ब्रेकअप आणि त्यातून होणाऱ्या हार्टब्रेकनंतर अनेक जण नैराश्यात जातात. बरेचजण व्यसन आणि निरर्थक रिलेशनशिपमध्ये अडकतात आणि काही तर स्वतःला संपवण्याचाही विचार करतात.

पण या उलट काही जण ब्रेकअपनंतर स्वतःला यशस्वी करून दाखवण्याची गाठ मनाशी बांधून घेतात. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतील.

ब्रेकअपनंतरही 'एक्स'बरोबर मैत्री ठेवता येते का? काहींच म्हणणं आहे की, 'एक्स'सोबत म्हणजे आधीच्या प्रियकर किंवा प्रेयसीबरोबर मैत्री करणं हे जुन्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे तर काही लोक हे नातं अगदी सहजपणे निभावतात.

एक्स प्रियकर किंवा प्रेयसीसोबत मैत्री टिकवून ठेवणे शक्य आहे का? जाणून घेऊयात.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

ब्रेकअपचा काळ कठीण असतो. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर केलेली असते, ते सगळं अचानक बंद होतं. पण त्याच व्यक्तीसोबत मैत्रीचे नाते निभावणे हे कधीकधी अधिक वेदनादायक ठरू शकते.

'मिलेनियल लव्ह' या डेटिंग हँडबुकच्या लेखिका ऑलिव्हिया पेटर म्हणतात, "खरे सांगायचे तर, माझे असे फार कमी मित्र-मैत्रिणी आहेत जे त्यांच्या 'एक्स'सोबत मैत्री टिकवून आहेत." मात्र, त्यांनी स्वतः काही प्रकरणांमध्ये हे यशस्वीपणे करून दाखवले आहे."

तुम्ही तुमच्या 'एक्स'शी मैत्री ठेवावी की पूर्ण संपर्क तोडावा? हा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला हे 4 प्रश्न नक्की विचारा-

1. तुमचं नातं किती गंभीर होतं ?

तुमच्या नात्याचं स्वरूप कसं होतं, यावर मैत्री टिकणार की नाही हे मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं . 'बीबीसी रेडिओ 4'च्या वूमन्स अवरमध्ये बोलताना लेखिका ऑलिव्हिया पेटर सांगतात, "माझ्या आयुष्यात अशा 1 किंवा 2 व्यक्ती आहेत ज्यांच्याशी माझे सुरुवातीला काही काळ रोमँटिक नाते होते, पण आता आमची घट्ट मैत्री आहे."

त्यांच्या मते, एकदा का तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत रोमँटिक नात्याचा अनुभव घेतला की, मनातील शंका आणि तणाव दूर होण्यास मदत होते. यामुळे पुढची मैत्री अधिक पारदर्शक आणि सोपी होऊन जाते. मात्र, दीर्घकाळ राहिलेल्या गंभीर नात्यांच्या बाबतीत ऑलिव्हिया म्हणतात की, अशा व्यक्तींशी त्यांचे संबंध चांगले असले तरी, ते 'जवळचे मित्र' मात्र नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक फोटो

डेटिंग आणि रिलेशनशिप कोच केट मॅन्सफिल्ड यांच्या मते, कॅज्युअल नात्यांमध्ये आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्याचे ओझे कमी असते. त्यामुळे अशा नात्यांचे मैत्रीत रूपांतर होणे अधिक सोपे होऊ शकते. पण त्या हेही सांगतात की, कधीकधी हीच कॅज्युअल नाती अधिक तीव्र असल्याने त्यातून भावनांचा मोठा उद्रेकही होऊ शकतो.

केट पुढे स्पष्ट करतात, "नात्यात तुम्ही किती वेळ एकत्र घालवला यापेक्षा ते नाते कसे संपले आणि कोणी संपवले, हे अधिक महत्त्वाचे आहे. जर नाते दोन्ही बाजूंच्या संमतीने संपले असेल, तर मैत्रीची शक्यता जास्त असते. पण जर एकाने अचानक नाते तोडले असेल, तर मैत्री करणे कठीण जाते."

2. तुम्ही खरोखर त्या व्यक्तीला विसरला आहात का?

पूर्वीच्या जोडीदाराशी मैत्री करताना येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे 'रोमान्स' आणि 'व्यक्ती' यांना एकमेकांपासून वेगळे करणे. जर तुमच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल प्रेम भावना असतील, तर मैत्री करणे अशक्य आहे.

रिलेशनशिप कोच केट मॅन्सफिल्ड यांच्या मते, "केवळ व्यावहारिकदृष्ट्या पुढे जाणे पुरेसे नाही, तर तुम्ही भावनिकरित्या देखील त्या ब्रेकअपमधून सावरलेले असणे आवश्यक आहे."

मैत्री करण्यापूर्वी हे तपासा की प्रेमापलीकडे तुमच्यात काही साम्य आहे का? जर तुमचे नाते केवळ शारीरिक आकर्षण किंवा प्रेमातील ओढीवर टिकून असेल, तर मैत्री टिकवणे खूप कठीण जाईल.

फोटो स्रोत, Olivia Petter

फोटो कॅप्शन, पत्रकार आणि लेखिका ऑलिव्हिया पेटर त्यांच्या 'मिलेनियल लव्ह' या पुस्तकात आधुनिक डेटिंगमधील गुंतागुंतीच्या प्रश्नांचे विश्लेषण करतात.

तुम्ही मैत्री का करू इच्छिता, याबद्दल स्वतःशी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

केट सांगतात, "जर तुम्ही या आशेने मैत्री करत असाल की, समोरची व्यक्ती पुन्हा तुमचा विचार करेल किंवा त्यांच्या नवीन डेटिंग आयुष्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही संपर्कात राहत असाल, तर ती मैत्री नाही. तो केवळ 'मैत्रीचा मुखवटा' आहे."

"थोडक्यात सांगायचे तर, मैत्री तेव्हाच यशस्वी होते जेव्हा दोन्ही व्यक्तींनी मनापासून नात्याचा शेवट स्वीकारलेला असतो आणि कोणाच्याही मनात कोणताही छुपा हेतू नसतो."

3. ब्रेकअप होऊन किती काळ लोटला आहे?

प्रेमी ते मित्र हा प्रवास तातडीने करणे कधीकधी गोंधळात टाकणारे असू शकते. ऑलिव्हिया पेटर यांच्या मते, "नात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःला थोडा वेळ देणे आणि विचार करायला स्पेस घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे तुमच्या भावनांना 'रिसेट' करण्यासाठी गरजेचे असते."

मात्र, प्रत्येक नात्याची कथा वेगळी असते. लेखिका आणि कॉमेडियन रोझी विल्बी यांनी त्यांच्या पूर्वीच्या प्रेयसींसोबत यशस्वी मैत्री टिकवून ठेवली आहे. रोझी आणि त्यांची एक्स पार्टनर 'डोना' यांचे उदाहरण खूप वेगळे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

रोझी आणि डोना यांचे ब्रेकअप अशावेळी झाले जेव्हा रोझी यांच्या आईचे निधन झाले होते आणि एका भीषण आगीत त्यांनी आपली सर्व मालमत्ता गमावली होती. अशा परिस्थितीत त्यांनी केवळ 3 आठवडे एकमेकांपासून संपर्क तोडला होता.

रोझी सांगतात, "आम्ही फक्त 3 आठवडेच लांब राहू शकलो, कारण आमच्यात एक अतूट नाते होते आणि त्या कठीण काळात आम्हाला एकमेकांच्या आधाराची गरज होती."

आज या घटनेला 25 वर्षे उलटून गेली आहेत. रोझी अभिमानाने सांगतात, "आज डोना मला माझ्या बहिणीसारखी वाटते."

4. तुमच्या नवीन जोडीदाराची याला संमती आहे का?

जर तुम्ही तुमच्या 'एक्स'सोबत मैत्री ठेवण्याचा निर्णय घेतला असेल, तर भविष्याबाबत स्पष्ट बोलणे गरजेचे आहे.

केट मॅन्सफिल्ड यांच्या मते, "जर तुमच्यापैकी कोणी नवीन नात्यात पडले, तर या मैत्रीचे स्वरूप काय असेल, यावर आधीच चर्चा व्हायला हवी."

जर तुमच्या नवीन जोडीदाराला या मैत्रीमुळे अस्वस्थ वाटत असेल, तर त्यांच्या शंका गांभीर्याने घ्या.

केट म्हणतात, "जोडीदाराचा विरोध हा नेहमीच असुरक्षिततेपोटी असतो असे नाही; कधीकधी त्यांच्या चिंता रास्त असू शकतात."

अशा वेळी तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या जोडीदाराशी संवाद साधून मैत्रीच्या काही मर्यादा ठरवाव्या लागतील.

उदा.

  • संपर्क कमी करणे - सतत बोलण्याऐवजी अधूनमधून संपर्क ठेवणे.
  • ग्रुपमध्ये भेटणे - एकांतात भेटण्यापेक्षा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात भेटणे.
  • पारदर्शकता - तुम्ही एकमेकांना भेटत असाल किंवा बोलत असाल, तर त्याबद्दल नवीन जोडीदाराला कल्पना देणे.

फोटो स्रोत, Rosie Wilby

फोटो कॅप्शन, नात्यांमधील गुंतागुंत मांडणाऱ्या 'द ब्रेकअप मोनोलॉग्स' या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका म्हणूनही रोझी यांची ओळख आहे.

ऑलिव्हिया यांच्या मते, समाजात स्त्रियांना त्यांच्या पुरुष जोडीदाराच्या 'एक्स'मध्ये एक प्रकारचे संकट किंवा भीती वाटते. अशी मानसिकताच सामाजिक वातावरणामुळे तयार झालेली असते.

मात्र, रोझी विल्बी सांगतात की, LGBT समुदायामध्ये एक्स जोडीदारांशी मैत्री ठेवणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. त्यांच्या मते, तिथे वागण्याचे आणि नाती हाताळण्याचे नियम पूर्णपणे वेगळे असतात.

थोडक्यात सांगायचे तर 'एक्स'सोबतची मैत्री टिकवायची असेल, तर त्यात प्रामाणिकपणा, वेळ आणि वर्तमान नात्याचा आदर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर ही मैत्री तुमच्या आजच्या सुखात अडथळा ठरत असेल, तर त्यातून लांब राहणेच शहाणपणाचे आहे.

संपूर्ण संपर्क कधी तोडावा?

कधीकधी मैत्रीचा प्रयत्न करण्यापेक्षा पूर्णपणे बाजूला होणे हाच एकमेव मार्ग असतो. केट मॅन्सफिल्ड यांच्या मते, काही परिस्थितीत मैत्री कधीच शक्य नसते, जसे की जर नाते शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या त्रासदायक असेल. जर नात्यात विश्वास नसेल किंवा विश्वासघात झाला असेल. जर एका व्यक्तीच्या मनात अजूनही रोमँटिक भावना शिल्लक असतील.

आयुष्यातील हे प्रकरण आता पूर्णपणे बंद झाले आहे. हे स्वीकारणे हे कधीकधी दोन्ही व्यक्तींच्या भल्यासाठी सर्वात चांगले असते, असं केट सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

ऑलिव्हिया पेटर सांगतात की, ज्यांनी त्यांना गंभीर स्वरूपाचा त्रास दिलाय , अशाच लोकांशी त्यांनी पूर्णपणे संपर्क तोडला आहे.

त्या पुढे म्हणतात, "माझे बहुतेक मित्र त्यांच्या 'एक्स'च्या संपर्कात नाहीत. मला वाटते की, भूतकाळ हा भूतकाळातच राहू देणे, असा अनेकांचा दृष्टिकोन असतो आणि तो चुकीचा नाही."

खरंतर एक्स जोडीदाराशी मैत्री करायची की नाही, हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. जर ती मैत्री 'तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत असेल किंवा तुमच्या वर्तमानातील सुखात विष कालवत असेल, तर सन्मानाने निरोप घेणे हेच योग्य ठरते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)