कमी सैन्यदल असूनही पानिपतच्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव कसा केला?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झहीरुद्दीन बाबरने पानिपतची पहिली लढाई जिंकली होती.
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

तैमूरने भारतावर हल्ला केल्यानंतर सुमारे 125 वर्षांनी त्याच्या सहाव्या पिढीतील वंशज झहीरुद्दीन बाबरनेही भारतावर आक्रमण करण्यास सुरू केलं.

बाबरचे आयुष्य अगदी 12 व्या वर्षापासूनच युद्धांनी भरलेले होते. त्याला अनेक वेळा पराभवाचा सामनाही करावा लागला, पण प्रत्येक पराभवाच्या अनुभवातून शिकण्याची त्याची जिद्द कधीच कमी झाली नाही.

आजच्या उझबेकिस्तानमधील फरगाना हे राज्य गमावल्यानंतर त्याने काबूलमध्ये आपली सत्ता स्थापन केली. तिथून त्याने पंजाबवर अनेक हल्ले केले. त्या काळी पंजाबवर दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा प्रतिनिधी दौलत खान राज्य करत होता.

दौलत खान इब्राहिम लोदीशी एकनिष्ठ नव्हता. तो आतून बाबरला मदत करत होता, कारण त्याला वाटत होतं की एक दिवस तो इब्राहिम लोदीच्या सत्तेतून मुक्त होईल. परंतु, 1525 मध्ये बाबरने त्याचा पराभव करून पंजाबवर स्वतःचा ताबा मिळवला होता.

फोटो स्रोत, Sanage Publishing House

फोटो कॅप्शन, जदुनाथ सरकार यांचं पुस्तक 'मिलिट्री हिस्ट्री ऑफ इंडिया'.

सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या 'मिलिट्री हिस्ट्री ऑफ इंडिया' या पुस्तकात लिहितात की, "1517 मध्ये दिल्लीचा सुलतान बनलेला इब्राहिम लोदी शूर होता, परंतु त्याच्या नातेवाईकांच्या बंडामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता."

"ते लोक त्याला सत्तेतून हटवून आपापली स्वतंत्र राज्यं निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. बाबरच्या शब्दांत सांगायचं झालं तर, त्याचा 'अडाणी भोळेपणा' हेही त्याच्या अडचणींचं एक कारण होतं. त्यामुळे बाबरच्या अनुभवी सैन्याविरुद्ध तो ठोस योजना बनवू शकला नाही."

"बाबरचे सैनिक शिस्तबद्ध होते आणि त्यांचं नेतृत्व अतिशय कुशल, सक्षम सेनापती करत होते."

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

बाबरचं लहान सैन्यदल

बाबरने आपल्या मोहिमेची सुरुवात 17 नोव्हेंबर 1525 रोजी सिंधमधील हैदराबाद शहरातून केली. हे आता पाकिस्तानमध्ये आहे. सिंधू नदी पार केल्यानंतर बाबरने आपल्या सैनिकांची मोजणी केली होती.

मोजणी केल्यावर त्याच्या सैन्याची संख्या त्याच्या अपेक्षेपेक्षाही कमी असल्याचं समोर आलं. त्या वेळी त्याच्याकडे सुमारे 12 हजार सैनिक होते. नंतर पूर्वीच्या भारत मोहिमेत मागे राहिलेले सैनिक आणि असंतुष्ट अफगाण सैनिकही त्यात सामील झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पानिपतमध्ये बाबर पहिल्यांदाच मैदानी प्रदेशात लढत होता.

या सगळ्यामुळे बाबर जेव्हा पानिपतला पोहोचला, तेव्हा त्याच्या सैन्याची संख्या वाढून सुमारे 20 हजार झाली होती. तरीही लोदीच्या तुलनेत त्याचं सैन्य खूपच कमी होतं. लोदीकडे किमान 1 लाख सैनिक असतील, असा बाबरचा अंदाज होता

लोदीच्या सैन्यात सुमारे 1 हजार हत्तीही होते, पण बाबरकडे त्याच्या मोठ्या सैन्याला उत्तर देण्यासाठी अधिक चांगली शस्त्रं होती. लोदीच्या मोठ्या सैन्याला हरवण्यासाठी उत्तम युद्धकौशल्यच महत्त्वाचं होतं.

जदुनाथ सरकार लिहितात, "बाबरचं सैन्य खूप वेगाने पुढे जात होतं, तर इब्राहिम लोदी दिवसाला फक्त 2 ते 3 मैलच संथ गतीने पुढे सरकत होता. तो मध्येच 2 दिवस थांबतही असत. त्यामुळे त्याचं सैन्य शिस्त नसलेल्या, विस्कळीत शहरासारखं पुढे जात होतं."

तोफखाना आणि उत्तम युद्धकौशल्य

यापूर्वी बाबरने बहुतांश लढाया डोंगराळ भागात जिंकल्या होत्या, जिथे मोठं सैन्य पाठवता येत नव्हतं. त्या लढायांमध्ये सैन्याच्या संख्येपेक्षा बुद्धी, भूभागाचा योग्य वापर आणि शत्रूला चकमा देण्याची युक्ती यावर विजय ठरत होता.

पानिपतच्या लढाईत बाबर पहिल्यांदाच मोकळ्या मैदानात लढत होता, जिथे सैनिकांची संख्या महत्त्वाची ठरत होती आणि ती दुर्लक्षित करता येत नव्हती.

फोटो स्रोत, Pigeon Publications

फोटो कॅप्शन, अब्राहम इराली यांचं 'एम्परर्स ऑफ द पीकॉक थ्रोन' हे पुस्तक.

अब्राहम इराली आपल्या 'एम्परर्स ऑफ द पीकॉक थ्रोन' या पुस्तकात लिहितात, "बाबरसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे इब्राहिम लोदीच्या मोठ्या संख्येनं असलेल्या सैन्याला आपल्या तोफखाना आणि युद्धकौशल्याच्या जोरावर निष्प्रभ करणं होतं."

"त्यामुळे लोदीच्या सैन्याला आपल्या लहान सैन्याला चारही बाजूंनी घेरण्याची संधी मिळू नये म्हणून लढाईचं मैदान शक्य तितकं अरुंद ठेवायचं, अशी बाबरची रणनीती होती."

"फक्त रणांगण अरुंद असणं पुरेसं नव्हतं, कारण बाबरच्या सैन्यात इतकी खोली नव्हती की ते लोदीच्या थेट हल्ल्यांना सहज तोंड देऊ शकतील."

"रणनीती ठरवण्यासाठी त्याने आपल्या प्रमुख सेनापतींची एक बैठक बोलावली आणि पारंपरिक मुघल युद्धतंत्रात काही बदल केले. त्यानंतर त्याने आपल्या गुप्तहेरांना पानिपतच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी पाठवलं."

बैलगाड्या एकत्र बांधून उभारली संरक्षणरेषा

गुप्तहेरांनी सांगितलं की, पानिपतचं मैदान बाबरपेक्षा इब्राहिम लोदीसाठी जास्त अनुकूल आहे. त्या मैदानात बाबरला फायदा होईल असं काहीच नव्हतं. संपूर्ण परिसर सपाट होता, फक्त थोडी झाडं आणि काही झुडपं होती.

बाबर पानिपतला पोहोचल्यानंतर त्याने आपलं सैन्य शहराच्या पूर्वेकडे, शहर आणि यमुना नदी यांच्या मध्यभागी तैनात केलं. त्या काळात यमुना नदी शहराच्या अगदी जवळून वाहत होती.

फोटो स्रोत, Rupa Publishing

फोटो कॅप्शन, बाबरनामा

बाबरने आपल्या 'बाबरनामा' या आत्मचरित्रात लिहिलं, "मी उस्ताद अली कुलीला 700 बैलगाड्या लोखंडी साखळ्यांनी नाही, तर चामड्याच्या दोऱ्यांनी एकमेकांना बांधून ठेवण्याचे आदेश दिले."

"प्रत्येक दोन बैलगाड्यांमध्ये पाच किंवा सहा लाकडी फळ्या लावाव्यात आणि त्यांच्या मागे 'बारूद' (दारूगोळा) पेटवणारे सैनिक हल्ल्यासाठी तयार उभे राहावेत. बाबरने 5 ते 6 दिवसांत युद्धाची पूर्ण तयारी केली."

"सर्व काही तयार झाल्यावर बाबरने आपल्या सैनिकांना सांगितलं, "पानिपतचं शहर आणि वस्त्या एका बाजूने आपलं संरक्षण करतील, तर दुसऱ्या बाजूला चामड्याच्या दोऱ्यांनी बांधलेल्या बैलगाड्या आपली ढाल बनतील. त्यांच्या मागे पायदळ सैनिक हल्ल्यासाठी तयार राहतील."

12 एप्रिलपर्यंत बाबरची तयारी पूर्ण झाली होती.

लोदीच्या हल्ल्याची प्रतीक्षा

इब्राहिम लोदीने आधी हल्ला करावा, यावर बाबरची संपूर्ण रणनीती अवलंबून होती.

बाबरला वाटत होतं की, लोदीच पहिला हल्ला करेल, कारण मुघल त्याच्या प्रदेशात आले होते आणि त्यांना हाकलून लावणं हे लोदीचं कर्तव्य होतं.

दुसऱ्या बाजूला, इब्राहिम लोदी हा सर्व प्रकार वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोदीचा मृत्यू झाला होता.

अब्राहम इराली लिहितात, "लोदीने बाबरवर हल्लाच केला नाही. त्याचा उद्देश बाबरला दिल्लीकडे जाण्याचा मार्गच बंद करायचा होता. बचाव करणे हाच आक्रमण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असं त्याचं मत होतं."

"तो वाट पाहण्याचा धोका पत्करू शकत होता. पण बाबरला लवकर निकाल हवा होता, जेणेकरून त्याच्या सैनिकांचं मनोबल कमी होऊ नये. त्यामुळे तो 7 दिवस खूप आतुरतेने लोदीच्या हल्ल्याची वाट पाहत होता."

"आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी बाबरने लोदीच्या युद्धकौशल्याची खिल्ली उडवली. त्याने दूरून बाण सोडून लोदीच्या सैन्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु लोदीच्या सैन्याने त्याकडे दुर्लक्ष केलं."

लोदीचे सैन्य बाबरच्या जाळ्यात अडकले

शेवटी बाबरला आपली रणनीती बदलावी लागली. 19 एप्रिलच्या रात्री त्याने अचानक लोदीच्या सैन्यावर हल्ला केला. बाबरच्या सैन्याच्या डाव्या बाजूच्या सुमारे 4 हजार सैनिकांनी सर्वात आधी हल्ला केला.

बाबर स्वतः बाकीच्या सैनिकांसोबत थांबला होता. हल्ला करणारे त्याचे सैनिक यशस्वी झाले, तर मिळालेल्या आघाडीचा फायदा घेत तो उरलेलं सैन्यही युद्धात उतरवेल, अशी त्याची योजना होती.

जर त्यांना यश मिळालं नाही, तर मागे हटणाऱ्या सैनिकांना मदत करण्यासाठी त्याचे इतर सैनिक पुढे येतील.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये झाली होती.

बाबरचा हा हल्ला फसला. लोदीचं सैन्य आश्चर्यचकित होण्याऐवजी हल्ल्यासाठी आधीच तयार होतं, असं त्याला दिसून आलं.

पण बाबरच्या दृष्टीने हे त्याच्यासाठी फायदेशीर ठरलं. या अपयशी हल्ल्यामुळे त्याला हवं तेच घडलं- म्हणजे लोदीचं सैन्य त्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी पुढे आलं.

20 एप्रिलचा दिवस अपेक्षेप्रमाणे शांत गेला. परंतु 21 एप्रिलच्या सकाळी लोदीच्या सैन्याने पुढे सरकायला सुरुवात केली आहे, असं पुढे तैनात असलेल्या मुघल सैनिकांनी मागे कळवलं.

कदाचित आदल्या रात्री बाबरचा हल्ला अपयशी ठरल्यामुळे त्यांना वाटू लागलं की, मुघलांना सहज हरवता येऊ शकतं.

ही त्यांची खूप मोठी चूक ठरली. लोदीचे सैनिक हळूहळू बाबरच्या जाळ्यात अडकत गेले.

लोदीचे हत्ती पाठीमागे पळाले

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आभास मालदाहियार आपल्या 'बाबर द क्वेस्ट फॉर हिंदुस्तान' या पुस्तकात लिहितात, "बाबर आपल्या तोफखान्यासह आणि बैलगाड्यांच्या ताफ्यासह त्यांची वाट पाहत होता. सर्वात मागे त्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी राखीव सैनिक तैनात केले होते."

"लोदीचं सैन्य पुढे आलं तेव्हा ते एका बाजूची पानिपतची भिंत आणि दुसऱ्या बाजूचे मुघलांनी खोदलेले खड्डे अशा अडथळ्यांमध्ये अडकले. लोदीचे सैनिक मुघलांच्या संरक्षणाजवळ येताच मुघलांनी जोरदार तोफांचा मारा सुरू केला."

"अरुंद जागेतून जाताना अफगाण सैनिक पूर्णपणे विस्कळीत झाले. थोड्याच वेळात लोदीचं सैन्य सैन्यासारखं न राहता सामान्य लोकांच्या गर्दीसारखं झालं. ते ना नीट लढू शकत होते, ना मागे पळून जाऊ शकत होते."

बाबरचे आदेश स्पष्ट होते. त्याने बाबरनामामध्ये लिहिलं, "मी माझ्या सैन्याला शत्रूवर बाणांचा मारा करण्यास सांगितलं. माझा सेनापती महदी ख्वाजाने सतत बाणांचा वर्षाव करून लोदीच्या हत्तींना मागे पळायला भाग पाडले."

"थोड्याच वेळात शत्रू स्वतःच्याच वर्तुळात अडकला. त्यांची अवस्था जणू कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या भक्ष्यासारखी झाली."

संधीचा फायदा घेत बाबरने लोदीच्या सैन्यावर मागूनही हल्ला केला.

फोटो स्रोत, Getty Images

बाबरने लिहिलं, "अफगाण (लोदीचे सैनिक) धाडसाने लढले, पण त्यांना संधीच मिळाली नाही. ही लढाई सूर्योदयाला सुरू झाली आणि दुपारपर्यंत लोदीचं सैन्य पूर्णपणे पराभूत झालं होतं."

"माझ्या अंदाजानुसार अफगाण सैन्यातील सुमारे 15 ते 16 हजार सैनिक मारले गेले. संपूर्ण मैदान शत्रूच्या मृतदेहांनी भरून गेलं होतं."

मृतांमध्ये इब्राहिम लोदीचाही समावेश होता. तो दिल्लीचा असा एकमेव शासक होता, जो थेट रणांगणात मारला गेला होता.

अब्राहम इराली लिहितात, "जेव्हा मुघलांना मृत सुलतानाचा मृतदेह सापडला, तेव्हा त्या काळच्या प्रथेनुसार त्याचं शीर कापून ते बाबरसमोर स्मृतीचिन्ह म्हणून सादर केलं गेलं."

"बाबरने मृतदेहाबद्दल आदर दाखवत म्हटलं, "'मी तुमच्या शौर्याचा आदर करतो.' युद्धापूर्वी इब्राहिम लोदीबद्दल अपशब्द बोलणाऱ्या बाबरने त्याच्या मृतदेहाला सलाम केला आणि त्याचा मृतदेह जरीच्या कापडाने झाकण्याचा आदेश दिला."

"त्याने आपले सेनापती दिलावर खान आणि अमीर खलिफा यांना इब्राहिम लोदीच्या मृतदेहाला आंघोळ घालून, ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला तिथेच पूर्ण सन्मानाने त्याला दफन करावं, असा आदेश दिला."

बाबरच्या नावाने खुत्बा वाचण्यात आला

बाबरने आपल्या आत्मकथेत लिहिलं, "भारताचं साम्राज्य अवघ्या 5 तासांच्या लढाईत जिंकलं गेलं. मी हुमायूनला लगेच आदेश दिला की, त्यानं वेळ न घालवता लोदीची राजधानी आग्रा जिंकायला पुढे जावं आणि तिथला खजिना ताब्यात घ्यावा."

दुसऱ्या दिवशी बाबरही आग्राकडे निघाला. वाटेत तो काही दिवसांसाठी दिल्लीमध्ये थांबला. तिथे त्याने खजिन्याचा ताबा घेतला आणि शहरातील राजवाडे, बागा तसेच पवित्र स्थळांना भेटी दिल्या.

त्याने अलाउद्दीन खिलजी आणि गियासुद्दीन बलबन यांच्या कबरींना भेटी दिल्या. त्याशिवाय त्याने कुतुबमिनार, हौज खास आणि सिकंदर लोदीच्या बागेलाही भेट दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीला गेल्यानंतर बाबरने कुतुबमिनारलाही भेट दिली होती.

बाबरने लिहिलं, "सत्तेची ही सर्व प्रतिकं पाहिल्यानंतर मी नावेत बसलो आणि विजयाच्या आनंदात दारू प्यायलो. रात्र झाल्यावर मी जमुना नदीच्या काठी उभा राहून तुघलकाबादचा किल्ला पाहत होतो. प्रत्येक दिवसासोबत हिंदुस्तानवरील माझी पकड अधिक मजबूत होत गेली."

बाबरने हेही निश्चित केलं की, शुक्रवारच्या नमाजावेळी शहराच्या मुख्य मशिदीत त्याच्या नावाने खुत्बा वाचला जावा, जेणेकरून त्याच्या सत्तेला अधिकृत मान्यता मिळेल. हे काम मौलाना महमूद आणि शेख झैन यांनी पूर्ण केलं.

त्याने 2 आठवड्यांत पानिपतपासून सुमारे 280 किलोमीटरचं अंतर कापलं. 4 मे रोजी त्याने आग्रामध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1 आठवडा त्याने शहराबाहेरील मोकळ्या मैदानात आपला तळ ठोकला.

10 मे रोजी बाबर भव्य मिरवणुकीसह आग्रामध्ये दाखल झाला. तो इब्राहिम लोदीच्या राजवाड्यासमोर घोड्यावरून उतरला आणि हिंदुस्थानचा सम्राट म्हणून सिंहासनावर बसला.

त्या वेळी बाबरचं वय 43 वर्षे होतं. त्याने नंतर कायमस्वरूपी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)