जनरल नरवणे पहिल्यांदाच पुस्तकाच्या वादावर बोलले, पण वाद थांबण्याची चिन्हं नाहीत; प्रकरण काय?

वाचन वेळ: 6 मिनिटे

माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा वाद संपण्याची चिन्हं अजून दिसत नाहीये.

जनरल नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ द डेस्टिनी या पुस्तकामुळे सध्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. याच वेळी, माध्यमांनी असं म्हटलं आहे की दिल्ली पोलीसने या प्रकरणात एफआयआरदेखील दाखल केली आहे.

जनरल नरवणेंच्या पुस्तकाबद्दल या पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन इंडियाने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

पेंग्विनने म्हटले आहे की हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नाहीये. त्यानंतर आता नरवणेंनी देखील पेंग्विनच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. यानंतरही हा वाद संपुष्टात येताना दिसत नाहीये.

भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की नरवणे यांच्या स्पष्टीकरणानंतर आता राहुल गांधींचा दावा निव्वळ एक कल्पना ठरतो.

राहुल गांधी यांनी त्यांच्या सुरस कथा सांगण्याचा प्रयत्न सभागृहात केला. त्यांचा हा दावा तथाकथित प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखक या दोघांकडून उद्ध्वस्त झाला आहे. राहुल गांधी काल विचारत होते की प्रकाशक खोटं बोलत आहे की जनरल नरवणे, आता हे स्पष्ट झालं आहे की कोण खोटं बोलत आहे.

माजी लष्करप्रमुख खोटं बोलतील असं मला वाटत नाही - राहुल गांधी

जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाबाबत दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली, यावर राहुल गांधी यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आणि प्रश्न उपस्थित केले.

राहुल गांधी यांनी 2023चं एक ट्विट वाचत म्हटलं, की एक तर जनरल नरवणे खरं बोलत नाहीयेत किंवा पेंग्विन. मला असं नाही वाटत की माजी लष्कर प्रमुख खोटं बोलतील. पेंग्विनचं म्हणणं आहे की अजून हे पुस्तक प्रकाशित नाही झालं पण हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे. जनरल नरवणेंनी ट्विट केलं होतं की कृपया 2023 मध्ये माझं पुस्तक विकत घ्या.

राहुल गांधी पुढे म्हणाले होते की मी पेंग्विन ऐवजी नरवणेजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवता. मला असं वाटतं की नरवणेजींनी आपल्या पुस्तकात सरकार आणि पंतप्रधान यांच्याबद्दल काही अप्रिय गोष्टी लिहिल्या आहेत. आता आपल्याला ठरवायचं आहे की कोण खरं बोलत आहे...पेंग्विन की देशाचे माजी लष्कर प्रमुख.

याबाबत पेंग्विन इंडियाने काय स्पष्टीकरण दिले आहे हे जाणून घेण्याआधी आणि जनरल नरवणेंचे ते ट्विट काय होते हे आपण पाहू ज्याबद्दल राहुल गांधी बोलत आहेत.

नरवणेंचं हे ट्विट 15 डिसेंबर 2023 चं आहे. ज्यात ते लिहितात की "हॅलो मित्रांनो, माझं पुस्तक उपलब्ध आहे. फक्त ही लिंक फॉलो करा. हॅप्पी रीडिंग. जय हिंद"

राहुल गांधींनी याच पोस्टवरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचं म्हणणं होतं की जर नरवणे म्हणत आहेत की पुस्तक उपलब्ध आहे तर प्रकाशक कंपनी का खोटं बोलत आहे.

परंतु आता पेंग्विनचा दावा बरोबर असल्याचे जनरल नरवणेंनी म्हटले आहे.

पेंग्विनने काय म्हटले?

या सर्व वादावर पेंग्विन इंडियाने दोन स्पष्टीकरण दिले आहे.

पहिले स्पष्टीकरण त्यांनी 9 फेब्रुवारी रोजी एक निवेदन स्पष्ट करुन दिले होते. त्यात ते म्हणाले होते की सध्याची चर्चा आणि माध्यमातील वृत्त पाहून पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हे स्पष्ट करू इच्छितं की फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी प्रकाशित करण्याचे एकमेव अधिकार आमच्याकडे आहेत.

हे पुस्तक भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेंनी लिहिले आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की अद्याप हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही. पुस्तकाची कोणतीच कॉपी - प्रिंट किंवा डिजिटल फॉर्ममध्ये...अद्याप प्रकाशित, वितरित, विकली गेली किंवा पब्लिकसाठी आमच्याकडून उपलब्ध करण्यात आलेली नाहीये.

"जी पण कॉपी सध्या सर्कुलेशनमध्ये आहे...मग ते पूर्ण पुस्तक असो वा त्याचा काही भाग, मग ते प्रिंटमध्ये, डिजिटलमध्ये, पीडीएफमध्ये या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असो...ते पेंग्विन रँडम हाऊसच्या कॉपीराइटचे उल्लंघन आहे आणि ते तत्काळ थांबवले गेले पाहिजे. जे चुकीच्या मार्गाने पुस्तकाच्या प्रती सर्क्युलेट करत असतील त्यांच्या विरोधात पेंग्विन रँडम हाऊस कायदेशीर कारवाई करेल," असं पेंग्विनने म्हटले आहे.

दुसरे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर देण्यात आले. राहुल यांनी नरवणे यांच्या ट्विटचा संदर्भ देत हे पुस्तक प्रकाशित झाल्याचा दावा केला होता.

दुसऱ्या स्पष्टीकरणात, भारतातील पुस्तक प्रकाशनाची प्रक्रिया कशी आहे याबाबत पेंग्विन इंडियाने सांगितले.

पेंग्विन इंडियाने म्हटले, "कोणत्या पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा, त्याची प्री-ऑर्डर उपलब्ध होणे आणि मुळात पुस्तक प्रकाशित होणं या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तिन्ही वेगळ्या प्रक्रिया आहेत. एखादे पुस्तक अमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर प्री-ऑर्डरसाठी दिसणे किंवा त्याची भविष्यातील रिलीजची तारीख निश्चित होणे हे सांगत नाही की संबंधित पुस्तक प्रकाशित झाले आहे. पेंग्विनचे म्हणणे आहे की पुस्तक त्याच वेळी प्रकाशित मानले जाऊ शकतो जेव्हा ते रिटेल प्लॅटफॉर्मवर थेट विक्रीसाठी उपलब्ध असेल."

यासंदर्भात मंगळवारी जनरल नरवणे यांची एक पोस्ट समोर आली आहे. नरवणे यांनी या पुस्तकाच्या स्टेटसबाबत स्पष्टीकरण दिले आहे आणि म्हटले आहे जे पेंग्विन म्हणत आहे तेच या पुस्तकाचे स्टेटस आहे.

त्यानंतर पुस्तकाच्या उपलब्धतेबद्दल दावे प्रतिदावे समोर येत आहेत.

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार प्रा. मनोज झा यांनी एएनआयला सांगितले की त्यांनी हे पुस्तक वाचले आहे.

प्रा. झा सांगतात, "ते पुस्तक मी वाचलं आहे. पुस्तक उपलब्ध आहे. डिजिटल जगात सारं काही उपलब्ध आहे. या युगात तुम्ही माहितीवर कशी रोख लावू शकाल. यातून आपल्या साम्राज्याची असुरक्षितता दिसते. दिल्ली पोलिसांना तुम्ही कारण नसताना बदनाम करत आहात. एफआयआर तर कुणाच्या तरी इशाऱ्यावर झाली आहे. मी पेंग्विन रँडम हाऊसचे ते सर्कुलर पण सोशल मीडियावर पाहिले. मला दुःख झालं."

'दिल्ली पोलिसांचा एफआयआर'

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, 9 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी नरवणे यांच्या अद्याप प्रकाशित न झालेल्या पुस्तकाच्या प्रसाराबाबत (सर्क्युलेशन) एफआयआर दाखल केला आहे.

या प्रकरणात पुस्तकाचे अप्रकाशित भाग परवानगीशिवाय कसे बाहेर आले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी दिल्ली पोलीस करणार आहेत.

पण प्रश्न असा आहे की, या संपूर्ण वादाची सुरुवात नेमकी कुठून झाली?

3 फेब्रुवारी रोजी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'कॅरव्हान' मासिकात प्रसिद्ध झालेल्या पण अजून प्रकाशित न झालेल्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकावरील लेखातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांनी म्हटलं होतं की, "या मासिकात नरवणे यांनी सांगितलं आहे की, हे त्यांचं संस्मरण (चरित्र) आहे, जे सरकार प्रकाशित करु देत नाही. मला यातील फक्त पाच ओळी वाचायच्या आहेत."

यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आणि अजून प्रकाशित न झालेल्या पुस्तकातील उतारे कसे वाचता येतील, असा सवाल केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षावर घाबरत असल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केले. मात्र त्यांना तो उतारा वाचण्याची परवानगी देण्यात आली नाही.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, नरवणे यांचं हे पुस्तक जानेवारी 2024 मध्ये बाजारात येणार होतं. परंतु, अद्याप त्याला संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळालेली नाही.

इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्सप्रेस' ने जानेवारी 2024 मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. चौकशी पूर्ण होईपर्यंत पुस्तकाचे भाग किंवा त्याची सॉफ्ट कॉपी कोणालाही देऊ नका, असे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस यांना सांगण्यात आले होते, असं यात म्हटलं होतं.

'पुस्तकाचे काही भाग 2023 मध्येच समोर आले होते'

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तात दावा करण्यात आला होता की, "हे पुस्तक 2020 मध्ये चीनसोबत पूर्व लडाखमध्ये झालेल्या लष्करी तणावावर आहे. यात गलवान खोऱ्यातील संघर्षाचा आणि अग्निपथ योजनेचाही उल्लेख आहे. तसेच 31 ऑगस्ट 2020 च्या रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचाही यात उल्लेख आहे."

डिसेंबर 2023 मध्ये पीटीआय वृत्तसंस्थेने जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील काही उतारे प्रसिद्ध केले होते, असं एक्सप्रेसच्या वृत्तात पुढे म्हटलं आहे.

यातही 31 ऑगस्टच्या सायंकाळी घडलेल्या घटनेचा सविस्तर उल्लेख होता. याच घटनेवर आणि नरवणे यांच्या पुस्तकावर 'कॅरव्हान' मासिकानेही एक लेख प्रकाशित केला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लेखात प्रसिद्ध झालेला काही भाग लोकसभेत वाचून दाखवायचा होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.