You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईतील झोपडपट्टीत शाळा सुरू करणाऱ्या शिक्षिकेला 9 कोटी रुपयांचा पुरस्कार
- Author, शर्लिन मोलन
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, मुंबई
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मुंबई शहरातील कुलाबा भागातील एका अरुंद गल्लीत शिरलं की, एक मोकळी जागा दिसते. या जागेत लहान-लहान काँक्रीटचे क्युबिकल्स (छोटी जागा) आहेत, जिथे शहरातील लोकांचे कपडे धुण्याचं आणि वाळवण्याचं काम केलं जातं.
या जागेच्या भोवती लाल, निळ्या, हिरव्या आणि पिवळ्या अशा चमकदार रंगांत रंगवलेल्या झोपड्या आहेत. या झोपड्या एकावर एक अशा उभ्या दिसतात, जणू तिरक्या टेट्रिस खेळातील ब्लॉक्सच.
या वस्तीमध्ये प्रामुख्याने कपडे धुण्याचा व्यवसाय करणारे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. त्यातील अनेक जण इथेच राहतात आणि इथेच काम करतात.
या गुंतागुंतीच्या वस्तीच्या आत एक छोटंसं शिक्षण केंद्र आहे. इथे मुलांना गणित आणि भाषेचं विनामूल्य मूलभूत शिक्षण दिलं जातं. त्यामुळे त्यांच्या मुलांना पहिल्यांदाच औपचारिक शिक्षणाची संधी मिळते, तर शाळा सोडलेल्या काही मुलांना पुन्हा शिक्षणाकडे वळता येतं.
'मागील तीन दशकांपासून काम सुरू'
हे शिक्षण केंद्र 45 वर्षीय रुबल नागी यांनी सुरू केलेल्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवलं जातं.
त्यांनी गेली सुमारे तीन दशकं शहरातील सर्वाधिक दुर्लक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला रुबल नागी यांना ग्लोबल टीचर प्राइज मिळाला. हा 1 दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे 9 कोटी रुपये) पुरस्कार वार्की फाऊंडेशन यांनी युनेस्कोच्या सहकार्याने सुरू केला आहे.
शिक्षण क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
ग्लोबल टीचर प्राइजच्या वेबसाइटनुसार, रुबल नागी यांची 139 देशांमधून आलेल्या 5 हजार नामांकन आणि अर्जांमधून निवड करण्यात आली आहे.
त्यानुसार, रुबल नागी यांनी त्यांच्या रुबल नागी आर्ट फाऊंडेशन (आरएनएएफ) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भारतभर 100 हून अधिक दुर्लक्षित वस्ती आणि गावांमध्ये 800 पेक्षा जास्त शिक्षण केंद्रे सुरू केली आहेत.
'भित्तीचित्रांनी वस्त्या सजवल्या, उत्सुकता निर्माण केली'
रुबल नागी म्हणाल्या की, साधारण तीन दशकांपूर्वी अनपेक्षितपणे वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. मुंबईत घेतलेल्या त्यांच्या एका कला कार्यशाळेत एक मुलगा आला होता. त्यावेळी त्यांना कळलं की तो मुलगा झोपडपट्टीत राहतो आणि शाळेत जाणं त्याला परवडत नाही.
रुबल नागी सांगतात की, त्या मुलाशी झालेल्या संवादामुळे त्या त्याच्या झोपडपट्टीत गेल्या. तिथली वस्ती अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसावी म्हणून भिंतींवर भित्तीचित्रे काढून परिसर सजवण्याची त्यांनी तयारी दर्शवली.
रुबल नागी आठवणी सांगताना म्हणाल्या की, "आम्ही भिंती रंगवत असताना मुले आजूबाजूला जमा होऊ लागली. मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे का? सगळ्यांनी एकसुरात 'हो' असं उत्तर दिलं."
त्या म्हणाल्या की, तेव्हाच मला उमगलं की गरीब वस्तीतील मुलांनाही शिकण्याची इच्छा असते. कलेच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करता येते, याची जाणीव त्यांना त्या क्षणी झाली.
गेल्या अनेक वर्षांत रुबल नागी आणि त्यांच्या टीमने भारतातील अनेक शहरांमध्ये शिक्षण केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी शिक्षकांना कलेच्या माध्यमातून अवघड गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवण्यास प्रोत्साहन दिलं जातं.
स्वयंसेवक मुलांना विविध कौशल्यांचे धडे देतात, तर देणग्यांमुळे मुलांना पुस्तकं, दप्तरं आणि इतर शालेय साहित्य मिळण्यास मोठी मदत होते.
'खुल्या आकाशात, मोकळ्या जागेत वर्ग'
नागी सांगतात की, त्यांची सर्वच लर्निंग सेंटर्स पक्क्या इमारतींमध्ये नाहीत. कधी-कधी झोपडपट्टीतील मोकळ्या जागेतच वर्ग भरतात. तेव्हा मुले चटया आणि सतरंजीवर बसून शिकतात.
त्या म्हणाल्या, "तुम्ही कुठंही शिकू शकता. ते फक्त रंजक पद्धतीने मांडायला हवं."
मात्र ही शिक्षण केंद्रे चालवणं सोपं नाही, असं नागी सांगतात. अनेक मुलांची कुटुंबाची परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या शिक्षकांना केवळ शिकवण्याबरोबरच समुपदेशक आणि संरक्षण देणारे पालकही व्हावं लागतं.
"जर एखादं मूल आठवडाभर आमच्या शिक्षण केंद्रात आलं नाही, तर आमचा स्वयंसेवक त्याच्या घरी जाऊन चौकशी करतो," असं नागी स्पष्ट करतात.
त्या पुढे सांगतात की, पालकांचा मुलांच्या शिक्षणात रस टिकून राहावा यासाठी त्या पालकांसोबत नियमित बैठकाही घेतात. याचा फायदा असा झाला की, त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि केंद्र सोडल्यानंतर काहींनी महाविद्यालयीन शिक्षणाचाही मार्ग निवडला, असंही त्या म्हणाल्या.
'फक्त मुलेच नाही तर पालकांशीही नातं'
एक माजी विद्यार्थी मयूर आता स्वतःचे आर्ट क्लास चालवतात आणि छपाईचा (प्रिंटिंग) व्यवसायही करतात. आठवड्याच्या शेवटी ते रुबल नागी यांच्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करतात. आपल्याला जशी संधी मिळाली, तशीच संधी वस्तीतील इतर मुलांनाही मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे.
"अशा झोपडपट्ट्यांमध्ये काम करताना फक्त मुलांशी नाही, तर संपूर्ण समुदायाशी नातं जोडावं लागतं. कधी आर्थिक मदत करून, कधी अडचणीच्या काळात आवश्यक सामान देऊन, तर कधी कुणाचं मन मोकळं ऐकून. समुदायाचा विश्वास आणि पाठिंबा मिळाला, तरच आपलं चांगलं काम सातत्याने पुढे नेता येतं," असं नागी स्पष्ट करतात.
नागी म्हणतात की, त्यांच्या संस्थेचा 'मिसाल' (म्हणजे उदाहरण) हा उपक्रम त्यांना विशेष प्रिय आहे. या उपक्रमाअंतर्गत झोपडपट्ट्यांच्या भिंतींवर शैक्षणिक भित्तीचित्रे काढून त्या भागांना 'खुल्या आकाशाखालील वर्गखोल्यांमध्ये' (ओपन एअर क्लासरूम्स) रूपांतर केलं जातं.
या चित्रांमधून विज्ञान, स्वच्छता, पर्यावरणाची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांची सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते.
ही भित्तीचित्रे परिसरातील लोकांमध्ये कुतूहल निर्माण करतात. दीर्घकाळापर्यंत यामुळे लोकांच्या सवयी, वागणूक आणि विचारांमध्येही सकारात्मक बदल घडू शकतो, असं त्या सांगतात.
या पुरस्कारातून मिळालेल्या रकमेच्या मदतीने नागी आपल्या संस्थेचे उपक्रम भारतातील आणखी भागांमध्ये नेण्याची आशा व्यक्त करतात. याची सुरुवात त्या जम्मू आणि काश्मीरपासून करू इच्छितात. याच ठिकाणी त्यांचं बालपण गेलं असून, आता तिथे संगणकांसह कौशल्य आणि शिक्षण केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
पुन्हा कुलाबामध्ये पाहिलं तर, झोपड्यांच्या भिंतींवर मोठी भित्तीचित्रे आणि प्रेरणादायी वाक्ये रंगवलेली दिसतात. शिक्षण केंद्राच्या भिंतीही चमकदार रंगांनी रंगवलेल्या असून, त्यावर वनस्पतींपासून प्राणीविश्वापर्यंत विविध विषय रेखाटले आहेत.
सात वर्षांची खुशी, या शिक्षण केंद्रात शिकते. ती सांगते की तिला रोज 'शाळेत' यायला खूप आवडतं. मोठी झाल्यावर तिला शिक्षिका व्हायचं आहे. तिची आई घरकाम करते आणि सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तिच्या एकटीच्याच कमाईवर चालतो.
इतरही अनेक मुले अशाच आर्थिक पार्श्वभूमीतून येतात. पण सगळ्यांच्या मनात भविष्यासाठी मोठी स्वप्नं आहेत. ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्यात रुबल नागी यांच्या शाळा हातभार लावतील, अशी आशा व्यक्त केली जाते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)