एका तासात 60 मिनिटंच का असतात? सावलीच्या खेळापासून ॲटॉमिक घड्याळापर्यंत, वेळेच्या निर्मितीचा रंजक प्रवास

फोटो स्रोत, The Fitzwilliam Museum, University of Cambridge

फोटो कॅप्शन, अठराव्या शतकात फ्रेंच राज्यक्रांती नंतर सत्तेत आलेल्या नव्या सरकारनं वेळ मोजण्याची नवीन दशमान पद्धत वापरायला सुरुवात केली. तेव्हा दशमान पद्धतीनुसार बनवण्यात आलेलं हे घड्याळ. आज हे घड्याळ ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून केंब्रिज विद्यापीठातील फिट्सविल्यम संग्रहालयात ठेवलेलं पाहायला मिळतं.
    • Author, जोसलिन टिम्पर्ली
  • वाचन वेळ: 12 मिनिटे

आजघडीला आपण गृहीत धरलेल्या वेळ मोजण्याच्या प्राचीन पद्धतीला साधारणतः 5 हजार वर्षांपूर्वी घेतल्या गेलेल्या एका निर्णयानं आव्हान दिलं होतं.

अर्थात हे आव्हान काही फार काळ उभा राहू शकलं नाही. पण 1793 सालच्या ऑक्टोबर महिन्यात नवनियुक्त फ्रेंच प्रजासत्ताकला क्रांतीपश्चात एक अतिशहाणपण सुचलं आणि त्यांनी वेळेचं गणितंच बदलायचं ठरवलं.

फ्रान्समधील क्रांतिकारकांनी दशमान पद्धती उचलून धरत दिवसाला आता 24 नव्हे तर 10 तास असतील, असं जाहीर केलं. हा 1 तास 100 मिनिटांचा बनलेला असेल, असं ठरलं. आणखी पुढचं विभाजन म्हणजे 1 मिनिटात 100 सेकंद असतील, असं मानलं गेलं.

ख्रिश्चन धर्माचं वर्चस्व आणि प्रभाव कमी करणं, हा फ्रेंच राज्यक्रांतीचा एक प्रमुख उद्देश होत. हा उद्देश समोर ठेवूनच येशू ख्रिस्ताभोवती फिरणारं वेळेचं गणित मोडून वेळेचं नवीन मापक काढण्यात आले.

सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना इतकंच काय वर्षाच्या मांडणीचीही पुनर्रचना करण्यात आली. दशमान पद्धतीनुसार आता दहा दिवसांचा आठवडा फ्रान्समध्ये ठेवला जाऊ लागला.

क्रांतीनंतर नव्या पद्धती नुसार घड्याळांच्या आणि दिनक्रमाच्या रचनेत बदल करायला सुरुवात झाली. शहरातील टाऊन हॉल्सच्या भिंतींवर दशमान पद्धतीची नवी घड्याळे बसवण्यात आली.

"फ्रान्सच्या नव्या सरकारनं आणलेल्या या अभूतपूर्व बदलामुळे सगळ्यांचीच डोकेदुखी आणि मनस्ताप वाढला होता", असं फिन बरिज बीबीसीशी बोलताना म्हणाले.

बरिज हे लंडनमधील रॉयल म्युझियम ग्रीनविच या संस्थेत वैज्ञानिक पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हेच ठिकाण आज जगभरात पाळल्या जाणाऱ्या वेळेच्या केंद्रस्थानी आहे.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जुनं घड्याळ बदलून नवीन घड्याळ बसवणं ही वाटते तितकी सोपी सहज गोष्ट नव्हती. वेळेचं स्वतःचं नवीन गणित बसवल्यामुळे फ्रान्स आता जगापासून वेगळा पडत चालला होता.

दैनंदिन जीवनापासून सरकारी कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टीत याचा अडथळा निर्माण होऊ लागला. वरून दहा दिवसांचा आठवडा म्हणजे कामगारांना दर सात दिवसांनी मिळणारी सुट्टी आहे आता दहा दिवसांनी मिळू लागली.

वेतनात वाढ न होता कामाची वेळ या नवीन घड्याळामुळे वाढल्यानं कामगारांमधील रोष देखील वाढत चालला होता. इतक्या सगळ्या असुविधा आणि सावळ्या गोंधळानंतर वर्षभराच्या आतच फ्रान्सच्या सरकारला वेळेची पुनर्रचना करण्याचा आपला निर्णय माघारी घ्यावा लागला.

24 तासांचा एक दिवस, 60 मिनिटांचा एक तास आणि 60 सेकंदांचा एक मिनिट हे वेळेचं गणित आपल्या सगळ्यांच्याच आज इतकं डोक्यात घट्ट बसलेलं आहे की जणूकाही तो निसर्गाचा नियमच वाटावा.

पण ही सुद्धा एक मानवनिर्मितच कृत्रिम गोष्ट आहे. वेळेचं हे गणित मांडलं जाण्याआधी सुद्धा माणूस जगतच आला होता.

आज आपल्याला नैसर्गिक वाटणाऱ्या या वेळेचा शोध नेमका कोणी, कसा आणि कधी लावला, याचा इतिहास मोठा रंजक आहे. वेळ मोजण्याची ही एकमेव पद्धत जगावर इतकी वर्ष का आणि कशी राज्य करते आहे, याचा मागोवा घेणं त्यामुळेच रोचक ठरेल.

60 चा पाढा

इसवी सन पूर्व 5300 ते इसवी सन पूर्व 1940 या कालखंडात त्यावेळच्या मेसोपोटामिया (आजचा इराक) या प्रदेशात वसलेल्या सुमेरीयन्स संस्कृतीनं 60 या एककावर चालणाऱ्या वेळ मोजण्याच्या पद्धतीचा शोध लावला, असं मानलं जातं.

शहरांची निर्मिती करणारी सर्वात प्राचीन संस्कृती म्हणूनही सुमेरीयन्स ओळखले जातात. सिंचन आणि नांगरणी यांसारख्या शेतीपद्धतींसोबतच आज इतिहासकारांना ज्ञात असलेली पहिली लिखाणाची पद्धत अथवा भाषा / लिपीचा शोधही याच संस्कृतीनं लावला होता. 60 च्या पटीत वेळ मोजण्याची पद्धत याच संस्कृतीत विकसित झाली.

आता 60 चा हा आकडा आला कुठून? याबाबत इतिहासकारांनी अनेक तर्क वितर्क लढवलेले आहे. यातील बऱ्यापैकी संगणमत असलेला तर्क म्हणजे हाताची बोटं (अंगठा सोडून) आपण वाकडी केली तर प्रत्येक बोटाला तीन याप्रमाणे एका हाताला 12 हाडे किंवा सांधे असतात.

हे एका हाताचे बारा सांधे दुसऱ्या हाताच्या 5 बोटांनी गुणले असता 60 हा आकडा मिळतो. हाताच्या बोटांनी आकडे मोजण्याची / हिशोब करण्याची सवय माणसाने हजारो वर्षांपासून जपलेली आहे.

अशा पद्धतीने 60 हा आकडा आधार मानला गेला. या आधारावरच मग वेळेचं गणित मांडलं गेलं. आज आपण पाहतो की 60 सेकंदांचा एक मिनिट व 60 मिनिटांचा एक तास असतो.

फोटो स्रोत, Cuneiform Digital Library Initiative

"इतके मोठे आकडे मोजण्यासाठीची गरज त्यांना निर्माण झाली कारण सुमेरीयन संस्कृती जसजशी विकसित होत गेली तशी तिथल्या शेतीची कार्यपद्धती प्रचंड विस्तारली व तितकीच क्लिष्ट बनली. ही शेतीच तिथल्या शहरांचा आधार होती. वाढत्या शेतीमालाची गणना करण्यासाठी हे संख्याशास्त्र विकसीत झालं," असं मार्टिन विलीस मोन्रो सांगतात.

सुमेरीयन्सनी विकसित केलेल्या कुनेफॉर्म या लिपीचे ते अभ्यासक आहेत. 60 च्या आधारावरील ही आकडेमोड देखील कुनेफॉर्म लिपीचाच एक भाग होती. मार्टिन विलीस मोन्रो कॅनडातील न्यू ब्रून्सविक विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

ओल्या मातीने बनवल्या गेलेल्या छोट्या पाट्यांवर या सुमेरीयन्सनी नोंदवून ठेवलेला कुनेफॉर्म लिपितील मजकूर व आकडेमोड पुरातत्व अभ्यासकांना मिळालेला अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक पुरावा मानला जातो.

जवळपास 7000 वर्ष जुन्या असलेल्या या लिपीचा उलगडा आपल्याला अगदीच अलीकडे म्हणजे 19 व्या शतकाच्या मध्यात झाला. उत्खननात मिळालेले हे पुरावे सापडल्यानंतर इतिहासकारांना या लिपीचा उलगडा झाला.

ज्याप्रमाणे आपण आज दहा या आकड्याला आधार म्हणून आकडेमोडीसाठी दशमान पद्धती वापरतो तशीच सुमेरीयन्स 60 या आकड्याला आधार मानून आकडेमोडीसाठी जी पद्धत वापरत असत तिला वैज्ञानिकांनी सेक्साजेसिमल हे नाव दिलेलं आहे.

"शिल्लक आकडेमोडी शिवाय क्लिष्ट वेळ मोजण्यापासून ते अगदी खगोलशास्त्राच्या अभ्यासापर्यंत सुमेरीयन्सनी शोधलेली सेक्साजेसिमल पद्धत आपल्याला आजही तितकीच उपयुक्त आहे. यावरून सुमेरीयनस हे किती प्रगत होते याचा आपल्याला अंदाज येतो", असं प्राध्यापक मार्टिन मोन्रो म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून याच विषयातून नुकतीच डॉक्टरेट मिळवलेल्या एरिका मेसझरोस यांनी ही सेक्साजेसिमल पद्धत उलगडून सांगितली.

"ज्याप्रमाणे आज आपण दशमान पद्धतीत 10 या आकड्याचा वापर करतो तसाच सेक्सजेसिमल पद्धतीत सुमेरीयन्स 60 हा आकडा वापरायचे. ज्याप्रमाणे दशमान पद्धतीत नऊ नंतर नवीन आकडा घेण्याऐवजी पुन्हा पहिलाच 1 हा एक आकडा सोबत शून्य जोडून वापरला जातो तसंच सेक्साजेसिमल पद्धतीत 59 नंतर पुन्हा त्याच आकड्यांची नव्याने सुरुवात होते," असं एरिका मेसझरोस सांगतात.

"सुमेरीयन्सनी 60 हा आकडा इतका प्रमाण का मानला याचं ठोस स्पष्टीकरण हाताच्या बोटांचा सिद्धांत देऊ शकत नाही. त्यामुळे सुमेरीयन्सनी 60 या आकड्याला दिलेलं महत्त्व थोडं अधांतरीच आहे," असा दावा मोन्रो करतात. काही तज्ञांच्या मते तर ही सेक्साजेसिमल पद्धत सुमेरीयन्सच्या आधी सुद्धा अस्तित्वात होती.

पण 60 या आकड्याची उपयुक्तता मात्र वादातीत आहे. हिशोब करण्याच्या दृष्टीने हा आकडा सर्वार्थाने सोयीचा म्हणावा लागेल. कोणतीही बाकी न उरता 60 या आकड्याचा एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, दहा, बारा, पंधरा, वीस, तीस इतक्या सगळ्या संख्यांनी भागाकार करता येतो.

याउलट दशमान पद्धतीतील दहा हा आकड्याचा बाकी शून्य ठेऊन एक, दोन आणि पाच या तीनच संख्यांनी भागाकार करता येतो. त्यामुळे आकडेमोड करायला (विशेषतः बोटांनी) 60 हा आकडा दहापेक्षा जास्त सोयीचा आहे.

जमीन मोजायची असो की पैशांची मोजदाद असो, कर मोजायचा असो की संपत्तीची वाटणी असो, ही सगळी गणितं करायला सेक्साजेसीमल पद्धत अतिशय सोपी आणि उपयुक्त ठरते.

वेळेचा उगम

सुमेरीयन्स वेळ समजण्यासाठी नेमक्या कुठल्या यंत्राचा वगैरे वापर करत होते का, याचा काही ठोस पुरावा इतिहासकारांना मिळालेला नाही.

मात्र सुमेरीयन्स नंतर याच प्रदेशात जन्मलेल्या बेबीलोनियन्स संस्कृतीत (साधारणतः इसवी सन पूर्व 1000 चा काळ) सनडाईल्स आणि पाण्यातील घड्याळासारखी उपकरणं वेळ सांगण्यासाठी वापरली जात होती, हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे.

"दिवसाचं तासांमध्ये विभाजन करणारे इतिहासातील पहिले लोक इजिप्तमध्ये होते. इसवी सन पूर्व 2500 या काळात इजिप्तमध्ये लोक तासांनुसार आपल्या दिवसाचं नियोजन करायचे हे त्यावेळच्या धर्मग्रंथांमधून सिद्ध होतं. या संस्कृतीत महान लोकांची मृत्यूपश्चात जी शवपेटी बनवली जायची तिच्या आत ठराविक पद्धतीचं घड्याळ लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यावरून या लोकांना दिवसाला 24 तास असतात हे चांगलंच ठाऊक असल्याचं स्पष्ट होतं," असा दावा स्वित्झर्लंडमधील बेसल विद्यापीठातील इतिहासकार व खगोलशास्त्रज्ञ रिता गोट्ची करतात.

फोटो स्रोत, The Board of Trustees of the Science Museum, London

फोटो कॅप्शन, सनडाईल हे वेळ मोजण्याचं मानवाने बनवलेलं सर्वात जुनं आणि पहिलं उपकरण मानलं जातं. इसवी सन पूर्व 1500 च्या काळात इजिप्तमध्ये याचा वापर पहिल्यांदा सुरू झाला.

इजिप्तमधील बेबीलोनियन्स लोकांनी दिवसाच्या 24 तासांना 12 आणि 12 अशा दोन भागात विभागलं होतं. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात नक्षत्रांची अथवा तारक समूहांची संख्या त्यांना 12 मानली होती.

हा संदर्भ पकडला तर बेबीलोनियन्सना खगोलशास्त्रामध्ये देखील तितकाच रस होता, असं म्हणता येईल. त्यामुळे 12 या आकड्यामागे एक तर हाताच्या बोटांवरील हाडांची संख्या किंवा आकाशातील नक्षत्रांचा संदर्भ असू शकतो.

आकाशातील चंद्र, पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या बदलत्या स्थानाचा त्यांचा अभ्यास देखील यासाठी कारणीभूत असावा, असं काही जण मानतात.

"इसवी सन पूर्व 1500 च्या काळात सनडाईल्स आणि वॉटर क्लॉक्ससारखी उपकरणं इजिप्त मध्ये वापरली जात होती, हे तर स्पष्टच आहे. यातली काही उपकरणं दैनंदिन आयुष्यात वेळ समजण्यासाठी वापरली जायची.

पण बहुतांशी या उपकरणांचा वापर धार्मिक विधींसाठी केला जायचा. त्यामुळे शास्त्रीय हेतूंपेक्षा देवाला वाहण्यासाठी एक वस्तू म्हणून या उपकरणांचा वापर जास्त प्रचलित होता. या काळात वेळेचे मापक म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ याच संकल्पना रूढ अर्थाने वापरल्या जायच्या.

तासांनुसार दिवसाची वेळ नोंदवणं अथवा दिवसाचं विभाजन करायची सुरुवात इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व 30 सालापासून म्हणजेच रोमन काळापासून झाली. रोमन काळात लोकांनी अर्ध्या अर्ध्या तासांचा देखील उल्लेख केलेला दिसून येतो," असं निरीक्षण रिता गोट्ची यांनी नोंदवलं.

तासानंतर आता मिनिटाचीही मोजदाद

तासापेक्षाही लहान एककामध्ये वेळेचं विभाजन आणि मोजणी जर कोणी पहिल्यांदा केली असेल तर ती म्हणजे बेबीलोनियन्सनी.

बेबीलोनियन्स संस्कृती इसवीसन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 540 या कालखंडात अस्तित्वात होती. त्यांनी सुमेरीयन्सकडून कुनेफॉर्म लिपी आणि सेक्साजेसिमल पद्धत आत्मसात केली.

साधारणतः इसवीसन पूर्व 1000 च्या आसपास पृथ्वीवरून सूर्याचं बदलत जाणारं स्थान त्यांनी हेरलं. पृथ्वी भोवती गोल फिरत फिरत साधारणतः 360 दिवसानंतर सूर्य पुन्हा आपल्या पूर्वीच्या जागी परततो, हे त्यांच्या लक्षात आलं. कालगणना करण्यासाठी त्यांनी नोंदवलेलं हे निरीक्षण अतिशय मूलगामी ठरलं.

"आधीच सेक्साजेसिमल पद्धत वापरणाऱ्या बेबीलोनियन्ससाठी 360 हा आकडा तर आणखीनच जास्त सोयीचा होता. यानंतर मग 30 दिवसांचा एक महिना असे 12 महिन्यांचा 1 वर्ष अशा मांडणीला यातून सुरुवात झाली.

30 दिवसांचा एक महिना हे गणित चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणेला देखील जुळून आलं. इतके सगळे योगायोग जुळून आल्यामुळे कालमापन करणं त्यांना आणखी सोपं झालं. दैनंदिन वापरासाठी त्यांनी मग दिवसाचं 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असं विभाजन केलं. 12 महिने आणि 12 राशी (नक्षत्र) यांच्याशी हा आकडा मेळ खाणारा होता. त्यामुळे दिवसाचे असे 12 तासांचे दोन भाग केले गेले असावेत," असा निष्कर्ष एरिका मेसझरोस यांनी काढला.

फोटो स्रोत, Getty Images

प्राचीन संस्कृतींनी केलेलं दिवसाचं हे 12 तासांचं विभाजन अगदी अलीकडच्या काळापर्यंत वापरात होतं. 15 व्या शतकात युरोप आणि 19 व्या शतकात जपानमध्ये याच आधारावर कालमापन केलं जात होतं. दैनंदिन आयुष्यात वेळेची मोजदाद यापेक्षाही छोट्या एककांमध्ये करायला सुरुवात अगदी अलीकडे म्हणजे आधुनिक काळात झाली. मेसोपोटामिया आणि इतर प्राचीन संस्कृतींमध्ये 12 तासांपेक्षा लहान वेळेचा एकक वापरला गेला नाही कारण वेळेचं इतका सूक्ष्म विभाजन करण्याची गरजच त्यांना कधी पडली नाही. दिवसा सूर्यप्रकाशात वस्तूंची सावली खाली ज्याप्रमाणे पडते अथवा सरकत जात आहे त्यानुसार ते दिवसाची वेळ काय झालेली आहे, याचा अंदाज बांधत असत.

दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त अवकाशातील घटनांचा अभ्यास करण्यासाठी बेबीलोनियन्सनी काळाची गणना करणारी आणखी एक पद्धत विकसित केली होती. या पद्धतीत दिवसाचं 12 बेरूंमध्ये विभाजन करण्यात आलं. यातला एक बेरू म्हणजे आजचे दोन तास. ही बेरू पद्धत फक्त बेबीलोनियन्सनीच नाही तर नंतर प्राचीन चीन आणि जपानमध्येही वापरली जायची, याचे पुरावे इतिहासकारांनी शोधलेले आहेत.

"वेळेचं आणखी सूक्ष्म नियोजन करण्यासाठी बेबीलोनियन्सनी या बेरूचं आणखी 30 भागांमध्ये विभाजन केलं ज्यांना उश म्हणून ओळखलं जातं. दोन तासांचं 30 भागांमध्ये केलेलं विभाजन या अर्थाने एक उश म्हणजे आपले आजचे चार मिनिट भरतात. या उशचं पुन्हा आणखी 60 लहान भागांमध्ये विभाजन केलं गेलं ज्यांना बेबीलोनियन्सनी निंडा असं नाव दिलं. हा एक निंडा म्हणजे आपले आजचे चार सेकंद भरतात. सेक्साजेसीमल पद्धतीत 60 च्या पटीत संख्या गणली जात असल्याने त्यांनी अशा प्रकारे हे वेळेचं उपविभाजन केला असावं," असा कयास एरिका मेसझरोस बांधतात.

फोटो स्रोत, Getty Images

"पण बेबीलोनियन्सनी वेळेचं उपविभाजन करण्यासाठी नव्हे तर आकाशातील ग्रहांचं एकमेकांपासूनच अंतर मोजण्यासाठी आणि या ग्रहांच्या भ्रमणाचा वेग मोजण्यासाठी हे नवीन परिमाण शोधले होते. कारण खगोलीय घटनांचा अभ्यास करायला वेळ हेच त्यांच्यासाठी सर्वात उपयुक्त साधन होतं," असा दावा प्राध्यापक मार्टिन मोन्रो करतात.

आता या वेळ मोजण्याच्या नवनव्या पद्धती नेमक्या कोणी कोणाकडून उचलल्या हे सांगणं कठीणच आहे. पण प्राचीन इजिप्त या सगळ्या वैज्ञानिक शोधांच्या केंद्रस्थानी होतं हे नक्की. याचं कारण म्हणजे इसवी सन पूर्व 330 च्या दरम्यान इजिप्त मधील अलेक्झांड्रिया येथे नव्याने स्थापन झालेलं वैज्ञानिक केंद्र.

या विज्ञान केंद्रात त्या काळातील आजूबाजूच्या प्रदेशातील लोक एकत्र जमायचे आणि विचारांची देवाण-घेवाण करायचे. या देवाणघेवाणी मधून अनेक वैज्ञानिक शोध लागले. हा काळ हेलिनिस्टिक काळ म्हणूनही ओळखला जातो.

अशा विज्ञान केंद्रामध्ये लांबच्या प्रदेशांमधून आलेले वेगवेगळे लोक एकमेकांशी विचार विमर्श करून आपल्या कल्पना मांडत असल्यामुळे या काळात ग्रीक व इतर संस्कृतींचा एकमेकांशी परिचय होऊन नवनवीन ज्ञानाची निर्मिती अतिशय वेगाने होऊ लागली. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या हा हेलिनिस्टिक काळ अतिशय अनुकूल समजला जातो.

याच देवाणघेवाणी मधून कदाचित ग्रीक लोकांनी ही कालमापन पद्धत बेबीलोनियन्सकडून आत्मसात केली असावी. पुढे जाऊन हीच कालमापन पद्धत हळूहळू सगळ्या जगाने अवलंबायला सुरुवात केली.

कारण वेळेची गणना असो अथवा खगोलशास्त्राचा अभ्यास असो, बेबीलोनियन्सनी विकसित केलेली ही कालमापन पद्धत सर्वार्थाने सगळ्यांसाठीच सोयीची होती.

कालमापनाच्यातिहासाचा कालक्रम

12 वं शतक - पहिल्या यांत्रिक घड्याळाची निर्मिती करण्यात आली. हे घड्याळ साधारणतः एक तासापर्यंतची अचूक वेळ नोंदवू शकत होतं.

16 वं शतक - आणखी जास्त अचूक असणाऱ्या लंबक घड्याळाचा (Pendulum clocks) वापर सुरू झाला. पण या घड्याळातही दिवसागणिक 10-15 मिनिटांचा घोळ घातला जायचा.

18 वं शतक - एच 4 घड्याळाचा शोध लागला. हे घड्याळ काही आठवड्यांपर्यंत एक मिनिटाचीही चूक न करता वेळ मोजू शकत होतं. "या घड्याळामुळेच मग सर्वसामान्य लोकांनीही मिनिट आणि सेकंदांमध्ये वेळ मोजायला व बोलायला सुरुवात केली," असं फिन बरिज सांगतात.

1920 चं दशक - या दशकात घड्याळाची निर्मिती करण्यात आली. हे घड्याळ वेळ मोजण्यात इतकं अचूक होतं की तीन वर्षांमध्ये फक्त एक सेकंद मोजण्यात मागे पडत असे.

1950 चं दशक - या दशकात अत्याधुनिक अशा ॲटॉमिक घड्याळाचं आगमन झालं. "अब्जावधी वर्षांनंतरही वेळ मोजण्यात एक सेकंदही न मागे पडणारं हे 100 टक्के अचूक घड्याळ आहे," असा दावा फिन बरिज यांनी केला.

मिनिटानंतर आता सेकंदाचाही हिशोब

"ग्रीक लोक त्यांच्या न्यायालयातील कचेरीत वाळूच्या घड्याळाचा वापर करायचे. न्यायालयात युक्तिवाद करताना प्रत्येक पक्षाला स्वतःची बाजू मांडण्यासाठी समान वेळ मिळावा यासाठी हे घड्याळ वापरलं जायचं.

ग्रीकांनी बेबीलोनियन्स कडून सेक्साजेसिमल पद्धत जरी घेतलेली असली तरी रोजच्या दैनंदिन जीवनात ते त्याचा वापर करत नव्हते. खगोलीय घटनांचा अभ्यास करताना फक्त सैद्धांतिक पातळीवर सेक्साजेसीमाल पद्धतीचा वापर सीमित होता," असं रिता गोट्ची सांगतात.

हेलेनिस्टिक काळात झालेल्या वैज्ञानिक विचारांच्या देवान घेवाणी मधूनच तास, मिनिट आणि सेकंदाच्या संकल्पना उदयाला आल्या आणि आज हजारो वर्षांनंतरही आपण त्यांचा वापर करत आहोत.

पण वेळ मोजण्याचं अचूक यंत्र बनवायला नंतर बराच काळ जावा लागला. 200-300 वर्षांपूर्वी माणसाला इतपत अचूक घड्याळ बनवता आलं जेणेकरून रोजच्या दैनंदिन आयुष्यात मिनिट आणि सेकंदांचा हिशोब त्याला सहज ठेवता येईल.

आज सेकंदाचा हिशोब कित्येक वैज्ञानिक शोध आणि वैज्ञानिक व्याख्यांमध्ये सर्रास वापरला जातो. हे प्रकरण सेकंदावर येऊन थांबलं नाही. वैज्ञानिक वापरासाठी सेकंदाचंही पुन्हा उपविभाजन करायला सुरुवात झाली.

यात गमतीचा भाग असा की वर्षांपासून सेकंदाला येईपर्यंत आपण सेक्साजेसीमल पद्धतीनुसार 60 चा पाढा वाचतो. पण सेकंदापेक्षाही लहान अशा वेळेची गणना करताना वैज्ञानिकांनी पुन्हा दशमान पद्धतीचाच आसरा घेतलेला दिसतो.

एका तासात 60 मिनिटं, एका मिनिटात 60 सेकंद असले तरी त्यापुढे एका सेकंदात 1000 मिलिसेकंद तर 10 लाख मायक्रो सेकंद असतात.

फोटो स्रोत, Getty Images

विसाव्या शतकातील ॲटॉमिक घड्याळाच्या शोधामुळे सेकंदाचं इतक्या सूक्ष्म पातळीवर जाऊन विभाजन करणं वैज्ञानिकांना शक्य झालं. याआधी पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणावर वेळ मोजली जायची.

यात थोडी का होईना चूक होणं अनिवार्य होतं. कारण अनेक नैसर्गिक / खगोलीय अडथळ्यांमुळे पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रत्येक प्रदक्षिणा तंतोतंत समान वेळेत पार पाडलीच जाईल असं नाही.

दर वर्षी त्यात थोडाफार का होईना बदल होतोच. पण अत्याधुनिक ॲटॉमिक घड्याळांमुळे पृथ्वीच्या या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. कॅसियम - 133 या अणूने केलेल्या मायक्रोव्हेव विकिरणांचं शोषण आणि उत्सर्जनाच्या आधारावर हे नवीन कालमापन ॲटॉमिक घड्याळातून सुरू झालं.

अणू व त्यातील उपपदार्थांची ही हालचाल स्थळकाळनिरपेक्ष एकाच गतीने सुरू असते. त्यामुळे इथे वेळेची गफलत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज जगातील जवळपास प्रत्येक घड्याळ याच तत्वावर चालतं.

जगातील प्रत्येक ॲटॉमिक घड्याळ हे या कॅसियम - 133 च्या जागतिक नेटवर्क प्रणालीशी जोडलं गेलेलं असल्यामुळे वेळ मोजण्यातील 100 टक्के अचूकते बरोबरच यात एकसंधपणाही आढळून येतो. आजच्या इंटरनेट, जीपीएस इतकंच काय तर एम आर आय इमेजिंगच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा हेच तंत्रज्ञान कामी येतं.

पण वेळ मोजण्याचा हा इतिहास निरखून पाहिल्यास एक गोष्ट सरळ लक्षात येते की वेळ ही काही नैसर्गिक गोष्ट किंवा वैश्विक सत्य नाही तर मानवाने बनवलेली फक्त एक संकल्पना आहे. वेळ हा एक भौतिकशास्त्रातील सत्य घटक असला तरी तास, मिनिट आणि सेकंद हे आपण वापरत असलेले परिमाण काल्पनिक आहेत.

हजारो वर्षांचा खटाटोप करून माणसाने ही काल्पनिक कालमापन पद्धती आपल्या सोयीसाठी विकसित केली. रोजच्या वापराने आपल्याला या कालमापन पद्धतीची इतकी सवय झालेली आहे की ते जणू नैसर्गिक सत्य असल्याचं आपल्याला वाटतं.

इतक्या वर्षांची ही सवय आता पडून गेल्यामुळे त्यात बदल करणं (भले आणखी उपयुक्त नवीन वेळ मोजण्याची पद्धत शोधली गेली तरी) अवघड आहे. कारण सोपं आहे. आपल्या सगळ्यांना वेळ मोजण्याची ही एकच पद्धत सवयीची झालेली आहे.

लोकांनी वेळ मोजण्याची वेगवेगळी पद्धत वापरायला सुरुवात केली की कसा सावळा गोंधळ निर्माण होतो, याचा अनुभव फ्रेंचांनी अठराव्या शतकात घेतलेलाच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दशमान पद्धतीनुसार नवीन कालगणना पद्धत फ्रेंचांनी लागू केली खरी, पण त्यामुळे इतकी गैरसोय निर्माण झाली की वर्षभराच्या आतच गाशा गुंडाळून पुन्हा जुन्या पद्धतीला त्यांना शरण जावं लागलं.

वेळ मोजण्याची नवी दशमान पद्धत लोकांना पटवून देण्यात फ्रेंच राज्यक्रांतीला जरी अपयश आलं तरी अंतर आणि पैसे मोजण्यासाठीची त्यांनी आणलेली हीच दशमान पद्धती जगभरात लोकप्रिय ठरली.

आजही अंतर आणि पैसे जगभरात दशमान पद्धतीनेच मोजले जातात. वेळ मोजण्यासाठी ही दशमान पद्धती कदाचित सेक्साजेसीमल पद्धतीपेक्षा जास्त सोयीची आणि सोपी असेल. पण प्रश्न आहे सवयीचा.

"लोकांंना लागलेली सेक्साजेसीमल सवय मोडता न आल्यामुळे दशमान पद्धत 17 महिनेच टिकू शकली. या काळातही तिने अभूतपूर्व गोंधळ घातला," असं फिन बरिज सांगतात.

अखेरीस 1795 साली क्लॉईड ॲंटोनी प्रिअर या फ्रान्सच्या संसदेतील सदस्याने फ्रेंच संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणांनं वेळ मोजण्याची दशमान पद्धत अधिकृतरित्या मोडित निघाली.

"ही दशमान पद्धत खरं तर अधिक जास्त सोयीची आणि उपयुक्त ठरली असती. पण सवयीने बांधलं गेल्यामुळे या दशमान पद्धतीनं लोकांचं आयुष्य सुखकर करण्याऐवजी त्यांच्या आयुष्यात आणखी जास्त गोंधळ निर्माण केला.

या सावळ्या गोंधळामुळे ही दशमान पद्धती आता इतकी बदनाम झालेली आहे की वेळच काय इतर घटकांच्या मोजमापन करतानाही दशमान पद्धतीचा अवलंब करायचा धसका लोकांनी घेतलेला आहे," अशा शब्दात त्यांनी आपली खंत व मनस्ताप व्यक्त केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)