अहमदाबाद विमान अपघातातील घटना स्थळाचे भीषण दृश्य, विमानाची झाली अशी अवस्था

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लंडनला जाणाऱ्या विमानाचा अहमदाबादेत अपघात झाला. त्यातील विमानाचा मागचा भाग एका इमारतीवर दिसत आहे.
वाचन वेळ: 3 मिनिटे

अहमदाबादमध्ये गुरुवारी 12 जून रोजी दुपारी एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. एअर इंडियाचे हे विमान AI171 लंडनच्या गॅटविकला जात होते.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या विमानात 242 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते.

फोटो स्रोत, AP

फोटो कॅप्शन, विमान कोसळल्यानंतरच्या आगीनं या परिसरात अशी अवस्था झाली.

त्यापैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होता, तर 7 पोर्तुगालचे नागरिक होते.

फोटो स्रोत, AP

फोटो कॅप्शन, आग विझवण्याचा प्रयत्न करणारे अग्निशमन विभागाचे कर्मचारी.

धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्या ठिकाणाहून धुराचे लोट दिसत होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अपघातानंतर परिसरात पसरलेले धुराचे लोट.

अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी पीटीआयला सांगितले की, "विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीत याठिकाणच्या झाडांचाही अक्षरशः कोळसा झाला.

काही वेळानंतर काढलेल्या छायाचित्रांमध्ये विमानाला लागलेली आग विझलेली दिसत आहे. फ्लाइटरडार 24 नुसार, अपघातग्रस्त विमान 787-8 ड्रीमलायनर प्रकारचे होते.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, प्रचंड धुरामध्ये बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, "सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य सर्व अपघातग्रस्त प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आहे. आम्ही घटनास्थळी उपस्थित आपत्कालीन पथकांना सहकार्य करत असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."

फोटो स्रोत, AP

फोटो कॅप्शन, विमान कोसळल्यानंतर आगीमुळं विमानाचा अक्षरशः कोळसा झाल्याचं पाहायला मिळालं.

या विमानात 53 ब्रिटिश नागरिक होते. त्यामुळे ब्रिटिश नागरिकांविषयी माहिती मिळवण्यासाठी यूकेचे परराष्ट्र कार्यालय सध्या स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात आहे.

फोटो कॅप्शन, विमान अपघातानंतर बचाव कार्यासाठी अग्निशमन विभागासह इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या.

अहमदाबाद ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) नुसार, या विमानाने अहमदाबादहून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यांनी एटीसीला डिस्ट्रेस कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

डीजीसीएनी माहिती दिली, "धावपट्टी 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडले. अपघातस्थळावरून काळा धूर निघताना दिसत होता."

फोटो कॅप्शन, विमान कोसळले त्या भागातील एका झाडाची अशी अवस्था झाली.

या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.

फोटो कॅप्शन, अपघातानंतर पडलेले विमानाचे एक पाते. यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते.

जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

एअर इंडियाने 1800 5691 444 हा हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे. हा हॉटलाइन नंबर फक्त या अपघाताशी संबंधित माहितीसाठी जारी करण्यात आला आहे.

अहमदाबाद पोलिसांनी विमान अपघाताबाबत आपत्कालीन सेवा आणि माहितीसाठी अहमदाबाद शहर पोलिसांचा आपत्कालीन क्रमांक 07925620359 देखील जारी केला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)