You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महापालिका निकाल : 'महाराष्ट्राचे आभार', पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीतून ट्वीट

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारीला मतदान पार पडलं. आज, 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. राज्याच्या राजधानीत ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि जनतेचे आभार मानले आहेत.
  • मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना युतीला कल आणि निकाल यामध्ये आघाडी
  • पुण्यामध्ये कल आणि निकाल पाहता भाजप एकहातील सत्ता मिळवण्याची शक्यता, अजित पवारांना मोठा फटका
  • ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रभागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शहाजी खुसपे यांचा विजय

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने, ओंकार करंबेळकर बीबीसी मराठी प्रतिनिधी

  1. मुंबई पालिकेत अजून 13 जागांचे निकाल बाकी

    मुंबई महानगरपालिकेच्या रात्री 9.25 मिनिटांनी आलेल्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी 85 जागांवर, शिवसेना शिंदे गट 25 जागांवर विजयी झाली आहे. उबाठा गटाला 60 तर मनसेला पाच जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 19, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 1 जागा मिळाली आहे. अजूनही 13 जागांचे निकाल येणं बाकी आहे.

  2. नांदेड मनपावर भाजपचा झेंडा, एमआयएमला 15 जागा

    काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत अखेर अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने 81 पैकी 45 जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे.

    त्यापाठोपाठ एमआयएम 15 आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने 15 जागा मिळवत विरोधी पक्ष नेते पदासाठी चुरस निर्माण केली आहे.

    दोन आमदार असलेल्या शिवसेनेला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळवता आली आहे.

  3. भाजपचा विजय, ठाकरे बंधूंची युती ते अजित पवारांचा पराभव - राजेंद्र साठे यांचं विश्लेषण

    महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नेमके काय बदल घडू शकतात? कोणत्या पक्षांना फायदा झाला आणि कोणत्या पक्षांना धक्का बसला? मतदारांनी दिलेला हा कौल कोणते संकेत देतो?

    या सगळ्या मुद्द्यांवर बीबीसी मराठीचे प्रतिनिधी गणेश पोळ यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. या मुलाखतीत निवडणूक निकालांचा राजकीय अर्थ, आगामी राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा संभाव्य परिणाम यावर स्पष्ट विश्लेषण पाहायला मिळेल.

  4. लोकांनी विकास हाच ब्रँड स्वीकारला- एकनाथ शिंदे

    या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मुंबई मध्ये देखील भाजपा शिवसेना मिळून महापौर होईल विकासाचा अजेंडा आम्ही राबवला. काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर लढवली तरी देखील युतीला लोकांनी कौल दिला."

    "25वर्षे सत्ता ज्यांनी राबवली त्यांच्या विरोधात मुंबईकरांनी मतदान केले आहे... त्यांना नाकारले आहे... UBT ने देखील 160 जागा लढून 60 जागांवर ते आघाडीवर आहेत. सत्ता युतीलाच मिळेल. विकास हाच ब्रँड आणि डेव्हलपमेंट हाच ब्रँड लोकांनी स्वीकारला आहे."

  5. महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस 'वंचित' का राहिली?

    महाराष्ट्रात 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. आज 16 जानेवारीला त्याचे निकाल जाहीर होत आहेत.

    आतापर्यंतच्या कलांनुसार आणि जाहीर झालेल्या विजयांनुसार महाराष्ट्रात सर्वत्र भाजपा, त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मजल मारलेली दिसते. त्यातही भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

    अजून निकाल पूर्ण जाहीर झाले नसली तरी एकूण चित्र स्पष्ट झालेलं आहे.

    राष्ट्रवादी काँँग्रेसचा विचार करता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपानं आघाडी घेतल्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या या दोन पालिकांचे 'पालक' म्हणवले जाणाऱ्या अजित पवार यांना मोठा फटका बसल्याचं दिसतं.

    मुंबईत भाजपाविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही महायुतीचा महापौर होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

    पण या निवडणुकीत सर्वात मोठा फटका काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला बसल्याचं दिसतं. एकेकाळी विविध पालिकांमध्ये सत्ता आणि तिजोरीच्या किल्ल्या ज्या पक्षांकडे होत्या, त्या पक्षाचं पुरतं पानिपत झाल्याचं दिसत आहे.सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  6. महाराष्ट्राचे आभार!: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मराठीतून ट्वीट

    महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि जनतेचे आभार मानले आहेत.

    ते एक्स या प्लॅटफॉर्मवर लिहितात,"महाराष्ट्राचे आभार ! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे.

    आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे."

    "महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे.

    त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा."

  7. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान यांची पत्नी विजयी

    नागपुरात पहिल्यांदाच एमआयएम ने खाते उघडलं आहे. या पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत.

    यामध्ये नागपूर हिंसाचारात ज्याच्यावर आरोप होते त्या फहीम खानची पत्नी अलीशा खान यांचा विजय झालेला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. नागपूर हिंसाचारानंतर फहीम खानच्या घरावर महापालिकेने बुलडोझर चालवला होता.

    मुस्लीम लीगने सुद्धा नागपूर महापालिकेत खातं उघडलं असून त्यांचे 4 नगरसेवक विजयी झालेले आहेत.

    आशीनगर झोन विजयी उमेदवार

    • मुस्लीम लीग 04
    • एमआयएम - 03
    • काँग्रेस - 06
    • भाजप - 01
    • बसप 02
  8. मुंबईत महापालिका निवडणुकीत कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला?

  9. मतदारांनी विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिला-देवेंद्र फडणवीस

    भारतीय जनता पार्टीनं शुक्रवारी सायंकाळी मुंबई आणि महाराष्ट्रातील बहुतांश महानगर पालिकेत मिळवलेल्या विजयाचा जल्लोष केला.

    मुंबईच्या नरीमन पॉइंटमधील भाजपच्या कार्यालयात राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विजयाचा हा जल्लोष करण्यात आला.

    सगळे विक्रम या विजयाने मोडले. 29 पैकी 25 महानगरपालिकांत भाजप किंवा युतीची सत्ता येत आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतही कल पाहता महायुतीला बहुमत मिळेल, यात शंका नाही असं यावेळी फडणवीस म्हणाले.

    "या निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा घेतला. लोकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. ज्या प्रकारचं बहुमत दिलं त्यावरून लोकांना विकास हवा असल्याचं स्पष्ट दिसतं. महाराष्ट्राचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच आहे हे या निकालानं स्पष्ट केलं आहे.

    या निकालाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण करतो कारण, त्यांचाही आशीर्वाद होता त्यामुळंच हा विजय मिळाला आहे."

    "हिंदुत्व आणि विकास याला वेगळं करता येणार नाही. त्यामुळं हिंदुत्वाच्या आत्म्यानेच आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं. आमचं हिंदुत्व व्यापक आहे. त्यामुळंच व्यापक पाठिंबा मिळाला."

    गेली अनेक वर्ष भावनिक आव्हानांवर निवडणुका होत होत्या. पण ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वास विकासावर झाली, आणि लोकांनी त्याला आशीर्वाद दिला त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत, असल्याचं यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले.

  10. सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिकेत भाजपला एकहाती सत्ता

    सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिकेचा अंतिम निकाल समोर आला आहे. भाजपला याठिकाणी एकहाती सत्ता मिळाली आहे.

    एकूण 78 जागांपैकी याठिकाणी भाजपनं 39 जागा जिंकल्या. तर शिवसेनेनं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 जागा मिळवल्या.

    याठिकाणी काँग्रेसला 18 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं 3 जागा मिळवल्या.

  11. एकनाथ शिंदेंच्या प्रभागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहाजी खुसपे विजयी

    ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत एक रंजक निकाल लागल्याचं समोर आलं आहे.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या प्रभागात राहतात त्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी खुसपे यांचा विजय झाला आहे.

    ठाण्याचे माजी महापौर आणि जेष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती यांचा ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी खुसपे यांनी पराभव केला आहे.

  12. 'तुमच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात नेत्रदीपक विजय', फडणवीस यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन करून महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमधील यशाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

    "तुमच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात पक्षानं नेत्रदीपक कामगिरी केली. त्याबद्दल तुमचे अभिनंदन," असं म्हणत फडणवीस यांनी फोनवरून रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

  13. निकाल Updates : छत्रपती संभाजीनगर, जालन्यात भाजपची आगेकूच

    राज्यातील महानगर पालिका निवडणुकीतील कल पाहता अनेक ठिकाणी भाजप आणि महायुतीनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणीत दुपारी 03 पर्यंत हाती आलेल्या निकालांपैकी काही प्रमुख निकाल इथे देत आहोत.

    छत्रपती संभाजीनगर

    एकूण जागा - 115

    भाजप - 30

    शिवसेना - 15

    एआयएमआयएम - 15

    शिवसेना (उबाठा) - 08

    वंचित बहुजन आघाडी - 07

    ----------------

    जालना

    एकूण जागा - 65

    भाजप - 41

    शिंदे सेना - 12

    काँग्रेस - 09

    MIM - 02

    अपक्ष - 01

    ----------------

    पुणे

    भाजप - 26

    राष्ट्रवादी काँग्रेस - 06

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 02

    काँग्रेस - 03

    ----------------

    ठाणे

    एकूण जागा - 131

    भाजप - 15

    शिवसेना - 28

    राष्ट्रवादी - 05

    मनसे - 00

    काँग्रेस - 00

    शिवसेना (उबाठा) - 03

    राष्ट्रवादी (शरद पवार) - 04

    एआयएमआयएम - 05

    अपक्ष - 01

    ----------------

    चंद्रपूर

    शिवसेना उबाठा - 05

    काँग्रेस - 15

    (मित्र पक्ष जनविकास सेनेचे 3 जोडून)

    भाजप - 12

    एआयएमआयएम - 01

    बसपा - 01

    वंचित बहुजन आघाडी - 01

    शिवसेना - 01

  14. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर विजयी

    गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांचा जालना महानगरपालिका निवडणुकीत विजय झाला आहे.

    ऑगस्ट 2018 मध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुंबईनजिकच्या नालासोपाऱ्यातून क्रूड बाँब, देशी बनावटीच्या बंदुका यांच्यासह मोठी स्फोटक सामग्री हस्तगत केली होती.

    या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांविषयी माहिती मिळाली होती.

    याच प्रकरणी श्रीकांत पांगारकर या शिवसेनेच्या जालन्याच्या माजी नगरसेवकालाही दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अटक केली होती.

    राज्यात अनेक ठिकाणी हल्ले करण्याच्या कटासाठी आर्थिक रसद पुरवण्याची कामगिरी पांगारकरवर होती, असा आरोप आहे.

    पांगारकर हे 2001 ते 2011 या कालावधीदरम्यान जालना नगरपालिकेत दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र मागील काही काळात त्यांचा कुटुंबासह मुक्काम औरंगाबादला होता.

    ऑगस्ट 2018 मध्ये बीबीसी मराठीने नालासोपाऱ्यातील एटीएसच्या कारवाईबाबत बातमी केली होती. त्यावेळी बीबीसी मराठीने महेश बुलगे यांच्याशी बातचित केली होती. महेश बुलगे जालन्याच्या 'आनंदनगरी' या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत आणि ते पांगारकर यांचे अनेक वर्षांपासूनचे मित्रही आहेत.

    महेश बुलगे म्हणाले होते, "पांगारकर यांचे वडील भाजपमध्ये होते. पण श्रीकांत हे पहिल्यापासून आक्रमक हिंदुत्ववादी असल्यानं ते मात्र शिवसेनेमध्ये गेले. दोनदा नगरसेवक झाल्यानंतर त्यांचं तिकीट कापलं गेलं. मग त्यांनी आपल्या पत्नीला अपक्ष म्हणून उभं केलं, पण त्यांचाही पराभव झाला."

    अशोक पांगारकर हे श्रीकांत पांगारकर यांचे चुलत बंधू आहेत आणि 2018 ते जालना नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते. त्यांच्या मते त्यांच्या भावावरचे आरोप चुकीचे आहेत. "त्याची आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नाही. मग तो अशा कामासाठी कसली आर्थिक मदत करेल?" असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

  15. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीचा विजय - जगताप

    पुण्यातील बहुचर्चित निवडणुकीत काँग्रेसकडून प्रशांत जगताप यांचा विजय झाला. विजयानंतर त्यांनी हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारसरणीचा विजय असल्याचं म्हटलं.

    "इथे माझ्याविरोधात जवळजवळ 4 आमदार आणि 2 माजी राज्यमंत्री लढत होते. त्या सगळ्यांचा पराभव होऊन प्रशांत जगतापचा विजय झाला आहे. हा निश्चित वानवडीमधील जनतेचा माझ्यावरील विश्वास आहे. ज्यांनी मला सोडलं किंवा मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्यांना माझा हाच सल्ला आहे की, या ठिकाणी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा कालही जिवंत होती आणि आजही आहे, उद्याही जिवंत राहील."

  16. GenZ नं विकसित भारतासाठी मतदान केलं- सुधांशु त्रिवेदी

    भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लोकांचे आभार मानले आहेत.

    दिल्लीमध्ये बोलताना ते म्हणाले. "आज महाराष्ट्र महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि आमचे युतीतले भागीदार यांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीए यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचं हे दर्शवतं…

    आम्ही महाराष्ट्रातील जनतेचे आणि सर्व समर्थकांचे आभार मानतो.

    विशेषतः जी भारतातीलच नव्हे तर कदाचित आशियातीलही सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक आहे…अशा बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) मिळालेल्या या यशासाठी ... "

    "मी असं म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या जनतेने भारताच्या या नव्या विकासावर शिक्कामोर्तब केलं आहे… मला वाटतं की GenZ ने ‘VB’ म्हणजेच ‘विकसित भारत’च्या बाजूने मतदान केलं आहे…

    हे यश देशाच्या भविष्यासाठी निश्चितपणे एक अतिशय चांगलं चिन्ह आहे, एक सकारात्मक संकेत आहे.

    महाराष्ट्रातील जनतेने नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना योग्य असा प्रत्युत्तर दिलं आहे…

    मला हेही विचारायचं होतं की INDI आघाडी अजून अस्तित्वात आहे का… INDI आघाडीची पकड पूर्णपणे सैल होत चालल्याचं दिसत आहे…"

  17. मुंबई महापालिका निवडणुकांच्या आतापर्यंतच्या निकालांमध्ये मोठ्या नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला आहे

  18. राज ठाकरेंवर टीका करायला रसमलाईचा वापर

    गेल्यावर्षी हरियाणा विधानसभा निवडणुकांच्यावेळेस राहुल गांधी यांनी जिलेबीबद्दल केलेले वक्तव्य प्रचारापेक्षा निकालानंतर जास्त गाजले होते. भाजपाने निकालानंतर जिलेबी वाटून राहुल गांधी यांची खिल्ली उडवली होती. असाच काहीसा प्रकार आता मुंबई महापालिकेच्या निकालावेळेस होत आहे. भाजपाचे तामिळनाडूतले नेते अण्णामलाई मुंबई हे फक्त महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे असं म्हणाले होते. त्यावर टीका करताना मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना रसमलाई असं संबोधलं होतं. आता निकालात भाजपा-शिवसेना शिंदे गटाने सत्तास्थापनेकडे केलेली आगेकूच पाहून भाजपा नेत्यांनी राज ठाकरे यांच्या या संबोधनाचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. बंगळुरू मध्य लोकसभा मतदार संघाचे खासदार पी. सी मोहन यांनी मी रसमलाई ऑर्डर केलीय. असं ट्वीट केलं आहे.

  19. मुंबईत महापालिका निवडणुकीत कोणत्या नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला? पाहा

  20. एकाच कुटुंबातील तीन नगरसेवक... एक नगरसेवक तुरुंगातच

    जळगाव महानगरपालिका निवडणुकीत कोल्हे कुटुंबातील तीन सदस्य ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे आणि पियूष ललित कोल्हे या निवडणुकीत विजयी झाले. ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली होती.

    पियूष कोल्हे म्हणाले, "आमच्या कुटुंबातील तीन जण निवडून आले. माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे मतदारांनी ललित कोल्हेंवर प्रेम व्यक्त केले आहे. गेल्या 15-20 दिवसांत लोकांनी आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण सत्याचा नेहमी विजय होतो"