नमिता थापर : नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितल्यानं वाद; आता म्हणाल्या, 'ट्रोलिंग चालू ठेवा, देव बघतोय'

नमिता थापर यांच्या नमाजबद्दलच्या व्हीडिओला सुमारे 76 हजार लोकांनी लाईक केले

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, नमिता थापर यांच्या नमाजबद्दलच्या व्हीडिओला सुमारे 76 हजार लोकांनी लाईक केले
वाचन वेळ: 4 मिनिटे

'एमक्योर' या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पूर्णवेळ संचालक, उद्योजिका आणि 'शार्क टँक इंडिया' या रिॲलिटी टीव्ही शोच्या परीक्षक नमिता थापर या सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

त्या सांगतात की, गेल्या तीन आठवड्यांपूर्वी 'नमाजचे आरोग्यदायी फायदे' सांगणारं एक रील बनवल्यामुळे त्यांना खूपच ट्रोल करण्यात आलं आहे.

आता या पार्श्वभूमीवर, त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, गप्प बसणं हा काही सद्गुण असू शकत नाही आणि कुणाचाही अपमान झाल्यास त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, याची त्यांना जाणीव आहे.

यासोबतच त्यांनी एक व्हीडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी सांगितलंय की, त्यांना आणि त्यांच्या आईला सोशल मीडियावर प्रचंड शिवीगाळ सहन करावी लागत आहे.

साधारण तीन आठवड्यांपूर्वी, 25 मार्च रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. या रीलमध्ये त्यांनी नमाज पढल्यामुळे आरोग्यासाठी काय फायदे होतात, ते सांगितलं होतं.

आता त्या व्हीडिओबद्दल त्यांनी म्हटलं आहे की, त्या बऱ्याच काळापासून योगा आणि त्यामुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल बोलत आलेल्या आहेत. पण, त्यावर कधीच चर्चा झाली नाही.

त्यांनी हा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत, तर अनेक जण त्यांच्यावर टीकाही करत आहेत.

पण, नमिता थापर ज्या रीलमुळे ट्रोल होत आहेत, त्या रीलमध्ये त्यांनी नमाज आणि त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांबद्दल काय भाष्य केलं होतं, ते पाहूयात.

नमाज आणि योगासनाबद्दल काय म्हटलं होतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

25 मार्च रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका रीलमध्ये नमिता म्हणताना दिसतात की, "या शनिवारी मी माझ्या जवळच्या एका मैत्रिणींसोबत ईद साजरी केली. ती मला म्हणाली की, नमिता, तू आरोग्याबद्दल इतकं बोलत असतेस. पण, तुला नमाजच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल माहिती आहे का?"

"हे खरंच अविश्वसनीय आहे. सर्वात आधी तर हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. हा शरीराच्या लवचिकतेसाठी उत्तम आहे आणि त्यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारतं. हे कोपर आणि गुडघ्यांसाठीही खूप चांगलं ठरतं."

नमिता थापर पुढे म्हणतात की, "दुसरं म्हणजे, हे मानसिक आरोग्यासाठीही खूप चांगलं आहे. कारण, यात तुमची एकाग्रता होते, जे ध्यान करण्यासारखंच आहे. तिसरं म्हणजे, तुम्ही वज्रासनात बसता, तेव्हा तेदेखील तुमच्या पचनासाठी खूप चांगलं ठरतं."

"यामधील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, यामुळे तुम्हाला दिवसातून पाच वेळा धावपळीमधून विसावा मिळतो. नमाजचं सामूहिक पठण केलं जातं. ते सामाजिक संबंधांसाठीही चांगलं असतं. प्रत्येक धर्माची प्रार्थना करण्याची स्वतःची एक अनोखी पद्धत असते आणि त्याचे आध्यात्मिक फायदेदेखील आरोग्यासाठी खूप चांगले असतात."

नमिता थापर यांना त्यांच्या एका व्हीडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

फोटो स्रोत, namitathapar

फोटो कॅप्शन, नमिता थापर यांना त्यांच्या एका व्हीडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

ही रील पोस्ट केल्यानंतर, त्याला समर्थन आणि विरोध करणाऱ्या सुमारे साडेसात हजार प्रतिक्रिया त्यावर मिळालेल्या दिसतात.

विपुल पटेल नावाच्या एका युझरने या रीलवर कमेंट करत आरती करण्याचेही अनेक फायदे सांगितले. त्याच्या या कमेंटला 3 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलेलं आहे.

कुशल व्यास नावाच्या एका युझरनं लिहिलं आहे की, "आता त्याच मैत्रिणीला हनुमान चालीसा वाचण्याचेही फायदे सांगा आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती, ते आम्हाला कळवा."

याशिवाय, अनेक लोकांनी त्यावर कमेंट करून म्हटलं की, ते आता या रीलमुळे नमिताला अनफॉलो करत आहेत.

यासोबतच, असेही अनेक लोक होते, जे त्यांच्या या रीलचं कौतुकही करत होते.

जसकिरत सिंग यांनी नमिताच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय की, "त्या अध्यात्माबद्दल बोलत आहे म्हणून लोक तिच्याबद्दल राग व्यक्त करत आहेत. पण लोक म्हणताहेत की, आम्हाला आमचं अध्यात्म शिकवा, त्यांचं नाही."

"पण त्यांना हेदेखील कळत नाही की, अध्यात्म हा देवाशी जोडलं जाण्याचा केवळ एक मार्ग आहे आणि देव एकच आहे. मग तुम्ही नमाज अदा करा, आरती करा, गुरुद्वारामध्ये पाठ करा किंवा चर्चमध्ये प्रार्थना करा. मार्ग वेगवेगळे असले तरी पोहोचण्याचा मार्ग एकच आहे. फक्त द्वेष पसरवून मूर्ख बनू नका."

नमिता थापर यांनी आता काय म्हटलंय?

तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर, नमिता थापर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सोमवारी (20 एप्रिल) त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ पोस्ट करून म्हटलं आहे की, गेल्या तीन आठवड्यांपासून लोक त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर करत आहेत.

नमिता थापर या व्हीडिओमध्ये म्हणाल्या की, "माझ्या लाडक्या आईलाही सतत घाणेरडी नावं ठेवण्यात येत आहेत. का? तर, फक्त नमाजच्या आरोग्यदायी फायद्यांवर एक व्हीडिओ बनवला म्हणून?"

"मी एक हेल्थकेअर प्रोफेशनल आहे. मी हिंदू धर्म आणि त्याच्या आरोग्यविषयक फायद्यांवर देखील रील बनवली आहे. मी प्रत्येक योगासनावर, विशेषतः सूर्यनमस्कारावरही रील बनवते. पण, तेव्हा मात्र कुणी काहीच बोललं नाही."

तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर, नमिता थापर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

फोटो स्रोत, namitathapar

फोटो कॅप्शन, तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटल्यानंतर, नमिता थापर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

नमिता पुढे म्हणाल्या की, "मला हेच शिकवण्यात आलं आहे की, आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. पण, तुम्ही या प्रकारे आदर करत आहात, खासकरून एका महिलेचा. महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानंतर सगळे आवाज उठवतात, पण जेव्हा दोन महिलांचा असा अपमान होतो, तेव्हा हे मौन का? मला खूप पूर्वीच हे लक्षात आलं आहे की, तुमच्यासाठी कुणीही बोलणार नाही. तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच बोलावं लागेल."

"मला माझ्या सर्व ट्रोलर्सना सांगायचं आहे की, तुम्ही तुमचं हे ट्रोलिंगचं काम करत राहा. पण लक्षात ठेवा की, मी एक स्वाभिमानी हिंदू आहे आणि हिंदू धर्मात कर्माची संकल्पना आहे. तुम्ही तुमच्या अक्कलहुशारीनं पुढे जात राहा, कारण देव सर्व पाहत आहे.

सर्व धर्मांचा आणि स्त्रियांचा आदर केला पाहिजे यावर ज्यांचा विश्वास आहे, त्या सर्व सुशिक्षित, स्वाभिमानी हिंदूंना मला सांगायचं आहे की, माझे नकारात्मक व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. आता हा व्हीडिओदेखील व्हायरल करा."

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या रीलवर आतापर्यंत 22 हजारहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. मात्र, या रीलवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जण तिची प्रशंसा करत आहेत आणि तिला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत, तर काही जण तिला ट्रोल करत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)