अमेरिकेच्या नौदलावर इराणचा हल्ला; पाकिस्तानातील शांतता चर्चेवर काय परिणाम होणार?
फोटो स्रोत, US Central Command
- Author, कॅथरीन आर्मस्ट्राँग
- वाचन वेळ: 5 मिनिटे
इराण आणि अमेरिका यांच्यात इस्लामाबादमध्ये पुन्हा चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. त्याची तयारी सुरू असतानाच इराणचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज अमेरिकेने ताब्यात घेतलं.
त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने नंतर ओमानच्या आखातात अमेरिकेच्या लष्करी जहाजांवर ड्रोन हल्ले केले. इराणची निम-सरकारी वृत्तसंस्था तसनीमने ही माहिती दिली आहे.
मात्र, या ड्रोन हल्ल्यांमुळे कोणतीही हानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.
इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांड युनिट खातम अल-अनबिया सेंट्रल हेडक्वार्टर्सने आधीच प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता.
त्यांनी अमेरिकन नौदलाची कारवाई शस्त्रसंधीचा भंग असल्याचे सांगितले. तसेच अमेरिकन नौदलाने केलेल्या या कारवाईला ते 'सशस्त्र लूट' मानतात आणि त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेने नौदल नाकेबंदीअंतर्गत आखातात इराणचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज थांबवलं आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेच्या नौदलानं थांबण्याचा इशारा देऊनही प्रतिसाद न दिल्यानं 'टोस्का' नावाचं जहाज ताब्यात घेतलं, असं ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलं.
"आज इराणचा ध्वज असलेल्या 'टोस्का' नावाच्या जहाजाने नौदलाच्या नाकेबंदीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. हे जहाज सुमारे 900 फूट लांब असून जवळपास विमानवाहू जहाजाएवढे मोठे आणि जड आहे," असं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेनं त्या जहाजाला थांबण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केलं.
"त्यामुळं आमच्या जहाजानं त्याच्या इंजिन रूमवर हल्ला करून ते जहाज तिथंच थांबवलं, " असं त्यांनी पुढं म्हटलं.
फोटो स्रोत, US Central Command/X
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने नंतर एक व्हीडिओ जारी केला. त्यात नौदलाचं एक जहाज मालवाहू जहाज थांबताना दिसत आहे.
इराणसोबत युद्ध थांबवण्याच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स पाकिस्तानमध्ये एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. व्हाइट हाऊसने याला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांचे हे वक्तव्य समोर आलं आहे.
या संभाव्य चर्चेत सहभागी होण्याबाबत इराणने अजून आपला सहभाग निश्चित केलेला नाही.
जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील तोपर्यंत अधिकारी चर्चेत सहभागी होणार नाहीत, असं इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिलं आहे.
चर्चेबाबत परस्परविरोधी विधानं
दोन्ही देशांमध्ये करार होईपर्यंत इराणच्या बंदरांवरील नौदल नाकेबंदी सुरूच राहील, असं ट्रम्प यांनी शुक्रवारी (17 एप्रिल) सांगितलं होतं.
हा संघर्ष 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांपासून सुरू झाला. त्यानंतर मध्य पूर्वेमध्ये 5 आठवडे सतत हल्ले झाले आणि नंतर 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती.
या महिन्याच्या सुरुवातीला झालेली चर्चेची पहिली फेरी कोणत्याही कराराशिवाय संपल्यानंतर ट्रम्प यांनी नाकेबंदीची घोषणा केली होती.
इराणचा आण्विक कार्यक्रम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण यांसारखे महत्त्वाचे मुद्दे अजूनही वादाचा विषय आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
रविवारी (19 एप्रिल) ट्रम्प यांनी, त्यांचे प्रतिनिधी सोमवारी पाकिस्तानमध्ये पोहोचतील, असं सांगितलं. पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करत आहे. ही शस्त्रसंधी बुधवारी (22 एप्रिल) संपणार आहे.
व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, उपराष्ट्राध्यक्ष व्हेन्स यांच्यासोबत ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह व्हिटकॉफ आणि जेरेड कुश्नरही प्रतिनिधीमंडळात असतील. हे दोघेही आधीच्या चर्चांवेळी उपस्थित होते.
परंतु, अमेरिकेसोबत दुसऱ्या फेरीच्या चर्चेची बातमी 'खरी नाही', असं इराणची सरकारी वृत्तसंस्था इरनाने सांगितलं.
अमेरिकेची नाकेबंदी, 'खूप जास्ती'च्या मागण्या आणि धमकीची भाषा यामुळे 'आतापर्यंत चर्चेतील प्रगतीत अडथळा निर्माण झाला आहे', असंही ते म्हणाले.
चर्चेची तयारी सुरू
एवढं सगळं होऊनही पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पुढील चर्चेची तयारी सुरू झाली आहे.
मागील आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये ज्या हॉटेलमध्ये चर्चा झाली होती, तिथे थांबलेल्या पाहुण्यांना हॉटेल रिकामं करण्यास सांगण्यात आलं आहे, असं बीबीसीच्या पाकिस्तानच्या प्रतिनिधीने सांगितलं.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रविवारी सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवर चर्चा केली.
ही माहिती त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. यात अमेरिका आणि इराण यांच्यात पुढे होणाऱ्या चर्चेचा कोणताही उल्लेख नव्हता.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
होर्मुझची सामुद्रधुनी रविवारी बंद राहिली. त्याआधी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी), तात्पुरता उघडलेला मार्ग पुन्हा बंद केला जात आहे, कारण अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे शस्त्रसंधीच्या अटींचे उल्लंघन केले आहे, असं सांगितलं होतं.
जोपर्यंत अमेरिका आपली नौदल नाकेबंदी संपवत नाही, तोपर्यंत हा मार्ग बंद राहील, असं इराणने सांगितलं.
जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) यांची वाहतूक साधारणपणे याच मार्गाने केली जाते.
अलीकडील संघर्षामुळे या मार्गाने जाणाऱ्या जहाजांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा दर वाढले आहेत.
इराण या जलमार्गावरून धमकी देऊन अमेरिकेला 'ब्लॅकमेल' करू शकत नाही, असं ट्रम्प म्हणाले होते.
ट्रम्प यांची धमकी
जर इराण शांतता करारासाठी तयार झाला नाही, तर इराणमधील प्रत्येक पूल आणि वीज प्रकल्प नष्ट केले जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
रविवारी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटलं, "जर त्यांनी करार केला नाही, तर त्यासाठी आवश्यक ते सर्व करणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल."
इराणने शनिवारी होर्मुज सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ला करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
त्यांनी सांगितलं की, यात एक फ्रेंच जहाज आणि ब्रिटनचे एक मालवाहू जहाजही होते.
फ्रेंच शिपिंग कंपनी सीएमए सीजीएमने पुष्टी केली की, त्यांच्या एका जहाजावर गोळीबार झाला होता आणि त्यांनी 'त्या जहाजावर इशारा म्हणून गोळीबार करण्यात आला होता,' असं एएफपीला सांगितले.
परंतु, ब्रिटनच्या संरक्षण आणि परिवहन मंत्रालयांनुसार, शनिवारी ब्रिटनशी संबंधित जहाजांवर हल्ला झाल्याची कोणतीही नोंद नव्हती.
फोटो स्रोत, AFP via Getty Images
यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सनुसार, शनिवारी सामुद्रधुनीत 2 जहाजांवर- 1 टँकर आणि 1 मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.
परंतु, हे जहाज कोणत्या देशाशी संबंधित होते, हे त्यांनी सांगितलं नाही.
याचदरम्यान, भारताकडून या गोळीबाराच्या घटनेमध्ये 2 भारतीय ध्वज असलेल्या जहाजांचा समावेश होता, असं सांगण्यात आलं.
मरीन ट्रॅफिकच्या आकडेवारीनुसार, रविवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबली होती.
आयआरजीसीशी संबंधित तसनीम वृत्तसंस्थेनं सांगितलं, "'बोत्सवाना आणि अंगोला'चा ध्वज असलेले 2 टँकर होर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, इराणच्या सशस्त्र दलांनी वेळीच कारवाई केल्यामुळे त्यांना मार्ग बदलावा लागला आणि ते परत फिरले.
(बीबीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही