इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; गेल्या 24 तासात 203 लोकांचा मृत्यू

गेल्या 24 तासात 203 लोकांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

फोटो स्रोत, Reuters

वाचन वेळ: 3 मिनिटे

काल (8 एप्रिल) इराण आणि अमेरिकेदरम्यान शस्त्रसंधी झाली. त्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले. या हल्ल्यात किमान 203 जण ठार, तर एक हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्यांमुळे इराण-अमेरिकेच्या शस्त्रसंधीचे भवितव्य काय असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या 100 हून अधिक तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलने या हिजबुल्लाच्या विविध कमांड सेंटरवर 10 मिनिटांच्या काळात हवाई हल्ले केल्याचे सांगितले.

लेबनॉनची राजधानी बैरुतच्या दक्षिणेकडील उपनगर, दक्षिण लेबनॉन आणि पूर्वेतील बेक्का व्हॅली या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी आधी सांगितलं होतं की, किमान 182 जण या हल्ल्यात ठार झाले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मात्र, आता गेल्या 24 तासांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 203 लोकांचा मृत्यू झाला असून एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी ताजी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासात 203 लोकांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 203 लोकांचा मृत्यू झाला असून एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले

फोटो स्रोत, Getty Images

ही आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा इराण लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यांना अमेरिका-इराण शस्त्रसंधी कराराचं घोर उल्लंघन असल्याचं म्हणत आहे.

त्याच वेळी, इस्रायलने बुधवारीच म्हटलं होतं की लेबनॉन शस्त्रसंधीचा भाग नाही, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं होतं की शस्त्रसंधी लेबनॉनलाही लागू होईल.

हिजबुल्लाहच्या प्रमुखाच्या खाजगी सचिवांना ठार केल्याचा आयडीएफचा दावा

इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर रात्रभरात हल्ला केला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने हिजबुल्लाह प्रमुखाच्या खाजगी सचिवांना ठार केल्याचा दावा केला आहे.

आयडीएफने सांगितलं की त्यांनी हिजबुल्लाहचे प्रमुख नईम कासिम यांचे खाजगी सचिव (जो त्यांचा पुतण्याही होता) अली युसूफ हर्शी यांनाही ठार केलं.

आयडीएफने सांगितलं की, त्यांनी लिटानी नदीवरील दोन पुलांना लक्ष्य केलं. या नदीला अलीकडच्या आठवड्यांत वारंवार लक्ष्य केलं जात असून त्यामुळे दक्षिण लेबनॉनचा संपर्क तुटला आहे.

इस्रायलने बुधवारी सांगितलं की लेबनॉन शस्त्रसंधीचा भाग नाही, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सांगितलं की शस्त्रसंधी लेबनॉनलाही लागू होईल.

शस्त्रसंधीचे 'खुलेआम' आणि 'स्पष्ट' उल्लंघन, इराणचा दावा

8 एप्रिल रोजी इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्यानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचे इराणच्या संसदेचे स्पीकर मोहम्मद बगर गालिबाफ यांनी म्हटले आहे.

शस्त्रसंधीसाठी इराणकडून दहा कलमी प्रस्ताव देण्यात आला आहे. त्या दहा कलमांपैकी 3 कलमांचे 'खुलेआम' आणि 'स्पष्ट' उल्लंघन झाल्याचे गालिबाफ यांनी म्हटले. आणि अशा वेळी द्विपक्षीय शस्त्रसंधी किंवा वाटाघाटी या अतार्किक आहेत, असे त्यांनी X ( ट्विटर) वर म्हटले आहे.

मोहम्मद बगर गालिबाफ

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, मोहम्मद बगर गालिबाफ

या प्रस्तावात लेबनॉनचा देखील समावेश होता, पण व्हाईट हाऊसकडून आज हे नाकारण्यात आले.

दक्षिण फार्स प्रांतात ड्रोनचा प्रवेश झाल्याचे त्यांनी सांगितले. या बाबत आपल्याला काही माहीत नाही असे IDF ने बीबीसीला सांगितले.

इराणच्या युरेनियम समृद्धीकरणाच्या (enrichment) हक्काचा देखील प्रस्तावात समावेश करण्यात आला होता पण तो नाकारण्यात आल्याचे गालिबाफ यांनी म्हटलं.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की 'विविध स्रोतांकडून आम्हाला वाटाघाटीसाठी प्रस्ताव आले आहेत. त्यातले अनेक जण खोटे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, "अर्थपूर्ण अशा "मुद्द्यांचा" (POINTS) फक्त एकच गट आहे. आणि हे असे मुद्दे आहेत जे शस्त्रसंधीसाठी आधारभूत आहेत. याच मुद्द्यांवर आम्ही वाटाघाटी दरम्यान बंद दाराआड चर्चा करू"

उत्तर इस्रायलवर हल्ला केल्याचा हिजबुल्लाचा दावा

प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर रॉकेट हल्ले केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे इराण समर्थित कट्टरवादी गटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले.

लेबनॉनवर इस्रायल-अमेरिकेकडून होणारे आक्रमण पूर्णपणे थांबत नाही तोवर हल्ले केले जातील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. बुधवारी (7 एप्रिल) इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले त्यात किमान 182 जणांचा मृत्यू झाला.

शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनचा समावेश आहे की नाही हा देखील वादाचा मुद्दा बनलेला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)