You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण झाल्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
पुण्यात काँग्रेस प्रवक्ते प्रा. हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याचा आरोप पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात स्वारगेट पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला.
एका वृत्तवाहिनीवरील चर्चेनंतर हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर तुषार दामगुडे आणि त्यांच्यासाथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करताना हनुमंत पवारांनी आरोप केलाय की त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली.
मात्र तुषार दामगुडेंनी म्हटलं आहे की यापूर्वीही एका कार्यक्रमात पवार यांनी आपल्याला शिवीगाळ केली होती, आणि 23 फेब्रुवारीलाही चर्चेच्या कार्यक्रमानंतर शिवीगाळ केली आणि धमकावलं होतं, ज्यानंतर हा प्रकार घडला.
या प्रकरणात हनुमंत पवार यांच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर दामगुडेंकडे असलेलं पिस्तूल काढून घेत सर्वांना सोडून देण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितलं.
या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सपकाळ म्हणाले की (देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने या मर्द मावळ्यांच्या महाराष्ट्रात गुंड मवाल्यांचं राज्य फोफावू पाहतंय. या महाराष्ट्र नासवणाऱ्या औलादींना अभय देण्याचे काम गृहमंत्री फडणवीसांनी करू नये, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही.)
दरम्यान घटनेनुसार कारवाई केली असून, यापुढे दामगुडेंकडचं पिस्तुलाचं लायसन्स रद्द करण्याचा विचार करत आहोत, असंही उपायुक्त मोहितेंनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
कोण आहेत तुषार दामगुडे?
तुषार दामगुडे हे पुण्यात उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. 2017-18च्या भीमा कोरेगाव प्रकरणाच्या आधी झालेल्या एल्गार परिषद आणि त्यानंतर घडलेल्या दंगली प्रकरणातील ते एक तक्रारदार आहेत.
नुकत्याच मुंबईत झालेल्या काला घोडा फेस्टिव्हलमध्ये प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या व्याख्यानाला विरोध करणाऱ्यांपैकी ते एक होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)