राजा रवी वर्मांच्या 'यशोदा आणि कृष्ण' चित्राची 167 कोटी रुपयांना विक्री; काय खास आहे या चित्रात?

  • वाचन वेळ: 4 मिनिटे

भारताचे महान चित्रकार राजा रवी वर्मां यांची अजरामर कलाकृती मानली जाणाऱ्या 'यशोदा आणि कृष्ण' या चित्रानं नवा विक्रम रचला आहे. भारतीय कलेला वाढती मागणीही त्यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दिल्लीत सॅफ्रनआर्ट या संस्थेनं 1 एप्रिल 2026 रोजी आयोजित केलेल्या लिलावात हे चित्र तब्बल 167.2 कोटी रुपयांना विकलं गेलं.

लिलावात विकलं गेलेलं हे आजवरचं सर्वात महागडं भारतीय चित्र ठरलं आहे. याआधी हा विक्रम एम. एफ. हुसेन यांच्या 'अनटायटल्ड – ग्राम यात्रा' या चित्राच्या नावावर होता, ज्याला गेल्या वर्षी तब्बल 119 कोटी रुपये (13.8 दशलक्ष डॉलर्स) किंमत मिळाली होती.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

आता 'यशोदा आणि कृष्ण' हे चित्र पुण्यातील 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे संस्थापक सायरस पूनावाला यांनी खरेदी केल्याची माहिती सफ्रॉनआर्टनं प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

"राष्ट्रीय ठेवा असलेली ही कलाकृती वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी पाहण्यास उपलब्ध व्हावी, यासाठी मी पुढाकार घेईन," असे पूनावाला यांनी म्हटल्याचं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

भारताच्या पुरातन वस्तू कायद्याअंतर्गत राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचा समावेश राष्ट्रीय कला ठेवा म्हणून केला जातो. त्यामुळे त्यांची चित्रं देशाबाहेर निर्यात करता येत नाहीत आणि केवळ भारतीय खरेदीदारच ती विकत घेऊ शकतात.

'यशोदा आणि कृष्ण' का आहे खास?

राजा रवी वर्मा यांचा जन्म 1848 साली त्रावणकोर म्हणजे आजच्या केरळमधील किलमानूर गावात झाला होता.

भारतात आधुनिक चित्रकलेचा पाया घालणारे चित्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. रवी वर्मा यांनी चित्रांत युरोपियन तंत्र आणि भारतीय परंपरा यांचा संगम घडवून आणला.

त्यांनी केलेले हिंदू पुराणकथा आणि महाकाव्यांमधील प्रसंगांचे वास्तववादी चित्रण भारतभर प्रसिद्ध आहे. एवढे की त्यांनी काढलेल्या देवदेवतांच्या चित्रांच्या छापील प्रती अनेक भारतीय घरांमध्ये देव्हाऱ्यात ठेवलेल्या आढळतात.

बुधवारी विकलं गेलेलं 'यशोदा आणि कृष्ण' हे चित्र 35 बाय 28.25 इंच (89 बाय 72 सेमी) आकाराचं आहे. कॅनव्हासवर तेलरंगात साकारालेलं हे चित्र 1890 च्या दशकातील आहे. हा तो काळ होता, जेव्हा राजा रवी वर्मांच्या कारकि‍र्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर होते.

या चित्रात लहानगा कृष्ण आणि त्याची पालनकर्ती आई यशोदा रेखाटले आहेत. यशोदा गाईचं दूध काढते आहे, आणि शेजारी कृष्ण हातात पेला घेऊन उभा आहे.

कृष्णाच्या डोळ्यांत खोडकर भाव आहेत, तर यशोदाच्या चेहऱ्यावर मातृसुलभ माया दिसते. दोघांनी परिधान केलेले दागिने साधे असले तरी अतिशय बारकाईने रेखाटलेले आहेत.

"रेशमी वस्त्रांची पोत, दागिन्यांची झळाळी, त्वचेची कोमलता आणि गायीची शांत स्थिरता यामुळे हे दृश्य भक्तिभावपूर्ण आणि जिव्हाळ्याचे वाटते," असे या चित्राचे वर्णन बंगळुरूस्थित रवी वर्मा हेरिटेज फाउंडेशननं एका पोस्टमध्ये केले आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'यशोदा आणि कृष्ण' या चित्राची तुलना अनेकदा युरोपीय कलेतील 'माता आणि बालक' (मॅडोना आणि ख्राईस्ट) या सार्वत्रिक विषयाशी केली जाते.

आई आणि बाळामधले भावविश्व आजवर जगभरात अनेकदा रेखाटले गेले आहे.

भारतच नाही, तर दक्षिण आशियाभर कृष्ण आणि यशोदा जोडीने शतकानुशतके कलाकारांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्यावर भक्तिगीते रचली गेली आहेत, मंदिरातील शिल्पे तसेच स्थानिक चित्रपरंपरांमधूनही त्यांचं चित्रण झालं आहे.

पण कला इतिहासकारांच्या मते, रवी वर्मांनी रेखाटलेलं चित्र या आधीच्या सर्व चित्रांपेक्षा वेगळं होतं. कारण त्यात यशोदा आणि कृष्णाला दैवी रुपात नाही, तर नैसर्गिकरित्या मानवी रुपात साकारले आहे.

"देवाची प्रतिकं असणारी प्रतिमा ही आदर आणि भीती निर्माण करते, प्रेम आणि जिव्हाळा नाही. पण रवी वर्मांनी कृष्ण प्रेक्षकांमधील अंतर कमी केले," असे कलाकार ए. रामचंद्रन यांनी 'आयकॉनिक मास्टरपीसेस ऑफ इंडियन मॉडर्न आर्ट,एडिशन 03' मध्ये लिहिले आहे.

देवांचे हे मानवी रूपांकन हेच रवी वर्मांच्या चित्रांना आणखी जीवंत बनवते.

म्हणूनच रवी वर्मा यांच्या चित्रांच्या प्रिंटेड प्रती आणि ओलिओग्राफ सहज उपलब्ध असतानाही त्यांची मूळ चित्रं आजही कलाकार, कला रसिक आणि संग्राहकांना भुरळ घालतात.

भारतीय कलाकृतींना वाढती किंमत

अलीकडच्या काळात दक्षिण आशियाई कलेला, विशेषतः भारतीय कलाकृतींना जागतिक स्तरावर विक्रमी किंमती मिळताना दिसत आहेत.

विशेषतः ऐतिहासिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या चित्रांसाठी संग्राहक अधिक किंमत मोजण्यास तयार होत आहेत.

बीबीसीशी बोलताना डीएजी (पूर्वीची दिल्ली आर्ट गॅलरी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आशीष आनंद सांगतात, "भारतीय कलेबाबतच्या दृष्टिकोनात स्पष्ट बदल दिसून येतो आहे"

"बाजारपेठ परिपक्व होते आहे आणि मापदंड उंचावत आहेत, तसतसे संग्राहक या कलाकृतींचं सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्य ओळखू लागले आहेत."

पण या सगळ्यात मूळ चित्रातली गुणवत्ता महत्त्वाची असल्याचंही ते नमूद करतात.

भारतीय गुंतवणूकदार आता कलेवर पैसा खर्च करण्यासाठी तयार आहेत. तसंच भारतातील कला संग्राहकांमध्ये आणि भारतीय वंशाच्या लोकांमध्येही भारतीय कलेविषयी जागरुकता वाढते आहे.

तसंच आंतरराष्ट्रीय संग्रहालये व संस्थांनीही अलीकडच्या काळात भारतीय कलाकृतींचं पुनर्मुल्यांकन केलं आहे.

या कलाकृतींना इतकी किंमत मिळण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे ही चित्रं दुर्मिळ आहेत.

रवी वर्मा, अमृता शेर-गिल यांच्यापासून ते वसुदेव गायतोंडेपर्यंत अनेक कलाकारांच्या उत्कृष्ट कलाकृती एक तर सार्वजनिक संग्रहात आहेत किंवा त्या लिलावासाठी क्वचितच उपलब्ध होतात.

या पार्श्वभूमीवर 'यशोदा आणि कृष्ण' या चित्राच्या विक्रीकडे एका नवी सुरुवात म्हणूनही पाहिले जात आहे, असे आशीष आनंद सांगतात.

"या जागतिक विक्रमाचा परिणाम संपूर्ण भारतीय कला बाजारपेठेत उमटेल आणि भारतीय कलेला केवळ सौंदर्यात्मक किंवा वैयक्तिक आनंदापुरते न पाहता, एक गंभीर आर्थिक संपत्ती म्हणूनही पाहिले जाईल," असं ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)