'एक संस्कृती आज रात्री पूर्णपणे नामशेष होईल', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला उद्देशून थेट इशारा

फोटो स्रोत, EPA/Shutterstock

    • Author, बर्न्ड डिब्शमॅन ज्युनियर आणि टॉम बेटमॅन
    • Role, व्हाईट हाऊसमधून
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सरळ इशारा देत नवी घोषणा केली आहे. मंगळवारी रात्री एक संस्कृती पूर्णपणे नष्ट होणार आहे, असं ते म्हणाले आहेत.

इराणने आपल्याशी (तडजोडीचा) करार करावा यासाठी त्यांनी वॉशिंग्टनच्या वेळेनुसार रात्री आठ पर्यंतची मुदत दिली आहे अर्थात इराणने अद्याप अशा कराराबद्दल सहमती दर्शवलेली नाही.

याच दरम्यान ट्रम्प यांमी ट्रुथ सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. 'मंगळवारी रात्री एक संस्कृती पूर्णपणे संपेल', असं ते म्हणाले.

ट्रुथ सोशलवर ते लिहितात, "एक संस्कृती पूर्णपणे आज रात्री नामशेष होईल. ती परत कधी येणार नाही. असं व्हावं अशी माझी इच्छा नाहिये पण कदाचित असं होऊ शकेल."

"अर्थात आता सत्ता पूर्णपणे बदलली गेली आहे. तिथं आता जास्त समजुतदार आणि कमी कट्टरतावादी लोक सत्तेत आले तर काहीतरी मोठं घडेल आणि चांगलं घडेल. कोणाला माहिती काय होईल ते..."

"आज रात्री समजेल. हा जगाच्या इतिहासाच्या दीर्घ आणि जटिल अशा क्षणांपैकी एक आहे."

"47 वर्षांचा दबाव, भ्रष्टाचार आणि हत्यांचं सत्र आता अखेर संपेल. देव इराणच्या महान लोकांवर कृपा करो."

खार्ग बेटावर हल्ले

दरम्यान, त्यांचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी बुडापेस्टमधील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आता "चर्चेसाठी पुढे येण्याची जबाबदारी इराणची आहे"; अन्यथा "इराणमधील आर्थिक परिस्थिती अत्यंत, अत्यंत वाईट होईल".

इतरत्र, अमेरिकेने इराणच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या खार्ग बेटावर लष्करी लक्ष्य साधून रात्री हल्ले केल्याचे बीबीसीच्या अमेरिकेतील भागीदार सीबीएस न्यूजने वृत्त दिले आहे.

या बेटावर एक मोठे तेल टर्मिनल आहे. मात्र, नाव न सांगणाऱ्या एका अधिकाऱ्याने सीबीएसला सांगितले की तेलविषयक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आलेले नाही.

दरम्यान, इराणच्या मुख्य भूमीत एका रेल्वे पुलावर झालेल्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे आणि रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. यापूर्वी इस्रायली लष्कराने इराणमधील लोकांना मंगळवारी रेल्वेने प्रवास करू नये, कारण त्यामुळे 'तुमचे प्राण धोक्यात येतील', असा इशारा दिला होता.

याशिवाय, इराणची राजधानी तेहरानमध्येही आणखी स्फोट झाल्याचे वृत्त स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या विविध माध्यमांनी दिले आहे.

ट्रम्प आधी काय म्हणाले होते?

इराणला एकाच रात्री नष्ट केलं जाऊ शकतं, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

ट्रम्प म्हणाले, जर इराण दिलेल्या मुदतीपूर्वी अमेरिकेसोबत करार करण्यास अपयशी ठरला, तर कारवाई उद्या (7 एप्रिल) रात्रीही होऊ शकते.

ट्रम्प यांच्या करारानुसार, इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवावी लागेल. या मार्गावरून जगातील सुमारे 20 टक्के तेलाची वाहतूक होते. हा निर्णय घेण्यासाठी दिलेली मुदत मंगळवारी वॉशिंग्टन डीसी वेळेनुसार रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 5.30 वाजता) संपणार आहे.

व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणचे सध्याचे नेते 'प्रामाणिक'पणे चर्चा करत आहेत. परंतु काय निकाल लागेल हे अद्याप स्पष्ट नाही.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

याचदरम्यान, इराणने तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्याऐवजी त्यांनी संघर्ष कायमस्वरुपी संपवण्याचा आणि निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे.

या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॉन केन आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथही उपस्थित होते.

मागील आठवड्यात अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी दक्षिण इराणमध्ये पाडलेल्या एफ-15 विमानातील दोन क्रू सदस्यांची यशस्वीरीत्या सुटका केली होती.

रेस्क्यू मोहिमेचं कौतुक आणि इराणला धमकी

ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेचा मोठा भाग बचाव मोहिमेवरच केंद्रित होता. त्यांनी या मोहिमेला 'धाडसी मिशन' म्हटलं.

पण त्याचवेळी त्यांनी पुन्हा इशाराही दिला की, मंगळवारपर्यंत होर्मुज मार्ग खुला केला नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर हल्ला करू शकते.

त्यांनी सोमवारी (6 एप्रिल) सांगितलं की, "संपूर्ण देश एका रात्रीत संपवता येऊ शकतो, आणि ती रात्र कदाचित उद्याची असू शकते."

अंतिम मुदत संपल्यानंतर इराणला 'स्टोन एज'मध्ये (पाषाण युगात) परत पाठवलं जाईल, असं ट्रम्प यांनी पुढे म्हटलं.

"मग त्यांच्याकडे एकही पूल शिल्लक राहणार नाही, एकही वीज प्रकल्प उरणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

इराणने याआधी अमेरिकेच्या मागण्या नाकारल्या असल्या, तरी ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली की, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये अनेक इराणी नेते मारले गेले. तरीही इराण 'चांगल्या हेतूने चर्चा करत आहे'.

फोटो स्रोत, Kyle Mazza/Anadolu via Getty Image

फोटो कॅप्शन, या पत्रकार परिषदेला डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर संरक्षण मंत्री पीट हेगसेथही उपस्थित होते.

युद्धविरामाशिवाय कोणत्याही चर्चेवर ठोस प्रगती होऊ शकणार नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितलं की, इराणच्या अधिकाऱ्यांपर्यंत संदेश पोहोचवणं आणि तिथून उत्तर मिळवण्यात अडचणी येत आहेत, कारण तिथली दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे.

अधिकाऱ्याने सांगितलं की, "इराणपर्यंत संदेश पोहोचवून नियोजित वेळेत उत्तर मिळणं शक्य नाही. उत्तर यायला साधारणपणे एक दिवस लागत आहे."

दरम्यान, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढील योजना काय आहे, याबद्दल ट्रम्प यांनी फारशी माहिती दिली नाही. ते फक्त इतकंच म्हणाले की, त्यांच्याकडे 'सर्वोत्तम प्लॅन' आहे, पण ते माध्यमांसमोर उघड करणार नाहीत.

कायदेशीर तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, इराणच्या पायाभूत सुविधांवर जाणीवपूर्वक आणि सतत हल्ले केले, तर ते युद्ध गुन्हे मानले जाऊ शकतात.

फोटो स्रोत, Daniel Heuer/Bloomberg via Getty Images

फोटो कॅप्शन, पत्रकार परिषदेच्या आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील इस्टर कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

ओबामा सरकारच्या काळातील एका माजी कायदेशीर सल्लागाराने (नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल) सीबीएसला (बीबीसीचे अमेरिकेतील सहकारी) सांगितलं की, "सर्व वीज प्रकल्प नष्ट करणं आणि लोकांवर दबाव आणून सरकारला चर्चेसाठी भाग पाडणं हे पूर्णपणे अवैध आहे."

पत्रकार परिषदेपूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, युद्ध गुन्ह्याबद्दल त्यांना कोणतीही चिंता नाही. त्यांनी पुढे जोर देऊन सांगितलं की, "इराणचे सरकार पाडण्याचा माझा हेतू नसला तरीही इराणचे लोक स्वातंत्र्यासाठी त्रास सहन करण्यास तयार असतील."

राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या प्रमुख मित्रदेशांवरही (ज्यात नाटो, ब्रिटन आणि दक्षिण कोरियाचाही समावेश आहे) टीका केली. संघर्षाच्या काळात त्यांनी अमेरिकेला मदत केली नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

"नाटोवरचा हा डाग कधीही पुसला जाणार नाही," असं ते म्हणाले.

"अमेरिकेला ब्रिटनची गरज नाही", असंही त्यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या ताज्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर अमेरिकेच्या दलांनी इराणमध्ये 13 हजारांपेक्षा जास्त हल्ले केले आहेत.

इराणचेही प्रत्युत्तर

ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर देताना इराणने 'तात्पुरता युद्धविराम' नाकारला आहे आणि संघर्ष 'कायमचा संपवण्याची' मागणी केली.

फोटो स्रोत, TELEGRAM/MFAIRA

फोटो कॅप्शन, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई यांनी सध्या अमेरिकेसोबत कोणताही करार होण्याची शक्यता फेटाळली आहे.

इराणने आपल्या अधिकृत आयआरएनए या वृत्तसंस्थेत प्रसिद्ध केलेल्या प्रस्तावात आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

  • त्यांच्यावर लावण्यात आलेले निर्बंध हटवावेत
  • होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी त्यांना मदत केली जावी.
  • हल्ल्यांमुळे नुकसान झालेल्या नागरी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली जावी.

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आजूबाजूच्या भागांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू ठेवले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.