दरोड्याबद्दल पत्नीचा व्हीडिओ झाला व्हायरल, नंतर पतीच्या हत्येच्या आरोपात तिलाच अटक, नेमके काय घडले?

फोटो स्रोत, ANI

    • Author, समीर खान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, इंदूरहून
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात 7 एप्रिलला मिरची व्यापारी देवकरण पुरोहित यांच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांची पत्नी प्रियंका पुरोहितला अटक करण्यात आली आहे.

धारचे पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी दावा केला आहे की आरोपी प्रियंका पुरोहितनं, कमलेश पुरोहित या तिच्या कथित प्रियकराच्या साथीनं हा कट रचला.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी प्रियंकाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये ती बेशुद्धावस्थेत एका घटनेची माहिती देते आहे.

मीडियासमोर दिलेल्या वक्तव्यात प्रियंका म्हणाली होती की हल्लेखोर तिच्या खोलीत शिरले होते. दागिने लुटल्यानंतर तिच्या पतीवर हल्ला करून ते फरार झाले.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

धार जिल्ह्यातील राजोदा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोंदी खेडा या गावातील हे प्रकरण आहे. धारच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की ही घटना या दांपत्याच्या घरीच घडली होती.

पोलिसांनी 6 तासांमध्येच या प्रकरणाचा उलगडा केला, असा दावा त्यांनी केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिरची व्यापारी देवकरण पुरोहित आणि त्यांची पत्नी प्रियंका पुरोहित यांच्यावर त्यांच्याच खोलीत काही दरोडेखोरांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना 7 एप्रिलला मिळाली होती.

त्यावेळी देवकरण पुरोहित यांच्या आई दुसऱ्या खोलीत झोपलेल्या होत्या.

देवकरण पुरोहित यांची पत्नी प्रियंकानं पोलिसांना सांगितलं की त्यांच्या झोपलेल्या पतीवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला.

नंतर तिला ओलीस ठेवून मारहाण करण्यात आली. तिचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला.

फोटो स्रोत, SAMIR KHAN

हल्लेखोर तिचे मौल्यवान दागिने घेऊन निघून गेले. नंतर तिनं प्रयत्न करून शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर तिनं पाहिलं की तिचा पती जखमी अवस्थेत पडलेला होता. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असं प्रियंकाचं म्हणणं होतं.

"या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले. तपासातून समोर आलं की ही लूटमार आणि दरोड्याची घटना नसून एक गुन्हेगारी कट होता.

या प्रकरणात मृताच्या पत्नीनं तिचा प्रियकर कमलेश पुरोहितबरोबर मिळून एका व्यक्तीला 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. हे सर्व नियोजनबद्धपणे करण्यात आलं. घराचा दरवाजा मुद्दाम उघडा ठेवण्यात आला होता," असं पोलीस अधीक्षक मयंक अवस्थी म्हणाले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र प्रताप सिंह फरार झाला आहे. तर मृताची पत्नी आणि कमलेश पुरोहितला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

पोलिसांनी दावा केला आहे की चौकशीच्या वेळेस मृताच्या पत्नीनं तिचा गुन्हा कबूल केला आहे.

मृताची पत्नी काय म्हणाली, आईनं काय सांगितलं?

या घटनेनंतर प्रियंकानं मीडियासमोर तिच्या घरी दिलेल्या वक्तव्यात दावा केला होता की हल्लेखोरांनी तिचं तोंड बांधलं होतं. त्यांनी तिला धमकावलं होतं की सर्व दागदागिने दे, नाहीतर ते त्यांना मारून टाकतील.

"मी त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वकाही घेऊन जा, मात्र आम्हाला सोडा. त्यानंतर माझे हातपाय बांधण्यात आले आणि मला मारहाण करण्यात आली. मी सगळं सामान बाहेर काढून त्यांना दिलं. ते म्हणाले की जर तू ओरडलीस तर तुझ्या पतीला मारून टाकू," असं प्रियंका म्हणाली.

किती हल्लेखोर होते, असं विचारलं असता, तिनं सांगितलं की तिला दोनजण दिसले आणि इकडे तिकडे इतरही लोक होते.

फोटो स्रोत, SAMIR KHAN

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पतीवर हल्ला होण्याबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली, "मला बंद करून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची हत्या कधी झाली, ते मला माहिती नाही."

या दांपत्याचं लग्न 2015 मध्ये पारंपारिक पद्धतीनं झालं होतं. त्यावेळेस आरोपी प्रियंका अल्पवयीन होती. नंतर तिचा गौना झाला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

(गौना ही उत्तर भारतातील एक प्रचलित प्रथा आहे. त्यात वधू लग्नानंतर पहिल्यांदा औपचारिकपणे तिच्या सासरी जाते आणि संसाराची सुरुवात करते.)

त्यानंतर 2021 पासून हे दोघे एकत्र राहत होते. मात्र नंतर काही वाद झाल्यानंतर प्रियंका तिच्या कुटुंबीयांबरोबर राहू लागली होती. गेल्या एक आठवड्यापासूनच हे दांपत्य सोबत राहत होतं.

मृताच्या आई खेची बाई म्हणाल्या की ज्या रात्री घटना घडली, त्या रात्री दोन-अडीच वाजेच्या सुमारास एका शेजाऱ्याचा फोन आला की भाभी (मृताची पत्नी) का ओरडते आहे. त्यानंतर आम्हाला या घटनेबद्दल माहिती झालं.

"मी खोलीत आल्यावर पाहिलं की माझा मुलगा पलंगावर पडलेला होता. मी मागच्या बाजूला गेली तर सुनेचं तोंड बांधलेलं होतं. ती काहीतरी सांगत होती. मी मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मला दिसलं की पलंगावर सर्वत्र रक्त पसरलेलं होतं," असं त्या म्हणाल्या.

खेची बाई यांनी त्यांच्या सुनेवर हत्येचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की तिला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.