'मी जिवंत आहे', ढिगाऱ्याखालून आवाज आला अन् सुरू झालं बचावकार्य, 16 दिवसांनी जिवंत बाहेर कसा आला?

फोटो स्रोत, QASIM

फोटो कॅप्शन, अब्दुल वहाब यांना 17व्या दिवशी जिवंत वाचवण्यात आलं.
    • Author, अजिज़ुल्लाह खान
    • Role, बीबीसी उर्दू, पेशावर
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

एखादा मोठा अपघात होतो, तेव्हा तिथे अडकलेल्या व्यक्तींबद्दल त्यांच्या कुटुंबाला प्रचंड काळजी असते, त्याचं बरं-वाईट झालं की काय अशा विचारांनी ते त्रस्त असतात.

पण आपण ज्या व्यक्तीची काळजी करत आहोत, ती व्यक्ती जिवंत असल्याचं जेव्हा अचानक कळतं, तेव्हा त्या कुटुंबाचा आनंद किती मोठा असेल याची कल्पनाही करता येणार नाही.

पण अब्दुल वहाबच्या कुटुंबीयांसाठी ही बातमी केवळ आनंदाची नव्हती, तर ती खूपच आश्चर्यकारक अशी होती. त्यावर विश्वास ठेवणं त्यांना खूप कठीण जात होतं.

कारण एका भीषण अपघातानंतर त्यांनी अब्दुल वहाबला मृत समजून त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले होते. परंतु, 16 दिवसांनी समजलं की अब्दुल वहाब तर जिवंत आहे.

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मर्दान जिल्ह्यातील रुस्तम भागात मार्बलच्या खाणी आहेत.

31 मार्च रोजी एका मार्बलच्या खाणीत काम करणाऱ्या मजुरांवर अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्या खाणीत 12 मजूर होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी अवस्थेत सापडले होते.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

खाणीत काम करणारा एक व्यक्ती अजून सापडला नव्हता, त्यामुळे त्याचा शोध सुरूच ठेवण्यात आला होता.

इतके दिवस शोध घेतल्यानंतर ढिगाऱ्यातून एक व्यक्ती जिवंत सापडला. तो जिवंत व्यक्ती अब्दुल वहाब होता. पण त्याच्या कुटुंबाने तर आधीच एका मृतदेहाला अब्दुल वहाब समजून त्याचं दफनही केलं होतं.

अब्दुल वहाब यांच्या कुटुंबातील एक सदस्य फजल मन्नान यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही एका मृतदेहाला अब्दुल वहाबचा मृतदेह समजून आधीच दफन केले होते. कुटुंबातील लोकांनी कपडे पाहून तो त्याचाच असावा असं सांगितलं. परंतु, मृतदेह खूपच छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यामुळे नीट ओळख पटत नव्हती."

फजल मन्नान यांनी सांगितलं की, 16 एप्रिलच्या सकाळी अब्दुल वहाबचा भाऊ नासिरने फोन केला.

"तो रडत होता आणि रडत रडत त्याने अब्दुल वहाब जिवंत असल्याचं सांगितलं. हे सांगताना नासिर पुन्हा जोरजोरात रडू लागला."

फजल मन्नान यांनी सांगितलं की, "15 एप्रिलच्या रात्री मी अब्दुल वहाब यांच्या आई-वडिलांसोबत बसलो होतो. त्या वेळी त्याची आई खूप दुःखी होती.

कारण साधारण दीड वर्षांपूर्वी त्यांचा दुसरा मुलगा सौदी अरेबियातून परत आला होता आणि तो आजारी होता. नंतर त्या आजारपणातच त्याचा मृत्यू झाला होता."

आता 16 दिवसांनी मार्बलच्या खाणीतून अब्दुल वहाब जिवंत आणि सुरक्षित सापडल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि परिसरातील लोक खूप खूश झाले आहेत.

अब्दुल वहाब कसा सापडला?

फजल मन्नान यांनी सांगितलं की, शोधकार्यासाठी त्या भागातील लोक जात होते. त्यात खाणीत काम करणारे मजूरही होते आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही शोधकार्यात मदत करत होते.

नजीबुल्लाह स्वतः या मार्बल खाणीत काम करतात. त्यांनी सांगितलं की, "16 ते 17 दिवसांपासून आमच्या एका सहकाऱ्याचा शोध सुरू होता. त्यासाठी खाणींमध्ये मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर केला जात होता."

ते म्हणतात, "आम्ही अब्दुल वहाबची नमाज-ए-जनाजाही अदा केली होती, पण गुरुवारी (16 एप्रिल) तो आम्हाला मार्बल खाणीत जिवंत सापडला."

फोटो स्रोत, QASIM

फोटो कॅप्शन, अब्दुल वहाबवर आता मर्दान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नजीबुल्लाह यांनी सांगितलं की, "आम्ही खाणीजवळील ढिगारा हटवत होतो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही खाणीच्या आतल्या बोगद्यापर्यंत पोहोचू, अशी आम्हाला आशा होती. परंतु, खोदकाम सुरू असताना दुपारच्या आधीच आतून 'मी जिवंत आहे, मला बाहेर काढा' असा आवाज आला."

"आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आणि लगेच हाताने ढिगारा हटवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात आम्हाला वहाब जिवंत सापडला."

कपड्यांमुळे मृतदेहाबाबत गैरसमज

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद कासिम म्हणाले की, ते 31 मार्चपासून त्या खाणीजवळ होते आणि मजुरांचा शोध घेण्याच्या कामात सहभागी झाले होते.

त्यांनी म्हटलं की,"जेव्हा मृतदेह बाहेर काढले जात होते, तेव्हा अब्दुल वहाबच्या कुटुंबाने एका मृतदेहाचे कपडे पाहून तो अब्दुल वहाबच असू शकतो असं सांगितलं."

उपायुक्तांनी ओळख पटवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. दफन केलेला तो व्यक्ती कोण होता, याची चौकशी केली जाईल, असं या प्रकरणाबाबत रेस्क्यू 1122 चे मर्दानचे प्रवक्ते अब्बास खान यांनी सांगितलं.

ओळख पटवण्याचं काम डीएनए चाचणीद्वारे करता येईल, असं ते म्हणाले. सध्या अब्दुल वहाबवर मर्दान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, असं कासिम यांनी सांगितलं.

गेल्या महिन्यात खाणकामासाठी आलेले मजूर आपली जागा आणि मशीन साफ करून बसून चहा पीत होते, त्याचवेळी डोंगराचा एक भाग त्यांच्या अंगावर कोसळला होता.

त्या वेळी मोहम्मद कासिम यांनी बीबीसीला सांगितलं की, हा अपघात मर्दान जिल्ह्यातील रुस्तम भागातील पलौढेरी नंग आबाद येथे झाला होता.

मोहम्मद कासिम यांनी सांगितलं की, काही दिवसांपासून त्या भागात पाऊस सुरू होता आणि तोपर्यंत खाणकाम (मायनिंग) अधिकृतपणे सुरूही झालं नव्हतं.

खैबर पख्तूनख्वामध्ये मोठ्या प्रमाणात मार्बल आणि इतर खनिजांच्या खाणी आहेत. मर्दान जिल्ह्यातही रुस्तम, काटलंग आणि बाइजई भागात मार्बलच्या खाणी आहेत. या प्रांतातील खाणीत सुमारे 75 हजार मजूर काम करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)