तुम्हाला झोप लागत नाही? मग कॅम्पिंगच्या या पर्यायाची माहिती घ्या

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, बेका वॉर्नर
    • Role, बीबीसी फ्युचर
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

मऊ गादी नाही पण फक्त पक्षांचा किलबिलाट…

घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात झोपल्यामुळे तुमची झोप कशी सुधारू शकते? आणि विशेष म्हणजे ट्रिपवरून घरी आल्यावरही तुम्हाला त्याचे फायदे मिळत राहतात.

मी काही खूप छान झोप घेणाऱ्यांपैकी नाही. माझी झोप तशी सावधच असते. रात्रीच्या शांततेत डोळ्यांवरची पट्टी सारखी नीट करत बसणं आणि मोबाईलवर टिक टॉक पाहण्याचा मोह आवरत वेळ घालवणं..

असं असूनही मी काही आव्हानात्मक ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न केलाच. कधी स्कॉटलंडच्या बर्फाळ वादळात तंबू ठोकला तर कधी ॲमेझॉनच्या मुसळधार पावसात. कधी स्वीडनच्या ओल्याचिंब बेटांवर तर कधी ग्लॅस्टनबरीच्या चिखलात.

विचित्र आवाज आणि ती कडक जमीन यामुळे झोप लागणं तसं कठीणच होतं. त्यामुळेच की काय, माझा तो तंबू आता कपाटाच्या एका कोपऱ्यात धूळ खात पडला आहे.

पण नव्या संशोधनानुसार, जर मला खरोखरच शांत आणि चांगली झोप हवी असेल तर मला पुन्हा एकदा त्याच कॅम्पिंगकडे वळावे लागेल.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

आपल्यापैकी बहुतांश लोक सूर्य मावळल्यानंतर खूप उशिरा झोपायला जातात. निसर्गाच्या चक्राशी जुळलेली ही विसंगती आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते.

मात्र, संशोधनातून एक रंजक बाब समोर आली आहे. बाहेर निसर्गाच्या सानिध्यात झोपल्यामुळे आपल्याला सूर्य आणि चंद्राच्या नैसर्गिक चक्राशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळते.

शास्त्रज्ञांच्या मते, केवळ एका वीकेंडला कॅम्पिंग केल्याने आपल्या शरीराचे 'सर्केडियन क्लॉक' म्हणजेच निसर्गाच्या वेळापत्रकानुसार आपल्या शरीराचे जे अंतर्गत वेळापत्रक चालते ते पुन्हा सेट होऊ शकते. यामुळे आपले शरीर बाहेरील नैसर्गिक जगाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेते. याचा साधा अर्थ असा की, आपण थोड्या लवकर झोपायला लागतो. परिणामी उशिरा झोपण्यामुळे उद्भवणारे धोके जसे की हृदयविकार आणि नैराश्य टाळण्यास आपल्याला मोठी मदत होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलराडो बोल्डर येथील 'स्लीप अँड क्रोनोबायोलॉजी लॅबोरेटरी'चे संचालक केनेथ राइट यांनी 15 वर्षांपूर्वी एक रंजक प्रयोग हाती घेतला.

आपल्या शरीरातील या 'जैविक घड्याळाची' गुपिते उलगडण्यासाठी त्यांनी कॅम्पिंगचा आधार घेतला. कॅम्पिंगमुळे आपल्या झोपेवर नक्की काय परिणाम होतो आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्या शरीराची आंतरिक लय कशी बदलते याचा सखोल अभ्यास त्यांनी या संशोधनातून केला.

केनेथ राइट यांना नेमकं हेच जाणून घ्यायचं होतं की, आपण ज्या निसर्गाच्या कुशीत वाढलो त्याच्याशी आज आपलं नातं किती तुटलं आहे. निसर्गाचं चक्र आणि आपल्या शरीराचं झोपण्या-जागण्याचं चक्र आज एकमेकांपासून किती लांब गेलं आहे याचा शोध त्यांना घ्यायचा होता.

हे शोधण्यासाठी त्यांनी लोकांच्या एका लहान गटाला रॉकी माउंटनमध्ये एका आठवड्यासाठी 'समर कॅम्पिंग'ला नेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांना दिवस आणि रात्रीच्या नैसर्गिक चक्राचा अनुभव घेता येईल. याचाच अर्थ असा होता की तिथे टॉर्च किंवा फोन वापरण्यास मनाई होती आणि त्या लोकांना त्यांच्या रोजच्या दिवसाच्या तुलनेत 4 पट अधिक नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळाला.

राईट यांनी सहभागींच्या लाळेचे नमुने गोळा केले जेणेकरून त्यांच्या शरीरातील 'मेलाटोनिन' संप्रेरकाची पातळी मोजता येईल. जे रात्रीच्या वेळेचे एक जैविक सूचक आहे. हे नमुने सहलीच्या आधी आणि नंतर अशा दोन्ही वेळी रात्रीच्या वेळी घेतले गेले.

याचे निकाल असे दिसून आले की, कॅम्पिंग सहलीमुळे लोकांचे 'सर्केडियन क्लॉक' 2 तास मागे सरकले होते. राईट म्हणतात, "या अभ्यासातील एक मुख्य निष्कर्ष असा आहे की, जेव्हा आपण नैसर्गिक प्रकाश आणि अंधाराच्या चक्राच्या संपर्कात येतो तेव्हा आपली सर्केडियन रिदम (जैविक घड्याळ) लवकर सुरू होते. याचाच अर्थ असा की, आपल्या आधुनिक जगात आपण या नैसर्गिक चक्राच्या तुलनेत उशिरा चालत आहोत."

फोटो स्रोत, Getty Images

कॅम्पिंगला गेलेल्या लोकांच्या शरीरातील मेलाटोनिनची पातळी ते जागे होण्यापूर्वीच कमी झाली होती. याउलट जेव्हा ते घरी झोपायचे तेव्हा सकाळी उठल्यानंतरही बराच वेळ त्यांच्या शरीरातील मेलाटोनिनची पातळी वाढलेली असायची.

राईट म्हणतात, "आजच्या आधुनिक जगातील कृत्रिम प्रकाशामुळे (मोबाईल, टीव्हीचा उजेड) आपल्या शरीराचं घड्याळ इतकं विस्कळीत झालं आहे की, सकाळी उठल्यानंतरही आपला मेंदू आपल्याला 'अजून झोपायला हवं' असंच सांगत असतो. काही बाबतीत तर आपण उठल्यानंतरही आपलं शरीर पुढचे 2 तास झोपेच्याच अवस्थेत असतं.

नेथ राइट यांच्या मते, निसर्गाच्या कुशीत झोपल्यामुळे आपण फक्त पर्यावरणाशीच नाही तर आपल्या स्वतःच्या शरीराशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातो. आपल्या शरीराच्या चक्राला थोडं लवकरच्या वेळेवर सेट करणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

राईट पुढे सांगतात की, जर तुमचं झोपण्याचं वेळापत्रक किंवा शरीराचं घड्याळ उशिराचं असेल तर त्याचे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. याउलट जे लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात त्यांना आरोग्याच्या समस्या कमी जाणवतात. अशा लोकांमध्ये व्यसनाधीनता, नैराश्य, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका तुलनेने खूप कमी असतो."

रात्री लवकर झोपणे आणि कृत्रिम प्रकाशाचा (मोबाईल, टीव्हीचा उजेड) संपर्क कमी होण्याचे शरीरावर नक्की काय परिणाम होतात यावर अजूनही सखोल संशोधन सुरूच आहे. तरीही केनेथ राइट यांना विश्वास आहे की, बाहेर निसर्गाच्या सानिध्यात झोपल्यामुळे लोक सकाळी अधिक फ्रेश, उत्साही आणि सतर्क राहू शकतात.

थोडक्यात सांगायचे तर, नैसर्गिक वातावरणात घेतलेली झोप ही केवळ विश्रांती नसून ती शरीराला पुन्हा 'रिचार्ज' करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. म्हणूनच जर तुम्हाला सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर एकदा निसर्गाच्या कुशीत झोपून पाहायला हरकत नाही.

चांदण्यांच्या सावलीतली ती सुखद झोप

एला ह्युटन यांचा अनुभवही काहीसा असाच आहे. एला यांना केवळ गिर्यारोहण आणि कॅम्पिंगची आवड आहे असं नाही तर त्या युकेमधील 'लव्ह हर वाइल्ड' (Love Her Wild) या महिलांसाठी साहसी सहली आयोजित करणाऱ्या सामाजिक संस्थेत 'कम्युनिटी मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत.

निसर्गाच्या या चक्राबद्दल बोलताना एला सांगतात की, "निसर्गाच्या त्या लयीत जगण्याची मजा काही वेगळीच असते. सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने तुम्हाला जाग येते आणि हळूहळू सूर्याचा प्रकाश अंगावर पडतो... झोपेतून उठण्यासाठी यापेक्षा सुंदर पद्धत दुसरी कोणती असू शकते का?"

एला यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाची आणि शांत झोप अशा एका ट्रिपमध्ये झाली जिथे कृत्रिम प्रकाशाचा लवलेशही नव्हता. ना मोबाईल, ना टॉर्च. ऊब मिळवण्यासाठी होता तो फक्त शेकोटीचा आधार आणि लोकरीची ब्लँकेट्स. त्या दिवशी त्या नेहमीपेक्षा खूप लवकर झोपायला गेल्या.

अर्थात शेकोटी विझू नये म्हणून तिला मध्येच लाकडे घालण्यासाठी त्यांना रात्रीतून दोन-तीनदा उठावे लागले. पण तरीही दुसऱ्या दिवशीचा अनुभव काही वेगळाच होता.

एला सांगतात की, "रात्रीतून काहीवेळा जाग येऊनही दुसऱ्या दिवशी मला कमालीचं फ्रेश वाटत होतं. मला अजिबात थकवा जाणवत नव्हता. उलट मी स्वतःशी आणि निसर्गाशी अधिक जोडले गेल्याची जाणीव होत होती. मी नेहमीपेक्षा जास्त वेळ आणि शांत झोपले होते."

फोटो स्रोत, Getty Images

एला यांचा अनुभव केनेथ राइट यांच्या आणखी एका संशोधनाशी मिळताजुळता आहे. या प्रयोगासाठी राइट यांनी एका धाडसी गटाला निवडून चक्क कोलोराडोच्या कडाक्याच्या थंडीत कॅम्पिंगसाठी नेले होते. त्यांना असे आढळले की, घरात झोपण्यापेक्षा बाहेर थंडीत झोपल्यामुळे या लोकांना रात्रीतून काही वेळा जास्त जाग आली असली तरी एकूण झोपेचा विचार करता त्यांना घरापेक्षा दोन तास अधिक झोप मिळाली.

ट्रिपवरून परतल्यानंतर राइट यांनी या लोकांच्या 'बायोलॉजिकल नाईट'चे (म्हणजेच शरीरात मेलाटोनिन तयार होण्याच्या वेळेचे) मोजमाप केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, उन्हाळ्यात कॅम्पिंग करणाऱ्यांच्या तुलनेत हिवाळ्यात कॅम्पिंग करणाऱ्या लोकांची 'बायोलॉजिकल नाईट' अधिक लांब होती.

याचाच अर्थ असा की, निसर्गातील बदलांमुळे त्यांच्या शरीराला रात्रीचा काळ अधिक सखोलपणे अनुभवता आला ज्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या झोपेवर झाला.

राईट यांच्या मते, प्राण्यांच्या आयुष्यात मेलाटोनिन महत्त्वाची भूमिका बजावते. ऋतू बदलले की प्राण्यांच्या अंगावरील केसांचा रंग बदलणे, पुनरुत्पादन क्षमता आणि वजनात होणारी वाढ हे सर्व याच हार्मोनमुळे घडते. "आमच्या संशोधनातून हेच सिद्ध झाले आहे की, मानवही यापेक्षा वेगळा नाही. निसर्गातील प्रकाश आणि अंधाराच्या चक्रानुसार होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता आपल्या शरीरातही आहे," असे ते सांगतात.

कृत्रिम प्रकाश काढून टाकल्यामुळे केवळ शांत झोपच लागते असे नाही तर त्याचे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे आहेत. संशोधनातून असे समोर आले आहे की, रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाशाच्या अतिसंपर्कात राहिल्यामुळे रक्तदाब , हार्मोन्सचे संतुलन बिघडणे आणि नैराश्याची लक्षणे वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.

केवळ मानवावरच नाही तर इतर प्राण्यांवरही रात्रीच्या या कृत्रिम प्रकाशाचे दुष्परिणाम होतात. यामुळे उभयचर प्राणी , वटवाघळे, पक्षी, मासे आणि कीटक यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावरही वाईट परिणाम होत असल्याचे आढळले आहे.

त्यामुळेच थोडा जास्त वेळ काळोखात राहणं हे शरीरासाठी फायद्याचेच आहे. तरीही एला ह्युटन यांच्या मते, बाहेर उघड्यावर झोपण्याची सवय व्हायला थोडा वेळ लागू शकतो. त्या म्हणतात, "कॅम्पिंगच्या सुरुवातीच्या एक-दोन रात्री तुम्हाला निसर्गातील त्या विचित्र आवाजांची सतत जाणीव होत राहते ज्याची आपल्याला घरी सवय नसते. पहिल्या किंवा दुसऱ्या रात्री कदाचित माझी झोप थोडी कमी होते पण एकदा का मी बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेतलं की मग मात्र माझ्या झोपेत झपाट्याने सुधारणा होते."

निसर्गातील आवाज आणि शांत झोप

निसर्गातील ते विविध आवाज एकदा का सवयीचे झाले की तेच तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत करू शकतात. ब्रिटनमधील 'कॅम्पिंग अँड कॅराव्हॅनिंग क्लब'ने 1,000 कॅम्पर्सचे सर्वेक्षण केले. त्यात असे आढळले की, 56% लोकांनी अशा व्यक्तींना बाहेर झोपण्याचा सल्ला दिला आहे ज्यांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावते.

यातील दर चार पैकी एका व्यक्तीने सांगितले की, त्यांना घराच्या बेडपेक्षा निसर्गाच्या कुशीत जास्त चांगली झोप लागते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे निसर्गातून येणारे ध्वनी. पावसाच्या थेंबांचा टप-टप आवाज, पानांची सळसळ, कीटकांचा आवाज, समुद्राच्या लाटांचा खळखळाट आणि अगदी ढगांचा कडकडाटही या लोकांना शांत झोप लावण्यासाठी एखाद्या अंगाई सारखं काम करतं.

फोटो स्रोत, Getty Images

हे आवाज मनाला इतकी शांतता देतात की शरीर आपोआप विश्रांतीच्या अवस्थेत जाते आणि आपण गाढ झोपेत शिरतो.

कॅम्पिंग आणि कॅराव्हॅनिंग क्लबच्या मासिकाचे संपादक आणि स्वतः आयुष्यभर कॅम्पिंगचा आनंद घेणारे रॉब गॅन्ले आपला अनुभव सांगताना म्हणतात की, माझ्या अनुभवानुसार रात्रीच्या वेळी घुबडांचा आवाज आणि इकडे-तिकडे वावरणाऱ्या रात्रीच्या जीवांची ती आवाजातील हालचाल खरोखरच सुंदर वाटते. हे आवाज तुमच्या मनावर गारूड घालतात आणि तुम्हाला आपोआपच शांत झोप लागते."

असं असलं तरी सर्वेक्षणातील काही लोकांनी दिलेल्या उत्तराने गॅन्ले यांना आश्चर्याचा धक्काच बसला. काही लोकांच्या मते, ढगांचा कडकडाट त्यांना शांत झोप लागण्यासाठी मदत करतो.

गॅन्ले हसत आपला अनुभव सांगतात की, "मी स्वतः काही वेळा अशा हवामानात कॅम्पिंग केलं आहे जिथे वादळामुळे मध्यरात्री उठून आपला तंबू पुन्हा नीट ठोकावा लागला होता. अशा परिस्थितीत ढगांचा कडकडाट ऐकून कोणाला शांत झोप कशी लागू शकते याचं मला खरंच नवल वाटतं."

मला आठवतंय एकदा वाऱ्याचा वेग ताशी 64 किलोमीटर असताना मी एका तंबूत रात्र काढली होती जी अजिबातच सुखाची नव्हती. पण असं असलं तरी यूट्यूबवर 'थंडर स्लीप साऊंड्स' शोधल्यानंतर मिळणारे 41,000 निकाल हेच सांगतात की, वादळी हवामानाचा आवाज अनेकांसाठी खरोखरच झोपेचं औषध म्हणून काम करतो.

अनुभवी नसलेले पर्यटक आणि माझ्यासारखी सावध झोप असलेल्या लोकांसाठी बाहेरची झोप अधिक सुखद आणि सोयीस्कर बनवण्याचे काही मार्ग आहेत.

गॅन्ले एक मोलाचा सल्ला देतात की, कधीही झाडाखाली आपला तंबू ठोकू नका. कारण पाऊस पडताना झाडाच्या पानांवरून पडणारे मोठे आणि जड थेंब एखाद्या मशीनगनसारखे तुमच्या तंबूवर आदळत राहतात ज्यामुळे तुमची झोप उडू शकते.

फोटो स्रोत, Getty Images

त्याचबरोबर ते एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगतात की,

"काहीही करा पण जमिनीवर स्वतःच्या शरीराखाली एखादं चांगलं जाड चादर किंवा गादी नक्की ठेवा. कारण जेव्हा तुम्ही मध्यरात्री उठाल तेव्हा जमीन नेहमीच गार लागू शकते."

ज्या लोकांना पहिल्यांदाच कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी गॅन्ले एक महत्त्वाची माहिती देतात. कॅम्पिंग क्षेत्रात होणारा कचरा कमी करण्यासाठी आता अनेक कंपन्यांनी सेकंड हँड म्हणजेच वापरलेले तंबू विकण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी तुम्ही ग्रंथालयासारख्या ठिकाणांहूनही तंबू उसने घेऊ शकता.

गॅन्ले म्हणतात की, "कॅम्पिंगसारख्या छंदाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे खर्च करावे लागतीलच असं नाही. हा छंद जोपासणं वाटतं तितकं महागडं नक्कीच नाही."

प्रयोगशाळेत नसताना राईट स्वतःदेखील एका अनुभवी कॅम्पर्सप्रमाणे दुर्गम भागात कॅम्पिंगचा आनंद घेतात. ते म्हणतात, "जेव्हा मी घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात असतो तेव्हा माझं शरीर लगेचच निसर्गाच्या त्या चक्राशी जुळवून घेतं.

मात्र, प्रत्येकालाच रोज बाहेर जाऊन झोपणं शक्य नसतं. यावर उपाय म्हणून राईट सांगतात की, आपण आपल्या घरातच निसर्गासारखं वातावरण निर्माण करू शकतो जेणेकरून आपले दिवस अधिक प्रकाशमान आणि रात्री अधिक काळोख्या होतील.

दिवसाच्या वेळेनुसार बल्बच्या प्रकाशाचा रंग बदलणे हा यावर एक प्रभावी उपाय आहे. दिवसा निळसर छटा असलेला प्रकाश आणि संध्याकाळी लालसर छटा असलेले बल्ब वापरल्याने शरीराला नैसर्गिक प्रकाशाचा आभास होतो. राईट यांच्या मते, "अशा प्रकारे आपण आपल्या आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेत निसर्गाच्या चक्राशी अधिक जवळ जाऊ शकतो."

कदाचित आता माझ्या धूळ खात पडलेल्या कॅम्पिंगच्या साहित्याला बाहेर काढण्याची वेळ आली आहे; किंवा निदान झोपण्याच्या 2 तास आधी घरातील दिवे कमी करण्याची तरी. यामुळे माझ्या झोपेत खरंच सुधारणा होईल का, हे बघायला मला आवडेल.".

पण रात्रीच्या वेळी बल्ब, स्क्रीन आणि गॅजेट्सच्या झगमगाटातून माझ्या मेंदूला थोडा विसावा मिळेल यात शंका नाही. आणि जर सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने मला जाग आली तर त्याहून उत्तम दुसरं काहीच नसेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)