आर्टेमिस 2 मोहीम : चंद्राच्या दिशेनी झेपावलेलं ओरायन यान कसं आहे, कसा राहील हा प्रवास?

फोटो स्रोत, Reuters

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अपोलो मोहिमांनंतर माणूस तब्बल 50 वर्षांनी चंद्राकडे निघालाय. इतकंच नाही, तर आर्टेमिस 2 द्वारे माणूस आजवरचा पृथ्वीपासूनचा सर्वात दूरचा प्रवास करतोय.

पृथ्वीवरून झेप, चंद्राला वळसा आणि पृथ्वीवर स्प्लॅशडाऊन असा असणारा आर्टेमिस 2 चा प्रवास समजून घेऊ.

सगळ्यात आधी, या आर्टेमिस-2 मोहिमेसाठी काय वापरलं जातंय ते पाहूया. तर ओरायन हे नासाचं नवीन अंतराळयान आहे.

हे यान आर्टेमिस मोहीमेतल्या अंतराळवीरांना चंद्रापर्यंत घेऊन जाईल आणि पृथ्वीवर परत आणेल.

ओरायन यानाला लाँच करणाऱ्या रॉकेटचं नाव SLS - Space Launch System.

हे एकच रॉकेट आहे जे एकाचवेळी ओरायन, अंतराळवीर आणि कार्गो अशा तीनही गोष्टी चंद्रावर एका लाँचमध्ये नेऊ शकतं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

10 दिवसांच्या या मिशनमध्ये चार अंतराळवीर आहेत. नासाचे कमांडर रीड वाईजमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, इंजिनियर क्रिस्टिना कॉच आणि कॅनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सन.

आर्टेमिस-2 ची स्पेस लाँच सिस्टम (SLS) रॉकेट 322 फूट उंच आहे आणि त्याच्या प्रॉपेलंट टँक्समध्ये 7,00,000 गॅलन लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन भरला जातो.

लिफ्टऑफच्या 12 सेकंद आधी हायड्रोजन बर्न ऑफ इग्नाइटर्स सुरू होतात. त्यानंतर 6 सेकंदांनी रॉकेटमधली चार RS-25 इंजिन्स सुरू होतात. काऊंटडाऊन शून्यावर आला की यान आकाशात झेपावतं.

या रॉकेटच्या बाजूला दिसणारे रॉकेट बूस्टर्स जवळपास 17 मजली उंच आहेत. यान झेपावताना लागणारी 75% शक्ती या रॉकेट बूस्टर्सकडून येते.

उड्डाणाच्या काही क्षण आधी नासाच्या अंतराळवीरांनी संदेश पाठवले

पायलट व्हिक्टर ग्लोव्हर यांनी म्हटलं, "आम्ही आमच्या कुटुंबांसाठी हे करतोय."

मिशन स्पेशलिस्ट क्रिस्टिना कॉच म्हणाल्या, "आम्ही आमच्या सहकाऱ्यांसाठी हे करतोय."

तर मिशन स्पेशलिस्ट जेरेमी हॅन्सन म्हणाले, "आम्ही सगळ्या मानवतेसाठी या मोहिमेवर जातोय."

आर्टेमिस-2 च्या लाँचच्या नियोजित वेळेच्या काही तासभर आधी आलेल्या दोन तांत्रिक कारणांमुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. पण लाँच अबोर्ट सिस्टीमच्या बॅटरीचं तापमान नेहमीपेक्षा जास्त आढळलं असलं, तरी त्याचा लाँचवर काही परिणाम होणार नसल्याचं नासाकडून स्पष्ट करण्यात आलं.

भारतीय वेळेनुसार 2 एप्रिलच्या पहाटे 03:55 वाजता T-10 म्हणजे लाँचच्या आधीच्या 10 मिनिटांची उलट मोजणी - काऊंटडाऊन सुरू करण्यात आला. यातला T म्हणजे लाँचचा क्षण.

फोटो स्रोत, NASA/PA Wire

कसं आहे ओरायन यान?

या ओरायन यानाला चार सौर पंख आहेत. संपूर्ण प्रवासात याच्याद्वारे यानाला ऊर्जा मिळेल आणि बॅटरीज चार्ज होतील.

लाँचनंतर 90 मिनिटांनी ओरायन पृथ्वीच्या वरच्या कक्षेत स्थिरावेल. पृथ्वीच्या जवळ असतानाच हे अंतराळवीर पुढचे 24 तास महत्त्वाच्या सिस्टीम्स तपासतील.

यानंतर ओरायन पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. तो साधारण 4 दिवसांचा असेल. इंग्रजी 8 आकड्याप्रमाणे दिसणारा हा आर्टेमिस मोहिमेचा मार्ग पृथ्वीपासून 2,30,000 मैलांचा (370,149.12 किमी) आहे.

या सगळ्या प्रवासात अंतराळवीर यानातल्या प्रणाली, रेडिएशनचे परिणाम, अपातकालीन प्रक्रिया या सगळ्याचा अभ्यास करतील.

आर्टेमिस 2 चे अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे तब्बल 4,600 मैल - 7,402.982 किमी प्रवास करतील आणि 50 वर्षांनी चंद्राची पलीकडची बाजू पाहतील.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

अपोलो 13 मोहिमेच्या तुलनेत ही आर्टेमिस मोहीम 13,400 किलोमीटर आणखी पुढे जाईल. भविष्यातल्या चांद्रमोहिमांसाठी त्यांची निरीक्षणं अतिशय महत्त्वाची असतील.

ओरायन यान चंद्राच्या पलीकडच्या बाजूला असताना कदाचित ग्राऊंड कंट्रोलसोबतचा त्यांचा संपर्क तुटेल, असा अंदाज आहे. चंद्राचं गुरुत्वाकर्षण वापरत हे यान चंद्राच्या मागच्या बाजूकडून ... पुढे येईल — याला स्लिंगशॉट मेथड म्हणतात. म्हणजे गोफण फिरवून खडा भिरकावण्यासारखं. भारताच्या चांद्रयान मोहिमेने पृथ्वीकडून चंद्राकडे जाण्यासाठी स्लिंगशॉट पद्धत वापरली होती. ओरायन चंद्राकडून पृथ्वीकडे परतण्यासाठीही तीच पद्धत वापरेल.

आणि मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून ओरायनचा परतीचा प्रवास होईल. याला free return trajectory म्हटलं जातं. अंतराळ मोहिमेदरम्यान इंधनाचा योग्य वापर करता यावा, म्हणून हे केलं जातं. शिवाय काही कारणांनी इंजिन्स बंद पडली, तरी यानाला पृथ्वीवर परतता येतं.

पृथ्वीवर परतण्याचा टप्पा आणि स्प्लॅश-डाऊन

पृथ्वीच्या वातावरणात परतणं - हा या मोहिमेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा. वातावरणात शिरण्यापूर्वी ओरायनचं क्रू मॉड्यूल सर्व्हिस मॉड्यूलपासून विलग होईल.

12 थ्रस्टर्स ओरायनला दिशा देतील. ताशी 40,233.6 किलोमीटरच्या वेगाने ओरायन आणि क्रू पृथ्वीच्या वातावरणात घुसेल. यानावर असणारी हिट शिल्ड क्रूचं घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या साधारणपणे 2760 डिग्री सेल्शियसच्या भीषण उष्णतेपासून संरक्षण करेल. म्हणजे किती गरम माहित्येय....सूर्याचा पृष्ठभाग जितका गरम आहे - त्याच्या निम्मं तापमान.

11 पॅराशूट्स टप्याटप्याने वापरून ओरायनचा वेग कमी केला जाईल आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरल्याच्या साधारण 16 मिनिटांनी ओरायन यान कॅलिफोर्नियाजवळ पॅसिफिक समुद्रात कोसळेल.

त्यानंतर अमेरिकेचं नौदल, हवाई दल आणि नासाच्या तज्ज्ञांचा समावेश असणारी रिकव्हरी टीम कामाला लागेल आणि आर्टेमिसच्या क्रूला ओरायन यानातून बाहेर काढेल.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, शक्तिशाली SLS रॉकेटच्या मदतीने आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या दिशेने झेप घेतली;

माणसाला तब्बल 50 वर्षांनी चंद्राच्या दिशेने घेऊन जाणारी आर्टेमिस 2 मोहीम भारतीय वेळेनुसार 2 एप्रिलच्या पहाटे 04: 05 वाजता नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशात झेपावली.

आर्टेमिस 2 मोहीम चंद्रावर उतरणार नाही. ही मोहीम चंद्राला वळसा घालून पृथ्वीवर परत येईल. भविष्यात चंद्रावर उतरणाऱ्या मोहिमांसाठी ही आर्टेमिस 2 मोहीम पाया आहे.

आर्टेमिस 2 चं उद्दिष्ट आणि पूर्वीच्या चांद्रमोहिमा

अंतराळात सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर हे अंतराळवीर या ओरायन यानाची कामगिरी कशी आहे, याची चाचणी घेतील. कारण मुळात हेच या आर्टेमिस 2 मोहीमेचं उद्दिष्टं आहे.

चंद्रावर उतरणाऱ्या मोहीमची आखणी करण्यासाठीची सगळी चाचपणी, यंत्रणाची - यानाची तपासणी ही मोहीम करेल. म्हणजे पुढच्या आर्टेमिस 3 मोहिमेचा पाया भक्कम करणारी ही मोहीम असेल.

याचसाठी पृथ्वीच्या कक्षेमध्ये ओरायन स्पेस कॅप्सूल manually उडवून, म्हणजे अंतराळवीरांकडे ताबा देऊन उडवलं जाईल आणि भविष्यात चंद्रावर उतरण्यासाठीची प्रॅक्टिस केली जाईल.

फोटो स्रोत, NASA

त्यानंतर हे यान चंद्रापासून हजारो किलोमीटर दूर जाऊन ओरायन यानाचा लाईफ-सपोर्ट कसा आहे, Propulsion म्हणजे पुढे जाण्याची प्रक्रिया, यानाची एकूणच शक्ती, Navigation म्हणजे दिशादर्शक यंत्रणा या सगळ्यांची तपासणी केली जाईल.

याकाळात आर्टेमिसचा क्रू वैद्यकीय संशोधनासाठीचा डेटा अंतराळातून पाठवत राहील. कारण हे चारजण मोहीमेदरम्यान लहानशा जागेत असतील.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या तुलनेत त्यांना जास्त किरणोत्सर्गाला सामोरं जावं लागेल. आणि पृथ्वीवर परताना अंतराळातून पृथ्वीच्या कक्षेत, वातावरणात शिरणं आणि नंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर पॅसिफिक महासागरात कोसण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास असेल.

यापूर्वीच्या चांद्रमोहिमा

1960 आणि 70 च्या दशकात नासाने अपोलो मोहीम राबवली. यातल्या 6 मोहीमा चंद्रावर उतरल्या. सगळ्यात आधी 1969 साली अपोलो 11 आणि मग अपोलो 12 चंद्रावर उतरलं. पण अपोलो 13 यान भरकटल्यानंतर त्यांनी चंद्रावर लँडिंग रद्द केलं. अपोलो 14, 15,16,17 या मोहिमादेखील चंद्रावर उतरल्या होत्या.

या अपोलो मोहीमांद्वारे आजवर 24 अंतराळवीर चांद्रमोहिमेवर गेलेयत. त्यापैकी 12 जण चंद्रावर उतरले - चंद्राच्या पृष्ठभागावर चालून आले.

गंमत म्हणजे या चांद्रमोहिमांमागे अंतराळ संशोधनापेक्षा सोव्हिएत युनियनवर पृथ्वीवरचं भू-राजकीय वर्चस्व, तांत्रिक आघाडी मिळवणं हा हेतू मोठा होता.

हा हेतू साध्य झाल्यावर या मोहिमांसाठीचा राजकीय उत्साह मावळला, लोकांचाही रस कमी झाला आणि चांद्र मोहिमांना मिळणारा निधीही कमी झाला. 1972 च्या अपोलो 17 नंतर मात्र नासाने चंद्रावर माणसांचा सहभाग असणारी मोहीम राबवली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.