अमेरिकेचं एक असं विमान जे अण्वस्त्र हल्ल्यातही सुरक्षित राहून सलग 7 दिवस न थांबता उड्डाण करू शकतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'डूम्सडे' विमान शक्तिशाली क्षमतांनी सुसज्ज आहे. त्यामुळे आण्विक हल्ला झाला तरी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी (ईएम वेव्ह) असतानाही ते सुरक्षितपणे उडू शकतं.
वाचन वेळ: 4 मिनिटे

'प्रलयाचे विमान' (प्लेन ऑफ डूम्सडे) म्हणून ओळखलं जाणारं हे विमान प्रत्यक्षात बोइंग ई-4बी आहे. हे विमान अत्यंत आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार करण्यात आलं आहे.

आण्विक हल्ला किंवा मोठी आपत्ती आली, तरी हे विमान हवेतूनच कमांड सेंटर म्हणून काम करू शकेल, अशा पद्धतीनेच हे डिझाइन केलं होतं.

शीतयुद्धाच्या काळात म्हणजेच 1974 मध्ये हे विमान अमेरिकन सैन्यात सामील करण्यात आलं होतं.

अमेरिकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास आणि जमिनीवरील नियंत्रण (कमांड) केंद्रांमध्ये व्यत्यय निर्माण झाल्यास एअर कमांड सेंटर म्हणून काम करणे हा या विमानाचा उद्देश होता.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

संकट किंवा अत्यंत आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, संरक्षणमंत्री आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ या विमानाचा वापर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सरकारच्या इतर विभागांशी संपर्क साधण्यासाठी करतात.

या विमानाला 'डूम्सडे प्लेन' असंही म्हणतात. हे विमान सलग 7 दिवस थांबता न उडू शकते. दीर्घकाळ आकाशात राहून हे लष्करी कारवायांना मदत करण्यास सक्षम आहे.

शक्तिशाली लष्करी विमानांचा ताफा

अमेरिकेकडे 4 ई-4बी विमानांचा ताफा आहे. ही विमाने वर्षभर नियमितपणे उड्डाण करत असतात.

अमेरिकेचे हवाईदल सध्या 5 बोइंग 747-8 विमानांची पुनर्बांधणी आणि परिवर्तनावर काम करत आहे. त्यांचा वापर पुढे ई-4बी विमानांच्या जागी करता येईल.

ही विमाने पूर्वी दक्षिण कोरियाच्या हवाई दलाकडे होती.

या विमानांमध्ये रेडिएशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सपासून संरक्षणासाठी विशेष शील्डिंग (कवच) असेल. तसेच त्यात आधुनिक कम्युनिकेशन अँटेना, कॉम्प्युटर, मिशन सिस्टिम, अत्याधुनिक इंटीरियर डिझाइन आणि हवेतच इंधन भरण्याची सुविधा असेल.

या 5 विमानांची एकूण किंमत सुमारे 13 अब्ज डॉलर (सुमारे सव्वा लाख कोटी रुपये) इतकी असेल.

डूम्सडे प्लेनमध्ये आण्विक आपत्ती आणि इतर मोठ्या संकटांच्या वेळीही सुरक्षितपणे उडता येईल अशा खास सुविधा आहेत.

या सुविधा साधारण विमानांमध्ये सहसा उपलब्ध नसतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हे विमान सलग 7 दिवस उड्डाण करू शकतं.

ही विमाने क्षेपणास्त्रे (मिसाइल) डागू शकतात. तसेच त्यांच्याकडे अण्वस्त्र हल्ले, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक परिणामांना तोंड देण्याची क्षमता आहे.

हे विमान अत्याधुनिक कम्युनिकेशन सुविधांनी सुसज्ज आहे. यात 67 अँटेना आहेत, त्यामुळे कोणत्याही ठिकाणाहून संपर्क साधता येऊ शकतो.

हे विमान 4 इंजिनवर चालतं. याला स्वेप्ट विंग्स आहेत आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमताही यात आहे.

अमेरिकेने 1974 च्या शेवटी सेवेत असलेल्या बोइंग ई-4ए विमान अपग्रेड करून त्यांना ई-4बी बनवले. अमेरिकेच्या वायुसेनेला पहिले बी-सीरिज विमान 1980 मध्ये मिळाले होते.

अमेरिकेच्या वायुसेनेनुसार, डूम्सडे प्लेनचा वापर अमेरिकेच्या कमांडर्सना प्रभावी नियंत्रण (कंट्रोल) आणि कम्युनिकेशनसाठी एक मजबूत कमांड सेंटर देण्यासाठी केला जातो.

या माध्यमातून राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी किंवा जमिनीवरील कमांड केंद्रे नष्ट झाली, तरी अमेरिकन सैन्याला सूचना दिल्या जाऊ शकतात.

हे विमान वादळ आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर वेगवेगळ्या भागांतील कमांड केंद्रांशी संपर्क साधते.

या विमानाची खास वैशिष्ट्ये काय आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संकटाच्या काळात डूम्सडे विमानामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, संरक्षणमंत्री आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ प्रवास करतात. (प्रतिकात्मक फोटो)
  • डूम्सडे प्लेन न थांबता सलग 7 दिवस उड्डाण करू शकते.
  • उड्डाणादरम्यान विमानातील कर्मचारी आणि प्रवासी जगात कुठेही जमिनीवर संपर्क साधू शकतात.
  • याची ताकद अमेरिकन हवाई संरक्षण दलाच्या ताफ्यापेक्षाही जास्त आहे.
  • हे विमान अशा पद्धतीने डिझाइन केलं आहे की, ते अण्वस्त्र हल्ला, उल्कापात आणि इतर कोणत्याही हवाई धोक्यापासून सुरक्षित राहू शकते.
  • याचे इंजिन 24 तास, वर्षाचे 365 दिवस सतत कार्यरत असते. म्हणजेच हे कधीही थांबत नाही आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लगेच उड्डाणासाठी तयार असते.
  • या विमानाची किंमत 223 मिलियन अमेरिकन डॉलर आहे.
  • अमेरिकेशिवाय रशिया असा एकमेव देश आहे, ज्यांच्याकडे अशा पद्धतीचे एक विमान आहे.
  • रेडिएशनपासून (किरणोत्सर्ग) संरक्षण असल्यामुळे, हे विमान आक्रमणानंतर काही मिनिटांतच उड्डाण करू शकते.
  • या विमानात 3 मजले आहेत आणि त्यात अत्याधुनिक उपकरणे बसवलेली आहेत. त्यामुळे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रभावांना अधिक प्रतिकार करू शकते.
  • विमानाचा कमांडर पायलट आतल्या स्क्रीनच्या मदतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अटर्नी जनरल यांची ठिकाणं पाहू शकतो.
  • खोल समुद्रात लपलेल्या पाणबुड्यांनाही याच्या माध्यमातून लष्करी आदेश मिळू शकतात.
  • 'डूम्सडे प्लेन' हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नियमित प्रवासासाठी वापरत असलेल्या 'एअर फोर्स वन' विमानापेक्षा वेगळे आहे.

डूम्सडे प्लेनचा प्रवास

या प्रलयकारी विमानांचा ताफा नीट काम करतोय का आणि त्याची लष्करी क्षमता योग्य आहे का, हे तपासण्यासाठी ही विमाने वेळोवेळी उड्डाण करत असतात.

या विमानाच्या खास क्षमता आणि वैशिष्ट्यांमुळे मीडियाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांच्यामध्ये आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांच्यात शाब्दिक वाद वाढल्यावर या विमानाची चर्चा जास्त झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (फोटोत) यांच्यासोबत त्यांचं शाब्दिक युद्ध रंगलं होतं. (प्रतिकात्मक फोटो)

दोन्ही नेत्यांमधील 'शाब्दिक युद्ध' जानेवारी 2018 मध्ये अधिक तीव्र झाले. त्यावेळी कोरियाच्या या सर्वोच्च नेत्याने "अमेरिकेने युद्ध सुरू करू नये म्हणून मी आण्विक बटन नेहमी आपल्या टेबलवर ठेवत असतो," असं म्हटलं होतं.

गेल्या वर्षी जूनमध्ये हे मोठे विमान वॉशिंग्टनकडे जाताना दिसले होते. यावर्षी जानेवारीतही ते पुन्हा दिसले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)