जयराज आणि फेनिक्स: तामिळनाडूमध्ये पोलीस कोठडीत बापलेकांच्या मृत्यूचा तपास CBI करणार - मुख्यमंत्री पलानीसामी

फोटो कॅप्शन, जयराज आणि फेनिक्स
वाचन वेळ: 4 मिनिटे

पोलीस कोठडीत बापलेकांचा मृत्यू झाल्याच्या एका घटनेवरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईडापडी के. पलानीसामी यांनी या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करेल, असं म्हटलं आहे.

पलानीसामी म्हणाले, "पोलीस कोठडीत असताना बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्यात येईल.

"मद्रास उच्च न्यायालयातून यासंबंधीची परवानगी मिळाल्यानंतर CBI कडे हे प्रकरण सोपवण्यात येईल," असंही पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

जयराज हे तुतिकोरीन म्हणजेच थुतुकुडी जिल्ह्यातल्या सथांकुलममध्ये राहतात. इथेच त्यांचा मुलगा फेनिक्स APJ मोबाईल्स नावाचं एक दुकान चालवत होते.

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हा पी. जयराज (58) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स (38) यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात दुकान उघडं ठेवल्याचा आरोप होता.

19 जूनला फेनिक्स यांचा दुकान बंद करण्यावरून स्थानिक पोलिसांशी वाद झाला.

यामुळे मग सथांकुलम पोलिसांनी फेनिक्स आणि त्यांच्या वडिलांविरोधात FIR दाखल केली. यानंतर जयराज यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. त्यानंतर आपल्या वडिलांपाठोपाठ फेनिक्स हेसुद्धा पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा त्यांनाही कोठडीत डांबण्यात आलं. 21 जून रोजी त्यांना कोविळपट्टीच्या कारागृहात पाठवण्यात आलं.

या दोघांनाही संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या दोघांनाही पोलिसांनी कोठडीत अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

यो दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, त्यानंतर ते रस्त्यावर पडले. यामुळे मग त्यांना अंतर्गत दुखापत झाली, असं FIRमध्ये म्हटलं आहे.

फेनिक्स यांचा सोमवारी रात्री तर जयराज यांचा मंगळवारी सकाळी कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला.

बीबीसी तामिळनं जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं, "फेनिक्स यांच्या छातीत दुखू लागल्यानं 22 जून रोजी ते खाली कोसळले. यानंतर त्यांना कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं. पण 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

"त्यानंतर काही तासातच जयराज यांना बरं न वाटल्यानं दवाखान्यात भरती करण्यात आलं. त्यांचा मंगळवारी सकाळी 5 वाजता मृत्यू झाला."

या घटनेनंतर फेनिक्स आणि जयराज यांच्या नातेवाईकांनी संथाकुलममध्ये निदर्शन केलं. या भागातील दुकानंही बंद ठेवण्यात आली.

"फेनिक्स आणि जयराज यांना जमिनीवर पडल्यामुळे जखमी झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. अशाप्रकारे एखादा व्यक्ती स्वत: ला जखमी करू शकतो का? तसंच सथांकुलमजवळ अनेक कारागृह असतानाही त्या दोघांना 100 किमी अंतरावरील कोविळपट्टी कारागृहात का पाठवण्यात आलं? " असा प्रश्न नातेवाईक चार्ल्स यांनी विचारला आहे.

मृत्यूनंतर काय घडलं?

या दोघांना मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर लोकांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी राज्यातील विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे तर व्यापारी संघानं पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. तसंच स्थानिक न्यायालयानंही हा विषय सुनावणीसाठी घेतला आहे.

या दोघांना अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे, आणि मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मात्र सोशल मीडियावर या घटनेचे पडसाद उमटले आहेत. देशभरातून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू झाल्यानंतर अनेक भारतीयांनी त्यावर मतप्रदर्शन केलं, पण भारतात दोन जणांचा पोलीस कोठडीच मृत्यू झाला असतानाही लोक त्यावर बोलत का नाहीत, असा प्रश्न अनेकांनी सुरुवातीला विचारला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा काही आठवड्यांपूर्वी पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत मोठी निदर्शनं सुरू झाली होती. अनेक भारतीयांनी या निदर्शनाला पाठिंबा दिला होता.

पण भारतातील घटना ही तामिळनाडूतल्या थुत्तुकुडी या छोट्याशा शहरात झाल्यानं सुरुवातीला अनेकांचं लक्ष याकडे गेलं नाही. काही वेळानंतर ही घटना राष्ट्रीय माध्यमांपर्यंत पोहोचली.

"दक्षिण भारतात झालेल्या घटनेविषयी लोक चर्चा करत नाहीत, कारण या घटना इंग्रजीमध्ये नसतात, याची मला खूप चीड येते," अशा आशयाचा एका महिलेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर ती या दोघांच्या कथित छळाविषयी या व्हीडिओत सविस्तर सांगते. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला आहे.

या दोघांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर खूनाचा गुन्हा दाखल न करता त्याची फक्त बदली करण्यात आल्यामुळे अनेकांना संताप व्यक्त केला आहे.

आता तर राहुल गांधी आणि शिखर धवन यांच्यासारख्या प्रसिद्ध लोकांनी ट्वीट करत घटनेत बळी पडलेल्या दोघांसाठी न्यायाची मागणी केली आहे.

फोटो स्रोत, Tweet

फोटो कॅप्शन, क्रिकेटपटू शिखर धवन यांचं ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

राहुल गांधी यांनी म्हटलं, "पोलिसांनी केलेला छळ हा भयंकर गुन्हा आहे. आपले संरक्षकच आपला आवाज दाबतात, असं हे संकट आहे. सरकारनं लवकरात लवकर पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. "

भारतातील पोलीस अत्याचाराच्या घटना

आएशा परेरा, बीबीसी इंडिया ऑनलाईन संपादक

याबद्दलची आकडेवारी चकित करणारी आहे. कोठडीअंतर्गत छळाच्या विरोधात असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या संघानं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, भारतात 2019मध्ये पोलीस कोठडीत 1,731 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ दरदिवशी जवळपास 5 जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे.

या अहवालात छळाच्या काही पद्धतींचं वर्णनही करण्यात आलं आहे. कबुलीजबाब मिळवण्यासाठी संशयितांचा छळ करणं आणि मारहाण करणं हे भारतातील पोलीस पद्धतीचा एक भाग बनलं आहे. यात गुंतलेल्या पोलिसांना क्वचितच शिक्षा दिली जाते. बहुतेक वेळा त्यांची दुसर्‍या जिल्ह्यात किंवा राज्यात बदली केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images

खूप कमी वेळा त्यांना जबाबदार धरलं जातं. यामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशानं न्यायपालिकेनं अनेकदा भाष्य केलं आहे.

गेल्या वर्षी एकदा निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटलं की, "पीडित व्यक्तीचा कोठडीत मृत्यू झाला किंवा सत्य उघडकीस आलं तरीसुद्धा जबाबदार धरलं जाणार नाही, हे त्यांना माहिती होतं."

2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला, की प्रत्येक राज्यानं पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करावी, जेणेकरून पोलीस अधिकाऱ्यानं गैरवर्तन केल्यास नागरिक त्याची तक्रार करू शकतात. असं असलं तरी बहुतेक राज्यात हा आदेश पाळला गेला नाही.

या प्रणालीत बदल घडण्यासाठी दीर्घकालीन हस्पक्षेप आवश्यक आहे, असं कार्यकर्ते म्हणतात.

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)