'बायको गरोदर आणि डोहाळे नवऱ्याला', असं का होतं, संशोधन काय सांगतं?
फोटो स्रोत, Getty Images
- Author, सॅन्डी ओंग
- वाचन वेळ: 8 मिनिटे
गरोदरपणाचा त्रास फक्त आईलाच होतो असं तुम्हाला वाटतं का?
जवळपास 50 टक्के पुरुषांना आपल्या जोडीदाराच्या गरोदरपणात स्वतःलाच गरोदर असल्यासारखी लक्षणं जाणवतात. याला शास्त्रज्ञ 'कुव्हेड सिंड्रोम' म्हणतात.
मळमळणे, प्रचंड थकवा, हात सुन्न होणे, हात आणि छातीची त्वचा संवेदनशील होणे किंवा सतत अस्वस्थ वाटणे ही अशी लक्षणं गरोदरपणात स्त्रियांना जाणवतात.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही लक्षणं आता गरोदर नसलेल्या जोडीदारांमध्ये आणि होणाऱ्या वडिलांमध्येही दिसून येत आहेत. यामागे एक दुर्लक्षित स्थिती कारणीभूत आहे, जिला 'कुव्हेड सिंड्रोम' म्हणतात.
ओहायो, अमेरिकेतील क्लीव्हलँड क्लिनिकच्या प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कॅथरीन कॅपोनेरो म्हणतात, "याचं सर्वात चांगलं वर्णन करायचं तर याला 'सिम्पॅथेटिक प्रेग्नन्सी' (Sympathetic Pregnancy) म्हणजेच 'सहानुभूतीपूर्ण गर्भधारणा' म्हणता येईल.
मी अशा काही केसेस पाहिल्या आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा जोडीदार स्वतः गरोदर नसूनही, आपल्या जोडीदाराच्या गरोदरपणामुळे तशीच लक्षणं स्वतःमध्ये अनुभवतो, तेव्हा त्याला हे म्हटलं जातं."
आता नवनवीन संशोधनातून असं समोर येत आहे की, हा 'सिंड्रोम' (Couvade Syndrome) आपण आधी समजत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांमध्ये दिसून येतो.
या विचित्र लक्षणांमुळे आता काही शास्त्रज्ञ असा विचार करत आहेत की, मूल होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम फक्त आईवरच नाही, तर दोन्ही पालकांवर कसा होतो, याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलण्याची गरज आहे.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. कॅपोनेरो म्हणतात की, हा प्रकार खूप व्यापक आहे, पण अजूनही त्याचं वर्गीकरण झालेलं नाही. याचा परिणाम होणाऱ्या वडिलांवर, समलिंगी जोडीदारावर आणि अगदी होणाऱ्या आजीवरही होऊ शकतो. म्हणजे गरोदर व्यक्तीसोबत राहत असणाऱ्या आणि त्यांची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तींवर याचा परिणाम होऊ शकतो.
याची लक्षणं खूप वेगवेगळी असतात. जसं की, मळमळणं, थकवा येणं, कंबरदुखी, दात दुखणं, अचानक स्वभाव बदलणं, विचित्र पदार्थ खाण्याची इच्छा होणं आणि वजन वाढणं.
ही लक्षणं अगदी खऱ्या गरोदरपणासारखीच दिसतात. पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत लक्षणं सर्वात जास्त जाणवतात आणि प्रसुती झाल्यावर आपोआप नाहिशी होतात.
कुव्हेड (Couvade) हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतींनी समोर येत असल्याने आणि त्याची नेमकी व्याख्या अजूनही अस्पष्ट असल्याने हा नक्की किती लोकांमध्ये आढळतो याची आकडेवारी खूप वेगवेगळी आहे.
उदाहरणार्थ एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील 52 टक्के बाबांनी कबूल केलं की, त्यांच्या पत्नीच्या गरोदरपणात त्यांनाही काही लक्षणं जाणवली.
जॉर्डनमध्ये हेच प्रमाण 59 टक्के आणि थायलंडमध्ये 61 टक्के इतकं आहे. पोलंड आणि चीनमध्ये तर हे प्रमाण खूपच जास्त आहे. तिथे दर 10 पैकी 7 जणांना ही लक्षणं जाणवतात.
मात्र, स्वीडनमध्ये फक्त 20 टक्के आणि रशियात 35 टक्के बाबांमध्ये हे लक्षण दिसून आलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील ओहायो येथील मानसशास्त्राचे प्राध्यापक रोनाल्ड लेव्हंट म्हणतात, "हा प्रकार खूप लोकांमध्ये दिसत असूनही, 'कुव्हेड सिंड्रोम'ला अजूनही अधिकृतपणे कोणताही वैद्यकीय आजार मानलं जात नाही."
जगभरातील डॉक्टरांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस' (ICD) किंवा अमेरिकन 'डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल' (DSM) या दोन्ही अधिकृत पुस्तकांमध्ये कुव्हेडचा साधा उल्लेखही नाही.
इतकंच काय, तर वैद्यकीय शिक्षणाच्या पुस्तकांमध्येही याबद्दल फारशी माहिती दिलेली नसते.
डॉ. कॅपोनेरो म्हणतात, "मला वाटतं, डॉक्टर म्हणून आमच्याकडे जी माहितीची साधनं उपलब्ध असतात त्यातही या विषयाबद्दल फारशी माहिती दिलेली नसते."
आजही या 'सिंड्रोम'बद्दल (Couvade Syndrome) फारसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे यातल्या अनेक गोष्टी अजूनही एक रहस्यच आहेत.
अमेरिकेतील सॅन डिएगो येथील 'सेंटर फॉर मेन्स एक्सलन्स'चे संचालक आणि मानसशास्त्रज्ञ डॅनियल सिंगले म्हणतात, "हे शरीर आणि मनाच्या पातळीवर नक्की कसं घडतं हे अजून नीट समजलेलं नाही. कदाचित मनातील भावनांना वाट करून देण्याचा किंवा भावनिक प्रश्नांशी लढा देण्याचा हा एक मार्ग असू शकतो."
"यामागे काही मज्जासंस्थेशी संबंधित कारणंही असू शकतात. पण याबद्दल कोणाला अजून ठोस माहिती आहे, असं मला वाटत नाही."
बहुतेक संशोधकांचे मते, कुव्हेड सिंड्रोम हा 'मल्टिफॅक्टोरियल' (Multifactorial) आहे म्हणजेच तो एकाच कारणाने होत नाही.
प्राध्यापक लेव्हंट म्हणतात की, यात शारीरिक बदल आणि मानसिक घटक या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. सोप्या भाषेत सांगायचं, तर हे शरीर आणि मन या दोन्हींच्या एकत्रित प्रभावामुळे घडतं.
कुव्हेड शब्दाचा उगम
कुव्हेड (Couvade) हा शब्द फ्रेंच क्रियापद 'कौव्हर'वरून (Couver) आला आहे. त्याचा अर्थ 'अंडी उबवणे' किंवा 'उब देणे' असा आहे.
एडवर्ड बर्नेट टायलर या इंग्रजी मानववंशशास्त्रज्ञांनी 1865 मध्ये पहिल्यांदा हा शब्द प्रसिद्ध केला. त्यांनी बास्क (Basque) प्रांतात प्रवास करताना एक विचित्र दृश्य पाहिलं होतं. तिथले साधे शेतकरी पुरुष आपल्या नवजात बाळासोबत अंथरुणात पडून होते जणू ते स्वतःच त्या बाळाला उब देत होते. यावरूनच त्यांनी हे नाव दिलं.
अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा विद्यापीठातील वैद्यकीय मानववंशशास्त्रज्ञ रिचर्ड पॉविस म्हणतात, "हा शब्द खरं तर त्या पुरुषांची थट्टा करण्यासाठी वापरला गेला होता."
पॉविस यांच्या मते, "पुरुष स्त्रियांसारखे वागत आहेत या कल्पनेतून हा शब्द समोर आला होता."
कुव्हेड (Couvade) या प्रथेचा इतिहास इ.स.पूर्व 50 पर्यंत मागे जातो. त्यावेळी कोर्सिका, सायप्रस आणि आयबेरिया यांसारख्या ठिकाणी होणारे वडील स्वतः अंथरुणावर झोपायचे आणि जणू त्यांनाच प्रसूती कळा (Labour pains) येत आहेत, असा आव आणायचे.
कधी कधी तर ते आपल्या पत्नीचे कपडे घालून बाळंतपणाचे सोंगही करायचे. पुढे जाऊन मानववंशशास्त्रज्ञांना असेच प्रकार वेस्ट इंडिज, दक्षिण अमेरिका आणि पूर्व आशियातील अनेक समुदायांमध्येही पाहायला मिळाले.
टायलर यांनी 1889 मध्ये लिहिलं होतं की, हे प्रकार एका विधीसारखे केले जायचे. काही जमातींमध्ये 'कुव्हेड' हा एक कायदेशीर मार्ग होता. त्याद्वारे वडील त्या बाळाला आपलं मूल म्हणून अधिकृतपणे स्वीकारायचे.
तर काही ठिकाणी अशीही समजूत होती की, बाळंतपणाच्या वेळी फिरणाऱ्या वाईट शक्तींचं लक्ष आईवरून हटवून वडिलांकडे वळवण्यासाठी हे केलं जायचं. जेणेकरून आई आणि बाळ सुरक्षित राहावं.
रिचर्ड पॉविस म्हणतात की, त्या काळातल्या शिकलेल्या आणि श्रीमंत विचारवंतांच्या नजरेत (जे प्रामुख्याने व्हिक्टोरियन काळातील पुरुष होते) 'कुव्हेड' म्हणजे एक ठरवून केलेली पद्धत होती.
परदेशातील अनेक संस्कृतींमध्ये नव्यानं वडील होणारे हे मुद्दाम करायचे. जेणेकरून त्यांच्या गरोदर पत्नीची आणि होणाऱ्या बाळाची तब्येत आणि मनस्थिती उत्तम राहावी.
डॉ. पॉविस म्हणतात की, 'जेव्हा 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगत पाश्चात्य देशांकडे लक्ष वळवण्यात आलं तेव्हा कुव्हेडकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्याला एक मानसिक आजार मानलं जाऊ लागलं.
म्हणजेच पुरुष मुद्दाम हे करत नव्हते, तर त्यांच्या शरीरातील जैविक बदल आणि मानसिक ताणतणावामुळे त्यांना हा गरोदरपणाचा त्रास आपोआप जाणवू लागला होता.
सिग्मंड फ्रायड आणि मेरी डग्लस यांसारख्या अभ्यासकांनी कुव्हेड सिंड्रोमचा संबंध मानवी मानसिकतेशी जोडला.
त्यांच्या मते, पुरुष गरोदरपणाचं सोंग करतात, जेणेकरून आपल्या जोडीदाराला मिळणारं लक्ष स्वतःकडे वळवता येईल.
दुसरीकडे, काही जण याला सुप्त मत्सर मानतात. यात वडिलांना असं वाटतं की, जन्माला येणारं बाळ त्यांच्या आणि पत्नीच्या नात्यात अडथळा ठरेल. या मानसिक ओढाताणीतूनच त्यांना शारीरिक लक्षणं जाणवू लागतात.
गुंतागुंतीच्या भावना
तज्ज्ञांच्या मते, कुव्हेड सिंड्रोम हा प्रामुख्याने मानसिक स्थितीशी जोडलेला आहे. पालकत्वाची नवीन जबाबदारी स्वीकारताना जोडीदाराला ज्या मानसिक संघर्षातून जावं लागतं, त्याचाच परिणाम शरीरावर होतो.
स्वतः गरोदर नसूनही, जोडीदाराच्या अवस्थेशी असलेलं भावनिक नातं आणि भविष्याची चिंता यामुळे ही शारीरिक लक्षणं उद्भवतात.
संस्थापक आणि क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ केविन ग्रुएनबर्ग म्हणतात, "बाळ होणं हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. कधीकधी हे सगळं खूप तणावपूर्ण आणि अंगावर येणारं वाटू शकतं. अशा वेळी 'कुव्हेड' हे तुमच्या आयुष्यात होणाऱ्या या मोठ्या बदलाचं किंवा परिवर्तनाचं एक प्रतिबिंब असू शकतं."
बाळंतपणानंतरचा काळ दोन्ही पालकांसाठी नवीन ताणतणाव घेऊन येतो. अपुरी झोप आणि नवजात बाळाची सतत करावी लागणारी देखभाल यामुळे खूप दमछाक होते.
डॉ. सिंगले म्हणतात, "या काळात शारीरिक जवळीक किंवा कुटुंबातील कामांचे नियोजन अशा विविध गोष्टींमध्येही बदल होतात. त्याचा परिणाम मनावर होतो."
साधारणपणे नव्यानं वडिल झालेल्यांमध्ये दर 10 पैकी एकाला गरोदरपणाच्या काळात किंवा बाळंतपणानंतर नैराश्य येऊ शकतं.
तर जवळपास 18 टक्के पुरुषांना चिंता जाणवते आणि 7 टक्के बाबांमध्ये मानसिक धक्क्यातून निर्माण होणारी लक्षणं, पीटीएसडीसारखी तीव्र तणावाची लक्षणं दिसतात.
संशोधनातून असंही समोर आलं आहे की, जर आईला बाळंतपणानंतर नैराश्य आलं, तर वडिलांनाही तसाच त्रास होण्याची शक्यता दुप्पट असते.
मानसिक बदलांमधील काही भाग खरोखरच 'फ्रॉइडियन' विचारांशी मिळताजुळता असू शकतो.
डॉ. सिंगले म्हणतात, "अनेक बाबा माझ्याकडे येतात आणि त्यांच्या मनातल्या भावनांबद्दल बोलतात. जसं की, नवजात बाळाबद्दल वाटणारा हेवा, आपलं जुनं आयुष्य आता संपलं आहे याचं दुःख किंवा आता आपल्या जोडीदाराला बाळासोबत शेअर करावं लागत आहे ही भावना त्यांच्या मनात असते."
पुरुषांना गरोदर असल्याची लक्षणं का जाणवतात?
काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, होणारे बाबा हे मुद्दाम नाही, तर अनैच्छिकपणे गरोदरपणाची लक्षणं अनुभवतात. ही त्यांच्या जोडीदाराबद्दलची खोलवरची सहानुभूती असू शकते.
प्राध्यापक लेव्हंट म्हणतात, "हे लक्षण म्हणजे आपल्या गरोदर जोडीदाराशी असलेलं त्यांचं खोल भावनिक नातं आणि त्यांच्याशी स्वतःला जोडून घेण्याचंच एक प्रतिबिंब आहे."
खरं तर, ही लक्षणं अनेकदा जोडीदाराला पाठिंबा देण्यासाठी जाणीवपूर्वक केलेल्या कृतींसोबतच येतात.
उदाहरणार्थ, जर गरोदर पत्नीला अचानक मांसाहाराचा वास सहन होत नसेल किंवा त्या वासाची शिसारी येत असेल, तर तिला सोबत देण्यासाठी पती देखील शाकाहारी बनण्याचा निर्णय घेऊ शकतो.
तसेच, जर गरोदरपणामुळे पत्नीने व्यायाम कमी करून आरामावर भर दिला, तर तिला एकटं वाटू नये म्हणून पतीही तिची साथ देण्यासाठी व्यायाम थांबवून तिच्यासोबत वेळ घालवू शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
पॉविस यांच्या मते, कुव्हेड ही केवळ एक वैद्यकीय अवस्था नसून ती जोडीदाराला दिलेल्या पाठिंब्याचे एक रूप आहे.
ते म्हणतात, "माझ्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतर आपल्या जोडीदाराला आधार देण्यासाठी काहीही करते तेव्हा त्याला कुव्हेड म्हणावं. जेव्हा आपण याला आजार म्हणतो, तेव्हा आपण त्याला एका व्याधीचं रूप देतो."
"पण खरं तर यात काहीच चुकीचं किंवा वेगळं नाही. ही फक्त मानवी सहानुभूती आहे. शेवटी माणसं एकमेकांची काळजी कशी घेतात आणि त्या काळजीपोटी त्यांच्यात काय बदल होतात हेच महत्त्वाचं आहे."
बदलणारे हार्मोन्स
असं असूनही काही पुरावे असं सांगतात की, कुव्हेडमागे जैविक कारणं असू शकतात. त्यामुळे पुढे मानसिक आणि जाणीवपूर्वक बदल घडू शकतात.
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील मानसशास्त्रज्ञ रॉबिन एडेलस्टीन यांनी यावर एक मोठं संशोधन केलं.
त्यांनी पहिल्यांदाच आई-बाबा होणाऱ्या जोडप्यांच्या (यात स्त्री-पुरुष आणि समलिंगी जोडीदारांचाही समावेश होता) हार्मोन्सच्या पातळ्यांमध्ये गरोदरपणाच्या काळात कसे बदल होतात याचा सखोल अभ्यास केला.
संशोधनात असं दिसलं की, गरोदर स्त्रियांमध्ये कोर्टिसोल, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन यांसारख्या हार्मोन्सची पातळी खूप वाढते. पण पुरुषांमध्ये मात्र प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी झालेली आढळली.
एडेलस्टीन म्हणतात, "यात नवल वाटण्यासारखं काही नाही. पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन कमी होण्यामागे एक शास्त्रीय कारण असू शकतं. त्यामुळे पुरुषांचा कल आक्रमकतेपेक्षा आपल्या कुटुंबाची आणि बाळाची काळजी घेण्याकडे जास्त वळतो. तसेच इस्ट्रॅडिओलची पातळी कमी झाल्यामुळे बाळाचे संगोपन करणे अधिक सोपे जाते."
बाळंतपणानंतर 3 आणि 6 महिन्यांनंतर जेव्हा या बाबांचे सर्वेक्षण केले गेले, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली.
ज्यांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी गरोदरपणात जास्त प्रमाणात कमी झाली होती, त्यांनी घरकामात आणि बाळाची काळजी घेण्यात जास्त मदत केल्याचे सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नींनीही या गोष्टीला दुजोरा दिला.
एडेलस्टीन म्हणतात, "शरीरातील हार्मोन्समधील बदल आधी होतात आणि त्यानंतरच बाबांचा घरातील कामांमधील रस किंवा सहभाग वाढतो, असं दिसून येतं."
एडेलस्टीन म्हणतात की, म्हणूनच 'कुव्हेड'च्या काही लक्षणांमागे हार्मोन्समधील बदल कारणीभूत असू शकतात.
उदाहरणार्थ, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रॅडिओल या दोन्ही हार्मोन्सची पातळी कमी झाल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच इस्ट्रॅडिओल कमी झाल्याचा संबंध नैराश्याशी देखील जोडला गेला आहे. पण मुळात हे बदल शरीरात नेमके कशामुळे सुरू होतात, हे रहस्य अजूनही उलगडलेले नाही.
मेंदूशास्त्रातील अनेक अभ्यासांनुसार हे सिद्ध झालं आहे की, बाळ जन्माला आल्यावर पालकांच्या मेंदूत मोठे बदल होतात.
2024 मधील एका संशोधनात असं आढळलं की, आईप्रमाणेच बाबांच्या मेंदूतील 'ग्रे मॅटर' (Grey matter) देखील बाळंतपणानंतर काही प्रमाणात कमी होतं. याला 'सिनॅप्टिक प्रूनिंग' म्हणतात.
म्हणजेच मेंदू अनावश्यक गोष्टी बाजूला सारून बाळाचे संकेत समजून घेणं, त्याच्याशी नातं जोडणं आणि त्याची काळजी घेणं यांसारख्या गोष्टींसाठी अधिक सक्षम होतो.
ज्या बाबांच्या मेंदूत हे बदल जास्त प्रमाणात झाले त्यांनी आपल्या बाळासोबत जास्त वेळ घालवला आणि त्यांच्यात एक वेगळंच प्रेमाचं नातं तयार झाल्याचं दिसून आलं.
या सर्व गोष्टींचा विचार करता डॉ. सिंगले हे जुनं मत नाकारतात की, कुव्हेड म्हणजे केवळ आपल्या गरोदर जोडीदाराची केलेली नक्कल किंवा प्रतिबिंब आहे.
ते म्हणतात, "पालकत्वाकडे पाहण्याचा हा अतिशय जुना दृष्टिकोन आहे."
त्यांच्या मते, होणारा बाप हा देखील एक स्वतंत्र व्यक्ती असतो. त्यामुळे तो स्वतः देखील मानसिक, सामाजिक, मज्जासंस्थेतील बदल, हार्मोन्समधील चढ-उतार आणि वैयक्तिक नात्यांमधील अनेक बदलांमधून जात असतो.
होणाऱ्या बाबांसाठी या गोष्टी स्वीकारणं खूप कठीण असू शकतं, कारण समाजात पुरुषाने कसं वागावं याच्या काही ठराविक कल्पना आहेत.
डॉ. सिंगले म्हणतात, "अनेक पुरुषांना असं वाटतं की, मी एक पुरुष आहे. मी नैराश्यात कसं काय जाऊ शकतो? ते तर कमकुवतपणाचं लक्षण आहे. मी एक बाप आहे. मला खंबीर राहून कुटुंबाचा सांभाळ करायला हवा."
"पण याउलट, त्यांनी असं म्हणायला हवं की मलाही डोकेदुखी होऊ शकते, मलाही शरीरात ताण जाणवू शकतो किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात. हे ओझं पेलताना मलाही त्रास होऊ शकतो हे मान्य करण्यात काहीच गैर नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही