समय रैना म्हणाला, 'मेलाटोनिन घेतल्यानंतर 16 तास झोपलो', हे औषध घेणं सुरक्षित आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डिंकल पोपली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"मी खूप मानसिक तणावाखाली होतो, झोप येत नव्हती. माझ्या थेरपिस्टने मला 3 मिलीग्रॅम मेलाटोनिन घेण्याचा सल्ला दिला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी मी 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मेलाटोनिन घेतलं. त्यानंतर मी पुढील तब्बल 16 तास सलग झोपलो."

हा किस्सा कॉमेडियन समय रैनाने त्याच्या 'स्टिल अलाइव्ह' या शोमध्ये सांगितला होता. हा व्हीडिओ यूट्यूबवर आतापर्यंत 2.2 कोटीपेक्षा (22 मिलियन) जास्त वेळा पाहिला गेला आहे.

समय रैनाचा वैयक्तिक अनुभव हा जरी कॉमेडी शोचा भाग असला, तरी तो एका वाढत्या ट्रेंडकडे लक्ष वेधतो.

हल्ली अनेक लोक झोपेसाठी मॅग्नेशियम स्लीप स्ट्रिप्स आणि मेलाटोनिनच्या गोळ्यांसारखे सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिनधास्तपणे वापरत आहेत.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

ही उत्पादने बाजारात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहज आणि खूप स्वस्तात मिळतात. त्यांचे 'वेलबीइंग सप्लिमेंट्स' (स्वास्थ्य पूरक) किंवा न्यूट्रास्युटिकल्समध्ये वर्गीकरण केले जाते, त्यामुळे त्यांच्या विक्रीवर फारसे नियम लागू होत नाहीत किंवा फारसे नियंत्रणच नसते.

अमेरिकन सरकारच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, न्यूट्रास्युटिकल्स ही अन्नाच्या स्रोतांपासून मिळवलेली उत्पादने आहेत. ती पौष्टिक तसेच आरोग्यदायी फायदे (ज्यात रोगांचा प्रतिबंध आणि उपचार यांचा समावेश आहे) देतात.

मेलाटोनिन म्हणजे काय?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मेलाटोनिन हा एक हार्मोन आहे. तो अंधार पडल्यावर मेंदूमधील पाइनल ग्रंथी तयार करतो. हा हार्मोन आपल्या शरीराची झोप आणि जागेपणाची वेळ म्हणजे चक्र नियंत्रित करतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेंदूतील पीनियल ग्रंथी अंधार पडल्यावर मेलाटोनिनचं उत्पादन वाढवते आणि उजेड पडल्यावर ते कमी करते. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. शरीराला कधी झोपायचं आणि कधी जागं राहायचं याचे संकेत मिळतात. (प्रतिकात्मक फोटो)

मेंदूमधील पाइनल ग्रंथी अंधार पडल्यावर मेलाटोनिनचे उत्पादन जास्त तयार करते आणि उजेड पडल्यावर ते कमी करते, त्यामुळे शरीराला आराम मिळतो.

महत्त्वाचं म्हणजे, मेलाटोनिन आपल्याला 'जबरदस्तीने' झोपवत नाही, तर फक्त शरीराला आता झोपायची वेळ झाली आहे, असे संकेत देतो.

मेलाटोनिनच्या वापराबद्दल तज्ज्ञ काय सांगतात?

मेलाटोनिनचा वापर जेट लॅग, मेंदूच्या दुखापती, न्यूरोडीजनेरेटिव्ह डिसऑर्डर (आजार) आणि मायग्रेनपासून बचावासाठी केला जातो.

याचे दुष्परिणाम कमी असतात, म्हणून ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही सहज मिळू शकते. परंतु तज्ज्ञ झोपेच्या समस्यांवर हा कायमस्वरूपी उपाय नाही, असं सांगत सावधही करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेलाटोनिनचा वापर जेट लॅग, मेंदूला झालेली दुखापती, न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर आणि मायग्रेनपासून बचावासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो. (प्रातिनिधिक फोटो)

ज्येष्ठ सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संयम गुप्ता यांच्या मते, "भारतात प्रौढांसाठी 10 मिलीग्रॅमपर्यंतच्या डोसला परवानगी आहे.

पण हे न्यूट्रास्युटिकल सप्लिमेंट असल्यामुळे, अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला किंवा योग्य डोसची माहिती न घेता ते विकत घेत आहेत."

अतिवापराचे धोके काय आहेत?

डॉ. संयम गुप्ता इशारा देतात की, झोपेच्या कोणत्याही औषधाचा निर्धारित डोसपेक्षा जास्त वापर केला तर दिवसभर खूप झोप येऊ शकते. हे धोकादायक असू शकतं, विशेषकरून जे लोक वाहन चालवतात किंवा जड यंत्रसामग्री वापरतात त्यांच्यासाठी.

त्यांचं म्हणणं आहे की, औषध असो किंवा न्यूट्रास्युटिकल त्याच्या विक्रीवर नियंत्रण असायला हवं. नाहीतर लोक नकळतपणे शरीरात हानिकारक किंवा विषारी घटक वाढवू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मिळणाऱ्या (ओव्हर-द-काउंटर) औषधांचा गैरवापर थांबवण्यासाठी कडक नियम आणि पॅकेजिंगमध्ये बदलही आवश्यक आहे. (प्रातिनिधिक फोटो)

लुधियानातील दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (डीएमसीएच) मधील एंडोक्राइनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नवीन मित्तल देखील याच गोष्टीवर भर देतात.

ते म्हणतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नयेत. हा एक 'गोल्डन रुल' आहे.

मेलाटोनिन साधारणपणे सुरक्षित असलं तरी, जास्त प्रमाणात घेतल्यास खूप झोप येऊ शकते आणि मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

ओव्हरडोसबद्दल कडक इशारा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मिळणाऱ्या औषधांचा गैरवापर थांबवण्यासाठी कडक नियम आणि पॅकेजिंगमध्ये बदल आवश्यक आहे, असं डॉ. गुप्ता सुचवतात.

नैसर्गिक झोपेसाठी तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स

बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी नैसर्गिक झोपेसाठी 'झोपण्याच्या योग्य सवयी' अवलंबण्याचा सल्ला दिला आहे:

वेळ ठरवा: दररोज झोपण्याची आणि उठण्याची एकच समान वेळ ठरवा.

बिछाना किंवा पलंगाचा फक्त झोपेसाठी वापर करा: बिछान्यावर बसून काम करू नका. त्यामुळे तुमचा मेंदू बिछान्याला काम किंवा ताण नव्हे, तर फक्त आरामाशी जोडण्यास मदत करेल.

20 मिनिटांचा नियम: जर झोप येत नसेल तर बिछान्यावरून उठा आणि थोडा वेळ फिरा.

कंटाळवाणं काहीतरी वाचा : खूप इंटरेस्टिंग नसलेलं काही तरी वाचा, त्यामुळे मन शांत होईल.

कॅफिन टाळा : संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा थंड पेय पिणं टाळा.

डिजिटल डिटॉक्स : झोपण्यापूर्वी मोबाइल स्क्रीन किंवा टीव्ही वापरणं टाळा, कारण त्यांचा प्रकाश मेलाटोनिन तयार होण्यामध्ये अडथळा आणतो.

शारीरिक थकवा : दिवसभर चालणं, पुश-अप्स किंवा शारीरिक व्यायाम करा, त्यामुळे शरीर थकून लवकर झोप येईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.