होर्मुझ, सुएझ किंवा जिब्राल्टरच नव्हे, 'या' सामुद्रधुनी आणि कालवेदेखील आहेत अत्यंत महत्त्वाचे
फोटो स्रोत, Getty Images
- Author, वालिद बदरान
- Role, बीबीसी
- वाचन वेळ: 12 मिनिटे
स्ट्रेट किंवा सामुद्रधुनी (दोन मोठ्या समुद्रांना जोडणारा अरुंद मार्ग) आणि कालवे यांचा समावेश जागतिक व्यापाराचा इतिहास घडवणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या भौगोलिक घटकांमध्ये केला जातो. या घटकांनी शतकानुशतके आंतरराष्ट्रीय संबंधांची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हे मार्ग फक्त जहाजांची वाहतूक सोपी किंवा सुरळीत करण्यापुरते मर्यादित नाहीत. तर ती खंडांमधील ऊर्जा (इंधन) आणि वस्तूंच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे व्यूहरचनात्मक ठिकाणंदेखील आहेत.
मालवाहतुकीचा मुख्य साधन म्हणून सागरी व्यापारावरील अवलंबित्व जसजसं वाढत गेलं, तसतसं या जलमार्गांचं महत्त्व अनेक पटीनं वाढत गेलं. आज ती जागतिक अर्थव्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची केंद्र झाली आहेत.
हे मार्ग समुद्र आणि महासागरांना एकमेकांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे सागरी मार्गांचं अंतर कमी होतं. त्याचबरोबर वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होते.
खंडांच्या भोवती पूर्ण वळसा घालून जाण्याऐवजी कालवे आणि सामुद्रधुनीमुळे थेट आणि अधिक प्रभावी मार्ग उपलब्ध होतात.
याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीवर होतो. त्यामुळेच जर या मार्गांपैकी एखाद्या मार्गात जरी अडथळा निर्माण झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलथापालथ निर्माण होऊ शकते.
फोटो स्रोत, Getty Images
सामुद्रधुनी आणि कालव्यांचं महत्त्व फक्त आर्थिक पातळीवरच नाही, तर याचा व्यूहरचनात्मक आणि लष्करी पैलूंवर देखील महत्त्वाचा परिणाम होतो. अनेकदा, या मार्गांवर नियंत्रण ठेवण्यावरून मोठ्या शक्तींमध्ये स्पर्धा असते. कारण या मार्गांमध्ये जागतिक व्यापाराच्या गतीवर परिणाम करण्याची क्षमता असते.
यावर नियंत्रण ठेवल्यास किंवा प्रभाव राखल्यास देशांना मोठा व्यूहरचनात्मक प्रभाव साधता येतो. याचा वापर संकट किंवा आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या वेळेस केला जाऊ शकतो.
या मार्गांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. मग त्या यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या लढाया असोत की हे मार्ग बंद झाल्यामुळे निर्माण झालेली संकटं असो. तंत्रज्ञानाचा विकास आणि जागतिक व्यापाराच्या वाढत्या व्याप्तीमुळे, हे मार्ग अधिकच संवेदनशील झाले आहेत.
इथे अचानक घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या काही प्रसिद्ध घटनांमधून असं आढळून आलं आहे.
सामुद्रधुनीला नैसर्गिक जलमार्ग मानलं जातं. टेक्टॉनिक प्लेटमधील हालचाल किंवा जमिनीची झीज किंवा स्खलन यासारख्या भू-वैज्ञानिक कारणांमुळे ते तयार होतात आणि दोन जलक्षेत्र किंवा समुद्रांना जोडतात. उदाहरणार्थ, जिब्राल्टरची सामुद्रधुनी भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते.
त्याउलट कालवे मानवनिर्मित असतात. ते खोदकाम करून किंवा इंजिनीअरिंगद्वारे बदल करून नौकानयन किंवा जहाजांची वाहतूक सोपी करण्यासाठी आणि समुद्रांना जोडण्यासाठी तयार केले जातात. उदाहरणार्थ, सुएझ कालवा तांबड्या समुद्राला भूमध्य समुद्राशी जोडतो.
या लेखात पुढे, जगातील प्रमुख सामुद्रधुनी आणि कालव्यांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर जागतिक व्यवस्थेमधील त्यांचं व्यूहरचनात्मक महत्त्वदेखील सांगण्यात आलं आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी
होर्मुझची सामुद्रधुनी इराण आणि ओमानमध्ये आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता, ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि नंतर हिंदी महासागराशी जोडतो.
याच कारणामुळे आखाती देशांमधून निघणाऱ्या कच्च्या तेलाच्या जहाजांसाठी (ऑईल टँकर) हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गानंच ही जहाजं जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचतात.
जगातील 20 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गानं होते. यावरुन ही सामुद्रधुनी किती महत्त्वाची आहे, ते लक्षात येतं. त्यामुळेच या सागरी मार्गाचं आर्थिक महत्त्व खूप अधिक आहे. ऊर्जा म्हणजे इंधन उत्पादक देश त्यांच्या संसाधनांच्या निर्यातीसाठी याच सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
जर या सागरी मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला, तर त्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. त्याचा परिणाम मोठ्या अर्थव्यवस्था आणि इंधन (ऊर्जा) आयात करणाऱ्या देशांवर होतो.
याव्यतिरिक्त, या सामुद्रधुनीशी निगडीत राजकीय आणि व्यूहरचनात्मक पैलूदेखील अत्यंत संवेदनशील, महत्त्वाचा आहे. हा सागरी मार्ग प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय संबंधांमधील तणावाचा एक महत्त्वाचा बिंदू राहिला आहे.
विशेषकरून आखाती प्रदेशातील प्रादेशिक आणि जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याचं महत्त्व आहे. त्यामुळेच, व्यापारी वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मोठ्या सागरी शक्तींकडून या सागरी मार्गावर सातत्यानं देखरेख केली जाते.
अलीकडेच इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनं जाहीर केलं की ही सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. विशेषकरून अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित जहाजांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या दिवसांमध्ये इराणवर झालेल्या लष्करी हल्ल्यांना थेट प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी या सामुद्रधुनीतील जहाजांची व्यापारी वाहतूक जवळपास ठप्प झाली. हल्ले आणि सुरक्षेशी संबंधित धोके यांच्या भीतीमुळे या मार्गानं जाणाऱ्या जहाजांच्या संख्येत वेगानं घट झाली.
सुएझ कालवा
इजिप्तमध्ये असलेला सुएझ कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या जल कालव्यांपैकी एक आहे. हा कालवा तांबड्या समुद्राला भूमध्य समुद्राशी जोडतो. तसंच या कालव्यामुळे युरोप आणि आशियामध्ये एक कमी अंतराचा आणि थेट सागरी मार्ग उपलब्ध होतो. यामुळे जहाजांना आफ्रिका खंडाला पूर्ण वळसा घालून जाण्याची आवश्यकता राहत नाही.
जागतिक व्यापारात, विशेषकरून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीसाठी हा कालवा अतिशय महत्त्वाचा आहे. हा कालवा इजिप्तच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोतदेखील आहे. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो.
सुएझ कालव्याचं खोदकाम 1859 मध्ये इजिप्तचे तत्कालीन शासक सईद पाशा यांच्या कार्यकाळात सुरू झालं होतं.
फर्डिनेंड डी लेसेप्सच्या नेतृत्वाखालील एका फ्रेंच कंपनीला त्यांनी या कालव्याचं खोदकाम करण्याचे अधिकार दिले होते. या प्रकल्पाला जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला. अखेरीस, खदीव इस्माईल यांच्या कार्यकाळात, 17 नोव्हेंबर 1869 ला एका भव्य आंतरराष्ट्रीय समारंभाद्वारे या कालव्याचं अधिकृत उद्घाटन झालं.
फोटो स्रोत, Getty Images
या उद्घाटनामुळे तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडणाऱ्या या नव्या सागरी मार्गाचं व्यूहरचनात्मक महत्त्व जगासमोर आलं.
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष जमाल अब्दुल नासिर यांनी 1956 मध्ये सुएझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. तो आधुनिक इतिहासाला मोठं वळण देणारा ठरला. याच निर्णयामुळे 1956 मध्ये इजिप्तवर ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायल या तीन देशांनी हल्ला केला. सुएझ कालवा ताब्यात घेणं आणि तो पुन्हा पाश्चात्य देशांच्या नियंत्रणाखाली आणणं, हा या हल्ल्यामागचा उद्देश होता.
मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावामुळे अखेरीस इस्रायल, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. त्यानंतर या कालव्यावरील इजिप्तचं सार्वभौमत्व कायम राहिलं. नंतरच्या काळात अरब-इस्रायल युद्धांमुळे देखील हा कालवा अनेकवेळा बंद करावा लागला होता.
असंच 1967 च्या युद्धाच्या वेळेस हा कालवा पूर्णपणे बंद झाला होता. तो अनेक वर्षे बंदच राहिला. कारण याच भागात थेट संघर्ष सुरू होता. ऑक्टोबर 1973 च्या युद्धानंतर, 1975 मध्ये हा कालवा पुन्हा खुला करण्यात आला. हळूहळू तिथली वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे जागतिक व्यापारातील त्याची महत्त्वाची भूमिका पुन्हा प्रस्थापित झाली.
बाब अल-मंदेबची सामुद्रधुनी
बाब अल मंदेबची सामुद्रधुनी तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी जोडते. ही सामुद्रधुनी येमेन, जिबूती आणि इरीट्रिया या देशांमध्ये आहे. सुएझ कालव्याचं दक्षिण द्वार म्हणून याला ओळखलं जातं. त्यामुळेच जागतिक व्यापारी वाहतुकीत याचं प्रचंड महत्त्व आहे.
आशिया आणि युरोपदरम्यान होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीचा मोठा भाग याच मार्गानं जातो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत तो एक प्रमुख थांबा (ट्रान्झिट पॉईंट) झाला आहे. या सामुद्रधुनीमुळे सर्वात छोट्या सागरी मार्गांद्वारे जागतिक बाजारपेठा थेट जोडल्या जातात.
मात्र, हॉर्न ऑफ आफ्रिका आणि येमेनच्या प्रदेशातील तणावामुळे या सामुद्रधुनीला सुरक्षेशी संबंधित अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जलवाहुतकीला धोके निर्माण होतात. म्हणूनच जागतिक शक्ती हा प्रमुख मार्ग सुरक्षित आणि खुला राहावा यावर भर देतात.
फोटो स्रोत, Gallo Images via Getty
अलीकडच्या काळात, इराणचे मित्र मानल्या जाणाऱ्या येमेनमधील हुती बंडखोरांकडून या मार्गातील वाहतुकीबाबत दिल्या जात असलेल्या धमक्या आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे जहाजांच्या वाहतुकीत स्पष्ट अडथळे निर्माण झाले आहेत. तसंच जहाजांच्या सागरी विम्यावरील खर्चदेखील वाढला आहे.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून युरोपातील अनेक देशांनी एकत्र येऊन एक बहुराष्ट्रीय नौदल शक्ती तयार केली. याला 'ऑपरेशन एस्पिड्स' असं नाव देण्यात आलं. व्यापारी जहाजांना सुरक्षा पुरवणं, तसंच तांबडा सुमद्र आणि बाल अल मंदेबमधील जहाज वाहतुकीचं स्वातंत्र्य अबाधित राखणं, हा याचा उद्देश आहे.
याअंतर्गत जहाजांना एस्कॉर्ट केलं जातं. या महत्त्वाच्या मार्गाची सुरक्षा भक्कम असावी आणि जागतिक व्यापारावरील वाढत्या तणावाचे परिणाम कमी करता यावेत, यासाठी तिथल्या धोक्यांवर लक्ष ठेवलं जातं आणि आवश्यकता भासल्यास ते धोके दूर केले जातात.
जिब्राल्टरची सामुद्रधुनी
जिब्राल्टरची सामुद्रधुनी मोरोक्कोचा उत्तरेकडचा भाग आणि स्पेनचा दक्षिणेकडचा भाग याच्यामध्ये आहे. या सामुद्रधुनीच्या युरोपामधील किनाऱ्यावर जिब्राल्टरचा प्रदेश आहे. तो ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच या महत्त्वाच्या सागरी मार्गात ब्रिटनची एक प्रभावशाली व्यूहरचनात्मक उपस्थिती आहे. ही सामुद्रधुनी भूमध्य समुद्राला अंटलांटिक महासागराशी जोडते.
युरोप, आफ्रिका आणि अमेरिका यांच्यामधील जहाजांच्या वाहतुकीचा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. याच कारणामुळे तो जागतिक व्यापाराचा एक केंद्रबिंदू बनला आहे. यातून एकाच सागरी मार्गाद्वारे अनेक बाजारपेठा एकमेकांशी जोडल्या जातात.
ही सामुद्रधुनी युरोप खंडाजवळ आहे आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी प्रवेशद्वारांपैकी एकावर नियंत्रण ठेवते. म्हणूनच या सामुद्रधुनीचं लष्करी आणि राजकीय महत्त्वदेखील खूप अधिक आहे. यामुळेच ही सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय व्यूहरचनात्मक संतुलनाचा एक भाग बनली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
इतिहासात या सामुद्रधुनीत अनेक संघर्ष झाले आहेत. अनेक शतकं चाललेल्या युरोपातील वसाहतवादी स्पर्धेशी हे संघर्ष निगडीत होते. विशेषकरून ब्रिटन आणि स्पेनमधील स्पर्धेमुळे ते झाले.
ब्रिटिश डच सैन्यानं हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर, 1704 मध्ये ब्रिटननं जिब्राल्टरच्या प्रदेशावर कब्जा केला. नंतर 1713 मध्ये उट्रेक्ट तहाद्वारे या कब्जाला अधिकृत स्वरुप देण्यात आलं. या तहानुसार स्पेननं जिब्राल्टर ब्रिटनच्या ताब्यात दिलं. तसं असूनही, तेव्हापासून आतापर्यंत स्पेन यावर दावा करत आलं आहे.
याव्यतिरिक्त, या सामुद्रधुनीच्या जवळपास असलेल्या काही छोट्या बेटांवरून मोरक्को आणि स्पेनमध्ये देखील वेळोवेळी वाद होत राहिले आहेत. उदाहरणार्थ, 2002 मध्ये झालेला लीला बेटाचं (तोरा), मर्यादित संकट. या घटनेमुळे या प्रदेशातील सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी निगडीत असुरक्षितता, संवेदनशीलता समोर आली.
अर्थात आधुनिक काळात या प्रदेशाशी निगडीत वादाचं रुपांतर कोणत्याही मोठ्या लष्करी संघर्षात झालेलं नाही. मात्र तरीदेखील या सामुद्रधुनीचं व्यूहरचनात्मक महत्त्व असल्यामुळे ती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शक्तींसाठी सातत्यानं लष्करी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र आहे. या मार्गानं जहाजांची वाहतूक सुरक्षितपणे आणि स्थिरपणे सुरू राहावी याची खबरदारी घेण्यासाठी सर्व संबंधित देश प्रयत्नशील असतात.
पनामा कालवा
पनामा कालवा, पनामा देशात आहे. तो कॅरिबियन समुद्राला (जो अटलांटिक महासागराशी जोडलेला आहे) पॅसिफिक महासागराशी जोडतो. या कालव्यामुळे जगाच्या पूर्व आणि पश्चिम भागामधील सागरी मार्गाची लांबी बरीच कमी होते.
या कालव्याची गणना इंजिनीअरिंगच्या सर्वात मोठ्या कामगिरी किंवा यशामध्ये केली जाते. या कालव्याचं वैशिष्टयं म्हणजे यात जहाजांना पाण्याच्या पातळीत वर-खाली करण्याची आणि उतरवण्याची एक विशेष प्रणाली वापरली जाते. यामुळे दोन्ही महासागरांमधील मोठाली जहाजंदेखील अतिशय सुरळीतपणे इथून प्रवास करतात. परिणामी सागरी प्रवासासाठी लागणारा कालावधी आणि खर्च या दोन्हीमध्ये घट झाली आहे.
जागतिक व्यापारात हा कालवा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषकरून अमेरिका खंड (उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका) आणि आशिया यामधील मालाची वाहतूक करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाढत्या व्याप्तीशी (जहाजांची वाढती वाहतूक) ताळमेळ साधण्यासाठी, अलीकडच्या वर्षांमध्ये या कालव्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचा विस्तारदेखील करण्यात आला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
फ्रेंच पुढाकारानं, 1881 मध्ये पनामा कालव्याचं खोदकाम सुरू झालं होतं. या प्रकल्पाचं नेतृत्व फर्डिनेंड डी लेसेप्स यांनी केलं होतं. त्यावेळेस पनामा, कोलंबियाचा एक भाग होता. मात्र हा प्रकल्प मध्येच अडकला आणि थांबवण्यात आला.
नंतर 1903 मध्ये पनामाला कोलंबियातून वेगळं होण्यासाठी अमेरिकेनं पाठिंबा दिला. त्यानंतर अमेरिकेनं हा प्रकल्प पुन्हा सुरू केला. कालव्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, 15 ऑगस्ट 1914 ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या कार्यकाळात याचं अधिकृतपणे उद्घाटन झालं. त्यावेळेस ब्लिसारियो बोरस बाराहोना, पनामाचे राष्ट्राध्यक्ष होते. ते 1912 ते 1916 पर्यंत सत्तेत होते.
उद्घाटन झाल्यानंतर अनेक दशकं पनामा कालवा अमेरिकेच्या नियंत्रण आणि प्रशासनाखाली होता. यामुळे पनामामध्ये अंतर्गत विरोध आणि तणाव निर्माण झाले. यामध्ये 1964 सालच्या घटना सर्वात प्रमुख होत्या. त्यावेळेस पनामातील नागरिक आणि अमेरिकेच्या लष्करामध्ये हिंसक चकमकी झाल्या होत्या.
पुढे 1970 च्या दशकात करार झाले. त्याअंतर्गत या कालव्याचं सार्वभौमत्व पनामाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अधिकृत प्रक्रिया 1999 मध्ये पूर्ण झाली. सार्वभौमत्वाशी संबंधित वाद जरी संपुष्टात आला, तरीदेखील आजही या कालव्याला राजकीय आणि आर्थिक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. त्याचा कधी-कधी कालव्यातील जहाज वाहतुकीवर परिणाम होतो. त्यातून या कालव्याची व्यूहरचनात्मक संवेदनशीलता पुन्हा समोर येते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालव्याचं नियंत्रण हस्तांतरित करण्यावर टीका केली आहे. ते म्हणाले होते की अमेरिकेनं घेतलेला हा एक चुकीचा निर्णय होता. त्यांच्या मते, कालवा ही एक व्यूहरचनात्मक मालमत्ता आहे. जागतिक व्यापार आणि अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा यासंदर्भातील त्याचं महत्त्व लक्षात घेऊन अमेरिकेनं हा कालवा स्वत:च्याच नियंत्रणाखाली ठेवायला हवा होता.
मलक्काची सामुद्रधुनी
मलक्काची सामुद्रधुनी मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये आहे. हा जगातील सर्वात वर्दळीच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. ही सामुद्रधुनी हिंदी महासागराला दक्षिण चीन समुद्राशी जोडते. मध्य-पूर्व आणि पूर्व आशियामध्ये वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी हा अतिशय महत्त्वाचा सागरी मार्ग आहे.
चीन आणि जपानसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांपर्यंत कच्चे तेल आणि इतर माल पोहोचवण्याचा हा सर्वात छोटा किंवा कमी अंतराचा मार्ग असल्यामुळे त्याचं मोठं महत्त्वं आहे. याच कारणामुळे ही सामुद्रधुनी जागतिक पुरवठा साखळीचा एक मूलभूत भाग बनली आहे. कच्चा माल आणि इंधनाच्या (ऊर्जा) अखंड पुरवठ्यासाठी अनेक देश या मार्गावर अवलंबून आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
आर्थिक महत्त्व असूनही, मलक्काच्या सामुद्रधुनीला सागरी चाचेगिरी आणि प्रचंड कोंडी यासारख्या सुरक्षेशी निगडीत आव्हानांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत, या मार्गातील जहाज वाहतुकीच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक ठरतं. त्यामुळेच, या महत्त्वाच्या मार्गाला सुरक्षित ठेवता यावं यासाठी याच्या अवतीभोवतीच्या देशांमधील समन्वय वाढलं आहे.
सागरी चाचेगिरी, लूटमार हे या सामुद्रधुनीतील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आव्हान होतं. तिसऱ्या सहस्त्रकाच्या सुरुवातीला, विशेषकरून 2000 ते 2005 दरम्यान चाचेगिरीमध्ये वेगानं वाढ झाली. त्या काळात या सामुद्रधुनीतील काही संवेदनशील भागांमध्ये व्यापारी जहाजांवर वारंवार हल्ले झाले. त्यानंतर मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर यासारख्या देशांनी सुरक्षा सहकार्य वाढवलं आणि संयुक्त गस्त घालण्यास सुरुवात केली. जेणेकरून हा महत्त्वाचा सागरी मार्ग सुरक्षित ठेवता यावा.
बोस्फोरस आणि डार्डानेल्सची सामुद्रधुनी
बोस्फोरसची सामुद्रधुनी तुर्कियेमधील इस्तंबूल शहरात आहे. ही सामुद्रधुनी आशिया आणि युरोप खंडाला वेगळं करते. तसंच काळ्या समुद्राला मरमरा समुद्राशी जोडते. या सामुद्रधुनीच्या भौगोलिक स्थितीमुळे ती जगातील सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक सामुद्रधुनींपैकी एक मानली जाते.
काळ्या समुद्राच्या प्रदेशात असलेल्या देशांमधून कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि इतर माल जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यात ही सामुद्रधुनी महत्त्वाची भूमिका बजावते. व्यापारी जहाजं आणि लष्करी युद्धनौकांसाठी हा एक प्रमुख मार्ग आहे. तसंच आंतरराष्ट्रीय करारांनुसार तुर्किये या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवतो.
ही सामुद्रधुनी पूर्व आणि पश्चिम जगाच्या संगमाचा बिंदू आहे. त्यामुळे देखील त्याचं महत्त्व आहे. यामुळे त्याला एक विशेष भू-राजकीय महत्त्व आहे. या सामुद्रधुनीची संवेदनशील स्थिती आणि आंतरराष्ट्रीय संतुलनावरील त्याचा प्रभाव यामुळे ती प्रादेशिक सुरक्षेचाही एक प्रमुख भाग आहे.
फोटो स्रोत, Getty Images
डार्डानेल्सची सामुद्रधुनीदेखील तुर्कियेमध्येच आहे. ही सामुद्रधुनी एजियन समुद्राला (हा भूमध्य समुद्राचाच भाग आहे) मरमरा समुद्राशी जोडते. तुर्कियेचे जे जलमार्ग काळ्या समुद्राला भूमध्य समुद्राशी जोडतात, त्याच मार्गांचा ही सामुद्रधुनी एक भाग मानली जाते.
ही सामुद्रधुनी व्यूहरचनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. युरोप आणि आशियामध्ये वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तसंच आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक व्यवस्थेचा तो एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक देखरेख केली जाते आणि नियंत्रण ठेवलं जातं.
तुर्कियेनं 1915 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात या सामुद्रधुनीच्या प्रदेशात गॅलीपोली मोहीम चालवली होती. त्यावेळेस मित्रराष्ट्रांनी रशियन साम्राज्यापर्यंतचा सागरी मार्ग खुला करण्यासाठी या सामुद्रधुनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उस्मानी सैन्यानं हा हल्ला परतवून लावला होता. त्या महायुद्धातील सर्वात भीषण लढायांपैकी ती एक लढाई होती.
कील कालवा
कील कालवा, जर्मनीच्या उत्तर भागातील श्लेसविग होलस्टीन प्रांतात आहे. हा कालवा बाल्टिक समुद्राला उत्तर समुद्राशी जोडतो. त्यामुळे युरोपातील जहाजांना वाहतुकीसाठी एक कमी अंतराचा सागरी मार्ग उपलब्ध होतो.
युरोपमधील सागरी वाहतुकीसाठी या कालव्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. विशेषकरून औद्योगिक बंदरांमधील वाहतुकीसाठी हा कालवा वापरला जातो. त्यामुळे युरोपच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणि अंतर्गत व्यापार सोपा करण्यामध्ये या कालव्याची महत्त्वाची भूमिका आहे.
या कालव्याची उच्च स्वरुपाची कार्यक्षमता आणि जहाजांच्या वाहतुकीचे काटेकोर मात्र सुरळीत व्यवस्थापन यामुळे या कालव्यातून अतिशय सुरळीतपणे प्रवास होतो. कालव्यांमुळे युरोपातील सागरी वाहतुकीच्या पायाभूत सुविधा कशा बळकट होतात, याचं हा कालवा अतिशय उत्तम उदाहरण मानला जातो.
फोटो स्रोत, Getty Images
जर्मन सम्राट विल्हेल्म प्रथम याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये, 1887 मध्ये कील कालव्याचं खोदकाम सुरू झालं होतं. त्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 1895 मध्ये सम्राट विल्हेल्म द्वितीय याच्या कार्यकाळात हा कालवा अधिकृतपणे खुला करण्यात आला. त्यानंच या कालव्याचं उद्घाटन केलं आणि याला जर्मनीच्या नौदल शक्तीचा एक महत्त्वाचा भाग बनवलं.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, हा कालवा जर्मनीच्या नौदलासाठी अतिशय महत्त्वाचा लष्करी मार्ग बनला होता. याच कारणामुळे शत्रूंसाठीदेखील हा कालवा एक व्यूहरचनात्मक लक्ष्य बनला होता. शत्रू राष्ट्र याच्यावर बॉम्बहल्ला करून किंवा नाकेबंदी करून त्याच्या वापरात अडथळा आणू पाहत होती.
पहिल्या महायुद्धानंतर व्हर्सायच्या तहाअंतर्गत या कालव्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घालण्यात आले. हा कालवा आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीसाठी खुला करावा लागला. यामुळे याच्यावरील जर्मनीचं नियंत्रण मर्यादित झालं.
नंतरच्या काळात हा कालवा पुन्हा पूर्णपणे जर्मनीच्या नियंत्रणाखाली, सार्वभौमत्वाखाली आला. मात्र सागरी संतुलनातील या कालव्याच्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे युरोपातील शक्तींचं याच्यावर लक्ष होतं. विशेषकरून शीतयुद्धाच्या काळात, युरोपच्या व्यूहरचनेच्या संदर्भात हा कालवा एक संवेदनशील मार्ग मानला जात असताना यावर लक्ष दिलं जात होतं.
जगातील इतर सामुद्रधुनी आणि कालवे
जागतिक पातळीवर मर्यादित भूमिका असलेले, जगात आणखी काही सामुद्रधुनी आणि कालवे आहेत. त्यांचं महत्त्व बहुतांशपणे प्रादेशिक स्तरावर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख मार्ग म्हणून त्यांचं महत्त्व नाही.
यात प्रामुख्यानं फ्लोरिडाची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्य आणि क्युबा बेटामध्ये आहे. ही सामुद्रधुनी मेक्सिकोच्या आखाताला अटलांटिक महासागराशी जोडते.
याव्यतिरिक्त, डेन्मार्कची सामुद्रधुनी आहे. ती उत्तर अटलांटिक महासागरात, आईसलँड आणि ग्रीनलँड यांच्यामध्ये आहे. ती अटलांटिक महासागराला आर्क्टिक महासागराशी जोडलेल्या पाण्याशी जोडते.
याशिवाय, चिलीच्या अगदी दक्षिण भागात मॅजेलन सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडते. अर्थात इतर प्रमुख सामुद्रधुनींच्या तुलनेत याचा वापर मर्यादित आहे.
फोटो स्रोत, Getty Images
जागतिक पातळीवर मर्यादित महत्त्व असलेले कालवे सर्वसाधारणपणे, स्थानिक किंवा प्रादेशिक जलक्षेत्रांना एकमेकांशी जोडतात.
यात ग्रीसमधील कोरिंथ कालवा आहे. हा कालवा कोरिंथच्या आखाताला सारोनिक आखाताशी जोडतो. अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यातील केप कॉड कालवा आहे. तो केप कॉड आखाताला अटलांटिक महासागराशी जोडून किनाऱ्याजवळील जहाज वाहतुकीला कमी अंतराचा मार्ग उपलब्ध करून देते.
तसंच इंग्लंडमधील मँचेस्टर शिप कॅनालदेखील आहे. हा कालवा मँचेस्टर शहराला मर्सी नदीद्वारे आयरिश समुद्राशी (जो अटलांटिक महासागराचा भाग आहे) जोडतो. या कालव्यामुळे शहराला थेट समुद्राशी जोडलं जातं. त्यातून स्थानिक आर्थिक घडामोडींना आणि सागरी वाहतुकीला चालना मिळते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
मोठ्या बातम्या
बीबीसी मराठी स्पेशल
लोकप्रिय
मजकूर उपलब्ध नाही