'आई स्वप्नात आली अन् कॅन्सरचा उलगडा झाला', मेंदू आपल्याला खरंच झोपेत संदेश पाठवू शकतो का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एडलाइन म्हणतात की जर त्यांना ते स्वप्नं पडलं नसतं, तर त्यावेळेस त्यांच्या त्या आजाराबद्दल माहित झालं नसतं
    • Author, केट बोई
    • Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

एडलाइन यांनी 2011 मध्ये एक स्वप्नं पाहिलं. हे काही नेहमीसारखं साधं स्वप्न नव्हतं, तर या स्वप्नामुळं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

त्यांना खूपच उदास, निराश वाटत होतं. तीन वर्षापूर्वी निधन झालेल्या त्यांच्या आईची त्यांना खूप आठवण येत होती.

एडलाइन (नाव बदलण्यात आलं आहे) हाँगकाँगमध्ये राहतात. एका रात्री त्यांची आई त्यांच्या स्वप्नात आल्याचं त्या सांगतात.

"मला आठवतं, मी म्हणाले, 'आई, शेवटी मी तुला भेटलेच. तू कशी आहेस?' त्यावर, 'मी ठीक आहे. मात्र मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तू लवकरात लवकर तुझा चेक-अप करून घे,' असं आई म्हणाली," एडलाइन यांनी सांगितलं.

एडलाइन पुढे म्हणाल्या की, आईनं त्यांना स्वप्नात दिलेला हा संदेश त्यांनी गांभीर्यानं घेतला. त्या डॉक्टरांकडे गेल्या. नंतर त्यांना समजलं की, त्यांना कर्करोग झाला असून तो स्टेज-1 वर आहे. त्यावर उपाय करणं शक्य होतं. कारण आजाराचं वेळीच निदान झालं होतं.

"मी खूप आभारी आहे. एऱ्हवी मी स्वत:हून तपासणीसाठी गेले नसते," असं एडलाइन म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images

जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमधील माणसं हजारो वर्षांपासून स्वप्नांचं विश्लेषण करत आली आहेत. प्राचीन इजिप्शियन, ग्रीक आणि बॅबीलोनियन संस्कृतींमध्ये मानलं जायचं की स्वप्नांमधून भविष्यवाणी होऊ शकते.

अब्राहमिक धर्मांमध्ये (एकेश्वरवादी धर्म, ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम) स्वप्नांना देवाकडून पाठवलेली 'दृष्टी' मानलं गेलं आहे. काही आदिवासी समूहांमध्ये, स्वप्नांकडे आत्म्यांकडून मिळणारी मदत (स्पिरिट हेल्पर्स) म्हणून पाहिलं जातं.

एडलाइन म्हणाल्या की, त्यांना पारंपारिक चिनी संस्कृतीबद्दल माहिती होतं. त्यानुसार पूर्वज स्वप्नांच्या माध्यमातून संदेश पाठवू शकतात. मात्र त्यांच्याबरोबर असं काही घडेल, याचा विचार त्यांनी कधीही केला नव्हता.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

स्वप्नांबद्दलचं हे आकर्षण आता ऑनलाइन स्वरुपातदेखील पोहोचलं आहे. हाँगकाँगमधील 'डिस्कस' या फोरमचे यूझर्स त्यांच्या स्वप्नांबद्दलचे तपशील शेअर करतात. तर आपल्या स्वप्नांचं विश्लेषण करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करत असल्याचं, रेडिटवर असंख्य लोक सांगतात.

मात्र एडलाइन यांना पडलेल्या स्वप्नांमधून आपल्याला काय समजतं? आपण त्यांना किती गांभीर्यानं घ्यायला हवं? वैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ याबद्दल काय म्हणतात?

आपल्याला स्वप्नं का दिसतात?

आपल्या मेंदूला स्वप्नं पाहायला आवडतं.

डॉ. अबिदेमी ओताइकू ब्रिटनमधील इंपीरियल कॉलेज लंडनमध्ये न्यूरोसायन्टिस्ट आहेत. त्यांच्या मते, आपण जेव्हा रॅपिड आय मूव्हमेंट (गाढ झोप) म्हणजे आरईएम झोपेत असतो, तेव्हा आपण नक्कीच स्वप्नं पाहत असतो.

याचा अर्थ, आपल्या झोपेचा जवळपास एक-तृतियांश भाग स्वप्न पाहण्यात जाऊ शकतो.

जर गाढ झोपेच्या अभावामुळे आपण स्वप्न पाहू शकलो नाही, तर पुढील वेळेस आपला मेंदू आपल्याला अधिक जिवंत म्हणजे वास्तविक आयुष्याशी निगडीत स्वप्नं दाखवतो. या प्रक्रियेला 'आयएम रिबाऊंड' असं म्हणतात.

"शरीराला खरंतर स्वप्नं पाहायची असतात. त्यामुळे संधी मिळाल्यावर ते याची भरपाई करून घेतं," असं डॉ. ओताइकू म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गाढ झोपेच्या अभावामुळे जर आपल्याला स्वप्न पडत नसतील, तर पुढील वेळेस आपला मेंदू आपल्या आणखी वास्तविक आयुष्याशी संबंधित स्वप्नं दाखवतो. (प्रतीकात्मक फोटो)

आपण नेमकं का झोपतो? हे आजदेखील विज्ञानासाठी एक कोडं आहे.

सर्वसाधारणपणे संशोधकांना वाटतं की, झोपेमुळं मेंदूला आराम मिळतो आणि दिवसभरातील आठवणी व्यवस्थित मांडायला वेळ मिळतो.

स्कॅनद्वारे (मेंदूची तपासणी करणारं मेडिकल इमेजिंग तंत्रज्ञान) माहीत झालं आहे की, झोपेत असताना आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत बदलते. त्यामुळे त्या कालावधीत आपण आपल्या स्वप्नांना वेगळ्या प्रकारे अनुभवतो.

आपण जेव्हा स्वप्न पाहत असतो, तेव्हा आपल्याला तर्कशुद्ध विचार करण्यास मदत करणारे आपले फ्रंटल लोब्स काम करणं थांबवतात.

तर, भावनांशी निगडीत लिम्बिक सिस्टम खूप जास्त सक्रिय होतं.

"या कारणास्तव, आपली स्वप्नं अनेकदा खूप विचित्र असतात आणि फारशी लक्षात येत नाहीत," डॉ. ओताइकू म्हणाले.

स्वप्नांच्या आधारे आपण निर्णय घ्यावेत का?

स्वप्नांमध्ये आपण जे पाहतो, त्यामुळे जागेपणी आपल्याला अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी प्रेरणा मिळू शकते, असं संशोधनातून दिसून आलं आहे.

एका अभ्यासातून आढळलं आहे की, ज्या लोकांनी धूम्रपान सोडलं होतं आणि स्वप्नांमध्ये ते स्वत:ला धूम्रपान करताना पाहत होते. त्यांना ती सवय पुन्हा लागण्याची शक्यता कमी होती.

हाच परिणाम घटस्फोटित लोकांमध्येही आढळून आला. ज्या लोकांना त्यांच्या माजी जोडीदाराबद्दल स्वप्नं पडत होती, ते एक वर्षानंतर मानसिकदृष्ट्या अधिक निरोगी होते, असं संशोधकांना आढळलं.

खरं तर, सकारात्मक स्वप्नांच्या तुलनेत नकारात्मक स्वप्नांमुळे कधी-कधी लोकांना त्यांच्या समस्यांवर मात करण्यात अधिक प्रभावीपणे मदत होऊ शकते, असं दोन्ही अभ्यासातून असं समोर आलं.

फोटो कॅप्शन, काही अभ्यासांनुसार, एखाद्या समस्येबद्दल स्वप्न पडल्यास, त्यामुळे त्या समस्येवर उपाय करण्यास मदत होऊ शकते. (प्रतीकात्मक फोटो)

"तुम्ही तो अनुभव समजून घेत असता आणि सर्जनशील मार्गानं त्यावर मात करत असता," असं अमेरिकेचे ड्रीम्स रिसर्चर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. डायलन सेल्टरमॅन म्हणतात.

स्वप्नांमुळे आपल्याला समस्या सोडवण्यासदेखील मदत होऊ शकते. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात असं आढळलं की, जेव्हा त्यात सहभागी झालेल्या लोकांना एक कोडं सोडवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा ज्या लोकांनी त्याबद्दल स्वप्न पाहिलं होतं, त्यांनी अधिक चांगली कामगिरी केली.

सेल्टरमॅन यांच्या मते, मेंदूला एखादी समस्या सोडवण्यासाठी अधिक वेळ मिळतो आणि स्वप्नांमुळे आपल्याला त्याकडे अधिक सर्जनशीलपणे पाहता येतं, हे त्यामागचं कारण असू शकतं.

"स्वप्न त्यांना फक्त त्या दिशेनं एक छोटीशी सुरुवात करण्यासाठी प्रेरित करतं," असं सेल्टरमॅन म्हणतात.

स्वप्नांमध्ये तुमच्या भावनांचं प्रतिबिंब उमटतं का?

स्वप्नांमध्ये आपल्या दडलेल्या किंवा खऱ्या भावना उमटतात, असा याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ इतकाच आहे की, जागेपणी आपल्याला ज्या गोष्टींमध्ये रस असतो, काळजी वाटते, झोपेत असतानादेखील आपल्या मेंदूला त्याच गोष्टींमध्ये रस असतो.

सेल्टरमॅन म्हणतात की त्यांनी अशी माणसं पाहिली आहेत, ज्यांनी स्वप्नांमुळे त्यांच्या जोडीदाराशी ब्रेकअप केला. मात्र या लोकांनी आधीच त्यांच्या नात्यांमध्ये कटुता असल्याचं सांगितलं होतं.

"स्वप्नांमुळे त्यांना फक्त थोडाशी चालना मिळाली. त्यांना वाटलं की ते स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. मात्र हे त्यांच्या आधीच्याच विचारांशी सुसंगत होतं," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपण जागेपणी ज्या गोष्टींबद्दल विचार करतो, त्या गोष्टींबद्दल झोपेत असतानाही देखील आपल्या मेंदूला त्या गोष्टींमध्ये रस असतो, हे स्वप्नांमधून दिसून येतं. (प्रतीकात्मक फोटो)

मग, ज्या व्यक्तीबद्दल आपण कधीही विचारच केला नव्हता, अशा एखाद्या व्यक्तीबद्दल स्वप्नं पाहिल्यावर आपण काळजी करायला हवी का?

"जर तुम्ही एका आनंदी आणि प्रेमळ नात्यात असाल आणि एखाद्या रात्री तुम्हाला स्वप्न पडलं की तुम्ही दुसऱ्या कोणासोबत आहात. तर ते ठीक आहे. ती एक सामान्य गोष्ट आहे," असं सेल्टरमॅन म्हणतात.

"त्यासाठी तुम्ही स्वत:ला दोषी मानण्याची आवश्यकता नाही. त्याचा काहीतरी विशेष अर्थ असेलच असंही नाही," असं ते पुढे म्हणाले.

आपला मेंदू भविष्याचा वेध घेऊ शकतो का?

स्वप्नं जेव्हा भविष्यवाणीसारखी वाटतात आणि ती जेव्हा खऱ्या आयुष्यातील घटनांशी जुळतात, तेव्हा आपण त्यांच्याकडे लक्ष देतो, ती लक्षात ठेवतो.

"तुम्ही जेव्हाही स्वप्नं पाहता आणि ती खऱ्या आयुष्याशी सुसंगत नसतात, तेव्हा तुम्ही अशी स्वप्नं विसरून जाता," असं डॉ. अबिदेमी ओताइकू म्हणतात.

"मात्र भविष्यवाणीसारख्या वाटणाऱ्या स्वप्नांमागं आणखी एक कारणदेखील असू शकतं. त्याला 'इंटरोसेप्शन' असं म्हणतात."

"काहीजण त्याला आपलं सहावं इंद्रिय असंही म्हणतात. मूलत: ती शरीराची आंतरिक स्थिती ओळखण्याची, जाणवून घेण्याची मेंदूची क्षमता आहे," असं डॉ. ओताइकू म्हणाले.

फोटो स्रोत, Dr Abidemi Otaiku

फोटो कॅप्शन, डॉ. अबिदेमी ओताइकू म्हणतात की, "आपली स्वप्न भविष्यवाणी करत असल्याचं आपल्याला वाटतं, त्यामागे इंटरोसेप्शन हे एक कारण असू शकतं".

इंटरोसेप्शनशी संबंधित मेंदूचे भाग अनेकदा स्वप्न पाहताना सक्रिय असणाऱ्या भागांशी जुळतात.

काही संशोधकांना वाटतं की कदाचित याच कारणामुळं कधी-कधी आपली स्वप्नं आजारांचेही संकेत देत असल्यासारखं वाटतं.

"एका मर्यादेपर्यंत ही एक संभाव्य यंत्रणा असल्याचं दिसतं, जी यातील गोष्टींचं स्पष्टीकरण देऊ शकते," असं डॉ. ओताइकू पुढे म्हणाले.

भीतीदायक स्वप्नांबद्दल आपण किती विचार करायला हवा?

आपली स्वप्नं, मेंदूशी संबंधित काही विशिष्ट आजारांच्या धोक्याचे संकेत असू शकतात, असं डॉ. ओताइकू यांच्यासारख्या न्यूरोसायन्टिस्ट्सच्या संशोधनातून दिसतं.

"जितक्यांदा तुम्हाला वाईट स्वप्नं किंवा दु:स्वप्न पडतात, तितकाच डिमेंशिया आणि पार्किंसनचा आजार होण्याचा धोका वाढू शकतो," असं ते म्हणतात.

यासंदर्भात त्यांचे सिद्धांत किंवा थेअरी आहेत.

पहिला सिद्धांत, वाईट स्वप्नं किंवा दु:स्वप्न म्हणजे या आजारांचं प्रारंभिक लक्षण, संकेत असू शकतात.

दुसरा सिद्धांत, वाईट स्वप्नांमुळेही आरोग्यावर विपरित किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आणि तिसरा सिद्धांत, वाईट स्वप्नं आणि हे आजार, या दोघांमागे एकच कारण असू शकतं. उदाहरणार्थ, आपली अनुवांशिकता.

यातील कोणती गोष्ट योग्य आहे, हे जाणून घेण्यासाठी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इमेज रिहर्सल थेरेपीमध्ये रुग्ण वारंवार पडणाऱ्या वाईट स्वप्नांचा शेवट बदलण्याचा सराव करतात

या निष्कर्षांमुळे आपण निराश होता कामा नये. उलट आपलं आरोग्य सुधारण्याची एक संधी म्हणून त्याकडे पाहायला हवं, असं डॉ. ओताइकू म्हणतात.

अशा परिस्थितीत तणाव कमी करणं, चांगली झोप घेणं आणि झोपण्यापूर्वी घाबरवणारे किंवा हॉरर चित्रपट न पाहणं, यासारख्या गोष्टी उपयुक्त ठरतात.

गंभीर प्रकरणांच्या बाबतीत काही उपचारही उपलब्ध आहेत. इमेज रिहर्सल थेरेपीमध्ये रुग्ण त्यांना वांरवार पडणाऱ्या दु:स्वप्नांचा शेवट बदलण्याचा सराव करतात.

तसंच, प्राजोसिन हे रक्तदाबावरील औषध दु:स्वप्नं रोखू शकतं. मात्र त्याचबरोबर सामान्य स्वप्नं सुरूच राहतात.

"असं पूर्णपणे शक्य आहे की, दु:स्वप्नांवर उपचार केल्यामुळं आपल्या आरोग्यावर तत्काळ आणि आशा आहे की, दीर्घकाळ राहणारे सकारात्मक परिणाम होऊ शकतात," असं ओताइकू पुढे म्हणतात.

स्वप्नांचं विश्लेषण केलं पाहिजे का?

स्वप्नांमध्येच योग्य किंवा खरा अर्थ शोधणं दिशाभूल करणारं ठरू शकतं. कारण त्यात व्यक्तीच्या स्वत:च्या संदर्भाकडे दुर्लक्ष केलं जातं, असा इशारा डॉ. सेल्टरमॅन देतात.

त्यांना वाटतं की, "एखाद्या डेंटिस्टच्या तुलनेत एका सागरी जीवशास्त्रज्ञासाठी शार्कचा अर्थ पूर्णपणे वेगळा असू शकतो."

अर्थात, स्वप्नांमध्ये येणाऱ्या विषयांवर लक्ष दिल्यावर आपल्याला स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होऊ शकते, असं त्यांना वाटतं.

"आता या जगात नसलेल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल तुम्हाला वारंवार स्वप्नं पडत असेल किंवा तुम्हाला भविष्यात करायची इच्छा असलेल्या एखाद्या नोकरीबद्दल स्वप्न पडत असेल, असं होऊ शकतं," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

या विषयांवर लक्ष दिल्यास आपल्याला स्वत:बद्दल आणि आपल्या नातेसंबंधांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतं. कारण याच गोष्टींबद्दल आपल्याला सर्वाधिक स्वप्नं पडतात.

"जर स्वप्नांचं काही महत्त्व असेलच तर ते प्रामुख्यानं आपल्या सामाजिक जीवनातच दिसून येतं," असं डॉ. सेल्टरमॅन म्हणतात.

एडलाइन म्हणतात की आता त्या त्यांच्या स्वप्नांकडे अधिक लक्ष देतात आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठीचा एक संकेत म्हणून त्यांचा वापर करतात.

"आपली स्वप्नं कोणते संदेश देत आहेत, हे लक्षात येण्यासाठी आपण फक्त आपल्या आंतरिक भावनेवर अवलंबून राहिलं पाहिजे. स्वत:मध्ये डोकावून पाहिलं की तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल," असं त्या म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.