महिलांना सोलो ट्रॅव्हलिंगसाठी सर्वात सुरक्षित असलेले जगातील टॉप 5 देश कोणते?

फोटो स्रोत, stock photo/Getty Images

फोटो कॅप्शन, महिला एकट्यानं पर्यटनाला जाण्याचं नियोजन करत आहेत, मात्र त्यांची सुरक्षेबद्दलची चिंता अजूनही कायम आहे.
    • Author, लिंडसे गैलोवे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अनेक महिला एकट्यानं पर्यटन करतात. अशा महिलांची जगभरात मोठी संख्या आहे. हा ट्रेंड वेगानं वाढतो आहे.

आता पूर्वीच्या तुलनेत जास्त महिला, सोलो ट्रॅव्हल म्हणजे एकट्यानं पर्यटन करण्यासंदर्भात माहिती शोधत आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये अशा प्रकारची माहिती शोधणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.

महिला सोलो ट्रिपच्या योजना आखत आहेत. मात्र एकट्यानं पर्यटन, प्रवास करताना सुरक्षेबाबतच्या त्यांच्या चिंता कायम आहेत.

फेब्रुवारी 2026 मध्ये यासंदर्भात एक सर्वेक्षण झालं होतं. त्यामध्ये 59 टक्के महिलांनी सांगितलं होतं की त्यांना रात्री एकट्यानं चालणं, सर्वाधिक असुरक्षित वाटतं.

आपण पुरुषांपेक्षा जास्त प्रवास, पर्यटन करत नाही, कारण सुरक्षेची चिंता वाटते, असं महिलांनी सांगितलं.

अशा परिस्थितीत, जगात महिलांना ज्या देशांमध्ये एकट्यानं प्रवास करताना सुरक्षित वाटतं, अशा देशांबद्दल जाणून घेणं आवश्यक ठरतं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

अर्थात, महिलांसाठी कोणता देश किती सुरक्षित आहे, हे सांगणारी कोणतीही जागतिक स्तरावरील यादी नाही.

यासंदर्भात, बीबीसीनं जॉर्जटाउन विद्यापीठातील विमेन, पीस अँड सिक्युरिटी (डब्ल्यूपीएस) इंडेक्स आणि ग्लोबल पीस इंडेक्सचा अभ्यास केला. त्याचबरोबर ज्या महिला एकट्यानं प्रवास करतात, अशा महिलांशी देखील बीबीसीनं संवाद साधला.

यातून, महिलांना एकट्यानं प्रवास करताना सुरक्षित वाटू शकतं, असे 5 देश समोर आले आहेत.

1. कोस्टा रिका

मध्य अमेरिकेत असलेला कोस्टा रिका या देशाचा अलीकडेच जगातील सर्वात सुखी,आनंदी देशांमध्ये समावेश झाला आहे.

डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये या देशाचं स्थान 34 वं आहे. इथल्या डिजिटल नोमॅड व्हिसामुळे रिमोटली म्हणजे ऑफिसमध्ये न जाता काम करणारे लोकदेखील इथं येत आहेत. याला 'रिमोट वर्क व्हिसा' असंदेखील म्हणतात.

या व्हिसाद्वारे रिमोट वर्कर्सना (दूरवरून काम करणारे कर्मचारी) दुसऱ्या देशात राहून आपल्या कंपनी किंवा ग्राहकांसाठी ऑनलाइन काम करण्याची कायदेशीर परवानगी मिळते.

फोटो स्रोत, Nano Calvo/VWPics/Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, कोस्टा रिकाचा समावेश जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये झाला आहे.

मॉली गॅनन ट्रॅव्हल एजंट आहेत. "कोस्टा रिका जगातील अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे एकट्या महिलेला अनोळखी लोकांच्या गाठीभेटी घेणं सर्वात सोपं आहे," असं मॉली म्हणाल्या.

सांता टेरेसा आणि नोसेरा सारख्या पर्यटन स्थळी सर्फिंग, योगासनं, कॅफे आणि समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत लोकांशी सहजपणे संवाद साधता येतो, त्यांच्याशी जोडून घेता येतं.

ॲशली हंटर तिथे फिरून आल्या आहेत.

"समुद्रकिनाऱ्यावरील शांतता आणि तिथलं वातावरण, हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. दिवसा मी फोटो काढायचे, पाऊस आल्यावर एखाद्या शांत ठिकाणी बसून स्नॅक्स खायचे आणि स्केच काढायचे." असं त्या म्हणाल्या.

2. एस्टोनिया

डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये एस्टोनिया हा देश 11 व्या स्थानावर आहे. ही त्याची आतापर्यंतची सर्वात चांगली क्रमवारी (रँकिंग) आहे.

महिलांचं आरोग्य, आर्थिक सहभाग आणि सामुदायिक सुरक्षा यांच्या दृष्टीकोनातून हा एक चांगला देश आहे. ग्लोबल पीस इंडेक्समध्ये एस्टोनिया 24 व्या स्थानावर आहे.

वेरोविका रोमेने ब्लॉगर आहेत.

"एस्टोनियामध्ये मला कधीही असुरक्षित वाटलं नाही", असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Artur Widak/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, ग्लोबल पीस इंडेक्समध्ये एस्टोनिया 24 व्या क्रमांकावर आहे.

टालिन ही एस्टोनियाची राजधानी आहे. युनेस्कोच्या यादीत असलेलं तिथलं ओल्ड टाउन, सोलो ट्रॅव्हल म्हणजे एकट्यानं प्रवास करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.

तिथे दगड-गोट्यांच्या गल्ल्या आहेत, छोट्या-छोट्या दुकानांमध्ये पारंपारिक वस्तू आणि जेवण मिळतं, असं रोमेने म्हणाल्या.

"एकट्यानं फिरत असताना, आर्ट सीन आणि टालिनच्या जुन्या गल्ल्यांच्या इतिहासामध्ये मला पूर्णपणे आरामदायी, निवांत वाटायचं," असं त्या म्हणाल्या.

टालिन या राजधानीच्या शहराच्या पश्चिमेला तबसालू नेचर पार्क आहे.

रोमेने म्हणाल्या, "तिथे एकट्यानं फिरणं खूप आरामदायी, समाधान देणारं होतं. तिथले लोक खूपच चांगले आणि स्वागतशील वृत्तीचे होते."

3. व्हिएतनाम

ग्लोबल पीस इंडेक्समध्ये व्हिएतनाम 38 व्या स्थानावर आहे. आग्नेय आशियातील देशांमध्ये तो सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये देखील हा देश शेजारील देशांपेक्षा चांगला आहे.

मॉली गॅनन इथे गेल्या वर्षी फिरायला गेल्या होत्या.

फोटो स्रोत, Allison Joyce/Getty Images

फोटो कॅप्शन, ग्लोबल पीस इंडेक्समध्ये व्हिएतनामचा क्रमांक आग्नेय आशियामध्ये सर्वात वरच्या देशांमध्ये आहे.

"इथे रोजच्या गप्पा, संवाद अतिशय उत्साहानं होतात. कॅफेच्या मालकाशी बोलणं, रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या टेबलवर बसणं असो की बसमधून प्रवास करणं असो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी मिसळू शकता," असं त्या म्हणाल्या.

लेखिका ट्रेसी स्मिथ म्हणाल्या, "मी व्हिएतनामला अनेकदा केले आहे. सापामध्ये ट्रेकिंग केलं, मेकांग डेल्टामध्ये होमस्टेमध्ये राहिले आणि स्थानिक लोकांसोबत टेट फेस्टिवल साजरा केला. प्रत्येक वेळेस मला इथं सुरक्षित वाटलं आणि स्वागतशील वातावरण जाणवलं."

तुमच्या चेकलिस्टचा भाग असलेल्या ठिकाणीच फक्त जाऊ नका. तर स्थानिक गाईडबरोबर समन्वय साधत, होमस्टेमध्ये राहा आणि एकट्यानं प्रवास करण्याचा आनंद घ्या, असा सल्ला ट्रेसी देतात.

4. उरुग्वे

उरुग्वेनं यावर्षीच्या डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये मोठी झेप घेतली आहे. या यादीत उरुग्वे आधी 59 व्या क्रमांकावर होता. आता तो 35 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

न्याय आणि सुरक्षेच्या क्षेत्रात या देशानं केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याचं स्थान उंचावलं आहे. विशेषकरून तिथे महिलांवरील हिंसाचाराचं प्रमाण कमी झालं आहे.

ग्लोबल पीस इंडेक्सचा विचार करता, उरुग्वे हा दक्षिण अमेरिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा शांत देश आहे. तर पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना आहे.

फोटो स्रोत, Ivanna INFANTOZZI / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये उरुग्वे आधी 59 व्या स्थानावर होता, तो आता 35 व्या स्थानावर आला आहे.

क्लाउडिया तवानी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या अनुभवाचं वर्णन केलं आहे.

"उरुग्वे अतिशय शांत देश आहे. तिथले लोक तुमचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात. मी तिथे मार्च महिन्यात गेले होते. तेव्हा तिथे जास्त पर्यटक नव्हते. चांगलं, व्यवस्थित बोलणारे अनेक स्थानिक लोक मला भेटले. ते त्यांच्या देशाबद्दल, तिथला इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती देण्यासाठी तयार असायचे," असं क्लाउडिया म्हणाल्या.

नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) उरुग्वेमधील कोलोनीया डेल साक्रामेंटो हे फिरण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. त्याव्यतिरिक्त, बारियो हिस्टोरिको हे देखील उत्तम आहे. तिथे या देशातील अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत.

या परिसराबद्दल तवानी म्हणतात, "हे दगडी गल्ल्यांचं जाळं आहे. रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या भिंती आणि रंगीबिरेंगी फुलं दिसतात. विटेंज कारमुळे त्याचं सौंदर्य आणखी वाढतं."

5. नॉर्वे

डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये नॉर्वे तिसऱ्या स्थानावर आहे. कल्याणकारी योजना, समान वेतन आणि समुदायाची सुरक्षा या क्षेत्रात नॉर्वेनं अतिशय चांगली कामगिरी केली आहे.

हा देश 2017 पासून टॉप 3 मध्ये राहिला आहे. या देशातील मजबूत सामाजिक सुरक्षा व्यवस्थेमुळे महिलांना काम करण्याची आणि सरकारमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळते.

एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिला पर्यटकांसाठी (सोलो विमेन ट्रॅव्हरल्स) या देशाचं सर्वात मोठं वैशिष्ट्यं म्हणजे इथली सुरक्षा आणि निसर्गाची सुंदर दृश्यं.

फोटो स्रोत, Thomas Trutschel/Photothek via Getty Images

फोटो कॅप्शन, डब्ल्यूपीएस इंडेक्समध्ये हा देश 2017 पासून टॉप 3 मध्ये आहे.

जैनीस लिंट्ज पर्यटक आहेत.

"इथे एकट्यानं प्रवास करणं खूपच सोपं होतं. मी इथे केलेला क्रुझ प्रवास हा सर्वात विलक्षण अनुभवांपैकी एक होता. आम्हाला सील, वॉलरस, आर्क्टिक फॉक्स आणि रेनडिअर दिसले," असं त्या म्हणाल्या.

लिसा मिशेल बर्न्स, 'द वॉंडरिंग लेन्स' या ट्रॅव्हल फोटोग्राफी क्लबच्या संस्थापक आहेत.

"नॉर्वेमध्ये इतकं सुरक्षित वाटलं की मी रात्रीच्या वेळेस बाहेर जाऊन आकाशाचे फोटोदेखील काढले," असं त्या म्हणाल्या.

त्या दोन वेळेस नॉर्वेमध्ये एकट्याच गेल्या होत्या. बर्न्स यांना तिथली आरामदायी हॉटेल्सदेखील आवडली.

"मला नेहमीच नॉर्वेला जायला आवडेल. कारण तिथले रोरबुए (मच्छिमारांची जुनी घरं, ज्यांचं रुपांतर आता केबिनमध्ये करण्यात आलं आहे) आणि स्कँडिनेव्हियन इंटेरिअर डिझाईन मला खूप आवडली आहेत," असं त्या म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)