इराणचे राजपुत्र मुराद यांचं बिहारच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलशी काय आहे कनेक्शन?

अनेक स्थानिक लोक मुराद शाह यांना सुफी संतासारखं मानून पुजतात.

फोटो स्रोत, Seetu Tiwari

फोटो कॅप्शन, अनेक स्थानिक लोक मुराद शाह यांना सुफी संतासारखं मानून पुजतात.
    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदी, पाटणा
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

पाटण्यातील राजू साह हे भाजी विकतात. ते आठवड्यातून सोमवार आणि गुरुवारी 'हजरत साहब' यांच्या दरबारात जाऊन अगरबत्ती लावतात.

बिहारमधील सर्वात मोठ्या पीएमसीएच रुग्णालयात (पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल) हजरत साहब यांच्या मजारसमोर उभे असलेले राजू हात वर करून प्रार्थना करत आहेत. त्यांच्या डोक्यावर रुमाल आहे आणि ते हळूच काहीतरी पुटपुटत आहेत.

'तुम्ही इथे का येता?' असं विचारल्यावर ते हळूवार आवाजात म्हणतात, "हजरत साहबमुळे खूप फायदा झाला आहे. त्यांच्या आशीर्वादाने आमची सर्व कामं सुरळीत होतात. कुटुंबात काही अडचण येत नाही. इथे आलं की खूप समाधान मिळतं."

राजू साह ज्या हजरत साहब यांच्या मजारवर अनेक वर्षांपासून येत आहेत, ती मजार इराणचे राजपुत्र मिर्झा मुराद शाह यांची आहे.

ही मजार पाटणा येथील अशोक राजपथवर असलेल्या पीएमसीएचच्या टाटा वॉर्डजवळ आहे. इथले अनेक लोक मिर्झा मुराद शाह यांना सूफी संताप्रमाणे पूजतात.

आज हे ऐकून आश्चर्य वाटतं की, इराणचे राजपुत्र मिर्झा मुराद पाटण्यात काय करत होते आणि त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसांसाठी गंगेच्या काठावर वसलेल्या पाटणा शहराचीच का निवड केली?

इराणी राजपुत्र मुराद आणि पाटणा कनेक्शन

मुघल सम्राट जहांगीर (1605-27) आणि शाहजहान (1627-58) यांच्या काळात बिहार हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रदेश होता.

इतिहासकार सय्यद हसन अस्करी आणि कयामुद्दीन अहमद त्यांच्या 'कॉम्प्रिहेन्सिव हिस्ट्री ऑफ बिहार – पार्ट टू' या पुस्तकात लिहितात की, "त्या काळात प्रांतात (बिहार) मोठ्या पदांवर सुबेदार आणि मनसबदार नेमले जात होते. अनेक राजपुत्रांनाही बिहारचे सुबेदार बनवण्यात आलं होतं आणि त्या वेळी या प्रदेशाच्या सीमाही विस्तारल्या होत्या."

मुराद शाह यांच्या मजारवर मुसलमानांपेक्षा हिंदू मोठ्या संख्येने येतात.

फोटो स्रोत, Seetu Tiwari

फोटो कॅप्शन, मुराद शाह यांच्या मजारवर मुसलमानांपेक्षा हिंदू मोठ्या संख्येने येतात.

जहांगिरच्या काळात बिहारचे शेवटचे गव्हर्नर मिर्झा रुस्तम सफवी (1626-27) होते. त्यांना मसूद फिदाई या नावानेही ओळखलं जात असत.

मिर्झा रुस्तम सफवी हे इराणच्या सफवी घराण्यातील होते. ते पर्शियाचे (आजचं इराण) राजा शाह इस्माईल यांचे पणतू होते.

याच रुस्तम सफवींचा मोठा मुलगा मिर्झा मुराद होते, ज्याची मजार पाटणातील पीएमसीएच येथे आहे. मिर्झा मुराद शाहजहान आणि जहांगीर या दोघांच्याही दरबारात होते.

एशियाटिक सोसायटीने प्रकाशित केलेल्या 'द मआसिर-उल-उमारा' या पुस्तकात मिर्झा मुराद यांचा उल्लेख आहे. त्यात लिहिलं आहे की, "मिर्झा मुराद यांचा विवाह अब्दुर रहीम खान-ए-खाना यांच्या मुलीशी झाला होता."

"जहांगीरने त्यांना 'इल्तिफात खान' ही पदवी दिली होती. त्यांना 2000 रँक आणि 800 घोडे मिळाले होते. शाहजहानच्या दरबारातून त्यांनी 16व्या वर्षी राजीनामा दिला आणि त्यांना वर्षाला 40 हजार रुपयांची पेन्शन निश्चित झाली होती. त्यानंतर ते पाटण्यामध्ये ते आपलं जीवन शांतपणे जगू लागले."

पीएमसीएच, मुरादपूर आणि मुराद शाह यांचा संबंध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मुरादशाह हे पाटणा इथं राहत असताना त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर हवेली बांधली. तसेच त्यांनी एक बाग आणि बाजारही तयार केला.

त्या हवेलीला मुराद कोठी आणि बागेला मुराद बाग (आजचा सब्जीबाग त्याचाच भाग होता) असं नाव देण्यात आलं. बाजाराला मुरादपूर असं नाव पडलं आणि त्याच नावाने पुढे एक परिसरही ओळखला जाऊ लागला.

बिहार सरकारने प्रकाशित केलेल्या 'पाटणा' या कॉफी टेबल बूकमध्ये पीएमसीएचच्या इमारतीच्या स्थापनेत मिर्झा मुराद शाह यांचा उल्लेख आढळून येतो.

या माहितीनुसार, "1857 च्या युद्धानंतर बंगाल सरकारने कलकत्ता (आताचं कोलकाता) येथील मेडिकल स्कूलवरील ताण कमी करण्यासाठी पाटणा येथे एक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला."

"1874 मध्ये 'बांकीपूर डिस्पेन्सरी' सुरू झाली, जी नंतर 'टेम्पल स्कूल ऑफ मेडिसिन' म्हणून ओळखली जाऊ लागली (याच ठिकाणी पुढे पीएमसीएच तयार झाला)."

"सुरुवातीला ही डिस्पेन्सरी आज जिथे बीएन कॉलेजचे हॉस्टेल आहे, तिथे होती. पण 1875 मध्ये जागा कमी पडल्यामुळे ती 16व्या शतकातील संत शाह मुराद यांच्या 'मुराद कोठी'मध्ये हलवण्यात आली. शाह मुराद हे गव्हर्नर रुस्तम सफवी यांचे पुत्र होते."

बिहार सरकारच्या कॉफी टेबल बुकमध्ये मुराद शाह यांचा उल्लेख सूफी संत म्हणून करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Seetu Tiwari

फोटो कॅप्शन, बिहार सरकारच्या कॉफी टेबल बुकमध्ये मुराद शाह यांचा उल्लेख सूफी संत म्हणून करण्यात आला आहे.

कॉफी टेबल बूकनुसार, 18व्या शतकाच्या सुरुवातीला ही कोठी (वाडा) इंग्रजांच्या ताब्यात होती, पण नंतर त्याची मालकी खासगी झाली. यामुळे टेम्पल स्कूल ऑफ मेडिसिनसाठी जुलै 1875 मध्ये सरकारला ही जमीन 28 हजार रुपयांना खरेदी करावी लागली.

नंतर 1903 मध्ये याच परिसरात सुमारे 1 लाख रुपये खर्च करून जनरल हॉस्पिटल ऑफ बांकीपूर सुरू करण्यात आले.

बिहार बंगालपासून वेगळं झाल्यानंतर 1927 मध्ये इथे अधिकृतपणे मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आलं. त्याला पुढे पीएमसीएच म्हटलं जाऊ लागलं.

आज जिथे पीएमसीएचचा प्रशासकीय विभाग आहे, तिथे पूर्वी मुराद कोठी होती. त्याचप्रमाणे ओ मॅली यांच्या 'बिहार अँड उडीसा गॅझेटियर - पाटणा' या पुस्तकातही मुराद बागचा उल्लेख आहे.

गॅझेटियरमध्ये नमूद आहे की, "या जागेवर आधी रेव्हेन्यू कौन्सिलच्या द्वितीय अधिकाऱ्याचं निवासस्थान होतं. 1771 ते 1775 दरम्यान इथे फॅक्टरी प्रमुख राहत होते. 1777 मध्ये इव्हान ला नावाचा अधिकारी भारत सोडेपर्यंत इथेच राहिला. श्रीमती हेस्टिंग्स 1781 पर्यंत इथे राहत होत्या. त्यानंतर ही जागा रिकामी पडली आणि पुढे टेम्पल मेडिकल स्कूलसाठी ती ताब्यात घेण्यात आली."

इतिहासकार एस.एच. अस्करी यांच्या 'मेडिव्हल बिहार: सल्तनत अँड मुघल पिरियड' या पुस्तकाच्या फुटनोटमध्ये नमूद आहे की, 1776 मध्ये या घराची किंमत 15 हजार रुपये होती.

4 जानेवारी 1790 रोजी गव्हर्नर जनरलच्या आदेशानुसार या घराचा आणि परिसराचा लिलाव करण्यात आला.

सफवी आणि मुघल वंश - मध्ययुगातील इस्लामी जगाची कहाणी

पाटण्यात 1891 मध्ये स्थापन झालेल्या खुदा बख्श ओरिएंटल पब्लिक लायब्ररीचे संचालक आणि इतिहासकार इम्तियाज अहमद यांनी बीबीसीला सांगितलं की, "मध्ययुगात सफवी वंशाचं राज्य होतं आणि ते मुघलांच्या समकालीन होते. बाबरच्या काळापासूनच त्यांचे मुघलांशी संबंध होते, पण हुमायूँच्या काळात हे संबंध अधिक जवळचे झाले. शेरशाहकडून पराभव झाल्यानंतर हुमायूँ इराणला गेले आणि तिथे सफवी राजा शाह ताहमस्प यांच्याकडे आश्रय घेतला."

मध्ययुगीन काळात इस्लामिक जगतात चार शक्ती होत्या.

इम्तियाज अहमद सांगतात की, "त्या काळात चार मोठ्या शक्ती होत्या, ऑटोमन तुर्क, भारतातील मुघल, मध्य आशियातील उझबेक आणि इराणमधील सफवी वंश. सफवी शिया होते, तर बाकी सर्व सुन्नी होते."

मिर्झा मुराद शाह यांचा चुलत भाऊ, मिर्झा नौजर यांच्या नावावरून पाटणा शहरात नौजर कटरा नावाचा परिसर आहे.

फोटो स्रोत, Seetu Tiwari

फोटो कॅप्शन, मिर्झा मुराद शाह यांचा चुलत भाऊ, मिर्झा नौजर यांच्या नावावरून पाटणा शहरात नौजर कटरा नावाचा परिसर आहे.

"बाबर भारतात येण्यामागचं कारण उझबेक होते, कारण त्यांच्यात सतत लढाया होत असत. उझबेकांच्या दबावामुळेच बाबरला मध्य आशिया सोडून भारतात यावं लागलं. काही लोक सांगतात की शाह ताहमस्प यांनी हुमायूँसमोर अट ठेवली होती की, त्यांनी शिया धर्म स्वीकारावा. तसेच कंधार परत देण्याचीही अट घातली होती."

वास्तविक कंधार पूर्वी सफवी साम्राज्याचा भाग होता, पण बाबरने तो जिंकला होता. हुमायूँसमोर शाह ताहमस्प यांनी तो परत देण्याची अट ठेवली होती. मात्र हुमायूँ भारतात परत आल्यानंतर काही काळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कंधारवरून मुघल आणि सफवी यांच्यात अनेक वेळा युद्धं झाली. शेवटी कंधार पुन्हा सफवी साम्राज्याच्या ताब्यात गेले.

नौजर कटरा पाटणा शहरात

सफवी वंशातील मिर्झा मुराद शाह अखेर भारतात कसे आले?

या प्रश्नावर पाटलीपुत्र विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अविनाश कुमार झा सांगतात की, "मुघल साम्राज्य खूप समृद्ध होतं आणि अकबरच्या काळात इराणमधील अनेक लोक भारतात येऊन स्थायिक झाले. औरंगजेबाची पत्नी दिलराज बानो या देखील सफवी वंशातील होत्या आणि त्या मिर्झा मुराद शाह यांच्या नात्यातील होत्या."

मिर्झा मुराद शाह यांचे काका मिर्झा मुजफ्फर होते आणि त्यांच्या मुलाचं नाव मिर्झा नौजर होतं. इतिहासकार एस.एच. अस्करी यांच्या 'मेडिव्हल बिहार - सल्तनत अँड मुघल पिरियड' या पुस्तकात म्हटलं आहे की, "जुन्या पाटणामध्ये (पाटणा शहर) नौजर कटरा नावाचा भाग मिर्झा नौजर यांच्या नावावरूनच ओळखला जातो."

मिर्झा नौझर यांची मजार

फोटो स्रोत, Seetu Tiwari

फोटो कॅप्शन, मिर्झा नौझर यांची मजार

"मिर्झा नौजर बहराइचमध्ये नियुक्त होते, पण आजारपणामुळे ते काम नीट करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना त्यांच्या भावाकडे, मिर्झा मुराद यांच्याकडे पाठवण्यात आलं. त्यांना वर्षाला 30 हजार रुपयांची पेन्शन मिळत होती."

नौजर कटरा येथेही हजरत नौजर गाझी साह यांच्या नावाची एक मजार आहे. ही मिर्झा नौजर यांची मजार असल्याचे इतिहासकार इम्तियाज अहमद सांगतात.

मजारच्या अगदी शेजारी राहणाऱ्या सुमित्रा देवी सांगतात, "इथे कधी कधी पूजा होते. बहुतेक वेळा ही जागा बंदच असते. परंतु, सणासुदीला आम्ही इथे अगरबत्ती लावतो."

'युद्धामुळे कुणाचंही भलं होत नाही'

सय्यद मोहम्मद शमीम अख्तर हे सध्या मिर्झा मुराद शाह यांच्या मजारचे मुतवल्ली (देखरेख करणारे) आहेत. त्यांचे वडील रझा करीम हे देखील या मजारचे मुतवल्ली होते.

शमीम अख्तर सांगतात, "माझे वडील सांगायचे की, ही आधी उघडी मजार होती. जी.एन. वर्मा नावाच्या एका ठेकेदाराने ही मजार बांधली. आजही या मजारवर मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू लोक येतात."

राजू साह हे आठवड्यातून दोन वेळा मिर्झा मुराद यांच्या मजारवर अगरबत्ती लावण्यासाठी येतात.

फोटो स्रोत, Seetu Tiwari

फोटो कॅप्शन, राजू साह हे आठवड्यातून दोन वेळा मिर्झा मुराद यांच्या मजारवर अगरबत्ती लावण्यासाठी येतात.

मिर्झा मुराद शाह हे शिया होते. परंतु, ही मजार बिहार सुन्नी वक्फ बोर्ड अंतर्गत आहे.

इराणच्या युद्धाबद्दल विचारल्यावर शमीम अख्तर म्हणतात, "आमचे बाबा (मिर्झा मुराद) नेहमी शांततेचीच शिकवण देत होते. ते फकीर होते आणि लोकांचं भलं करत होते. आम्हीही शांतता हवी असणारे लोक आहेत. युद्धातून सरकारशिवाय कुणाचं भलं झालं आहे का?"

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन