आशा भोसले : कमी वयात लग्न, यशाचा लपंडाव; तरी जिद्द आणि प्रतिभेच्या बळावर अनेक दशकं 'स्वरसम्राज्ञी'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले
    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहासकार, बीबीसीसाठी
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

शरीर निघून जातं, पण काही आवाज कायम हवेत गुंजत राहतात, खूप दूरपर्यंत… कधी कधी कायमचे. 'नया दौर' पासून 'तीसरी मंझील', 'हरे रामा हरे कृष्णा' ते 'उमराव जान', 'इजाजत' आणि 'रंगीला'पर्यंत…

काळ बदलला, गाणी बदलली, पिढ्या बदलल्या, पडद्यावरच्या नायिका बदलल्या, परंतु आशा भोसलेंचा आवाज मात्र नेहमीच तरुण आणि ताजाच राहिला.

त्यांच्या खट्याळ, मस्तीखोर, रोमँटिक गाण्यांचा उल्लेख जास्त होतो, पण त्यांनी केलेल्या प्रदीर्घ आणि खडतर संघर्षाबद्दल मात्र कमी बोललं जातं.

खरं तर, इतकी अफाट, विलक्षण प्रतिभा असूनही आशा भोसले यांना अनेकदा 'नंबर दोन'वरच समाधान मानावं लागलं.

कारण त्यांची स्वतःची महान आणि दिग्गज मोठी बहीण लता मंगेशकर हिंदी चित्रपटसृष्टीत 'नंबर वन' वर होत्या.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

हिंदी पार्श्वगायनाच्या अवकाशात लता मंगेशकर यांच्यासारख्या तेजस्वी सूर्यासमोर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं आशा भोसले यांच्यासाठी मोठं आव्हान होतं.

त्या काळात हे जवळजवळ अशक्यच वाटत होतं. परंतु, जिद्द आणि अफाट प्रतिभेच्या जोरावर आशा भोसलेंनी त्या सावलीतून बाहेर येत, संगीताच्या क्षितिजावर स्वतःचं स्वतंत्र आणि भक्कम स्थान निर्माण केलं.

संगीताचा वारसा आणि संघर्षाची सुरुवात

आशा भोसले यांचं संगीताशी नातं लहानपणापासूनच जोडलेलं होतं. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीताचे जाणकार आणि मराठी रंगभूमीवरील मानाचं व्यक्तिमत्त्व होतं.

लता, मीना, आशा, उषा आणि मुलगा हृदयनाथ या त्यांच्या पाचही मुलांच्या आयुष्यात लहानपणापासूनच संगीताचा सूर घुमत होता. लहानपणी लता आणि छोट्या आशा यांची जोडी अतूट होती. आशा या आपल्या मोठ्या बहिणीच्या मागे सावलीसारख्या फिरायच्या.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 2008 मध्ये मुंबईत त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर (मध्यभागी) यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आशा भोसले (डावीकडे) आणि लता मंगेशकर.

पण आशा अवघ्या 9 वर्षांच्या असतानाच त्यांच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. वडिलांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. उदरनिर्वाहासाठी कुटुंब पुणे आणि कोल्हापूर असं करत 1945 साली मुंबईत येऊन स्थायिक झालं.

येथे अवघ्या 14 वर्षांच्या लता मंगेशकर यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि चित्रपटसृष्टीत आपला संघर्ष सुरू केला.

लवकरच आशाही त्यांच्या संघर्षात सामील झाल्या.

पहिलं पाऊल आणि यशाचा लपंडाव

1948 साली 'चुनरिया' या चित्रपटातून आशा भोसले यांनी पार्श्वगायनात पाऊल टाकलं. या चित्रपटात त्यांनी गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्यासोबत 'सावन आया रे' हे गाणं गायलं.

त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1949 मध्ये 'रात की रानी' या चित्रपटात त्यांना पहिलं सोलो (एकल) गाणं मिळालं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले 92 वर्षांच्या होत्या (फाइल फोटो)

हाच तो काळ होता, जो लता मंगेशकर यांच्यासाठी मोठा 'टर्निंग पॉइंट' ठरला. 'महल' चित्रपटातील 'आएगा आनेवाला' या गाण्यामुळे त्या रातोरात खूप प्रसिद्ध झाल्या आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

1950 च्या दशकात लता मंगेशकर यशाच्या पायऱ्या झपाट्याने चढू लागल्या. नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन आणि एस.डी. बर्मन यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांच्या त्या पहिली पसंती बनल्या.

लता यांचं मोठं स्थान आणि आशांचा संघर्ष

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या काळात लता मंगेशकर यांचा हिंदी पार्श्वगायनावर मोठा दबदबा होता. दुसरीकडे खूप कष्ट करूनही आशा भोसले यांना हवं तसं यश मिळत नव्हतं. त्यांना बहुतांश वेळा बी-ग्रेड किंवा कमी बजेटच्या चित्रपटांतच संधी मिळायची.

त्या ए. आर. कुरेशी, सज्जाद हुसेन आणि सरदार मलिक यांच्यासारख्या संगीतकारांसोबत काम करत असत. पण मोठे संगीतकार आणि मुख्य प्रवाहातील मोठे बॅनर मात्र त्यांच्यापासून दूरच होते.

आशा भोसले यांचं चरित्र लिहिणारे चित्रपट इतिहासकार राजू भारतन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटलं होतं की, "सुरुवातीला आशा भोसले यांचा प्रवास विशेष चमत्कारिक असा नव्हता, त्या फक्त एक संघर्ष (स्ट्रगलर) करणाऱ्या गायिका होत्या. मी त्यांना कामासाठी झगडताना, धडपडताना पाहिलं आहे."

"निर्माते जर लता मंगेशकर यांना घेऊ शकत नसतील तर त्यांची पुढची पसंती ही गीता दत्त आणि शमशाद बेगम असायच्या."

"त्या यादीत आशा भोसले यांचं नाव तर कुठेच नसायचं. त्यामुळे जे काही काम मिळालं, ते त्यांनी स्वीकारलं आणि गायलं. त्यांच्या 'मराठी मिश्रित हिंदी'ची अडचण असल्यामुळेही त्यांना त्रास झाला. त्यांनी लता मंगेशकर यांच्यासारखं उर्दू सुधारण्यावर फारसं काम केलं नव्हतं. याशिवाय, त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आणि अडचणी होत्या."

फोटो स्रोत, AFP via Getty Images

राजू भारतन यांनी ज्या वैयक्तिक घटनेचा उल्लेख केला, त्यावेळी आशा भोसले या केवळ 16 वर्षांच्या होत्या. त्यांनी 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्याशी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही बहिणींमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ही दरी पुढची अनेक वर्षं भरून निघाली नव्हती.

लता मंगेशकर यांना हे नातं त्यांच्या धाकट्या बहिणीसाठी योग्य नाही, असं वाटत होतं. एका मुलाखतीत आशा भोसले यांनीही मान्य केलं होतं की "लतादीदी या लग्नाच्या पूर्ण विरोधात होत्या.

एक काळ असा आला होता की, आमच्यातील नातेसंबंधात खूपच कटुता आली होती, आणि अनेक वर्षं आमच्यात बोलणंसुद्धा बंद होतं."

आशा भोसले यांचं गणपतराव भोसले यांच्यासोबतचं लग्न त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी खूप कठीण आणि त्रासदायक ठरलं.

आशा भोसले यांनी त्या दिवसांची आठवण सांगताना लिहिलं की, "ते कुटुंब खूप पारंपरिक विचारांचं होतं आणि त्यांना 'गायिका सून' मान्य नव्हती. त्यांच्या पतींचा स्वभावही कठोर, वाईट आणि रागीट होता. त्यांना इतरांना त्रास किंवा वेदना देण्यात आनंद मिळत असत. पण बाहेरच्या लोकांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती."

या ताणतणाव आणि अडचणींनी भरलेल्या काळात आशा भोसले यांची कारकीर्दही फारशी पुढे जात नव्हती. त्याच वेळी लता मंगेशकर यांनी मात्र यशाचं शिखर गाठलं होतं.

ओ.पी. नय्यर आणि एस.डी. बर्मन यांची साथ

सुरुवातीला आशा भोसले यांच्या कारकिर्दीला बिमल रॉय यांच्या 'परिणीता' (1953) आणि राज कपूर यांच्या 'बूट पॉलिश' (1954) या चित्रपटांतील गाण्यांमुळे मजबुती मिळाली.

परंतु, संगीतकार ओ.पी.नय्यर यांच्याशी झालेली भेट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. लता मंगेशकर यांच्याशिवायही आपण सुपरहिट संगीत देऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता. लता मंगेशकर याही त्यांच्यासोबत काम करत नव्हत्या.

सुरुवातीला संगीतकार ओ.पी. नय्यर यांची पहिली पसंती गीता दत्त असायच्या. पण 'सीआयडी' चित्रपटानंतर त्यांच्या संगीतामध्ये आशा भोसले यांनी आपलं स्थान निर्माण केलं.

नय्यर यांनी आशा भोसले यांच्या आवाजातील खोल सूर ओळखले आणि त्याचा योग्य वापर केला. 1957 च्या 'नया दौर' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मोठा इतिहास रचचला.

फोटो स्रोत, khagesh dev burman

फोटो कॅप्शन, एस डी बर्मन

'उडे जब-जब जुल्फें तेरी आणि 'मांग के साथ तुम्हारा' यांसारख्या गाण्यांमुळे आशा भोसले पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्रीचा आवाज बनल्या आणि बी.आर. चोप्रांसारख्या मोठ्या चित्रपट समूहाचा त्या भाग झाल्या.

त्याच वर्षी म्हणजे 1957 मध्ये संगीतकार एस.डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे आशा भोसले यांच्यासाठी यशाची नवीन दारे उघडली गेली.

पुढील पाच वर्षे एस.डी. बर्मन यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत काम केलं नाही. या काळात त्यांच्या संगीत कॅम्पमधील मुख्य गायिका म्हणून आशा भोसले उदयास आल्या.

या सगळ्या घडामोडींमुळे लता मंगेशकर बहिणीवर नाराज होत्या, अशा त्या काळात चित्रपटसृष्टीत आणि मासिकांमध्ये चर्चा होती. परंतु, या 5 वर्षांत आशा भोसले यांनी आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

संगीतकार एस.डी. बर्मन, किशोर कुमार, आशा भोसले आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी या चौघांनी मिळून रोमँटिक आणि खट्याळ गाण्यांचं एक नवं युग सुरू केलं.

'हाल कैसा है जनाब का' (चलती का नाम गाडी), 'आँखों में क्या जी', 'छोड दो आँचल' (पेइंग गेस्ट) आणि 'दीवाना मस्ताना हुआ दिल' (बंबई का बाबू) अशी अनेक सुंदर गाणी आजही लोकांच्या लक्षात आहेत.

एस.डी. बर्मन यांनी आशा भोसले यांना फक्त खट्याळ आणि हलक्या गाण्यांपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर त्यांच्या आवाजातील खोलीही घडवली. 'काला पानी' चित्रपटात त्यांचं 'अच्छा जी मैं हारी' हे मजेशीर आणि रोमँटिक गाणं होतं, तर 'नजर लगी राजा तोरे बंगले पर' हे ठुमरी शैलीतील गाणंही होतं.

तसंच 'सुजाता' आणि 'लाजवंती' यांसारख्या चित्रपटांत त्यांनी आशा भोसले यांना गंभीर आणि भावपूर्ण गाणीही गायला लावली. त्यामुळे आशा भोसले या प्रत्येक प्रकारचं गाणं सहज गाऊ शकतात, हे सिद्ध झालं.

ओ.पी. नय्यर यांच्याशी जवळीक आणि नवीन ओळख

ओ.पी. नय्यर आणि एस.डी. बर्मन यांच्यासोबतचा हा काळ आशा भोसले यांच्यासाठी केवळ कामासाठीच नव्हता, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा सुवर्णकाळ होता.

पण या यशाच्या मागे एक वैयक्तिक अंधारही होता. 1960 मध्ये तीन मुलांसह त्यांचा विवाह दुःखदरीत्या संपुष्टात आला.

या गोंधळाच्या काळात ओ.पी.नय्यर यांच्यासोबत आशा भोसले यांची जवळीक वाढू लागली, ज्यामुळे चित्रपट वर्तुळात खळबळ उडाली. त्या काळात लता मंगेशकर आणि ओ.पी. नय्यर यांचे संबंध आधीच वेगळे झाले होते. त्यामुळे आशा भोसले यांचं नय्यर यांच्याजवळ जाणं दोन्ही बहिणींमधील दुरावा आणि कटुता आणखी वाढवणारं ठरलं.

परंतु, आशा भोसले यांच्या कारकिर्दीसाठी हा काळ सर्वोत्तम ठरला. ओ.पी. नय्यर यांच्यासोबत त्यांनी हिंदी संगीताला अनेक अजरामर गाणी दिली. 'आइए मेहरबान' (हावडा ब्रिज), 'आओ हुजूर तुमको', 'कजरा मोहब्बत वाला' (किस्मत) आणि 'ये है रेशमी जुल्फों का अंधेरा' (मेरे सनम) ही त्यातील काही अजरामर गाणी आहेत.

ओ.पी. नय्यर यांनी आशा भोसले यांना लता मंगेशकर यांच्या सावलीतून बाहेर काढून एक स्वतंत्र, 'बोल्ड' आणि वेगळ्या शैलीची गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. याचं खरं श्रेय नय्यर यांनाच जातं.

फोटो स्रोत, Jack Vartoogian/Getty Images

ओ.पी. नय्यर यांच्यासोबत आशा भोसले यांनी सुमारे 60 चित्रपटांमध्ये 324 गाणी गायली. म्हणजेच प्रत्येक चित्रपटात सरासरी पाचपेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली होती.

यशस्वी आणि हिट गाण्यांची मोठी यादी असूनही, संगीतविश्वातील प्रत्येक मोठा मार्ग अजूनही लता मंगेशकर यांच्या आवाजातूनच जात होता. आशा भोसले यांनी स्वतःची वेगळी ओळख नक्कीच निर्माण केली होती. परंतु, हिंदी पार्श्वगायनाच्या जगतावर लता मंगेशकर यांचाच एकछत्री प्रभाव कायम होता.

आशा भोसले यांच्या चरित्रात राजू भारतन यांनी लिहिलं आहे की, 1950 आणि 60 च्या दशकात संगीतविश्वात लता मंगेशकर यांचा इतका मोठा प्रभाव होता की, त्या एका गाण्यासाठी सुमारे 500 रुपये घ्यायच्या, तर आशा भोसले यांना मात्र 100 ते 150 रुपयांवरच समाधान मानावं लागायचं.

लता मंगेशकर यांना कोणती गाणी गायची आणि कोणासाठी गायची याची निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं, परंतु आशा भोसले यांच्याकडे असा पर्याय नव्हता. हा फरक त्यांना खूप जाणवत होता आणि आतून दुखावणारा होता.

मोठ्या बहिणीकडून मिळालेला दुरावा आणि साथ न मिळणं यामुळे दोघींमधील अंतर आणखी वाढलं. पण आशा भोसले यांनी हे आव्हान म्हणून स्वीकारलं आणि आपण स्वतःच्या मेहनतीवर, आपली वेगळी ओळख निर्माण करून दाखवण्याचं ठरवलं.

बहिणींमधील या परस्पर संघर्षाचा आणि मत्सराची चर्चा फक्त वास्तवातच नव्हे तर चित्रपटांमध्येही दिसून आली. प्रख्यात दिग्दर्शिका सई परांजपे यांनी त्यांच्या 'साज' (1997) या चित्रपटात संगीत क्षेत्रातील दोन बहिणींच्या अशाच नात्याची कथा पडद्यावर मांडल्याचे मानले जाते.

पंचम आणि आशा, एक सुरेल नातं

एस.डी. बर्मन यांच्यासोबत काम करत असताना आशा भोसले यांची ओळख त्यांचा मुलगा आर.डी. बर्मन (पंचम) यांच्याशी झाली. वयाने लहान असलेले पंचम आपल्या वडिलांच्या मोठ्या सावलीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

पुढच्या काळात ही जोडी संगीताच्या जगात एक नवा इतिहास घडवणार आहे, अशी त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती

1966 साली नासिर हुसेन यांच्या 'तीसरी मंझिल' या चित्रपटातून आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांचं पहिलं व्यावसायिक सहकार्य सुरू झालं. इथूनच त्यांच्या सर्जनशील आणि सुरेल नात्याचा पाया रचला गेला, ज्याने पुढे हिंदी चित्रपटसंगीताचं स्वरूपच बदलून टाकलं.

एकीकडे 'ओ मेरे सोना रे' या गाण्यात रोमँटिक गोडवा होती, तर दुसरीकडे 'ओ हसीना जुल्फों वाली'सारखं वेगवान आणि जोशपूर्ण गाणं होतं. या गाण्यात आशा भोसले यांनी आपल्या श्वासांवर ठेवलेला जबरदस्त ताबा आणि सुरांवरील नियंत्रण पाहून सर्वच जण थक्क झाले.

आर.डी. बर्मन जेव्हा चित्रपटसृष्टीत आले, तेव्हा त्यांच्या मनात जगभरातील संगीत होतं. त्यांना हिंदी सिनेमात फंक, जॅझ, कॅबरे आणि रॉक-एन-रोलसारखे नवे प्रयोग करायचे होते.

फोटो स्रोत, Pancham Unmixed

फोटो कॅप्शन, रेकॉर्डिंग दरम्यान आर. डी. बर्मन आशा भोसले यांच्यासोबत

पण अशा अवघड आणि वेगळ्या सुरांसाठी त्यांना एक लवचिक, धाडसी आणि प्रयोगशील आवाज हवा होता. आशा भोसले यांनी ही भूमिका उत्तम प्रकारे निभावली आणि त्या 'तो' आवाज बनल्या.

आर.डी. बर्मन यांनी आपल्या संगीतात पाश्चिमात्य शैलीची छटा आणली, आणि आशा भोसले यांच्या आवाजाने त्या संगीताला एक वेगळीच आकर्षकता आणि मोकळेपणा दिला.

परंतु, पंचम यांचं लक्ष फक्त जोशपूर्ण गाण्यांवरच नव्हतं. त्यांनी आशा भोसलेंच्या आवाजातील त्या वेगळ्या आणि खोल पैलूंनाही ओळखलं, ज्याकडे जगाने आतापर्यंत दुर्लक्ष केलं होतं.

एकीकडे 'पिया तू अब तो आजा' (कारवाँ) आणि 'दम मारो दम' (हरे रामा हरे कृष्णा) या गाण्यांनी आशा भोसले यांना 'कॅबरे क्वीन' आणि 'वेस्टर्न व्हाइब' म्हणजेच आधुनिक, वेस्टर्न स्टाइलची गायिका म्हणून ओळख मिळवून दिली.

तर दुसरीकडे आर.डी. बर्मन यांच्यासोबत 'इजाजत' (1987) या चित्रपटातील 'मेरा कुछ सामान' आणि 'खाली हाथ शाम आई है' यांसारख्या गाण्यांमधून त्यांनी शांतपणे आणि भावपूर्ण पद्धतीने वेदना व्यक्त करता येतात, हे दाखवून दिलं.

विशेषतः 'मेरा कुछ सामान' या गाण्यात आशा भोसले यांनी ठराविक ताल नसलेल्या, गद्यासारख्या वाटणाऱ्या कवितेला ज्या भावपूर्ण आणि आत्मीयतेनं गायलं, ते आजही गायकीचा एक उत्तम आदर्श मानलं जातं.

आर.डी. बर्मन यांच्यासोबतच्या या जुगलबंदीत आशा भोसले यांनी स्वतःला प्रत्येक प्रकारच्या गाण्यांत सहज बसवलं- कधी कॅबरेची खट्याळता, कधी गझलची शांतता, तर कधी शास्त्रीय बंदिशीची अवघड रचना. यातून त्यांनी आपल्या आवाजाचा रंग बदलण्याची क्षमता विलक्षण असल्याचं आणि त्याला संगीत जगतात तोड नसल्याचं दाखवून दिलं.

सुरांची नवी वाट, 'उमराव जान'मध्ये आशा भोसलेंची जादू

परंतु, नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी आणखी एक मोठं आव्हान निवडलं होतं, ज्यामुळे आशा भोसले यांच्या आवाजात असा बदल दिसला, की त्या फक्त एक गायिका न राहता दिग्गज बनल्या.

त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये गझल म्हटलं की लता मंगेशकर यांचंच नाव घेतलं जायचं. मुझफ्फर अली यांच्या 'उमराव जान'साठी संगीतकार खय्याम यांच्यासमोर 'पाकीजा'सारख्या मोठ्या परंपरेनंतर काहीतरी वेगळं आणि नवीन करण्याचं मोठं आव्हान होतं.

खय्याम यांनी धाडसी निर्णय घेत आशा भोसले यांची या चित्रपटासाठी निवड केली, पण त्यांनी एक कठोर अट ठेवली, "या गाण्यांत 'आशा' नकोय."

त्यांचा अर्थ असा होता की, आशा भोसले यांनी आपली नेहमीची खट्याळ आणि नखरेल शैली बाजूला ठेवून, शांत आणि शास्त्रीय पद्धतीने गाणं गायलं पाहिजे. आशा भोसलेंनी आपला आवाज साधारण दीड सूर (स्केल) खाली घेऊन गावं, अशी खय्याम यांची इच्छा होती.

इतक्या खालच्या सुरात गाणं त्यांच्यासाठी अगदी नवीन आणि थोडंसं भीतीदायक होतं. 8 दिवसांच्या कठोर रियाजानंतर जेव्हा रेकॉर्डिंग सुरू झालं, तेव्हा एक क्षण असाही आला की त्यांचा आत्मविश्वास डळमळला. कदाचित आपण हे गाणं गाऊ शकणार नाही, असंही त्यांना वाटलं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले आणि ए आर रहमान (फाइल फोटो)

पण रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर आशा भोसले यांनी आवाज ऐकला, तेव्हा त्या स्वतःच थक्क झाल्या. 'दिल चीज क्या है', 'इन आँखों की मस्ती के' आणि 'ये क्या जगह है दोस्तों' यांसारख्या कालातीत गझलांनी त्यांच्या आवाजाचा एक मखमली, शांत आणि भावपूर्ण पैलू जगासमोर आणला, जो पूर्वी फारसा कुणाला माहीतच नव्हता.

याचा परिणामही मोठा झाला. 'उमराव जान'साठी खय्याम आणि आशा भोसले यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा क्षण इतिहासात नोंदला गेला.

काळ पुढे सरकत राहिला, संगीताचे रंग आणि शैली बदलत गेल्या, पण आशा भोसले यांच्या आवाजातील ऊर्जा कधीच कमी झाली नाही. पुढच्या काळात ए. आर. रहमान यांच्यासोबत 'रंगीला', 'लगान' आणि 'ताल'सारख्या चित्रपटांतूनही त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, त्यांच्या सुरांवर वयाचा काहीही परिणाम होत नाही.

ज्या काळात त्यांच्या पिढीतील अनेक गायक बदलत्या संगीतशैली आणि रिमिक्सबद्दल नाराज होते, त्या वेळी आशा भोसले यांनी मात्र नव्या काळाला मनापासून स्वीकारलं. त्यांनी स्वतःच आपल्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स अल्बम काढले आणि नव्या पिढीला त्या जादुई संगीताची पुन्हा नव्याने ओळख करून दिली.

आशा भोसले यांचा प्रवास खूप कठीण, काट्यांनी भरलेला होता. स्वतःच्या बहिणीच्या मोठ्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना खूप झगडावं लागलं. पण शेवटी त्यांच्या जिद्दीचा विजय झाला.

त्यांनी जगाला दाखवून दिलं की, त्या प्रत्येक प्रकारात सहज बसणाऱ्या, एक परिपूर्ण कलाकार आहेत, असा आवाज, जो कालही तितकाच तरुण होता आणि ज्याची जादू प्रत्येक पिढीच्या मनाला स्पर्श करत राहील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)