आशा भोसलेंची गाणी दाखवल्यामुळे पाकिस्तानच्या चॅनलला नोटीस; काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, AFP via Getty Images

    • Author, शहजाद मलिक
    • Role, बीबीसी उर्दू
    • Reporting from, इस्लामाबाद
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी (12 एप्रिल) निधन झालं. आशा भोसलेंच्या निधनानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. केवळ भारतातल्याच नाही तर सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या श्रोत्यांनी देखील यावर दुःख व्यक्त केलं.

पाकिस्तानच्या कलाकारांनी देखील आशा भोसलेंच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या. जगभरातील टीव्ही चॅनल्सवर आशा भोसले यांच्या निधनाच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजवर देखील आशा भोसले यांच्या मृत्यूसंदर्भातील बातम्या प्रसारित करण्यात आल्या.

मात्र, आता पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामकाने (PEMRA) आशा भोसलेंच्या संदर्भातील सामग्री प्रसारित केल्यामुळे जिओ न्यूजला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती या चॅनलच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

जिओ न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून अशी नोटीस मिळाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी लिहिलंय, "महान कलाकारांशी संबंधित बातम्या देताना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाच्या आठवणी सांगण्याचा प्रघात आहे. पण तरीही PEMRAने त्यावर बंदी घातली."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशा भोसले

पाकिस्तानच्या नियामकाने मात्र नोटीस पाठवण्याच्या या कृतीचं समर्थन केलं आहे.

बीबीसी उर्दूने 'जिओ न्यूज'ला पाठवण्यात आलेल्या नोटिशीबाबतची भूमिका जाणून घेण्यासाठी 'पेमरा'च्या (PEMRA) प्रवक्त्याशी संपर्क साधला. त्यावर ते म्हणाले, "एखाद्या कलाकाराच्या मृत्यूची बातमी प्रसारित करण्यावर 'पेमरा'चा कोणताही आक्षेप नाही; परंतु चित्रपटांमधील गाणी वाजवणे, ही नेमकी कोणत्या प्रकारची पत्रकारिता आहे?"

पेमराने पाठवलेली ही नोटीस नेमकी काय आहे आणि जिओ न्यूजने याबाबत काय म्हटलं आहे हे जाणून घेण्याआधी, आपण सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत काय चर्चा सुरु आहे हे पाहूया.

'जिओ न्यूज'च्या व्यवस्थापकीय संचालकांची एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर अनेकांनी 'पेमरा'वर (PEMRA) टीका केली.

सिंधचे माजी राज्यपाल मुहम्मद जुबेर यांनी आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, "आज आशा भोसले यांची गाणी प्रसारित केल्याबद्दल नोटिसा पाठवल्या जात आहेत, आणि उद्या असे म्हटले जाईल की, एखाद्या पाकिस्तानी वाहिनीवर विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक करणारा मजकूर का प्रसारित करण्यात आला?"

फोटो स्रोत, X

फोटो कॅप्शन, जिओ न्यूजच्या व्यवस्थापकीय संचालकांची एक्सवरील पोस्ट

मोना आलम नावाच्या एका व्यक्तीने लिहिलं, 'आशा भोसले या एक अशा महान गायिका आहेत, ज्यांचे संगीत सर्व सीमा ओलांडून जातं.'

"मला या गोष्टीचा आनंद आहे की, त्यांच्या निधनानंतर 'जिओ न्यूज' त्यांना विसरलं नाही, कारण आशाजींवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या लाखो पाकिस्तानींची हीच भावना आहे. आम्ही त्यांची गाणी ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत."

काही सोशल मीडियावरील लोकांनी मात्र 'जिओ न्यूज'वर आशा भोसले यांच्याविषयी करण्यात आलेल्या वार्तांकनाच्या आशयावर आक्षेप घेतला आहे.

मीना घौरी नावाच्या एका व्यक्तीने लिहिलं, 'मी ही क्लिप पाहिली; सध्याची परिस्थिती पाहता, ही क्लिप बऱ्यापैकी मोठी होती. मलाही आशा भोसले आवडतात. पण या बातमीत त्यांच्या आवाजापेक्षा गाणीही दाखवली गेली.'

पेमराने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीत, जिओ न्यूजला 27 एप्रिल रोजी प्रत्यक्ष किंवा वकिलामार्फत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

'पेमरा'ने (PEMRA) जिओ न्यूजला पाठवलेल्या या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 'या चॅनलने भारतीय गायिका आशा भोसले यांच्या निधनाच्या बातमीसोबतच, आशा भोसले यांनी गायलेल्या गीतांच्या क्लिप देखील दाखवल्या होत्या.'

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2018मध्ये दिलेल्या एका निर्णयाचा देखील संदर्भ या कारणे दाखवा नोटीसमध्ये देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या वाहिन्यांवर कोणत्याही प्रकारचा भारतीय मजकूर दाखवण्यावर त्यावेळी बंदी घातली होती.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मियाँ साकिब निसार यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला होता.

'पेमरा'च्या (PEMRA) मते, ही कृती करून सदर टीव्ही चॅनलने केवळ न्यायालयाच्या या निर्णयाचेच उल्लंघन केलं नाही, तर 'पेमरा अध्यादेश 2002' च्या कलम 20 चेही उल्लंघन केले आहे.

फोटो स्रोत, sourceAPP

फोटो कॅप्शन, PEMRA नुसार, जिओ न्यूजने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पेमराकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर देताना, 'जिओ न्यूज'चे व्यवस्थापकीय संचालक अझहर अब्बास यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "ज्याप्रमाणे ज्ञानाला सीमा नसतात, त्याच प्रमाणे कला देखील मानवतेच्याच वारशाची वाहक असते. त्यामुळे तिलाही सीमांचे बंधन असू नये."

"स्वतः आशा भोसले या पाकिस्तानी दिग्गज गायिका नूरजहाँ यांचा मनापासून आदर करत असत; त्या नूरजहाँ यांना आपली मोठी बहीण मानत असत. त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत काम केलं, तसेच नासिर काझमी यांच्यासारख्या महान उर्दू कवींच्या काव्यरचनांचीही प्रशंसा केली होती."

'बीबीसी उर्दू'ने संपर्क साधला असता, अझहर अब्बास यांनी सांगितले की, त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती पोस्ट एक पत्रकार म्हणून लिहिली होती; "परंतु पेमराकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीबाबत आमची संस्थाच कायदेशीर मार्गाने उत्तर देईल."

पेमरा या नियामकाने मात्र ही नोटीस योग्य असल्याचं म्हटलं आहे. या संस्थेच्या एका प्रवक्त्याने 'बीबीसी उर्दू'ला सांगितलं की, "जगात इतरत्र कुठेही अशी पद्धत नाही की, एखाद्या महान कलाकाराच्या निधनानंतर चार-पाच मिनिटांचे असे विशेष कार्यक्रम प्रसारित केले जावेत, ज्यामध्ये केवळ चित्रपटांमधील गाण्यांचाच समावेश असेल."

त्यांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने पेमराने खाजगी टीव्ही वाहिन्यांना 'कारणे दाखवा नोटिसा' बजावल्या आहेत; या निर्णयानुसार, पाकिस्तानमध्ये भारतीय मजकूर प्रसारित करण्यास करण्यास मनाई आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)